विद्युत् दाब नियामक : विद्युत् उद्गमाचा विद्युत् दाब स्वीकार्य मर्यादांमध्ये टिकवून ठेवणारी विद्युतीय वा इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती. जनित्राचा विद्युत् दाब, रोहित्रामधून मिळणारा विद्युत् दाब किंवा एकूणच विद्युत् पुरवठा यंत्रणेद्वारा मिळणाऱ्या विजेचा विद्युत् दाब विहित वा इष्ट मर्यादांमध्ये जवळजवळ स्थिर राखण्यासाठी विद्युत् दाब नियामक साधन वा मंडल वापरतात (म्हणून कधीकधी याला विद्युत् दाब स्थिरीकारक असेही म्हणतात). विद्युत् वा इलेक्ट्रॉनीय सामग्रीला हानी न पोहोचता ती व्यवस्थित चालू शकेल असा विद्युत् दाब पुरविणे गरजेचे असते. तो या मर्यादेपेक्षा कमी असल्यास सामग्रीचे काम व्यवस्थित होत नाही आणि जादा झाल्यास सामग्री बिघडू शकते वा जळूनही जाऊ शकते. म्हणून अशा सामग्रीला सहन होणार नाही एवढा जादा चढउतार विद्युत् दाबात होत असल्यास विद्युत् दाब नियामक वापरणे गरजेचे होते (उदा., दूरचित्रवाणी संच किंवा शीतकपाट). थोडक्यात प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् प्रवाहाचे ग्राहकाला वितरण करताना आणि इलेक्ट्रॉनीय सामग्रीला एकदिश (एकाच दिशेत वाहणारा) विद्युत् प्रवाह पुरविताना विद्युत् दाब विहित मर्यादांमध्ये रोखण्यासाठी विद्युत् दाब नियामक वापरतात.

अशा प्रकारे विद्युत् प्रणालीतील विद्युत् दाब स्थिर राखणे, अनेक सरीने एकत्र जोडलेल्या विविध जनित्रांतील विजेचे सर्व जनित्रांमध्ये योग्य पद्धतीने वाटप करणे, जनित्राची समकालिकता [प्रदान कंप्रता (दर सेकंदाला होणाऱ्या आंदोलनांची संख्या) जनित्राच्या गतीच्या अगदी बरोबर प्रमाणात असतानाची स्थिती] कायम ठेवणे आणि जनित्राची एकूण विद्युत् प्रणालीबरोबर असणारी समकालिकता राखणे ही कामे विद्युत् दाब नियामकामार्फत होतात. यांतील पहिल्या दोन कामांसाठी सर्वसाधारण प्रकारच्या तर नंतरच्या दोन कामांसाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या विद्युत् दाब नियामकांची आवश्यकता असते.

विद्युत् पुरवठी यंत्रणेतील विद्युत् दाब नियामक : सर्व विद्युत् वितरण व्यवस्थेत विद्युत् दाब ठराविक मर्यादेत कायम राखणे अतिशय गरजेचे असते. या नियमकांमुळे विद्युत् दाबातील चढउतार किमान होऊन कारखाने, उद्योगधंदे व शेती येथे वापरण्यात येणारी विद्युत् सामग्री किंवा गृहोपयोगी उपकरणे कार्यक्षम रीतीने चालतात व त्यांचे संरक्षणही होते. त्यामुळे केवळ जनित्रांच्या अग्रांमधील व विद्युत् निर्मिती केंद्रातील संगमदांड्यांमधील विद्युत् दाब स्थिर राखून चालत नाही. कारण एकाच विद्युत् जनित्रामार्फत निरनिराळ्या प्रेषणमार्गांतील संवाहकांना वीजपुरवठा होत असतो. म्हणून उपकेंद्रातील व निरनिराळ्या वितरण मंडलांतील विद्युत् दाब नियंत्रणासाठीही स्वतंत्र विद्युत् दाब नियामक वापरतात. या विद्युत् दाब नियामकांमध्ये बऱ्याच ठिकाणी एकेरी रोहित्रे वापरतात. रोहित्राची प्राथमिक गुंडाळी संवाहकांना समांतर जोडतात व द्वितीयक गुंडाळी मंडलाच्या एकसरीत जोडतात. द्वितीयक गुंडाळीतील विद्युत् दाब चल स्पर्शकाने गुंडाळीतील फेरे बदलून बदलता येतो. याचाच उपयोग मुख्य मंडलातील विद्युत् दाब आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करण्यासाठी करता येतो.

