विद्युत् मोटारगाडी : पुनःपुन्हा विद्युत् भारित करता येणाऱ्या विद्युत् घटमालेद्वारे चालविण्यात येणाऱ्या मोटारगाडीला विद्युत् मोटारगाडी म्हणतात. विद्युत् घटमालेत साठविलेल्या विद्युत् ऊर्जेचे विद्युत् चलित्रामार्फत (मोटारमार्फत) यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते व या यांत्रिक ऊर्जेने ही गाडी चालते.

प्रचक्रयुक्त मोटारगाडी व ट्रॉली बस किंवा विजेची बस या विजेवर चालणाऱ्या आणखी दोन प्रकारच्या मोटारगाड्या आहेत. प्रचक्रयुक्त मोटारगाडीत बाहेरच्या विजेने प्रचक फिरवून त्यात गतिज ऊर्जा साठवितात व या गतिज ऊर्जेने विद्युत् जनित्रे फिरवून वीज निर्माण करतात. मग ही वीज मोटारगाडीच्या प्रत्येक चाकावर बसविलेल्या लहान चलित्रांना पुरवून मोटारगाडी चालवितात. विद्युत् घटमाला पुनर्मारित (रिचार्जिंग) करण्यापेक्षा ऊर्जा साठविण्याच्या कामाला फारच कमी वेळ लागतो. शिवाय प्रचक्रात साठविलेल्या ऊर्जेएवढी ऊर्जा साठविण्यासाठी वापराव्या लागणाऱ्या घटांची संख्या व पर्यायाने त्यांचे वजनही प्रचकापेक्षा जास्त होते[⟶प्रचक्र]. ट्रॉली बस चालविण्यासाठी टांगलेल्या तारांमधून वीज घ्यावी व ती मोटारगाडीप्रमाणे साध्या रस्त्यावरून धावू शकते [⟶ ट्रामगाडी]. तथापि या दोन्ही प्रकांरात लागणारी वीज बाहेरून घेतली जाते, म्हणून त्यांना विद्युत् मोटारगाडी म्हणता येत नाही. मराठी विश्वकोशात मोटारगाडी, विद्युत् कर्षण, चलित्र, विद्युत् घट इ. विद्युत् मोटारगाडीशी संबंध असणाऱ्या विषयांवर स्वतंत्र नोंदी आहेत. 

