भूयोजन : (अर्थिंग ग्राउंडिंग). विद्युत् पुरवठा प्रणालीतील भाररहित (किंवा तटस्थ) संवाहक तसेच विद्युत् साधनांचे व उपकरणांचे प्रवाह वाहून न नेणारे धातूचे भाग यांची विद्युत् संवाहक संदर्भ पृष्ठभागाशी (उदा., जमीन) कमी रोध असणाऱ्या संवाहक तारेच्या साहाय्याने हेतुपूर्वक केलेली जोडणी.

विद्युत् सामग्रीत भूयोग दोष निर्माण झाल्यास त्यापासून विद्युत् उपकरणे व ती साधने आणि ती हाताळणाऱ्या व्यक्तीचे जीवित यांच्या संरक्षणासाठी भूयोजन आवश्यक ठरते. प्रवाह वाहून नेणाऱ्या भाररहित संवाहकाचे भूयोजन सर्वसाधारणपणे विद्युत् पुरवठा प्रणालीच्या स्थैर्यासाठी व सुरक्षिततेसाठी आवश्यक ठरते. यास विद्युत् पुरवठा प्रणालीचे भूयोजन म्हणतात. विद्युत् उपकरणे व साधने यांच्या विद्युत् प्रवाह न नेणाऱ्या धातुभागांची जमिनीच्या पृष्ठभागाशी परिणामकारक जोडणी मनुष्य-प्राणी, जीवित व मालमत्ता यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ठरते. यास विद्युत् सामग्रीचे भूयोजन म्हणतात. भूयोजनाचा उद्देश विद्युत् पुरवठा केंद्राजवळपासच्या सर्व परिसराची विद्युत् पातळी जमिनीच्या विद्युत् पातळीशी समान किंवा निदान तिच्या जवळपास ठेवणे हा असतो. त्यामुळे उपकरणे, सामग्री यांचे संवाहक वगळता प्रवाह वाहून न नेणारे इतर सर्व धातुभाग सर्व वेळी (भूयोग दोष निर्माण झाला तरी) जमिनीच्या समान विद्युत् पातळीवर राहतील आणि दोषयुक्त प्रवाह निर्माण झाला, तरी त्यांची जमिनीसापेक्ष विद्युत् दाब पातळी विद्युत् धक्का बसण्याइतपत वाढणार नाही. योग्य भूयोजनामुळे विद्युत् उपकरणे हाताळणाऱ्यास विद्युत् धक्का बसण्याची भीती रहात नाही परंतु हे साध्य करण्यासाठी भूयोजनाचा विद्युत् रोध कमीत कमी असावा लागतो निदान तो भूयोजनाच्या त्या त्या विशिष्ट प्रकारासाठी अनुज्ञात मूल्याइतका असणे आवश्यक असते. हा रोध पुढील बाबींवर अवलंबून असतो : (१) भूयोजक विद्युत् प्रस्थ (जमिनीत पुरलेला संवाहक) व भूयोजक तारेसाठी वापरलेली धातू (२) भूयोजक विद्युत् प्रस्थ व भूयोजक तारेचे माप (लांबी, व्यास, क्षेत्रफळ), (३) जमिनीतील भूयोजक विद्युत् प्रस्थाची खोली (४) मातीचे तापमान, मातीची आर्द्रता, मातीत मिसळलेल्या लवणांचे प्रमाण.

पद्धती : भूयोजन प्रामुख्याने दोन पद्धतींनी करतात : (१) नळी वापरून व (२) पत्रा वापरून. (भारतीय मानक संस्थेने भारतीय परिस्थितीशी सुसंगत अशी भूयोजनाची मानके-प्रमाणभूत मापे निश्चित केलेली असून ती आय. एस. ३०४३-१९६६ या क्रमांकाच्या मानकात प्रसिद्ध केली आहेत).

आ.१. पोळादी नळी वापरून केलेले भूयोजन : (१) जमीन, (२) चरावरील झाकण, (३) चर, (४) धातुभागापासून येणारी तांब्याची तार, (५) भूयोजक विद्युत् प्रस्थ, (६) भूयोजक पोलादी नळी, (७) कोळशाची भुकटी व धुण्याचा सोडा किंवा मीठ यांचे एकाआड एक थर.