या नियामकांचे कार्य स्वयंचलित प्रकारचे असते. विद्युत् दाब नियंत्रित करणारे अभिचालित्र [अगदी अल्प शक्ती वापरून मोठ्या शक्तीच्या विद्युत् मंडलात पाहिजे तसा बदल घडवून आणणारे साधन ⟶ अभिचालित्र] विद्युत् दाबातील फरक व त्याची दिशा लक्षात घेऊन त्यांनुसार एका चलित्राने चल स्पर्शकाचे स्थान ठरवून जरूरीप्रमाणे विद्युत् दाब कमी वा जास्त करते. बऱ्याचदा वितरण तारांच्या अंतिम अग्रांजवळ विद्युत् दाब स्थिर ठेवावा लागतो. त्याकरिता या तारांमधून वाहणाऱ्या विद्यत् प्रवाहाने होणारा विद्युत् दाबपातही (तारांमधून वाहणाऱ्या प्रवाहाने निर्माण झालेला त्यांच्या दरम्यानचा विद्युत् दाबही) लक्षात घ्यावा लागतो. विद्युत् पुरवठा यंत्रणेत मुख्यत: रोहित्र पद्धतीचा टप्प्याटप्प्याचा व प्रवर्तन या दोन प्रकारचे विद्युत् दाब नियामक वापरतात. पहिल्या प्रकारात स्विचांनी विद्युत् प्रवाहाच्या पुरवठ्याचे नियंत्रण करून विद्युत् दाबतील बदल टप्प्याटप्प्याने होतात तर दुसऱ्या प्रकारात विद्युत् दाब एकसारखा जुळवून घेतला जातो.

टप्प्याचा विद्युत् दाब नियामक : रोहित्राच्या उच्च दाब गुंडाळीतून काही छेडे (सुटी टोके) रोहित्राच्या बाहेर काढातात व त्यांच्यावर स्पर्शाग्रे बसवितात. बाह्य संवाहकाला जोडलेला स्पर्शक या स्पर्शाग्रांवरून क्रमाक्रमाने बदलून त्या प्रमाणात द्वितीयक गुंडाळीतील विद्युत् दाब बदलता येतो व अशा रीतीने ग्राहकाला हवा असलेला विद्युत् दाब स्थिर ठेवता येतो.

आ. १. टप्प्याच्या विद्युत् दाब नियामकाचे मंडल : (१) परिवर्तनीय स्विच, (२) विद्युत् दाव निवडणारे विवेचक स्विच, (३) विद्युत् दाब बदलाच्या वेळी वापरावयाचा प्रतिक्रियाकारक, (४) स्विचाचे स्पर्श बोट, (५) व्दितीयक गुंडाळीचे छेडे, (६) प्राथमिक गुंडाळी, (७) विद्युत् पुरवठा करणारा संवाहक, (८) प्रदान विद्युत् दाब.आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे काही वेळा रोहित्राची प्राथमिक गुंडाळी प्रेषण मार्गाच्या समांतर व द्वितीयक गुंडाळी संवाहक मार्गाच्या एकसरीत जोडलेली असते. परिवर्तनीय स्विचाच्या स्थितीनुसार द्वितीयक गुंडाळीतील विद्युत् दाब संवाहकातील विद्युत् दाबात मिळविला किंवा वजा केला जातो. अशा तऱ्हेने विद्युत् दाबाचे नियमन करता येते. द्वितीयक गुंडाळीतून बरेच छेडे बाहेर काढलेले असतात व ते विद्युत् दाबाची निवड करणाऱ्या विवेचक स्विचाला जोडलेले असतात. छेड्यावर टेकणाऱ्या स्पर्शकाची स्थिती बदलून द्वितीयक गुंडाळीत निर्माण होणाऱ्या विद्युत् दाबाचे मूल्यही कमीजास्त करता येते.