इतिहास : पहिले व्यवहारिक विद्युत् वाहन रॉर्बट डेव्हिडसन यांनी १८३७ साली इंग्लंडमध्ये तयार केले. १८३९ साली रॉर्बट अँडरसन यांनी विद्युत् मोटारगाडी बनविली होती, असे म्हणतात. यानंतर १८९० पर्यंत अनेक प्रयोग होऊनही विशेष प्रगती झाली नाही  कारण गाडी चालविण्यासाठी सलागणारा मोठा विद्युत् प्रवाह प्राथमिक विद्युत् घटांपासून दीर्घकाळ मिळत नाही. १८५९-६० मध्ये गास्ताँ फ्लांते यांनी संचायक विद्युत् घटमाला बनविली व १८८१ साली कामीय फॉरे यांनी घटमालेत सुधरणा केल्या. १८८१ साली पहिले तीनचाकी विद्युत् वाहन पॅरिसला चालविण्यात आले. १८८२ साली लंडनला व १८८८ साली बोस्टनलाही तीनचाकी विद्युत् वाहन चालविण्यात आले होते. १८८६ साली संचायक विद्युत् घटावर चालणारी विद्युत् मोटारगाडी इंग्लमध्ये बनविण्यात आली. हिच्यात २८ विद्युत् घटांद्वारे चाकांना जोडलेली चलित्रे फिरत असत. हिचा कमाल वेग ताशी १३ किमी. होता. १८९१ साली विल्यम मॉरिसन यांनी अमेरिकेतील पहिली विद्युत् मोटारगाडी बनविली व गावतल्यागावातकमी अंतर जाण्यासाठी ही बनविली होती. तिच्यात आसनाखाली २४ विद्युत् घट ठेवले होते व हे घट सलग १३ तास कार्य करू शकत. १८ प्रवाशांच्या या गाडीत ४ अश्वशक्तीचे चलित्र वापरले होते व तिचा कमाल वेग ताशी २३ किमी. होता. एल्मर ॲम्बरोझ स्पेरी यांनी ज्या विद्युत् घटमालेचे एकस्व घेतले होते, ती वापरून १८९५ साली विद्युत् मोटारगाडी बनविली होती. याच सुमारास हिरम पर्सी मॅक्सिम यांनी ‘कोलंबिया’ नावाने ओळखण्यास येणाऱ्या विद्युत् मोटारगाडीचा अभिकल्प (आराखाडा) बनविला होता व तो अनेक वर्षे वापरात होता. १८९५ साली अमेरिकेत झालेल्या मोटारगाड्यांच्या शर्यतीत दोन विद्युत् मोटारगाड्या होत्या. १८९६ साली वॉल्टर बर्सी यांनी विद्युत् मोटारगाडीने लंडन ते ब्राइटन असा  प्रवास केला होता. त्यांच्या लंडन इलेक्ट्रीक कॅब कंपनीने विद्युत् मोटारगाडीची नियमित प्रवासी –सेवा सुरू केली होती. या गाडीत चालक मध्यभागी उंचावर बसत असे आणि मागे व पुढे प्रवाशांचे बंदिस्त होते. हिच्यात ४० विद्युत् घट व ३ अश्वशक्तीचे चलित्र वापरले होते. एका पुनर्भारणात ही गाडी ८० किमी. जात असे. घट काढायला व बसवायला सोयीचे व्हावेत म्हणून ते सर्व एका तबकात बसविलेले होते. घट ठेवण्यासाठी जास्त जागा लागत असे व गाडीचे वजनही त्यामुळे वाढले होते. शिवाय विशेषतः ती चालू व बंद करताना धक्के बसत. त्यामुळे ही सेवा बंद पडली १८९८ साली फ्रान्समध्ये झालेल्या मोटारगाड्यांच्या टेकडी चढण्याच्या शर्यतीत विद्युत् मोटारगाडी पहिली आली होती. 

अमेरिकेत १८९५ते १९१२ पर्यंत विद्युत् मोटारगाड्या विशेष लोकप्रिय होत्या. १९०० साली तेथील एकूण मोटारगाड्यांपैकी ३८% गाड्या विद्युत् मोटारगाड्या होत्या. त्याच साली झालेल्या अमेरिकेतील मोटारगाड्यांच्या पहिल्या राष्ट्रीय प्रदर्शनात मुख्यत्वे विद्युत् मोटारगाड्या ठेवल्या होत्या. खाजगी व सार्वजनिक वाहतूक, कमी अंतरावरील मालवाहतूक केरकचरा गोळा करणे वगैंरेसाठी या गाड्या वापरीत. या गाड्यांचा  कमाल वेग (ताशी२४ ते ४०) व पल्ला म्हणजे एका पुनर्भारणात कापण्यात येणारे अंतर (८० ते १८० किमी.) कमीच राहिले, उदा., १९०३ सालची क्रिमार गाडी २४ किमी. वेगाने ८० किमी. अंतर तर १९१३ सालची ५ माणसे बसू शकणारी ‘ग्रिनेल के’ गाडी ताशी ३५ किमी. वा कमाल वेगाने १८० किमी, अंतर जाई. १९१२ साली अमेरिकेत विद्युत् मोटारगाड्यांची संख्या ३३·८४२ होती व त्यांचे उत्पादन करणाऱ्या २० कंपन्या होत्या. १९२० सालापर्यंत या गाड्या अंतर्ज्वलन-एंजिन [ज्यात इंधन जाळण्याची व्यवस्था आतच केलेली असते असे एंजिन,⟶ अंतर्ज्वलन -एंजिन] वापरणाऱ्या पेट्रोलच्या गाड्यांच्या स्पर्धेत टिकून राहिल्या. 

