विद्युत् वाहक तारकाम: कारखाने, दुकाने, सार्जनिक जागा, घरे वगैरे ठिकाणी वापरात आलेले विजेचे दिवे आणि विद्युत् शक्तिवर  चालणारी विविध यंत्रे, उपकरणे (उदा., वातानुकूलक, विद्युत् तापक, धुलाई यंत्र, पंखे इ.) यांना त्यांच्या जागेवर विद्युत् वाहक तारांची (किंवा केबलींची) स्थापना करतात. यालाच विद्युत् तारकाम म्हणतात. हे करीत असताना प्रत्येक उपकरणाला आवश्यक तेवढा विद्युत् प्रवाह योग्य तेवढ्या कायम दाबाने पुरविणे जरूर असते तसेच वापरातील उपकरणाचे जळण्यापासून वा बिघडण्यापासून संरक्षण करणे आणि त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीचे विजेच्या धक्क्यापासून संरक्षण करणे जरूर असते.

अशा प्रकारे या तारकामात  विजेचे वितरण करणारी सामग्री येते. तशीच वीजपुरवठा खंडित करणारी व त्याचे नियंत्रण करणारी सामग्रीही येते. शिवाय एकूण व्यवस्थेचे संरक्षण करणारी सामग्री व वापरलेली वीज मोजण्यासाठी मापक (मीटर) यांचाही यात अंतर्भाव असतो. चुकीच्या व अयोग्य तारकामामुळे मंडल संक्षेप (शॉर्ट सर्किट) होऊन सामग्री खराब होण्याची अथवा आग लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सुरक्षितता हा अशा तारकामातील महत्त्वाचा घटक असतो. या सुरक्षेततेसाठी निरनिराळ्या देशांत योग्य तऱ्हेच्या तारकामासंबंधीची काही किमान मानके ठरवून दिलेली असतात. तसेच काही नियम केलेले असतात. तारकाम करताना विजेची हानी होणार नाही अशीही काळजी घेतात.

मराठी विश्वकोशात केबल, भूयोजन, वितळमार, विद्युत् दोष, विद्युत् मंडल खंडक व विद्युत् संवाहक या संबंधित स्वतंत्र नोंदीही आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करता एकूण विद्युत् प्रवाहाच्या प्रमाणात जाड व बारीक विद्युत् तारा वापरतात व त्यांवर रबर अथवा पॉलिव्हिनिल क्लोराईड (पीव्हीसी) प्लॅस्टिकासारख्या विद्युत् निरोधक पदार्थाचे संरक्षक आवरण घालतात व उपकरणाची योग्य त्या ठिकाणी जमिनीशी जोडणी किंवा भूयोग करतात [⟶ भूयोजन]. उपकरणात काही दोष उत्पन्न झाल्यास परिणामी जास्त प्रवाह खेचला जाऊन शिसे अच्छादित तारकाम होऊ शकतात व आगही लागू शकते. हे टाळण्यासाठी जरूरीपेक्षा जास्त प्रवाह वाहू लागल्यास आपोआप प्रवाह बंद वा खंडित होण्यासाठी ⇨पितळ तारेची अथवा ⇨विद्युत् मंडल खंडकाची योजना करतात.

विद्युत् तारांची स्थापना करताना तारा भिंतीवर २·७५ मी. उंचीवरून नेतात. यामुळे त्यांच्या मार्गात दारे, खिडक्या वगैरे अडथळे येत नाहीत शिवाय माणसांचाही हात सहजासहजी तेथपर्यंत पोहोचत नाही.

विविध पद्धती : विद्युत् वाहक तारा स्थापन करण्याच्या (१) क्लीट, (२) केसिंग-कॅपिंग, (३) सीटीएस किंवा टीआरएस, (४) नलिका व (५) शिसे अच्छादित तारेची या पाच पद्धती प्रचलित आहेत.

यांपैकी कोणती पद्धत कोठे योग्य ठरेल, हे ठरविताना पद्धत कोठे योग्य ठरेल, हे ठरविताना पद्धत किती काळासाठी जरूर आहे, भोवतालचे वातावरण, सुरक्षितता, सौंदर्य आणि सर्वांत प्रमुख म्हणजे या सर्वांसाठी लागणारे साहित्य आणि मजुरी यांसाठी होणारा खर्च यांचा विचार करतात.