टप्पा नियामकाचे (१) रोहित्र बंद करूने बदलता येणारा नियामक व (२) रोहित्र चालू असताना बदलता येणारा नियामक हे दोन उपप्रकार आहेत. आ. १ मध्ये यांपैकी दुसरा प्रकार दाखविला आहे. यात एकाऐवजी दोन स्पर्शक वापरतात व प्रत्येक स्पर्शकाच्या एकसरीत एक संरोध (प्रत्यावर्ती प्रवाहाला मंडलाकडून होणारा एकूण विरोध) जोडलेला आहे. विद्युत् दाब बदलायच्या वेळी प्रथम त्यांपैकी एकच स्पर्शक स्विचाच्या स्विचाच्या दुसऱ्या स्पर्श बोटावर नेतात. अशा वेळी काही काळ दोन स्पर्शकांमधुन अर्धाअर्धा विद्युत् प्रवाह वाहतो. मग दुसरा स्पर्शकही नवीन स्पर्श बोटावर आणून ठेवतात. अशा रीतीने मंडलात कधीही खंड पडू न देता विद्युत् दाब नियमन करता येते. मात्र असे नियमन हे टप्प्याटप्प्याने होते.


प्रवर्तक विद्युत् दाब नियामक : याची रचना प्रवर्तन चलित्राप्रमाणेच असते [⟶विद्युत् चलित्र]. यातील प्राथमिक गुंडाळी घूर्णकावर व द्वितीयक गुंडाळी स्थाणुकावर असते. याची जोडणी टप्प्याच्या दाब नियामकाप्रमाणे केलेली असते. तथापि घूर्णक अक्षाभोवती फिरत असल्याने द्वितीयक गुंडाळीतील विद्युत् दाबाचा कलाकोन (‘ज्या’ वक्रीय रीतीने बदलणाऱ्या राशीची कला आणि त्याच कंप्रतेला ‘ज्या’ वक्रीय रीतीने बदलणाऱ्या एक दुसऱ्या राशीची कला यांच्यामधील फरक) शून्यापासून ३६० अंशापर्यंत बदलता येतो. त्यामुळे मूळ विद्युत् दाबात द्वितीयक गुंडाळीतून मिळविल्या किंवा वजा केल्या जाणाऱ्या विद्युत् दाबाचे मूल्य नेहमी स्थिर असते परंतु कलाकोन बदलेल त्या प्रमाणात मूळ विद्युत् दाब व हा विद्युत् दाब यांची सदिश बेरीज बदलते. अशा रीतीने नियमित विद्युत् दाब मिळू शकतो व त्याची मर्यादा + १० टक्के असते.

बऱ्याचदा नियामकाजवळ नव्हे, तर विद्युत् भारमध्यावर विद्युत् दाब स्थिर राखणे आवश्यक असते. त्यामुळे नियामकापासून भारमध्यापर्यंतच्या संवाहकात होणारा विद्युत् दाबपातही लक्षात घ्यावा लागतो. यासाठी नियामक मंडलात संवाहकाच्या एवढाच संरोध वापरून त्यातून मुख्य संवाहकाइतकाच विद्युत् प्रवाह पाठवून संवाहकामधील विद्युत् दाबाएवढाच विद्युत् दाब कृत्रिम रीतीने निर्माण करून तो नियामकाला मिळणाऱ्या विद्यत् दाबात मिळवितात. यासाठी वापरलेल्या संरोधाला पूर्ती करण्यासाठी वापरलेल्या संरोध असे म्हणतात.

जनित्रासाठी वापरण्यात येणारे विद्युत् दाब नियामक : प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यान्वित रोधक वापरणारे विद्युत् दाब नियामक मुख्यत्वे जनित्रांसाठी वापरतात. शिवाय इलेक्ट्रॉनीय व चुंबकीय विवर्धक वापरणारे नियामकही जनित्रांसाठी वापरले जातात.