विद्युत् मोटारगाड्यांचा वेग व पल्ला कमी होताच, शिवाय त्या अवजडही होत्या. त्यांची ऊर्जा घनातही (माध्यमाच्या दर एकक घनफळामागील ऊर्जाही) कमीच (०·००८८ ते ०·००१३२ किवॉ. तास/किग्रॅ.) होती. तसेच विद्युत् घटमोलाच्या पुनर्भारणावर अवलंबून रहावे लागते. यामुळे शक्तिशाली व चालवायला सोप्या पेट्रोलच्या मोटारगाड्या आल्याने विद्युत् मोटारगाड्या मागे पडू लागल्या. पुनर्भारणाच्या तुलनेत कमी वेळा पेट्रोल भरावे लागते., पेट्रोल कोठेही सहज वाहून नेता येते, शिवाय महोत्पादनामुळे पेट्रोलगाड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या व त्यांची किंमत कमी झाली. १९१२ साली पेट्रोलगाडीत विद्युत् घटमालेद्वारे चालणारा स्वयं-आरंभक वापरण्यास सुरूवात झाली. यामुळे हँडल फिरवून गाडी सुरू करण्याची गरज उरली नाही व स्त्रिया पण मोठ्या प्रमाणावर मोटारगाड्या चालवू लागल्या. अशा प्रकारे विद्युत् मोटारगाड्यांची जागा पेट्रोलगाड्यांनी घेतली आणि १९३० च्या सुमारास विद्युत् मोटारगाड्या जवळजवळ प्रचारातून गेल्या.  

तथापि १९६०-७० या दशकात प्रदूषणाविषयी अधिक जाणीव निर्माण होऊ लागली, तर त्यापुढील दशकात खनिज तेलाचे घटते साठे, वाढत्या किंमती व त्याचा राजकीय हत्यार म्हणून होऊ लागलेला वापर यांमुळे विद्युत् गाड्यापुन्हा आकर्षक वाटू लागल्या. मात्र त्याचा विकास अगदी सावकाश होत आहे. व १९७० नंतर त्यांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होऊ लागले. ⇨इंधन विद्युत् घटामुळे याला काही प्रमाणात चालना मिळाली. मात्र मूळची जास्त किंमत, मर्यादित पल्ला व वेग, कार्यमानाचा माफक दर्जा, तसेच स्वस्त, शक्तिशाली, वजनाला हलक्या व टिकाऊ विद्युत् घटमालांची अनुपलब्धता यांमुळे १९८५ पर्यंत त्यांचा खप व पर्यायाने उत्पादन ही मर्यादित राहिले आहेत.  


योग्य अशा विद्युत् घटमाला शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसेच १९७०-८० दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या संकरित प्रकारच्या विद्युत् मोटारगाड्यांचे उत्पादन मर्यादित प्रमाणावर करण्यात येत आहे. या संकरित विद्युत् मोटारगाडीचे सर्व भाग आसतातच. शिवाय तिच्यात पर्यायी वापरासाठी अंतर्ज्वलनएंजिनही बसविलेले असते. गरजेनुसार विद्युत् घट किंवा हे एंजिनवापरून गाडी चालविता येते.विद्युत् घटमालेच्या पुनर्भारणासाठीही हे एंजिन वापरता येते. १९८०-९० या दशकात जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या अमेरिकेतील कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारलेली ‘सनरेसर’ ही विद्युत् मोटारगाडी बनविली आहे. या प्रायोगिक गाडीत विद्युत् घटांचे पुनर्भारण सौर ऊर्जेद्वारे केले जाते. अमेरिकेत काही राज्यांनी प्रदूषणरहित गाड्या बनविण्यासाठी १९९८ ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे जनरल मोटार्स कंपनीप्रमाणेच क्रायस्लर व फोर्ड या अमेरिकेतील आणि टोयोटो व होंडा या जपानी कंपन्या आपापल्या विद्युत् मोटारगाड्या १९९८ सालाअखेरपर्यंत बाजारात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत अशा रीतीने विद्युत् मोटारगाडीच्या संशोधनाला चालना मिळाली असली, तरी विद्युत् मोटारगाड्या महाग आहेत. तथापि कारखान्यातल्या मालवाहतूक तसेच मालाची चढ-उतार करण्यासाठी येणाऱ्या फोर्क लिप्ट गाड्या, गोल्फ खेळासाठी लागणाऱ्या छोट्या गाड्या, रूग्णवाहक, कचरा व माल वाहून नेणाऱ्या गाड्या, विमानतळावरील गाड्या, तसेच बेकरी, धुलाई, दूध, टपाल या उद्योगांत लागणाऱ्या गाड्या या बहुतेक गाड्या आता विद्युत् घटमालांद्वारे चालविल्या जातात. 