कमीत कमी ३८ मिमी. व्यासाची झिलईयुक्त पोलादी नळी जमिनीच्या पृष्ठभागाखाली किमान ३.७५ मी. खोल पुरून करण्यात येणारे भूयोजन आ. १ मध्ये दाखविले आहे. सर्वसाधारण जमिनीपेक्षा जर कोरडी जमीन असेल, तर जमिनीत याहीपेक्षा खोल (४.२५ मी. पर्यंत) नळी पुरतात. धातुभागापासून येणारी तांब्याची तार १२.७ मिमी. व्यासाच्या झिलईयुक्त पोलादी नळीतून जमिनीखालील चरात आणून भूयोजक विद्युत् प्रस्थाशी पक्की जोडतात. जमिनीखालील नळीभोवची कोळशाची भुकटी व धुण्याचा सोडा किंवा मीठ यांचे एकाआड एक थर रचलेले असतात. सुरुवातीस ३ ते ४ बादल्या पाणी नळीत (वरील ओतीव बिडाचे बिजागरीयुक्त झाकण उघडून) ओततात. त्यामुळे जमीन ओलसर व विद्युत् वाहक राहते आणि भूयोजन कार्यक्षम राहते. उन्हाळ्यात अथवा आवश्यक वाटेल तेव्हा मधून मधून पाणी सोडतात.

अशाच प्रकारे पण पत्रा वापरूनही भूयोजन करतात. हा पत्रा तांब्याचा असून त्याची मापे कमीत कमी ६० सेंमी. लांब, ६० सेंमी. रूंद व ३.१५ मिमी. जाड (किंवा झिलईयुक्त पोलाद वापरल्यास जाडी ६.३. मिमी.) अशी असावीत. त्याची वरील कडा ही भूपृष्ठाच्या खाली कमीत कमी १.५ मी. असावी. भूयोजक विद्युत् प्रस्थावर रंग, लुकण अथवा ग्रीज नसावे व प्रस्थ स्वच्छ असावे. भूयोजक विद्युत् प्रस्थ जमिनीत खोलवर पुरणे शक्य नसेल, तर एकापेक्षा अधिक प्रस्थे एकमेकांशी अनेकसरीत संवाहक तारेने किंवा पट्टीने जोडून आवश्यक तो कमी रोध मिळवितात.

पट्टी अथवा संवाहक तार वापरूनही काही वेळा भूयोजन करतात. त्यासाठी २५ मिमी.  १.६० मीमी. तांब्याची पट्टी अथवा २५ मीमी.  ४ मीमी. झिलईयुक्त पोलादी कांब (संवाहक वर्तुळाकार काटच्छेदाचा असल्यास ३ चौ. मिमी. तांब्याची अथवा ६ चौ. मिमी. झिलईयुक्त पोलादी तार) वापरतात. हिची लांबी कमीत कमी १५ मी. असावी.


भारतीय विद्युत् पुरवठा नियमाप्रमाणे त्रिकला-चार तारी विद्युत् पुरवठा पद्धतीमध्ये [⟶ प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह] भाररहित संवाहक किंवा द्विकला-तीन तारी विद्युत् पुरवठा पद्धतीत मधला संवाहक कमीत कमी दोन स्वतंत्र ठिकाणी (पुरवठा केंद्राजवळ तसेच वितरण केंद्राजवळ) जमिनीशी भूयोजित केला पाहिजे.

भूयोजक कायम ओल असलेल्या ठिकाणी बसवितात परंतु सतत वाहते पाणी असलेल्या ठिकाणी भूयोजन केल्यास आसपासचे लवण वाहून गेल्याने भूयोजन कार्यक्षम राहत नाही. भाजीपाला लावलेल्या जमिनीचा विशिष्ट रोध कमी असतो (द्रव्याच्या एकजिनसी एकक घनाने त्याच्या विरुद्ध पृष्ठांतून एकसारख्या घनतेच्या एकदिश विद्युत् प्रवाह वाहण्यास केलेल्या रोधाला त्या द्रव्याचा विशिष्ट रोध म्हणतात). कोष्टकामध्ये विविध प्रकारच्या मातींचे विशिष्ट रोध दिलेले आहेत. भूयोजक हा अखंड असला, तरच भूयोजन परिणामकारक होते.