प्रत्यक्ष कार्यान्वित रोधक वापरणारे विद्युत् दाब नियामक : मुख्य उत्तेजकाच्या चुंबकीय क्षेत्र गुंडाळीच्या एकसरीत जोडलेल्या व मूल्य बदलता येणाऱ्या रोधकावर या नियामकाचे कार्य अवलंबून असते. हे रोधकमूल्य कमी अथवा जास्त करून त्याद्वारे चुंबकीय क्षेत्र गुंडाळीतील विद्युत् प्रवाह कमी-जास्त होतो व त्या प्रमाणात जनित्राच्या विद्युत् प्रवाह कमी-जास्त होतो व त्या प्रमाणात जनित्राच्या विद्युत दाबाचे नियमन करता येते. अगदी सुरुवातीस कार्बनाच्या पट्टया रोधक म्हणून वापरीत व त्यांच्यावरील यांत्रिक दाब कमी-जास्त करून रोधकमूल्याचे नियमन करीत. नंतर नियामकात धातूचा रोधक वापरण्यात येऊ लागला व त्यातील बदल टप्प्याटप्प्याने करता येऊ लागला.

रोधक वापरणाऱ्या विद्युत् दाब नियामकाच्या काही मर्यादा आहेत : (१) उत्तेजकाच्या क्षेत्रगुंडाळीमधील विद्युत् प्रवाह बदलण्यासाठी वापरलेल्या रोधकाच्या मूल्यात बदल होतो व त्यामुळे उत्तेजक प्रवाहाच्या प्रत्येक बदलाबरोबर नियामकाचा प्रतिसादकालही बदलतो. (२) प्रतिसादकाल व त्याच्यावर अवलंबून असलेली उत्तेजक मंडलातील नियामक सामग्री फारच मंद गतीने कार्यान्वित होते. विशेषकरून स्थैर्याच्या मर्यादेच्या जवळपास जनित्र कार्य करीत असताना या नियामकाचा पल्ला कितीही कमी असला, तरी तो स्वीकार्य नसतो.(३) जनित्रांची विद्युत् निर्मितिक्षमता जशी वाढत गेली, तशी त्यांच्या उत्तेजकाची क्षमताही वाढत गेली. त्यामुळे नियामकाच्या स्पर्शकांमधून एवढा प्रवाह जाणे अवघड होत गेले. या मर्यादांमुळे हे नियामक मागे पडले. या मर्यादांवर मात करण्याच्या प्रयत्नांमुळे नियामक तंत्रविद्येच्या दृष्टीने अधिक गुंतागुंतीचे बनले. नियामकातील हलणाऱ्या घटकांचा वापर कमी होऊन स्थिर घटकांचे प्रमाण वाढले. परिणामी ते अधिक निर्दोष व विश्वासार्ह झाले.

अप्रत्यक्ष कार्यान्वित रोधक वापरणारे विद्युत् दाब नियामक : यामध्ये मूल्य बदलता येणारा एक रोधक क्षेत्र गुंडाळीच्या एकसरीत जोडलेला असतो. त्या रोधकावर ठेवलेल्या चल स्पर्शकाची स्थिती एका चलित्राने नियंत्रित करून रोधकमूल्य जरूरीप्रमाणे कमी किंवा जास्त करतात. अशा प्रकारे विद्युत् दाबाचे नियमन होते. मात्र विद्युत् दाब नियमनाची ही पद्धती पुरेशी चांगली नाही. कारण हिच्यात विद्युत् दाबातील फरकाला अगदी मंदपणे प्रतिसाद मिळतो व विद्युत् दाब पूर्वपदावर येण्यास बराच अवधी लागतो. म्हणून हे नियामक स्वतंत्रपणे न वापरता वरील प्रत्यक्ष कार्यान्वित रोधक वापरणाऱ्या विद्युत् दाब नियामकाला पूरक म्हणून वापरतात. या दोन्हींचा मिळून असणारा प्रतिसादकाल अगदी अल्प असल्याने इष्ट विद्युत् दाब लगेच मिळतो. अशा रीतीने विद्युत् दाब स्थिर होईपर्यंत दोन्ही नियामक कार्यान्वित असतात. नंतर दाब कायम असेपर्यंत याच स्थितीत स्थिर होऊन पुन्हा विद्युत् दाब बदलेपर्यंत तेथेच ते निश्चल राहतात.

इतर विद्युत् दाब नियामक : येथे अधिक वापरात असलेल्या दोन नियामकांची माहिती दिली आहे.