सर्वसाधारण रचना : विद्युत् चलित्र, घटमाला व नियत्रंकहे या गाडीचे मुख्य भाग असून ही विद्युत् चलित्राच्या साहाय्याने चालते. हे चलित्र एकसरी पद्धतीने गुंडाळलेले व जास्तीत जास्त भार खेचण्याची शक्ती निर्माण होईल अशी रचना असलेले कर्षण प्रकारचे व मुख्यत्वे एकदिश (एकाच दिशेत वाहणाऱ्या) विद्युत्  प्रवाहावर चालणारे असते. विद्युत् घटमाला संचायक (विद्युत् भार साठवून ठेवणाऱ्या) प्रकारची असते. चलित्र गाडीच्या चाकांना किंवा आसाला दंतचक्राने जोडलेले असते. बहुधा चलित्रे मोटारीच्या चाकांनाच थेट जोडतात. यामुळे शक्तिप्रेषणाची गरज उरत नाही. विद्युत् मोटार गाडीला खालची चौकट (चॅसी) असते पण बहुधा एंजिन, इंधन, दंतचक्र पेटी, क्लच इ. पेट्रोलगाडीचे भाग हिच्यात नसतात. अशा रीतीने पेट्रोलगाडीपेक्षा विद्युत् मोटारगाडीत यांत्रिक भागांची संख्या बरीच कमी असते. चलित्राद्वारे मागील चाकांना गती देण्यासाठी आस, बेव्हल दंतचक्र (एकाच प्रतलात असलेल्या पण ज्यांच्या अक्षांत कोन आहे अशा आसांना जोडणारी दंतचक्रांची प्रणाली) किंवा वर्म व वर्म दंतचक्र आणि गतिविभाजक यांचा उपयोग करतात. गतिरोधनासाठी पूर्वी जाड तार व तरफेचा तर नंतर द्रवीय पद्धतीचा उपयोग करतात.

गाडीच्या नियंत्रणासाठी घटमाला व चलित्र यांच्या दरम्यान विद्युत् रोध एकसरीमध्ये जोडतात. नियंत्रकाच्या मदतीने हा रोध हळूहळू कमी करतात व अखेरीस चलित्र पूर्ण विद्युत् दाबावर चालते मात्र यात विद्युत् प्रवाहाचा फार अपव्यय होतो. एकसरी-अनेकसरी क्षेत्र नियंत्रण व एकसरी–अनेकसरी घटमाला नियंत्रण हे नियंत्रणाचे दोन प्रकारही वापरतात. व ते कमी खर्चिक आहेत. इलेक्ट्रॉनीय नियंत्रकाच्या मदतीनेही घटमालेकडून चलित्राला होणाऱ्या विजेच्या पुरवठ्याचे नियंत्रण चालकाला करता येते.

विद्युत् घटमाला : विद्युत् मोटारगाडीत वापरण्यात येणाऱ्या विद्युत् घटमालेची क्षमता गाडीच्या उपयोगावर अवलंबून असते. उदा., रस्त्याचे स्वरूप (चढउतार, खडबडीतपणा). गाडीची भार वाहून नेण्याची क्षमता, गाडीचे १ किमी.मधील टप्पे वगैंरे. ही  क्षमता अँपिअर–तास या एककात मोजतात. गाडीच्या उपयोगानुसार घटमालेची क्षमता १०० ते ४०० अँपिअर–तास आणि विद्युत् दाब २५ ते ७५ व्होल्ट असतो. स्वस्त, वजनाने हलकी, अधिक शक्तिशाली व टिकाऊ घटमाला विकसित करणे हीच खरी अडचण असून त्या दृष्टीने  प्रयत्न चालू आहेत. वापरात असलेल्या काही विद्युत् घटमालांची माहिती पुढे दिली आहे.