आ. १. क्लीट पद्धत. चिनी मातीच्या दोन पट्ट्यांवमधून नेलेल्या दोन तारा : (१) खालची पट्टी, (२) वरची पट्टी. क्लीट पद्धत: ही पद्धत सर्वांत कमी खर्चाची असून  अगदीच तात्पुरत्या स्वरूपाचा कामांसाठीही वापरतात. या पद्धतीत चिनी मातीच्या आधार पट्ट्यांची जोडी वापरतात (या पट्ट्यांना क्लीट म्हणतात) व त्यांमधून संवाहक तारा नेलेल्या असतात. यासाठी सु. ५ ते ८ सेंमी. उंच, २ ते ३ सेंमी रूंद व १ सेंमी जाड या मापाच्या चिनी मातीच्या पट्ट्या वापरतात. ज्या मार्गावरून संवाहक तारा न्यावयाच्या असतील त्या मार्गावर सु. २५ सेंमी अंतरावर स्क्रूच्या साह्याय्याने या पट्ट्या बसवितात. स्क्रू बसविण्यासाठी भिंतीत लाकडी भाग नसल्यास रॉल (रावळ) प्लगचा वापर करतात. किंवा योग्य त्या ठिकाणी प्रथम लाकडी ठोकळे बसवून घेतात व त्यांवर  चिनी मातीच्या अथवा तीन खाचा ठेवतात. त्यांवर विद्युत् वाहक तारा ठेवून वरून दुसरी पट्टी बसवून दोनही पट्ट्या मिळून भिंतीत स्क्रूने घट्ट बसवितात. यामुळे विद्युत् वाहक ताराही दोन पट्ट्यांमध्ये घट्ट पकडल्या जातात व हलू शकत नाहीत. (आ.१).


 आ. २. केसिंग-कॅपिंग पद्धत : (अ) खाचा पाडलेल्या पट्टीचा (केसिंगचा) छेद, (आ) खाचा पाडलेल्या पट्टीत तारा ठेवून झाकणपट्टी (कॅपिंग) बसविल्यानंतरचा छेद : (१)खाचा पाडलेली पट्टी, (२) झाकणपट्टी, (३) चिनी मातीची चकती. केसिंग–कॅपिग पद्धत: या पद्दतीत संवाहक तारा न्यावयाच्या मार्गावर दोन खाचा  पाडलेल्या  लाकडी पट्ट्या (केसिंग) स्क्रूच्या साहाय्याने भिंतीवर बसवितात. भिंतीतील ओल वगैरेंचा परिणाम होऊ नये म्हणून लाकडी पट्टी व भिंत यांमध्ये चिनी मातीच्या गोल चकत्या बसवितात. पट्ट्यांच्या खाचांमध्ये योग्य त्या संवाहक तारा ठेवून खाचा झाकून टाकण्यासाठी वरून लाकडी झाकणपट्ट्या (कॅपिंग) खिळ्याने अथवा स्क्रूने बसवितात. या सर्व पट्ट्या सागवाणासारख्या चांगल्या टिकाऊ लाकडाच्या बनवितात. आणि कीड वगैंरेपासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी त्यांवर व्हार्निश लावून मग त्या वापरतात. (आ.२).

ही पद्धत थोडी महाग पडत असली, तरी हिच्यात संवाहक तारा पूर्णपणे सुरक्षित रहातात. त्यामुळे साधारणपणे घरातील तारकामासाठी हीच पद्धत जास्त प्रमाणात वापरतात. आता केसिंग व कॅपिंग या दोन्ही पट्ट्या पीव्हीसी प्लॅस्टिकाच्या बनविल्या असतात. त्या विविध रंगांत मिळत असल्याने त्यांचा गृहशोभा वाढविण्यास उपयोग होतो. तसेच लाकडाप्रमाणे त्या किडण्याची भीती नसते व झाकणपट्ट्या या स्क्रूने बसवाव्या लागत नाहीत. डब्याच्या झाकमाप्रमाणे नुसत्या दाबून त्या घट्ट बसतात.

आ. ३. सीटीएस किंवा टीआरएस पद्धत : (१) पकडपट्टी, (२) लाकडी पट्टी. सीटीएस किंवा टीआरएस पद्धत: त्यातल्या त्यात कमी खर्चाची व दुरुस्तीस सोपी असल्याने हीच पद्धत बऱ्याचशा घरांत वापरतात. या पद्धतीत तारा नेण्याच्या संपूर्ण मार्गावर भिंतीवर प्रथम योग्य त्या आकारमानाच्या लाकडी पट्ट्या स्क्रूच्या साह्याय्याने  बसवून घेतात व या पट्ट्यांवर संवाहक तारा पकडून ठेवण्यासाठी सु. ८ ते १० सेंमी. अंतराने कल्हई केलेल्या पितळेच्या पातळ पत्र्याच्या पकडपट्ट्या संवाहक तारचुबंकाच्या साह्याने बसवितात. या पकडपट्ट्यांवरून संवाहक तार बसवत जातात व त्याच वेळी या पकडपट्ट्यांची दोन टोके विद्युत् संवाहक वळवून एकमेकांत गुंतवतात अशा रीतीने तारा लाकडी पट्टीवर घट्ट बसतात. दमट हवामानातही ही पद्धत वापरता येते. पण जेथे पार पाणी वा  सूर्यप्रकाश किंवा अम्लाची वा क्षाराची (अल्कलीची) वाफ येत असेल, अशा ठिकाणी ही पद्धत वापरणे योग्य नसते. (आ.३).