मोटारगाडीतील विद्युत् दाब नियामक : सामान्यपणे रबरी टायर वापरणाऱ्या व रुळांवरून न जाणाऱ्या अशा सर्व स्वयंचलित वाहनांत विद्युत् दाब नियामक मोठ्या प्रमाणात वापरतात. मोटारगाडीतील जनित्राचा प्रदान विद्युत् दाब हा विद्युतीय भाराशी (उद्‌गमापासून घेण्यात येणाऱ्या विजेच्या राशीशी) आणि विद्युत् घटमालेच्या विद्युत् भारणाच्या गरजांशी जुळणारा असावा म्हणून तिच्यात विद्युत् दाब नियामक वापरतात.

या नियामकाचे कार्य स्प्रिंग असलेल्या दुहेरी ध्रुव स्विचाच्या मदतीने चालते. हे स्विच एकाच वेळी दोन स्वतंत्र विद्युत् मंडलांत किंवा एकाच विद्युत् मंडलाच्या दोन्ही तारांमध्ये कार्य करू शकते. या स्विचामुळे नियामक मंडलातील तीनपैकी एका स्थितीकडून दुसरीकडे जलदपणे जातो. गती कमी असताना जनित्राचा थोडा विद्युत् प्रवाह जनित्राचे चुंबकीय क्षेत्र वाढविण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे विद्युत् दाब प्रदान वाढते. अधिक उच्च गतींना जनित्राच्या क्षेत्र-मंडलात रोध अंतर्भूत होतो व त्यामुळे त्यातील विद्युत् दाब व विद्युत् प्रवाह मर्यादित होतात. यापेक्षाही अधिक गतीला विद्युत् मंडल बंद होते. परिणामी चुंबकीय क्षेत्र कमी होते. या नियामकांची चालू-बंद होण्याची त्वरा सर्वसाधारपणे सेकंदाला ५० ते २०० एवढी असते.

घरगुती विद्युत् दाब नियामक : घरांमधील विद्युत् उपकरणांचा वापर वाढत आहे. अशा गृहोपयोगी विद्युत् उपकरणांचा उपयोग समाधानकारक रीतीने होण्यासाठी त्यांना पुरविला जाणारा विद्युत् दाब एका ठराविक मर्यादेत राखावा लागतो. आदान विद्युत् दाबात बदल होत असतानाही उपकरणाला इष्ट विद्युत् दाब पुरविण्यासाठी विद्युत् दाब नियामकाची योजना करतात. उदा., विद्युत् पुरवठा यंत्रणेतून मिळणारा विद्युत् दाब २०० ते २८० व्होल्ट असा बदलला, तरी नियामकामुळे उपकरणाला मिळणारा विद्युत् दाब २१० ते २३० व्होल्ट दरम्यान स्थिर राखता येतो. जेव्हा विद्युत् दाब या मर्यादेपलीकडे जातो, तेव्हा विद्युत् मंडल आपोआप खंडित व्हावे अशी व्यवस्थाही काही नियामकात केलेली असते. दूरचित्रवाणी संच, शीतकपाट यांसारख्या उपकरणांकरिता असे नियामक वापरतात. हे नियामक स्वतंत्रपणे जोडता येणारे किंवा उपकरणाच्या रचनेतच समाविष्ट केलेले असतात.


इलेक्ट्रॉनीय विद्युत् दाब नियामक : विद्युत् प्रवाहात होणारे बदल सुरळीत व सौम्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनीय विद्युत् दाब नियामकात घन अवस्था अर्धसंवाहक प्रयुक्ती वापरतात [⟶ अर्धसंवाहक  इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति]. प्रत्यावर्ती मंडलातून मिळणाऱ्या विद्युत् दाबात व मंडलातून मिळणाऱ्या भारात चढउतार होत असले, तरी पुष्कळ इलेक्टॉनीय सामग्रीला होणाऱ्या एकदिश पुरवठ्याचा विद्युत् दाब स्थिर असावा लागतो. याकरिता इलेक्ट्रॉनीय पुरवठ्यात पुढील दोन प्रकारची विद्युत् दाब नियामक मंडले वापरतात : (१) पहिल्या प्रकारात झेनर द्विप्रस्थ [झेनर या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी दोन विद्युत् अग्रे असणारी इलेक्ट्रॉनीय नलिका ⟶ अर्धसंवाहक] किंवा वायुनलिका यासारखी जवळजवळ स्थिर विद्युत् दाब प्रयुक्ती वापरतात. (२) दुसऱ्या प्रकारात ट्रँझिस्टरच्या अथावा निर्वात नलिकेच्या चलरोधाचा उपयोग करतात. अशा नियामकाचे कार्य चलरोधाप्रमाणे असते. म्हणजे विद्युतीय भार जास्त असताना रोध कमी होतो व हा भार कमी असताना रोध वाढतो.