शिसे-अम्ल घटमाला : ही जास्त प्रमाणात वापरली जाते. हिच्यात शिसे व विरल सल्फ्यूरिक अम्ल यांच्यातील रासायनिक विक्रियेचा विजनिर्मितीसाठी उपयोग केलेला असतो. ही घटमाला स्वस्त असली, तरी जड असते. शिवाय तिची आयुर्मर्यादा कमी आहे म्हणजे जास्तीत जास्त ४०० वेळा तिचे पुनर्भारण करता येते. हिच्या साहाय्याने गाडीचा कमाल वेग ताशी ३२ किमी. ठेवता येतो व हिचा पल्ला ६० किमी. पर्यंत असतो. सुधारित शिसॉ-अम्ल घटमालेचा पल्ला १६० किमी. असून तिचे आयुर्मान ८०० पुनर्भारणांएवढे असते. अन्य धातू, विद्युत् विच्छेद्य (विद्युत् प्रवाह वाहून नेणारा पदार्थ) व ऑक्सीडीकारक पदार्थ [⟶ ऑक्सिडीभवन] यांच्या निरनिराळ्या संयोगांचा वापर करून या घटमाला अधिक कार्यक्षम, टिकाऊ व वजनाने हलक्या करण्याचे प्रयत्न होत आहेत.

निकेल-जास्त घटमाला : हिचे १,००० वेळा पुनर्भारण करता येते व हिच्या धन पट्टीवर साचणाऱ्या प्रश्र सोडविण्यास आला आहे. ‘व्हायब्रो’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या अशा घटमालेचे वजन शिसे-अम्ल घटमालेच्या तुलनेत १/३ असून हिचे १,२०० वेळा पुनर्भारण करता येते.

लिथियम-धातू सल्फाइड घटमाला : ५०० वेळा पुनर्भारण करता येणारी अशी एक घटमाला १० हजार तास चालू ठेवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. चार उतारूंच्या गाडीसाठी याघटमालेचा पल्ला ३२० किमी. पर्यत वाढू शकेल. शिसे-अम्ल घटमालेच्या तुलनेत ही घटमाला सु. १/५ एवढी हलकी होऊ शकेल. मात्र हिचे कार्य ३०० ते ५०० से. एवढ्या धोकादायक उच्च तापमानालाच चालते (उदा., लिथियम-आर्यंन सल्फाइड घटमाला ४५० से.ला) म्हणून ती वापरण्यात अडचणी आहेत. 

सोडियम-गंधक घटमाला : शिसे-अम्ल घटमालेच्या तुलनेत दर किग्रॅ, मागे हिच्यापासून सहापट ऊर्जा मिळते. ३०० ते ५०० से. एवढ्या उच्च तापमानाला कार्य करणाऱ्या या घटमालेत विद्युत् विच्छेद्य म्हणून मृत्तिकाद्रव्ययुक्त पदार्थ वापरला आहे. हिचे आयुर्मान ५०० पुनर्भारणांएवढे आहे. ब्रिटनमध्ये हिचे विशेष संशोधन चालू आहे.  

