धोकासूचक, विद्युत् : कोणत्याही ठिकाणी धोक्याची स्थिती उत्पन्न झाल्याबरोबर तिची योग्य सूचना देण्याकरिता बसविलेले साहित्य. आग लागली, तापमान अथवा दाब वाढला, तर त्याची सूचना देण्यासाठी असे साहित्य वापरता येते. उद्योगधंद्यात या साहित्याचा अनेक ठिकाणी उपयोग करतात. अणुकेंद्राचे भंजन करून उष्णता उत्पन्न करण्याच्या अणुभट्टीमध्ये बिघाड झाला, तर त्याची ताबडतोब सूचना देण्याकरिता असे साहित्य बसविलेले असते. तसेच घरात अथवा इतर संरक्षित ठिकाणी चोर शिरला, तर ती बातमी देण्यासाठीही या प्रकारचे साहित्य बसविता येते.

आ. १. घरात चोर शिरल्याची सूचना देणारी योजना : (१) दरवाजाला जोडलेला स्विच, (२) विद्युत् घटमाला, (२ अ) रोहित्र, (३) विजेची घंटा, (४) अभिचालित्र, (५) तपासणी स्विच, (६) नियंत्रक स्विच, (७) साहित्य चालू नसल्याचे दर्शविणारा दिवा.

अशा साहित्यात (१) धोक्याची नोंद करणारा आणि (२) त्या नोंदीचा उपयोग करून सूचना देणारा असे दोन मुख्य भाग असतात. हे भाग विद्युत् मंडलाने जोडलेले असल्यामुळे ते एकमेकांपासून पाहिजे तितक्या अंतरावर बसविता येतात. संबंधित व्यक्तींना सूचना मिळण्यासाठी साधारणतः लुकलुकणारा किंवा लाल भडक दिवा लागतो आणि घंटाही वाजू लागते अथवा जरूर असल्यास मोठा भोंगाही वाजविण्याची व्यवस्था करता येते. अणुभट्टीच्या परिसरात किरणोत्सर्गाचे (भेदक कण अथवा किरण बाहेर पडण्याचे) प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढले, तर तेथे काम करणाऱ्या व्यक्तींच्या जिवाला अपाय होण्याचा संभव असतो. म्हणून आयनीकरण कोठी, गायगर-म्यूलर गणित्र इ. [ → कण अभिज्ञातक] किरणोत्सर्गशोधक साधने बसविलेली असतात. या उपकरणांच्या मदतीने अणुभट्टीतील न्यूट्रॉनांच्या घनतेचे प्रमाण व ते प्रमाण बदलण्याचा वेगही समजतो. त्यावरून जवळच्या व्यक्तींना जरूर असल्यास त्वरेने दूर जाण्याची सूचना मिळते. तसेच अणुभट्टीमधील उष्णता बाहेर नेणाऱ्या द्रव्याचा म्हणजे शीतनकाचा प्रवाह थांबला किंवा अणुभट्टीच्या मुख्य कोशामध्ये अथवा नळामध्ये दाब फार वाढला, तर त्याचीही सूचना मिळते.

आ. २. अद्दश्य किरणांचा उपयोग करणारी धोकासूचक योजना : (१) जंबुपार किंवा अवरक्त किलणांचा दिवा, (२) किरणांनी रोखलेला मार्ग, (३) प्रकाशविद्युत् घट, (४) अभिचालित्र, (५) विजेची घंटा.

घरात शिरणाऱ्या चोराची सूचना देण्याच्या साहित्यात घरातील प्रत्येक दाराजवळ एक विशिष्ट प्रकारचा स्विच बसवितात. चोराने एखादा दरवाजा उघडला म्हणजे तेथील स्विच बंद होतो व सूचक घंटा वाजू लागते. अशा साहित्याला लागणाऱ्या विद्युत् शक्तीकरिता नेहमीच्या विद्युत् शक्तीचा रोहित्राद्वारे (विद्युत् दाब बदलणाऱ्या साहित्याद्वारे) उपयोग करतात किंवा घरात ठेवलेली विद्युत् घटमाला वापरतात. घटमालेमुळे हे साहित्य सदैव चालू राहते. अशा योजनेची एक साधी पद्धत आ. १ मध्ये दाखविली आहे. या पद्धतीत ही योजना बंद किंवा चालू ठेवण्यासाठी मुख्य नियंत्रक स्विच (६) हा आहे. ज्या वेळी (१) या क्रमांकाने दर्शविलेल्या स्विंचामधून विद्युत् प्रवाह वाहतो त्या वेळी (४) हा अभिचालित्र (एका भागातून जाणाऱ्या विद्युत् प्रवाहात बदल झाल्यास दुसऱ्या भागातून विद्युत् प्रवाह सुरू करण्याचे साधन) स्विच खाली ओढला जाऊन बंद होतो. त्यामुळे घंटा वाजत नाही. या परिस्थितीत या योजनेला जोडलेला कोणताही दरवाजा उघडला, तर तेथील (१) हा स्विच उघडतो व मुख्य मंडलातील प्रवाह खंडीत होतो. त्यामुळे (४) हा स्विच चालू स्थितीत येतो व घंटेचे मंडल पूर्ण होऊन घंटा वाजू लागते.