या दोन्ही प्रकारांत प्रतिसाद अतिशय जलदपणे मिळतो. त्यामुळे दोन्हींचा पुढील प्रकारे दुहेरी उपयोग होतो : या नियामकांमुळे आदान अथवा प्रदान यांतील अनियमित चढउतारांचे निराकरण होतेच, तसेच तरंग विद्युत् दाबाचे दमनही होते [एकदिश विजेचा उद्‌गम म्हणून वापरण्यात येणाऱ्या एकदिशकारकातून (प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे एकदिश विद्युत् प्रवाहात रूपांतर करणाऱ्या प्रयुक्तीतून) किंवा जनित्रामधून मिळणाऱ्या प्रत्यावर्ती घटकाला तरंग विद्युत् दाब म्हणतात]. परिणामी या नियामकांमुळे साधे विद्युत् छानक वापरता येतात [इच्छित कंप्रतांच्या संकेतांचे प्रेषण व नको असलेल्या कंप्रतांच्या संकेतांचे क्षीणन करणाऱ्या विद्युत् जालाला विद्युत् छानक म्हणतात ⟶ छानक, विद्युत्].

 आ. २. झेनर व्दिप्रस्थ विद्युत् दाब नियामक : Ei.- अनियमित विद्युत् दाब पुरवठा, Rs- एकसरीतील रोधक, झ-झेनर व्दिप्रस्थ, i1 – व्दिप्रस्थ प्रवाह, j2 – भार प्रवाह, VL – प्रदान भार विद्युत् दाब, RL – भार रोधक. द्विप्रस्थ नियामक मंडल : आ. २ मध्ये झेनर द्विप्रस्थ विद्युत् दाब नियामक दाखविला आहे. या द्विप्रस्थावर विद्युत् दाब एका विशिष्ट मर्यादांमध्ये जवळजवळ स्थिर राहतो. हा स्थिर विद्युत् दाब वापरलेल्या द्विप्रस्थावर अवलंबून असतो आणि तो २ ते २०० व्होल्ट असू शकतो.

आ. २ मधील विद्युत् मंडलाद्वारे पुढील दोन अटींचे पालन व्हावे लागते :  (१) आदान विद्युत् दाब (Ei) एकसरीत असलेल्या रोधकातील (Rs) विद्युत् दाबपात (Vs) व झेनर द्विप्रस्थाने स्थिर राखला जाणार प्रदान भार विद्युत् दाब (VL) यांच्या बेरजेएवढा असतो. (२) एकसरीत असलेल्या रोधातील विद्युत् प्रवाह हा नेहमी भार प्रवाह (i2) व द्विप्रस्थ प्रवाह (i1) यांच्या बेरजेएवढा असतो.

ठराविक आदान विद्युत् दाबाला एकसरीत असलेल्या रोधकामधील विद्युत् दाबपात स्थिर राहतो. यामुळे त्यातील प्रवाहही स्थिर राहत असला पाहिजे. म्हणून भार प्रवाहात बदल झाला की, द्विप्रस्थातील प्रवाहात तेवढाच पण विरुद्ध बदल व्हायला हवा.