जस्त-क्लोरीन घटमाला : या घटमालेचे आयुष्य ३,५०० पुरनर्भारणांएवढे दीर्घ असून ही घटमाला वापरणाऱ्या गाडीचा वेग ताशी ८० किमी. व पल्ला २०० ते ३६० किमी. असू शकेल. ही घटमालाही ३०० ते ३५० से. ला. कार्य करते. पेट्रोल गाडीपेक्षा या घटमालेने चालणाऱ्या विद्युत् मोटारगाडीचा खर्च १/३ एवढा असेल, असा अंदाज आहे. या घटमालेत गल्फ अँड वेस्टर्न कंपनीने सुधारणा करण्यास १९७२ साली सुरूवात केली, रात्रीच्या वेळी वीज साठविणारी व दिवसा अधिक गरज असताना वीज वापरणारी  अशी घटमाला बनविण्याचे प्रयत्न या कंपनीने केले. अशी घटमाला २२० व्होल्टच्या प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशांनी वाहणाऱ्या) प्रवाहाने ६ ते ८ तासांत पुनर्भारित करता येते. या घटमालेने विद्युत् गाडीचा पल्ला १९० ते २४० किमी. एवढा वाढला. शिवाय ही घटमाला तिच्यातील ९५% विद्युत् भार संपेपर्यंत पुर्ण शक्ती पुरवू शकते. ही घटमाला अमर्यादपणे पुनर्भारित करता येईल, असाही अंदाज आहे.  


ॲल्युमिनियम-हवा घटमाला : हिच्यात अम्लाऐवजी क्षार (अम्लाशी विक्रीया झाल्यास लवण देणारा पदार्थ, अल्कली) वापरतात. त्यामुळे कोरडी करून ठेवल्यास ही बरेच दिवस टिकू शकते व क्षार भरून लगेच वापरातही येते. ही विशेष गंजत नाही, स्थिरगतीने ऊर्जा विसर्जित करते, हिचे पुनर्भारण यांत्रिक रीतीने काही मिनिटांतच करता येते, ही वजनाला हलकी असते आणि ६० से. एवढ्या कमी (सुरक्षित) तापमानाला हिचे कार्य होत असते. [⟶विद्युत् घट].  

प्रचालनाची संकरित पद्धती : विविध घटमालांचे गुणधर्म लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या घटमाला एकत्रितपणे वापरण्याची विद्युत् मोटारगाडीच्या प्रचलनाची संकरित (संमिश्र) पद्धतीही वापरात आणल्याचे दिसते. उदा., धातु-हवा घटमाला एकक वजनामागे उच्च ऊर्जा विसर्जित करते. त्यामुळे ती नेहमीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरावयाची, तसेच उच्च प्रवेग मिळविण्यासाठी व तीव्र चढ चढून जाण्यासाठी मात्र त्या दृष्टीने अधिक कार्यक्षम शिसे-अम्ल घटमाला तिच्या जोडिनेच वापरावयाची. यामुळे मोटारगाडीची कार्यक्षमता वाढते. अशी गाडी ताशी ५० किमी. वेगाने एका पुनर्भारणात ६०० किमी. पर्यंत अंतर सहज कापू शकेल.  

मोटारगाडीचा पल्ला व कार्यक्षमता सुधारण्यासाठी विद्युत् घटमालेच्या जोडीने पेट्रोल एंजिनाचाही वापर करतात. यात शहरातील प्रवासाच्या वेळी विद्युत् घटमाला तर गावाबाहेरील दूरवरच्या सलग दीर्घ प्रवासासाठी पेट्रोल एंजिन वापरतात. 

कधीकधी विद्युत् घटमालेबरोबर प्रचक्रही वापरतात. अशा हलक्या मिश्रधातूंची चाके प्लॅस्टिकच्या खिडक्या असलेल्या कमी वजनाच्या आणि २० अश्वशक्तीचे चलित्र असलेल्या मोटारगाडीची कार्यक्षमता ९० टक्क्यांपेक्षाही अधिक असते. तसेच या गाडीच्या गतिरोधनाच्या वेळेस किंवा गाडी तीव्र उतारावरून प्रवास करताना गाडीतील चलित्र विद्युत् जनित्राप्रमाणे कार्य करते म्हणजे गतिज ऊर्जेचे विजेत रूपांतर करते. या विजेचा वापर घटमाला पुनर्बारित करण्यासाठी होऊ शकतो. गाडीचा वेग, चलित्राचे घूर्णी परिबल [फिरविणारी स्पर्शक प्रेरणा व तिचे परिवलन अक्षापासूनचे अंतर यांचा गुणाकार, ⟶ धूर्णी ] व प्रयोग (वेग वाढण्याची त्वरा) यांचे कार्यक्षम रीतीने व सुरळतीपणे नियंत्रण करणारी शक्तिनियामक यंत्रणाही या गाडीत असते. हिच्यातील ट्रँझिस्टराच्या मदतीने मोठे विद्युत् प्रवाह काही मायक्रोसेंकदात चालू वा बंद करता येतात. तसेच त्यांची दिशाही बदलता येते. प्रचालन ऊर्जा प्रवाहाचे नियंत्रण करण्यासाठी सूक्ष्मप्रक्रियक वापरला आहे. या गाडीचा आकार असा असतो. की तिला होणारा हवेचा रोध परंपरागत पेट्रोलगाड्यांच्या रोधाच्या ६०% इतकाच होतो. या गाडीच्या सुधारित प्रकारात उच्च वेगाने फिरणारे प्रचक बसविलेले असते. प्रचक्रामुळे साठविली गेलेली ऊर्जा चढ चढण्यासाठी अथवा प्रयोग वाढविण्यासाठी वापरता येते.  