विविध प्रकारच्या मातींचे विशिष्ट रोध

मातीचा थर 

विशिष्ट (ओहम–मीटर)

काळी चिकण माती

६ ते २३

कोरडी माती

३६ ते १०९

गाळवट माती (ओली)

२ ते ५

गाळवट माती (कोरडी)

७५ ते १७०

जांभा दगडाची माती

३०० ते ८००٭

मुरमाड माती

१० ते ५०

वाळूयुक्त माती

६० ते २००

  

सातारा-कोयना-रत्नागिरी या विभागात काही प्रदेशांतील जमिनीचा विशिष्ट रोध अधिकतम असल्याने तेथे परिणामकारक भूयोजन करणे कठीण जाते.

विद्युत् पुरवठा प्रणालीचे भूयोजन : विद्युत् पुरवठा प्रणालीचे भूयोजन करताना काही पद्धतींत भाररहित संवाहक सरळ जमिनीशी जोडतात. काही पद्धतींत ही जोडणी अवरोधयुक्त संरोधाच्या अथवा रोधयुक्त संरोधाच्या मध्यस्थीने केलेली असते (आ.२). अभूसंपर्कित

विद्युत् पुरवठा प्रणालीतील भूयोजन हे धारकी (विद्युत् भार साठवून ठेवणारे) माध्यम वापरून मिळणाऱ्या भूयोजनासमान असते. विमानातील अथवा जहाजामधील विद्युत् पुरवठा प्रणालीत सुद्धा भूयोजनाचे

आ. २. विद्युत् पुरवठा प्रणालीच्या भूयोजनाच्या पद्धती : (१) सरळ जमिनीशी जोडणी (कमीत कमी रोधाद्वारे), (२) कमी अवरोध असलेल्या प्रवर्तनी संरोधाद्वारे, (३) उच्च अवरोध असलेल्या प्रवर्तनी संरोधाद्वारे, (४) कमी रोधयुक्त संरोधाद्वारे, (५) उच्च रोधयुक्त संरोधाद्वारे, (६) अभूसंपर्कित ‘भूयोजन’ (यातील संरोध, अवरोध व प्रवर्तन या संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह’ ही नोंद पहावी).नियम पाळावे लागतात परंतु या टिकाणी प्रत्यक्ष जमिनीशी संपर्क न येता जमिनीसमान संदर्भ पृष्ठभागाचा संपर्क साधण्यासाठी उपयोग केला जातो. जहाजाचा पाण्याशी स्पर्श होणारा भाग व विमानाचा अंत्य भाग (शेपटी) यांचाच उपयोग जमिनीप्रमाणे मानून भूयोजन करतात.

विद्युत् पुरवठा प्रणालीच्या भूयोजनाचे पुढील फायदे असल्याने ते आवश्यक ठरते : (१) संवाहकावरील निरोधकाचे आवरण कमजोर झाल्याने, फाटल्याने अगर नष्ट झाल्याने जमिनीशी संवाहकाचा संपर्क येऊन त्यातून जाणारा दोषयुक्त प्रवाह अगर झिरप प्रवाह भूयोजनात लहान मोठ्या मूल्याचे रोधक वापरून किंवा प्रवर्तनी संरोध वापरून मर्यादित करता येतो. दोषयुक्त अगर झिरप प्रवाह सुरक्षित प्रमाणाबाहेर वाढल्यास त्यामुळे ⇨ विद्युत् मंडल खंडकांसारखी सुरक्षा साधने कार्यान्वित होऊन विद्युत् पुरवठा आपोआप तोडला जातो (आ. ३). यांसाठी भूयोजन आवश्यक ठरते. (२) झिरप अगर दोषयुक्त प्रवाहामुळे तारांच्या निरोधक आवरणात विद्युत् दाब वाढून निर्माण होणारा ताण भूयोजनाद्वारा दाब मर्यादित केल्यामुळे कमी होतो. (३) शक्ती बऱ्याच प्रमाणात वाढून विद्युत् पुरवठ्यात खंड पडण्याचे प्रमाण कमी होते. (४) विद्युत् दाब प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे भूयोजनाअभावी प्रज्योत (वायूतून होणारे विद्युत् विसर्जन) निर्माण झाल्याने होणारा उष्णता-ऊर्जा-व्यय भूयोजन केल्यास टळतो. (५) आजूबाजूस विद्युत् भार वाढून विद्युत् धक्का बसण्याचे प्रसंग भूयोजनामुळे टळतात.