ट्रँझिस्टर नियामक मंडले : एक ट्रँझिसटर असलेले नियामक मंडल हे शाखांतरी नियामक असते. त्यात एक ट्रँझिस्टर व एक झेनर द्विप्रस्थ वापरतात  (आ. ३). झेनर द्विप्रस्थामधून त्याच्या कार्यकारी मर्यादांच्या जवळजवळ मध्यम मूल्याएवढा प्रवाह वाहील अशा तऱ्हेने रोधक (R) निवडतात. भारादरम्यानचा विद्युत् दाब (Eo) वाढल्यास ट्रँझिस्टरच्या पायाचे वर्चस् वाढते, त्यामुळे संमुलक प्रवाह वाढतो व Rs दरम्यानचा विद्युत् दाब वाढतो. यामुळे भार विद्युत् दाब मूळ मूल्याएवढा होऊ लागतो. अशा प्रकारे भार विद्युत् दाबातील चढउताराचे निराकरण होते.

आदान विद्युत् दाब (Ei) वाढल्यास पाया-वर्चस् परत वाढते व (Rs) रोधकाच्या दरम्यानचा विद्युत् दाब वाढतो. या वाढीने आदान विद्युत् दाबातील वाढीवर मात करता येते. परिणामी प्रदान विद्युत् दाबात अत्यल्प वाढ होते. अशा प्रकारे या मंडलाने आदान विद्युत् दाबातील चढउतार काबूत आणले जातात.

आ. ३. ट्रँझिस्टर शाखांतरी विद्युत् दाब नियामक मंडल: Ei− आदान विद्युत् दाब, Rs- एकसरीत असलेला रोधक, R- रोधक, झ-झेनर व्दिप्रस्थ, ट-ट्रँझिसटर, Eo-भारादरम्यानचा विद्युत दाब, RL- भाररोधक. याला आदर्श नियामक म्हणता येणार नाही. कारण आदन विद्युत् दाबात पुष्कळच जास्त बदल झाल्यास प्रदान विद्युत् दाबात अल्पसा बदल होतोच.ट्रँझिस्टर विवर्धकाचे एक वा अनेक टप्पे समाविष्ट करून हा अत्यअल्प फरकही आणखी कमी करता येतो.

एकसरी ट्रँझिस्टर विद्युत् दाब नियामक मंडल आ. ४ मध्ये दाखविले आहे. झेनर द्विप्रस्थ त्याच्या कार्यकारी मर्यादांच्या जवळजवळ मध्यम मूल्याएवढे राहील अशा रीतीने रोधक (R) निवडला आ. ४. एकसरी ट्रँझिस्टर विद्युत दाब नियामक मंडल: Ei- आदान विदेयुत दाब, R-रोधक, झ-झेनर व्दिप्रस्थ, ट-ट्रँझिस्टर,Eo-प्रदान विद्युत दाब, RL- भार रोधक.आहे. हा ट्रँझिस्टर सर्व भार प्रवाह वाहून नेऊ शकणारा, तसेच आदान व प्रदान विद्युत् दाबांमधील फरकाएवढ्या विद्युत् दाबाला टिकणारा असावा लागतो. प्रदान विद्युत् दाब (Eo) वाढल्यास ट्रँझिस्टरच्या उत्सर्जकापासून पायापर्यंतचा विद्युत् दाब वाढतो. परिणामी ट्रँझिस्टर-मधील विद्युत् दाब वाढतो. अशा तऱ्हेने प्रदान विद्युत् दाब कमी होऊन त्याच्या मूळच्या मूल्याकडे जाऊ लागतो. उलट आदान विद्युत् दाब (Ei) वाढल्यास ट्रँझिस्टमधील उत्सर्जक ते पाया हा विद्युत् दाब वाढतो. परिणामी ट्रँझिस्टरचा विद्युत् दाब वाढून यावर मात केली जाते व विद्युत् दाब स्थिर राखला जातो. यात विवर्धक वापरल्यास विद्युत् मंडल वरीलप्रमाणेच अत्यल्प बदलांना अधिक प्रमाणात प्रतिसाद देते. [⟶ ट्रँझिस्टर तंत्रविद्या].

संदर्भ : 1. Bird, B. M, King, K. G. Power Electronics, New York, 1983.

           2. Brophy, J. J. Basic Electronics for Scientists, New York, 1983.

          3. Pressman, A. I. Switching and Linear Power Supply, Power Converter Design, New York, 1977.

         4. Spencer, J. D. Pippenger, D. E. The Voltage Regulatro Handbook for Design Engineers, New York, 1977.

ओक, वा. रा. ठाकूर, अ. ना.