स्वीडनमध्ये नेहमीच्या रासायनिक विद्युत् घटाला सौर विद्युत् घटाची जोड देऊन संकरित प्रचालन पद्धतीवर चालणारी गाडी बनविली आहे. सूर्यप्रकाश असताना या गाडीच्या टपावरील सौर विद्युत् घटात निर्माण होणाऱ्या विजेवर गाडी चालते. तर इतर वेळेस गाडी  चालविण्यासाठी शिसे-अम्ल घटमालेचा उपयोग होतो. सूर्यप्रकाश असताना गाडी वापरात नसेल तेव्हा सौर विद्युत् घटात निर्माण होणारी वीज शिसे-अम्ल घटमालेच्या पुनर्भारणासाठी वापरता येते. स्वीडनमध्येच एका ट्रेलरमध्ये ५० अश्वशक्तीचे पर्यायी पेट्रोल एंजिन ठेवलेली गाडीही वापरून पाहण्यात येत आहे. केवळ विद्युत् घटमालेने चालविल्यास ताशी ४० किमी. वेगाने १०८ किमी. पल्ला गाठता येईल. पेट्रोल एंजिनाने चालविल्यास सु. ६५ किमी. वेग व टाकीनुसार पल्ला राहील. विशिष्ट एंजिन डोंगरळ भागातही वापरता येईल, असा प्रयत्न होत आहे. व्होल्वहो कंपनीही विद्युत् व पेट्रोलवर चालणारी संकरित गाडी १९९८ पर्यत बनविणार आहे, तिच्यात २० ते ३०% पेट्रोल वाचेल. 

अलीकडील प्रगती : खनिज तेलाचे घटते साठे, प्रदूषणाचा प्रश्र इ. गोंष्टीमुळे यूरोप, अमेरिका, जपान, जर्मनी इ. ठिकाणचे मोटारगाडी उद्योजक  विद्युत् मोटारगाडी बनविण्यासाठी नव्याने प्रयत्न करू लागले आहेत. भारतातही असे प्रयत्न होत आहेत. मुख्यत्वेविद्युत् घटमाला व चलित्र यांचे पर्यायी  प्रकार पूर्णपणे विजेवर चालणारी सुकाणू यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. याविषयी काही माहिती आधी आलेली आहेच. पुढे काही कंपन्यांच्या आधुनिक विद्युत् मोटारगाड्यांची माहिती व त्या अनुषंगाने झालेले प्रयत्न दिले आहेत. 

ब्रिटनमधील ल्युकॅस कंपनीने १९७६ मद्ये विद्युत् टॅक्सी बनविली. तिचा वेग ताशी ८० किमी. व पल्ला १६० किमी. होता. खास बनविलेली हिची घटमाला दर किग्रॅ.मागे ३५-३८ वॉट-तास शक्ती पुरवू शकते. या घटमालेचे ५०० वेळा पुनर्भारण करता येते. अशा खास घटमाला फार्टा (जर्मनी) व क्लोराइड (ब्रिटन) या कंपन्याही बनवीत आहे. क्लोराईड कंपनीने बस मालवाहू व प्रवासी विद्युत् मोटारगाड्या बनविल्या होत्या. 

