परिवर्तक, समकालिक : काही अभियांत्रिकीय यंत्रसामग्रीकरिता एकदिश विद्युत् प्रवाह लागतो, तर काही यंत्रसामग्रीकरिता प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणारा) विद्युत् प्रवाह आवश्यक असतो. विद्युत रेल्वेसाठी एकदिश विद्युत् प्रवाह वापरणे पुष्कळ वेळा फायद्याचे असते. यामुळे सर्वसाधारण ⇨ विद्युत् जनित्रापासून मिळणाऱ्या प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे एकदिश विद्युत् प्रवाहात परिवर्तन करावे लागते. असे परिवर्तन निरनिराळ्या साधनांद्वारे करता येते. समकालिक परिवर्तक हे अशा प्रकारचे एक साधन आहे, याला परिभ्रमी परिवर्तक असेही म्हणतात. हे एकच साधन समकालिक चलित्र [मोटर ⟶ विद्युत् चलित्र] व एकदिश जनित्र म्हणून वापरले जाते. याचा फिरण्याचा वेग समकालिक चलित्राप्रमाणेच विद्युत् प्रवाहाच्या कंप्रतेवर (एका सेकंदात होणाऱ्या आवर्तनांवर) व त्यातील चुंबकीय ध्रुवांच्या संख्येवर अवलंबून असतो.

 त्रिकला चार ध्रुवी समकालिक परिवर्तक: (१, २, ३) घसरकड्यांना जोडलेले त्रिकला संवाहक, (४) दिकपरिवर्तक भाग, (४अ) एकदिश स्पर्शक (ब्रश), (५) आर्मेचराची गुंडाळी.

यातील आर्मेचर (ज्यातील विद्युत् संवाहक तारेच्या गुंडाळीत विद्युत् चालक प्रेरणा म्हणजे विद्युत् प्रवाह वाहण्यास कारणीभूत असणारी प्रेरणा निर्माण होते असा भाग) एकदिश जनित्राच्या आर्मेचरासारखे असते. त्याचप्रमाणे चुंबकीय ध्रुवही सारखेच असतात. एका बाजूला दिक्परिवर्तक ‌ [⟶ दिक्परिवर्तन] असतो, तर दुसऱ्या बाजूला घसरकडी बसविलेली असतात. याचे चुंबक एकदिश प्रवाहाने उत्तेजित केलेले असतात. आर्मेचराला घसरकड्यांच्या बाजूने प्रत्यावर्ती प्रवाह दिलेला असतो. बहुधा हा प्रवाह सहा कलांचा (ज्यातील विद्युत् दाबांच्या विशिष्ट संदर्भसापेक्ष स्थितीत म्हणजे कलेत ठराविक अंतर आहे अशा सहा निरनिराळ्या विद्युत् मंडलांतून वाहणारा) वा तीन कलांचा असतो. आकृतीमध्ये त्रिकला प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहावर चालणाऱ्या समकालिक परिवर्तकाची अंतर्गत जोडणी दाखविली आहे. हा परिवर्तक प्रत्यावर्ती बाजूकडून समकालिक चलित्रासारखा व एकदिश बाजूकडून एकदिश जनित्रासारखा वापरला जातो. याचा वेग स्थिर असतो व तो सहसा बदलता येत नाही. हा परिवर्तक जर दुसऱ्या एखाद्या चलित्राच्या साहाय्याने फिरविला, तर त्यापासून प्रत्यावर्ती व एकदिश असे दोन्ही प्रवाह मिळू शकतात. त्याच्या विद्युत् दाबाचे प्रमाण कायम असते आणि ते सहसा बदलता येत नाही. या प्रकारच्या परिवर्तकाला एकच आर्मेचर, चुंबकीय ध्रुव संच आणि धारव्यांची जोडी (फिरणारा दंड योग्य स्थितीत राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या आधारांची जोडी बेअरिंग्ज) व एकच फिरणारा दंड असल्यामुळे हे यंत्र जास्त सुटसुटीत आहे. क्

या यंत्राचे आणखी फायदे म्हणजे (१) याच्या आर्मेचरामधून प्रत्यावर्ती आणि एकदिश प्रवाह एकमेकांच्या विरुद्ध दिशांनी वाहत असल्यामुळे एकूण प्रवाह कमी होतो व कमी उष्णता निर्माण झाल्याने विद्युत् ऊर्जा कमी खर्च होते (२) धारव्यांची एकच जोडी व एकच दंड वापरल्याने यंत्राची लांबी कमी होते (३) याची कार्यक्षमताही जास्त असते. या यंत्राचे काही तोटेही आहेत : (१) एकदिश व प्रत्यावर्ती विद्युत् दाबांचे प्रमाण कायम असते (२) शक्तिगुणक (प्रत्यक्ष जात असलेली शक्ती व जाऊ शकणारी शक्ती यांचे गुणोत्तर वॉट/व्होल्ट×अँपिअर) कमी असतो व फारच थोडा बदलता येतो (३) आर्मेचरामधील सर्वच संवाहक सारख्या प्रमाणात गरम होत नाहीत काही ठिकाणी गरम बिंदू उत्पन्न झाल्यामुळे तेथील निरोधक वेष्टन खराब होण्याची भीती असते.

या प्रकारचे परिवर्तक हल्ली तयार करण्यात येत नाहीत तथापि काही अद्याप वापरात आहेत. अशा परिवर्तकांऐवजी आता पुष्कळच जास्त कार्यक्षमता असलेले व देखभालीचा खर्च कमी येणारे, पाऱ्याच्या प्रज्योतीवर चालणारे किंवा सिलिकॉनाचे एकदिशकारक वापरतात [⟶ एकदिशकारक].

संदर्भ: Dawes, C. L. A. Course in Electrical Engineering, Vol, II, New York, 1956.

ओक, वा. रा. कुलकर्णी, पं. तु.