नलिका पद्धत: ही सर्वांत टिकाऊ पद्धत असून हिच्यात संवाहक तारा पूर्णपणे सुरक्षित रहातात. हिचे पुढील दोन प्रकार आहेत: (अ) भिंतीवरून केलेले तारकाम व (आ) बाहेरून दिसून न येणारे  भिंतीच्या व छताच्या आतून केलेले (बंदिस्त) तारकाम.

आ. ४. नलिकांमधून संवाहक तारांचे जोडकाम करण्यासाठी वापरण्यात येणारी संयोजन पेटी. (अ) संवाहक तारांच्या संपूर्ण मार्गावर मानक अंक १४, १६ वा १८ च्या लोखंडी पत्र्याच्या जोडरहित व दोनही टोकांस आटे पाडलेल्या नलिका बसवून घेतात. नलिकांवर बाहेरून एनॅमलाचे आवरण दिलेले असते व आतून व्हार्निश लावलेले असते. यामुळे या नलिका ओलसर जागेतही गंजत नाहीत तसेच आतील ताराही खराब होत नाहीत. साधारणपणे तीन मीटर लांबीच्या नलिका मिळतात. नलिका भिंतीवर स्थिर  करण्यासाठी जागोजागी नलिका  पकडण्यासाठी  लोखंडी  जाड अर्धवर्तुळाकार पट्ट्या नलिकेवर स्क्रूने पक्क्या केलेल्या असतात. या  नलिकांचे जोडकाम करण्यासाठी नलाचे जोडकाम करण्यासाठी वापरतात. तशा प्रकारचे इतर सुटे भागही (उदा., युग्मक, कोपरे इ.) वापरावे लागतात [⟶नळकाम]. जेथे वळण लहान असेल तेथे नलिकांनाच  बाक  देता येतो. नलिका भिंतीवर घट्ट बसविल्यावर त्यांतून संवाहक तारा एकदम ओढून घेणे अवघड पडते. म्हणून प्रथम एक कोल तोंडाची चपटी लोंखडी तार नलिकेतून ढकलत ढकलत पुढे नेतात आणि या तारेचे टोक नलिकेच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आले म्हणजे या तारसच मागील बाजूस संवाहक तारांची टोके एकत्र बांधून पोलादी तार तशीच पुढे पुढे ढकलत आणतात. पोलादी तार जसजशी पुढे येईल, तसतशी संवाहक टोकेही नलिकेतून पुढे पुढे सरकतात व शेवटी सर्व पोलादी तार बाहेर येऊन नलिकेत फक्त संवाहक ताराच शिल्लक राहतात. नलिकेमधून तारा घालताना त्रास होऊ नये म्हणून नलिकेतून कोठल्या आकारमानाच्या किती तारा न्यावयाच्या असतील त्यामानाने नलिकेचे आकारमान ठरवितात.त्यासंबंधीचे कोष्टक विद्युत् स्थापनेसंबंधीच्या पुस्तकांत दिलेले असते. नलिकेतून तारा बाहेर काढण्याच्या दोन लागोपाठच्या जागांमध्ये फार अंतर असेल अथवा त्यांमध्ये बरीच वळणे आली असतील, तार ओढताना संवाहक तारांवर ताण पडतो. व क्वचित प्रसंगी खराब होण्याचा संभव असतो. अशा वेळी नलिका मार्गाचे योग्य लांबीचे छोटे छोटे भाग करून दोन भागांमध्ये झाकण असलेल्या संयोजन पेट्या वापरतात (आ.४). या पेटीचा बाहेरचा भाग लोखंडाचा असून आतला भाग मातीचा वा पीव्हीसीचा असतो. व या पेट्यांना दोन बांजूनी नलिका जोडतात. या पेट्यांमुळे तार ओढणे सुरक्षित व सुलभ होतेच. शिवाय या पेट्या पुढील काळात तपासणीसाठी उपयोगी पडतात व काही दोष निर्माण झाल्यास तो दूर करताना काही तारा काढून त्यांच्या जागी नवीन तारा स्थापणेही सुलभ होते.