अमेरिकेतील क्रायस्लर कंपनीने सुधारित ‘टी-व्हॅन’ बनविली आहे. सहाजण बसू शकणाऱ्या या गाडीत १८० व्होल्टची निकेल-लोह विद्युत् घटमाला वापरली असून तिचे पुनर्भारण ८ तासांत करता येते. ताशी ३९ किमी. वेगाने एका पुनर्भारणात ही गाडी १८९ किमी. जाऊ शकते. 

फोर्ड कंपनीच्या ‘इकोस्टार’ गाडीत ३० किवॉ. तास क्षमतेची सोडियम-सल्फाइड विद्युत् घटमाला व ७५ अश्वशक्तीचे विकला प्रवर्न चलित्र वापरले आहे. 

जपानच्या निस्सान कंपनीच्या विद्युत् वाहनात दोन प्रौढ व दोनमुले बसू शकतात. ही गाडी निफेल-कॅडमियम विद्युत् घटमालेवर चालते. या घटमालेचे पुनर्भारण घरगुती वापराच्या विजेद्वारे ८ तासांत, तर ४०० व्होल्टवर चालणाऱ्या खास पुनर्भारण पद्धतीने १५ मिनिटांत करता येते. अशा पुनर्भारणाची जलद सोय हमरस्त्यावर उपलब्ध झाल्यास या गाड्या यशस्वी होतील, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय जपानमध्ये हलके ट्रक, बस, विद्युत् घटमाला यांविषयी संसोधन चालू आहे. 

जर्मनीतील मर्सिडीज-बेंटसच्या विद्युत् मोटारगाडीत पाचजण बसू शकतात. हिच्यातील सोडियम-निकेल क्लोराईड विद्युत् घटमालेची क्षमता २५ किवॉ.तास असून हिच्या पुनर्भारणाला १२ तास लागतात. हिच्यात एकदिश चलित्रांची जोडी वापरलेली आहे.  

बेयरिश मोटरेन वेर्के (बीएमडब्ल्यू) या म्यूनिक येथील जर्मन कंपनीने ई-१ या नावाची विद्युत् मोटारगाडी यूरोपीय बाजारपेठसाठी बनविली आहे. हिच्यात दोन प्रौढ व दोन मुले बसू शकतात. हिच्यात सोडियम-गंधक घटमालेचे दोन संच असून त्यांची एकूण क्षमता २८ किवॉ. तास आहे. या गाडीचा पल्ला २५७ किमी. आहे. याच कंपनीने अमेरिकन बाजारपेठकरिता ई-२ ही चारजणांची गाडी बनविली आहे. यांशिवाय जर्मनीत बस व मालवाहू विद्युत् मोटारगाड्या, तसेच विद्युत्  घटमाला यांविषयीचे संशोधन होत आहे.  


 अमेरिकेतील जनरल मोटर्स कॉर्पोरेशनने ‘इंपॅक्ट’ या सर्वांत आधुनिक विद्युत् मोटारगाडीचा प्रकल्प १९९३ साली सुरू केला आहे. पुढच्या प्रत्येक चाकाला एक अशी दोन प्रत्यावर्ती विद्युत् चलित्रे बसविली असून त्यांच्यामार्फत ८५ किवॉ. शक्ती निर्माण होते. यामुळे गाडीचा वेग सहजपमे ताशी १२० किमी.वर जातो, हिचा पल्ला १९२ किमी. आहे. ही अतिशय हलक्या द्रव्यांची बनविली असून हिची बनावट अगदी नवीन प्रकारची आहे. हिचा आकार ⇨ वायुगतिकीच्या दृष्टीने परीक्षण करून ठरविला आहे. [⟶ वायुयामिकी ].  

प्युगॉत-सीत्राएं या फ्रेंच कंपनीची दोनजमांसाठी सु. २·१ मी. लांबीची ट्यूलिप गाडी बनविण्याची योजना आहे. या गाडीचे चलित्र १३ अश्वशक्तीचे व घटमाला ९·७६ किवