जॉर्ज वेस्टिंगहाऊसवेस्टिंगहाऊस, जॉर्ज : (६ ऑक्टोबर १८४६ – १२ मार्च १९१४). अमेरिकन संशोधक, अभियंते व उद्योगक. त्यांचा जन्म सेंट्रल ब्रीज (न्यूयॉर्क राज्य) येथे झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण फार झालेले नव्हते. स्केनेक्टडी येथील युनियन कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ शिक्षण घेतले, तथापि ते पदवी संपादन करू शकले नाहीत. वडिलांच्या शेतीच्या अवजारांचे उत्पादन करणार्याळ यंत्रशाळेत त्यांना काम व संशोधन करण्याची संधी लाभली. अमेरिकेतील यादवी युद्धात त्यांनी पायदलात व नाविक दलात काम केले होते.

हवेच्या दाबावर काम करणारा ⇨गतिरोधक हा त्यांचा सर्वांत महत्त्वाचा शोध होय (१८६८). त्यांनी १८६९ साली त्याचे एकस्व (पेटंट) घेतले. त्यामुळे या संपीडित वायूवर चालणाऱ्या हवागतिरोधकाला त्यांचे नाव देण्यात आले. रेल्वेचे सिग्नल आपोआप वरखाली होतील, अशी यंत्रणा त्यांनी शोधली. ही यंत्रणा पूर्णपणे विद्युतीय व संपीडित (दाबयुक्त) हवा यांवर चालणारी होती. गाडी सुरू होताना व एकदम थांबताना धक्का न बसेल अशी व्यवस्था त्यांनी केली. रूळमार्गविषयक मोठे संशोधन करून त्यांनी नावलौकिक मिळविला. मालवाहू रेल्वेगाडीसाठी त्यांनी स्वयंचलित हवागतिरोधकाचा शोध लावला. १८९३ साली अमेरिकेत आगगाड्यांसाठी हे गतिरोधक वापरणे कायद्याने बंधनकारक झाले. स्वयंचलित हवागतिरोधकांचा वापर यूरोपातही होऊ लागला. त्यामुळे त्याचे प्रमाणीकरण करणे फायदेशीर ठरेल, असे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी या गतिरोधक सामग्रीचे प्रमाणीकरण केले. अशा प्रकारे आधुनिक प्रमाणीकरणाची कल्पना प्रत्यक्षात आणणारे ते पहिले संशोधक ठरले. मोठमोठ्या नळांतून पाण्याप्रमाणे नैसर्गिक वायूही दूर अंतरावर सुरक्षितपणे वाहून नेता येईल, अशी यंत्रणा शोधून तिच्यात त्यांनी सुधारणा केल्या (१८८३). सिग्नल यंत्रणेप्रमाणेच याकरिताही त्यांनी हवागतिरोधकातील आपल्या ज्ञानाचा उपयोग केला होता.

विद्युत्‌ क्षेत्रात त्यांनी मौलिक कार्य केले. ⇨रोहित्र विकासात त्यांनी कार्य करून बफालो (न्यूयॉर्क राज्य) शहराला प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशांनी वाहणार्याच) विद्युत्‌ प्रवाहाने वीज पुरवली. प्रत्यावर्ती विद्युत्‌ प्रवाहाच्या पुरवठ्यद्वारे प्रकाशमान होणारे हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले. १८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या कोलंबियन एक्स्पोझिशन या जागतिक प्रदर्शनासाठी त्यांनीच विजेची सोय केली. नायगरा धबधब्यावरील नव्या जलविद्युत्‌ केंद्रात त्यांनी १८९४ मध्ये नवी १० विद्युत्‌ जनित्रे बसविली. नागरी वाहतुकीसाठी त्यांनी वाफ टरबाइन शोधले व ते बाजारातही आणले.

इ. स. १८६५ मध्ये त्यांनी घूर्णी वाफ एंजिनाचे पहिले एकस्व घेतले. त्यांच्या नावावर अशी सु. ४०० एकस्वे आहेत. वेस्टिंगहाऊस एअर ब्रेक कंपनी (१८६९), युनियन स्विच अँड सिग्नल कंपनी (१८८२) व वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक कंपनी (१८८६ वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असे नामांतर १८८९ साली) या त्यांनी स्थापन केलेल्या कंपन्या होत. त्यांच्या कंपनीने नीकोला टेस्ला यांनी अभिकल्पित केलेल्या नवीन बहुकला प्रत्यावर्ती विद्युत्‌ प्रवाह चलित्राचे हक्क मिळविले. याच्यामुळे चलित्रासाठी (विद्युत्‌ ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणार्यात साधनासाठी) व प्रकाशासाठी ऊर्जा निर्माण करणारे साधन तयार करता येई. १९०७ मध्ये आर्थिक मंदीच्या संकटात कंपन्यांवरचे त्यांचे नियंत्रण कमी झाले आणि १९११ सालापर्यंत या कंपन्यांबरोबरचे संबंध त्यांनी तोडून टाकले.

हवागतिरोधक, विद्युतीय व वाफ यंत्रसामग्रीसाठी त्यांनी फ्रान्स, जर्मनी व ग्रेट ब्रिटनमध्ये कार्यशाळा उभारल्या. त्यांच्या अन्य संशोधनात ढकलमोटारगाडीसाठी (ट्रॉली कारसाठी) विद्युत चलित्र, भुयारी रेल्वेसाठी विद्युत्‌ गतिरोधक, आगगाड्यांचे विद्युतीकरण, स्वयंचलित वाहनासाठी धक्काशोषकांचे विविध प्रकार, घर्षण दंतचक्र, दंतचक्र (गीअर्ड) टरबाइन, वायुदाब स्प्रिंग यांचा समावेश होतो.

जेव्हा प्रत्यावर्ती विद्युत्‌ प्रवाहाचा वापर धोकादायक मानत, तेव्हा त्याच्या वितरण-प्रेषणासाठी त्यांनी आघाडीवर राहून कार्य केले. १९१० मध्ये ते अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल एंजिनिअर्सचे अध्यक्ष झाले.

न्यूयॉर्क येथे ते मरण पावले. मरणोत्तर १९५५ मध्ये त्यांना ‘हॉल ऑफ फेम’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

कुलकर्णी, सतीश वि.