चोराची सूचना देणारी आणखी एक योजना आ. २ मध्ये दाखविली आहे. या प्रकारात अदृश्य किरणांचा (जंबुपार किंवा अवरक्तवर्णपटातील जांभळ्याच्या पलीकडील किंवा तांबड्याच्या अलीकडील अदृश्य–किरणांचा) आ. २ मध्ये (२) या मार्गातून कोणीही व्यक्ती जाऊ लागली, तर (१) या अदृश्य किरणांच्या उद्‌गमापासून (३) या प्रकाशविद्युत् घटाकडे (प्रकाश पडला असता ज्याची विद्युत् स्थिती बदलते अशा साधनाकडे) जाणारे किरण खंडित होतात व त्यामुळे या घटातून जाणारा विद्युत् प्रवाह बदलतो व (४) हे अभिचालित्र कार्यान्वित होऊन (५) ही घंटा वाजू लागते. ही रचना सामान्य लोकांना सहज दिसण्यासारखी नसते. त्यामुळे ती गुप्त ठेवता येते.

एखाद्या खोलीत आग लागली, तर त्याची सूचना बाहेरच्या लोकांना देण्यासाठी तापमान वाढल्याने चालू होणारी स्विच वापरतात. या स्विचामध्ये दोन निरनिराळ्या धातूंच्या पट्ट्या एकमेकींवर रिव्हेट मारून बसविलेल्या असतात व ही दुहेरी पट्टी आकड्यासारखी किंचित वाकविलेली असते. खोलीतील आगीमुळे तेथील हवेचे तापमान वाढते व तापमानातील वाढीमुळे वाकविलेली पट्टी आणखी वाकते आणि त्यामुळे घंटेचे विद्युत् मंडल चालू होऊन ती वाजू लागते.

लोकांच्या मौल्यवान वस्तू ठेवण्याच्या बँकेमधील तिजोऱ्यांत किंवा संरक्षित खोल्यांमध्ये (सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये) बसविण्यात येणाऱ्या धोकासूचक यंत्रणेत रडारचे तत्त्व वापरतात. कार्यालयाचे काम संपल्यावर तेथे एक श्राव्यातीत तरंग प्रेषक (सामान्यतः कानाने ग्रहण करता येणाऱ्या ध्वनितरंगांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त तरंगलांबीचे ऐकू न येणारे तरंग प्रेषित करणारे साधन) चालू करतात. संशयित माणसाची कोणतीही हालचाल या तरंगांमध्ये बदल घडवून आणते व श्राव्यातीत ग्राहक (श्राव्यातीत तरंग ग्रहण करणारे साधन) घंटेचे मंडल चालू करतो आणि घंटा वाजू लागते. ही घंटा त्याच कार्यालयात किंवा पोलिसांच्या कोठीत बसविलेली असते, दुसऱ्या एका पद्धतीत विजेच्या तारांचे जाळे भिंतीत बसविलेली असते व ते अशा रीतीने बसविलेले असते की, भिंत फोडण्याचा प्रयत्न केल्यास घंटा वाजू लागते. आणखी एका पद्धतीमध्ये संशयित माणसाने खोलीत प्रवेश करताच त्याच्या अंगावर गरम वाफ सोडली जाते व त्याच वेळी घंटाही वाजू लागते. ज्या वेळी कार्यालय चालू असेल किंवा घरात नेहमीची माणसे असतील तेव्हा मुख्य स्विच असा ठेवतात की, आ. १ मध्ये (७) या क्रमांकाने दर्शविलेला दिवा लागलेला राहिल म्हणजे दरवाजे उघडले, तरी घंटा वाजत नाही.

ओक, वा. रा.