आ. ३. भूयोगातून जाणारा विद्युत् प्रवाह मर्यादित करण्याची रोधक पद्धत: (१) भूयोजित रोधक, (२) शक्ती उद्‌गम, (३) चालू भार, (४) विद्युत् मंडल खंडक, (५) संवाहक तारा, (६) दोष बिंदू (जमिनीशी संयोग झालेला), (७) भूयोजन मंडले व जमिनीतून वाहणारा ४०० अँपिअर प्रवाह.

विद्युत् सामग्रीचे भूयोजन : विद्युत् साधने [जनित्र (यांत्रिक शक्तीचे विद्युत् शक्तीत रुपांतर करणारे साधन), चलित्र (विद्युत् शक्तीचे यांत्रिक शक्तीत रूपांतर करणारे साधन मोटर), रोहित्र (प्रत्यावर्ती प्रवाहाचा विद्युत् दाब बदलणारे साधन)] आणि विद्युत् उपकरणे [इस्त्री, शेगडी, तापक (हीटर), गिझर इ.] यांचे विद्युत् प्रवाहापासून अलिप्त ठेवलेले धातूंचे आच्छादक पृष्ठभाग, धातूंचे गाळे, आधार-चौकटी (जे नेहमी विद्युत् निरोधक-आच्छादित संवाहकांशी संपर्कात असतात) या धातुभागांची जमिनीच्या पृष्ठभागाशी कार्यक्षम विद्युत् जोडणी करणे यालाच विद्युत् सामग्रीचे भूयोजन म्हणतात. याचा उद्देश विद्युत् संवाहकावरील निरोधकाचे आवरण यदाकदाचित खराब झाल्यास, गळून पडल्यास अगर कमजोर झाल्यास संवाहकास दिलेल्या विद्युत् दाबामुळे संवाहकाच्या संपर्कातील धातुभागातही हा दाब निर्माण होऊन धातुभागास स्पर्श केला गेल्यास विद्युत् धक्का बसण्याची असलेली शक्यता दूर करणे, हा असतो. भारयुक्त व भाररहित अशा दोन जवळजवळच्या धातुभागांत फारच कमी अंतर असेल, तर त्यांमध्ये ठिणगी पडून आग लागण्याचीही शक्यता असते. हे टाळण्यासाठी धातुयुक्त भाग सरळ जमिनीच्या पृष्ठाभागाशी एकत्रित अथवा स्वतंत्रपणे जोडलेले असतात. यामुळे संवाहकांचा धातुभागांशी संपर्क येताच संवाहकातील काही प्रवाह (यालाच झिरप प्रवाह म्हणतात) भूयोजक

आ. ४. निरनिराळ्या विद्युत् साधनांतील धातूची आवरणे जोढणारी भूयोजक पट्टी : (१) भूयोग, (२) भूयोग स्विच, (३) शक्ती उद्‌गम, (४) वितरण फलक, (५) संगम दांड्यांचा कप्पा, (६) रोहित्र, (७) चलित्र, (८) एक-कला भार, (९) भूयोग संवाहक (तांब्याची पट्टी), (१०) विद्युत् भाररहित संवाहक.


तारेमार्फत जमिनीकडे पोहोचविला जातो व धातुभागांवरील दाब वाढत राहत नाही. असे केल्याने साधने व उपकरणे वापरताना धातुभागास होणाऱ्या संपर्कात विजेचा धक्का बसण्याची भीती रहात नाही व विद्युत् साधने व उपकरणे वापरणे अधिक सुरक्षित होते. साधनाचा वा उपकरणाचा धातुभाग व विद्युत् पुरवठ्याची भारहित तार यांची संवाहक तारेने जोडणी करूनही भूयोजन करण्यात येते. बहुतेक सर्व विद्युत् पुरवठा प्रणालींमध्ये विद्युत् साधनांतील निरोधकाच्या दोषामुळे जर प्रवाहापासून अलिप्त ठेवलेले धातुभाग संवाहकाशी संपर्कित झाल्याने त्यांचा विद्युत् दाब प्रमाणाबाहेर वाढू लागला, तर विद्युत् प्रवाह आपोआप बंद करणारी सुरक्षा साधने बसविलेली असतात. या सुरक्षा साधनांच्या कार्यपूर्तीसाठीसुद्धा भूयोजन आवश्यक ठरते.