 (आ) अशाच तऱ्हेचे पण भिंतीत दडविलेले तारकाम करताना भिंतीत नळीच्या आकाराचे व मापाचे खोदकाम करून वळविलेल्या खिळ्यांच्या साहाय्याने नलिका प्रथम भिंतीत घट्ट बसवून घेतात व मग त्यांवरून गिलावा करतात. तसेच प्रबलित सिमेंट काँक्रीटचे छत असेल, तेथे छताला नंतर काच पाडणे अवघड जाते म्हणून काँक्रीट ओतण्यापूर्वी काँक्रीट प्रबलित करण्यासाठी वापरलेल्या सगळयांनाच या नलिका बांधतात व काँक्रीट ओतण्यापूर्वी त्यांत काँक्रीट जाऊ नये म्हणून नलिकांची दोनही तोंडे कापड बांधून बंद करून घेतात तारकामास जरूर लागणाऱ्या स्वीच पेट्या, वितरणफलक वगैरेंसारख्या वस्तूही याबरोबरच भिंतीत वा छतात बसवून घेतात.

लोखंडी नलिका वापरल्यामुळे स्थापनेत कोठेही दोष निर्माण झाला, तर वापरणारास धक्का बसू नये यासाठी ठिकठिकाणी नलिकेचे ⇨भूयोजन करतात. तसेच सर्व नलिका एकमेंकींशी विद्युत् दृष्ट्या पक्क्या जोडलेल्या असतात. अशा एकमेकींना जोडलेल्या सर्व नलिकांचा एकूण रोध एक ओहमपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे. तसेच भूयोजन परिणामाकडे व्हावे यासाठी या नलिकांचा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला भूयोग करणे चांगले असते किंवा योग्य भूयोजनासाठी मापकाजवळच (मीटरजवळ) जमिनीत खड्डा करून विशेष भूयोग-स्थान निर्माण केलेले असते. त्यास याची जोडणी करतात. घरात वापरात असलेल्या विविध विद्युत् उपकरणांचे सुद्धा भूयोजन करावे लागते. त्यासाठी तीन पिनांचे प्लग वापरतात. यांतील तिसरी पिन इतर दोन पिनांहून थोडी जास्त जाड व लांब असते. आणि विद्युत् उपकरणाचे धातूचे बाह्या आवरण या पिनेला जोडतात. त्यामुळे प्लगमध्ये पिन घालताना प्रथम ही तिसरी पिन आत जाऊन प्रथम उपकरणाच्या आवरणाचे भूयोजन होते आणि मगच इतर दोन पिनांचा संयोग होतो. मात्र कोठल्याही परिस्थितीत नलिकांचे भूयोजन गच्चीवरून येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या नळाला वा इंधन वायू वाहून नेणाऱ्या घरातील नलिकांना करू नये. कारण त्यामुळे आगीचा  व विजेचा धक्का बसण्याचा संभव वाढतो.

मोठमोठ्या कारखान्यांत वापरण्यात येणाऱ्या विविध विद्युत् उपकरणांना वीजपुरवठा करण्यासाठी हीच पद्धत जास्त योग्य असते. भिंतीवर व छतावर  जरी या सरळ आणि लांब नलिका वापरल्या तरी उपकरणे व स्विचयांच्याजवळ मात्र तारा नेण्यासाठी लवचिक लोखंडी नलिका (केबली) वापरतात. कारण त्या सहजपणे वाकविता येतात व इतर ठिकाणाप्रमाणे त्यासाठी युग्मक, कोपरे वगैंरेचा वापर करावा लागत नाही.

याच पद्धतीत हल्ली पीव्हीसीच्या नलिकाही वापरतात. त्या वजनाने हलक्या असतात व त्या गंजण्याची भिती नसते. तसेच पीव्हीसी विद्युत् निरोधक असल्यामुळे वापरणाऱ्यांना विजेचा धक्का बसण्याची भीती राहत नाही. यांचे जोडकामही लोखंडी नलिकांप्रमाणेच करतात. तसेच हल्ली भरपूर लांबीच्या लवचिक पीव्हीसी नलिका मिळतात. त्यांचा वापर विशेषतः भिंतीतील बंदिस्त तारकामात चांगल्या रितीने करता येतो. कारण नलिकाच लवचिक असल्यामुळे व भरपूर लांब असल्याने तारकामात वळणे वगैरे देणे सुलभ होते, तसेच युग्मक, कोपरे वगैंरेचा वापर करावा लागत नाही.


