स्वॉन, सर जोसेफ विल्सन : (३१ ऑक्टोबर १८२८-२७ मे १९१४ ). इंग्रज भौतिकीविद व रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी प्रदीप्त विद्युत् दिवा तयार केला तसेच छायाचित्रणाच्या कोरड्या पट्टिकेचा शोध लावला. हा शोध छायाचित्रणातील महत्त्वाची सुधारणा असून आधुनिक छायाचित्रण पटलाच्या (फिल्मच्या) विकासातील मह-त्त्वाचा टप्पा होय.

सर

स्वॉन यांचा जन्म इंग्लंडमधील संडरलंड परगण्यातील डरॅम येथे झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नाही. आपल्या जन्मगावी एका औषधविक्रेत्याकडे त्यांनी उमेदवारी केली. नंतर ते न्यू कॅसल येथील मॉसन अँड स्वॉन या कंपनीत प्रथम साहाय्यक व नंतर भागीदार झाले. छायाचित्रणाच्या ओल्या पट्टिकांविषयीचे काम करीत असताना त्यांना असे दिसून आले की, उष्णतेमुळे सिल्व्हर ब्रोमाइड पायसाची संवेदनशीलता वाढते. त्यांनी १८७१ च्या सुमारास ओल्या पट्टिका कोरड्या करण्याची पद्धत तयार केली. यामुळे छायाचित्रणातील सोयीस्कर कामाचे युग सुरू झाले.१८७९ च्या सुमारास त्यांनी ब्रोमाइड पेपरचे एकस्व (पेटंट) घेतले.हा कागद सामान्यपणे आधुनिक छायाचित्रण मुद्रितांमध्ये वापरतात. [→ छायाचित्रण].

स्वॉन यांनी १८६० मध्ये प्रदीप्त विद्युत् दिवा तयार करताना त्यात निर्वातित केलेल्या काचेच्या बल्बमध्ये (फुग्यात) कार्बनीकृत कागदाचा तंतू वापरला. संपूर्ण निर्वात व पुरेसा शक्तिशाली विद्युत् स्रोत यांच्या अभावी या दिव्याचे आयुष्य अल्पकालीन ठरले. त्याची प्रकाश देण्याची क्षमता पुरेशी नव्हती. त्यांच्या या दिव्याचा अभिकल्प (आराखडा)⇨ टॉमस आल्वा एडिसन यांनी वीस वर्षांनी तत्त्वतः वापरला. निर्वाताच्या तंत्रात सुधारणा झाल्यावर या दोघांनी मिळून कळकाच्या सालीपासून बनविलेल्या तंतूचा एडी-स्वॉन नावाचा व्यावहारिक दिवा तयार केला (१८८०). नंतर आपल्या विद्युत् दिव्यासाठी अधिक चांगला कार्बन तंतू शोधताना स्वॉन यांनी कृत्रिम तंतू तयार करण्यासाठी छिद्रांमधून नैसर्गिक सेल्युलोजापासून बनविलेले नायट्रोसेल्युलोज घुसविण्याच्या (रेटून घालण्याच्या) प्रक्रियेचे एकस्व घेतले (१८८३). त्यांनी १८८५ मध्ये याविषयीच्या आपल्या सामग्रीचे आणि कृत्रिम तंतूंपासून बनविलेल्या काही वस्तूंचे प्रदर्शन मांडले. कापड उद्योगाने त्यांच्या या प्रक्रियेचा उपयोग करून १८९१ मध्ये व्यापारी प्रमाणावर अशा तंतूंचे उत्पादन प्रथम सुरू केले [→ तंतु , कृत्रिम]. स्वॉन यांनी त्याआधी जिलेटिनाच्या कोरड्या संवेदनशील (छायाचित्रण) पट्टिकेचा आणि खाणकामगारांसाठी विद्युत् सुरक्षा दीपाचा असे दोन शोध लावले.

स्वॉन रॉयल सोसायटीचे फेलो होते. त्यांना १९०४ मध्ये सर (नाइट) हा किताब बहाल करण्यात आला.

स्वॉन यांचे सरी परगण्यातील वार्लिंगहॅम येथे निधन झाले.

पहा : विद्युत् दिवे.

ठाकूर, अ. ना.