  

भूयोजनाचा कमाल अनुज्ञात विद्युत् रोध : भूयोजन करावयाच्या निरनिराळ्या ठिकाणी भूयोजनाच्या कमाल अनुज्ञात असलेल्या विद्युत् रोधाची मूल्ये खाली दिली आहेत. 

(१) मोठे विद्युत् निर्मिती केंद्र 

०.५ ओहम 

(२) मोठे विद्युत् वितरण केंद्र 

१.० ओहम 

(३) लहान विद्युत् वितरण केंद्र 

२.० ओहम 

(४) इतरत्र सर्वसाधारण ठिकाणासाठी 

५.० ओहम 

(५) अंतर्गत विद्युत् अधिष्ठापनासाठी 

 

(अंतर्गत उभारणीतील विद्युत् सामग्रीसाठी) 

१.० ओहम 

भूयोजक विद्युत् जोडणीचा एकूण रोध (जमीन आणि विद्युत् अधिष्ठापनातील कोणताही बिंदू यांमधील रोध) हा विद्युत् रोध दिलेल्या मर्यादेत ठेवण्यासाठी भूयोजकाच्या सभोवार जमिनीत सु. १५ सेंमी. पर्यंत खोल खड्डा करून त्यात मधूनमधून मीठ व चाळलेली कोळशाची भुकटी यांचे मिश्रण टाकतात. भूयोजनासाठी नळी वापरली असेल व नळीभोवताली कोरडी जमीन असेल, तर नळीतून मधूनमधून लवणयुक्त पाणी सोडतात म्हणजे भूयोजन कार्यक्षम राहते. त्याचप्रमाणे जमिनीत गाडलेला भाग वर्षातून एकदा तरी वर काढून तपासतात आणि त्यावर गंज चढलेला असेल, तर तो साफ करून घेतात. ठिकाणी खांबावरील वितरण रोहित्राचे भूयोजन केले असेल त्याच्या बाजुने चांगले सुरक्षित तारांचे कुंपण घालतात. त्याच्या आजूबाजूस चरण्यासाठी आलेली गाय-म्हशीसारखी जनावरे संपर्कात येऊन त्यांना विद्युत् भारामुळे धक्का बसू नये म्हणून ज्या ठिकाणी जोडतारेचा जमिनीशी डाखकाम [⟶ झाळकाम व डाखकाम] करून पकडपट्टीच्या साहाय्याने जोडलेला असतो, तो भाग जमिनीत १ मीटरपर्यंत खाली गाडण्याची काळजी घेतात. भूयोजनाचा एकूण विद्युत् रोध मोजण्यासाठी ब्रिज-मेगर हे उपकरण वापरतात [⟶ विद्युत् राशिमापक उपकरणे].

विद्युत् निर्मिती केंद्र व विद्युत् वितरण केंद्र यांचे भूयोजन : निरनिराळ्या दाबाच्या विद्युत् पुरवठा प्रणालींसाठी प्रत्येकी स्वतंत्र भूयोजक वापरणे हे सर्वात उत्तम. त्याचप्रमाणे भाररहित पुरवठा तार आणि साधने व उपकरणे यांच्या धातुभागांची जमिनीशी जोडणी स्वतंत्ररीत्या करणेच नियमाप्रमाणे जरूरीचे आहे. पुरवठ्यात दोष निर्माण झाल्यास भाररहित तारेवरील वाढलेला दाब दुसऱ्या भाररहित भागाकडे पसरू नये यासाठी ही काळजी घ्यावी लागते. उच्च दाब प्रणालीत एक समाईक भूयोजक वापरतात. यालाच सर्व भाररहित संवाहक एकत्र जोडतात. जोडणीचा रोध कमी ठेवण्यासाठी अधिक क्षेत्रफळाचे तांब्याचे पत्रे किंवा जाड पट्ट्या (एक अगर अनेक) एकमेकींशी अनेकसरीत जोडून व जमिनीत खोलवर गाडून भूयोजन करतात. मध्यम व कमी दाबाच्या विद्युत् पुरवठा प्रणालींचे भूयोजन