 शिसे आच्छादित तारेची पद्धत: या पद्धतीत प्रत्येक संवाहक तारेवर स्वतःचे स्वतंत्र निरोधक आवरण असते. व अशा दोन वा अधिक तारांवर मिळून एक शिशाचे आवरण असते.

आ. ५. लहान घरातील विद्युत् संवाहक तारा बसविण्याची पद्धत : (१) सॉकेट, (२) एकमार्गी स्विच, (३) दिवा, (४) पंखा, (५) जलतापक, (६) विजेची शेगडी, क-व्हरांडा, ख-बैठकीची खोली, ग-स्वयंपाक घर, घ-नहाणी.

यांमुळे पाणी वा इतर द्रव पदार्थांचा तारकामावर कोठलाच परिणाम होत नाही, तसेच संवाहक तारा पूर्णपणे अच्छादिलेल्या असल्याने ही पद्धत जास्त टिकाऊ असते व उघड्या जागेवरही हिचा वापर करता येतो. अशा तारा भिंतीवर सीटीएस पद्धतीप्रमाणेच लाकडी पट्टीवर वा पट्टीशिवाय सरळ भिंतीवरही बसवितात. यांवरील शिशाचे आवरण ठिकठिकाणी दुसऱ्या संवाहक तारांच्या मदतीने भूयोजित करावे लागते. या पद्धतीत मुख्यतः शिशाचे आवरण संलग्न राखण्यासाठी जोड असेल तेथे विशेष प्रकारच्या संयोजन पेट्यांचा वापर करावा लागतो. नाही तर ही पद्धत इतर सर्व प्रकारांपेक्षा जास्त धोकादायक ठरण्याचा संभव असतो. अशा तऱ्हेचे संवाहक फार महागही असतात. हल्ली यांचा उपयोग फारसा होत नाही.

 आ. ६. दिवे व पंखा यांसाठीचे विद्युत् मंडल : (१) विद्युत् पुरवठा चालू नसलेला संवाहक, (२) प्लग सॉकेट, (३) स्विच, (४) दिवा, (५) पंखा, (६) विद्युत् पुरवठा चालू असलेला संवाहक.शिशाऐवजी हल्ली सर्व संवाहकांवर मिळून पीव्हीसीचे आवरण असलेल्या तारा मिळतात. यांचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. भूयोजित करण्यास संवाहक तारांपैकी एका तारेचा उपयोग करतात.ही पद्धत टिकाऊ असून शिवाय हिच्यात पाणी वगैंरेपासून कोठलाच धोका संभवत नाही. विशेषतः कारखान्यात विविध यंत्रसामग्रीने चार तारा त्रिकला प्रवाह पुरविण्यासाठी यांचा सर्रास उपयोग केला जातो.

आ. ७. एककला उपकरणांचे विद्युत् मंडल : (१) विद्युत् पुरवठा चालू असलेला संवाहक, (२) विद्युत् पुरवठा चालू नसलेला संवाहक, (३) भूयोजन तार, (४) विजेचा प्लग स्विच.

कोठलेही तारकाम करताना प्रथम त्या जागेचा आराखाडा किंवा नकाशा घेऊन त्यांवर विद्युत् उपकरणे व फलक यांच्या जागा व त्यांना जोडणारे तारकाम दाखविणारे आरेखन करून घेतात व त्यानुसारच नंतर तारकाम करतात (आ.५).

सर्वसाधारण दिवे व पंखे यांसाठी एक विद्युत् मंडल वापरतात (आ.६) व विद्युत् शक्तिवर चालणाऱ्या इतर अवजड सामग्रीसाठी स्वतंत्र विद्युत् वापरतात (आ.७). अशा तऱ्हेच्या नकाशामध्ये विविध भागांसाठी वापरावयाची सांकेतिक चिन्हे ठरवून दिलेली असून ती (पृ.क्र. ५६१ वरील) कोष्टकात दाखविली आहेत. 

पहा: भूयोजन विद्युत् मंडल. 

संदर्भ: 1. Doyle, J. Introduction to Electrical Wiring, Chicago, 1980.

          2. Earl, J. T. Traister, J. Electrical wiring, Princeton, 1986.

          3. Mix, F. M. House writing Simplified, 1989.

          4. Richter, H. W. Practical Electrical wiring, New York, 1989.

          5. Wood, R. W. Home Writing From Start to Finish, New York, 1989.

         ६. वर्तक, विद्युत् इलेक्ट्रिक वायरिंगची पूर्वतयारी, पुणे १९५९.

ओक, वा. रा, कोळेकर, श. वा.