पुढील पद्धतींनी करतात : (१) या प्रणाली जर प्रमुख केंद्राच्या कक्षेतच येत असतील (केंद्राचे प्रदीपन व इतर पुरवठ्यासाठी), तर त्यांचे भाररहित संवाहक व संबंधित धातुभाग केंद्राच्या भूयोजकांशीच जोडतात. त्यामुळे दोष निर्माण होऊन उच्च दाब यंत्रणेच्या भाररहित संवाहकाचा दाब भूसापेक्षा वाढला, तरी कमी दाब यंत्रणेतील धातुभाग व भाररहित संवाहक यांच्यावरील सापेक्ष दाब वाढत नाही. (२) जर अशी विद्युत् पुरवठा प्रणाली केंद्राच्या कक्षेबाहेर असेल, तर त्यांचे धातुभाग स्वतंत्रपणे भूयोजित करावेत आणि विद्युत् रोधक वापरून उच्च दाबाच्या धातुभागांपासून सरक्षित ठेवावेत.

खांबावरून नेलेल्या विद्युत् प्रेषण अथवा वितरण मार्गातील प्रवाह नेणारा संवाहक तुटला, तर त्यापासून अपघात होऊ नये म्हणून भारवाही संवाहकाच्या खालून दोन विद्युत् भाररहित संवाहक नेलेले असतात व ते ठराविक अंतरावर भूयोजित केलेले असतात. ही पद्धत जेथे रस्त्याच्या चौकातून विजेच्या तारा नेल्या जातात त्या ठिकाणी वापरतात. एखादा भारवाही संवाहक तुटला, तर खालच्या विद्युत् भाररहित संवाहकावर पडून तो भूयोजित होतो आणि विद्युत् भाररहित संवाहकातून दोषयुक्त प्रवाह वाहू लागतो. या दोषयुक्त प्रवाहामुळे सुरक्षा साधने कार्यान्वित होतात व तुटलेल्या संवाहकातील प्रवाह आपोआप बंद होतो.


जमिनीखालून जाणाऱ्या संवाहक तारा (केबली) भूयोजित करताना त्यांच्या टोकाशी असलेली अंतिम पेटी भूयोजकावर ठेवून त्यांची पक्की जोडणी करतात. तारांच्या निरोधक आवरणावर धातूच्या तारांची जाळी असते. ती व पेटी यांचा पक्का सांधा करून भूयोजन करतात. खांबावरील प्रवाह नेणाऱ्या संवाहकांच्या बाबतीत फक्त पोलीदी खांब, पोलादी आधारस्तंभ, आधार-तारा एवढेच भूयोजित करून चालत नाही, तर वरीलप्रमाणेच संवाहकाखालील भाररहित ताराही भूयोजित करतात. 

विद्युत् केंद्रातील साधने व उपकरणे तसेच विविध प्रकारच्या इमारती यांचे तडितेपासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तडित् निवारकातील संवाहकाच्या भूयोजनाचे विवरण ‘तडित् संरक्षण’ या नोंदीत दिलेली आहे.

इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे भूयोजन : इलेक्ट्रॉनीय साधनांमध्ये भूयोजन दोन ठिकाणी महत्त्वाचे ठरते. (१) रेडिओ प्रेषण केंद्र : या ठिकाणी आकाशक (अँटेना) व भूयोग तार यांचा एकमेकींशी धारकी संबंध असल्याने आकाशक तारेशी (ती आडवी असल्यास तिच्या विस्ताराइतक्या) समांतर अशा जमिनीत पुरलेल्या पट्ट्यांशी जोडणी करून भूयोजन करतात. जर आकाशक तार उभी जात असेल, तर त्याच लांबीच्या अरीय (त्रीज्यीय) संवाहक तारा घेऊन त्या खालील बाजूस (केंद्रीभूत झालेल्या ठिकाणी) निरनिराळ्या वाहक पट्ट्यांशी जोडतात व जमिनीत पुरतात. उंची फारच असेल, तर कुवाहक खांबावर उंच तारा बसवितात. या भूयोजनामध्ये विद्युत् रोध अतिशय कमी ठेवतात. (२) ग्राही केंद्र : या केंद्राजवळ नेहमीप्रमाणे भूयोग तार ही पाणीपुरवठ्याच्या नळीच्या शेवटी अडकपट्टीने पक्की बसवतात. ही भूयोग तार इतर विद्युत् प्रवाहांच्या व्यत्ययापासून मुक्त ठेवावी म्हणजे संदेश/गोंगाट हे प्रमाण चांगले मिळते. इतर इलेक्ट्रॉनीय मंडलात भूयोजन हे संदर्भपातळी राखण्यासाठी आवश्यक असते. प्रत्यक्ष भूयोजन न करता बऱ्याच वेळा अशा मंडलातील समभारयुक्त बिंदू एकत्रित जोडून ते धातूच्या बैठकीस जोडतात व त्याला एक भूयोजित तार जोडतात.

पाणीपुरवठ्याच्या नळीशी केलेले भूयोजन कामचलाऊ पण असुरक्षित स्वरूपांचे असते. विशेषतः अनेक मजली इमारतीत अशी नळी इमारतीच्या वरच्या टाकीशी जोडलेली असल्याने तिचा प्रत्यक्ष जमिनीशी संपर्क नसतो. याखेरीज नळ्यांच्या जोडकामापाशी साचलेला गंज व इतर कारणांनीही असे भूयोजन असुरक्षित बनण्याची शक्यता असते.

इलेक्ट्रॉनीय उपकरणांचा शक्ती उद्‌गम, आसपासचा संदर्भ संपर्क, उपकरण वापरणाऱ्यांचा संदर्भ यांची व उपकरणाच्या विद्युत् चुंबकीय संदर्भाशी जोडणी म्हणजे इलेक्ट्रॉनीय भूयोजन होय. इलेक्ट्रॉनीय भूयोजनाचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे आहेत : (१) उपकरण वापरणाऱ्यास विद्युत् धक्क्यापासून सुरक्षित ठेवणे. (२) अनावश्यक व अयुक्त दाब व प्रवाह यांपासून सामग्रीचे संरक्षण. (३) आजूबाजूच्या ⇨ विद्युत् गोंगाटाच्या पातळीचे नियमन करणे.

इलेक्ट्रॉनीय सामग्री वापरणाऱ्यांना विद्युत् धक्क्यापासून सुरक्षितता लाभावी म्हणून विद्युत् भूयोजनाप्रमाणेच भूयोजन करतात. याशिवाय इलेक्ट्रॉनीय साधनात व उपकरणात बाहेरून धारकी संयोगामुळे वा प्रवर्तनी संयोगामुळे शिरणारे अप्रस्तुत आगंतुक संदेश वगळण्यासाठी विशिष्ट निर्दाब पातळी  संदर्भपातळी म्हणून भूयोजित करतात. यामुळे अनावश्यक मिसळलेले आगंतुक संदेश लुप्त झाल्याने फक्त मूळ संदेश मिळविणे सोपे जाते. भिन्न संदर्भपातळी असणारी दोन इलेक्ट्रॉनीय उपकरणे संदेश वाहक तारेस अवगुंठित करणाऱ्या धातूच्या लांबच लांब जाळीदार नळीने जोडून भूयोजित करतात. यामुळे एकमेकांतील दाब पातळ्यांमधील फरक नष्ठ होतो. विशेष सूक्ष्मग्राही संदेशवहनासाठी वापरलेल्या उपकरणात शक्ती संवाहक वापरले असतील, तर एकमेकींपासून अलग पण एकीवर एक अशा दोन नळ्या वापरून मध्यभागी धातूंच्या चकतीने त्या संपर्कित करतात व अक्रिया संदर्भपातळी मिळविण्यासाठी त्यांचे भूयोजन करतात.

संदर्भः

1. Carr, C. C. American Electricians’ Handbook, New York, 1961.

2. Indian Standards Institution, Code of Practice for Earthing (IS 3043-1966), New Delhi, 1966.

कुलकर्णी, का. मं. टेंबे, वि. शं.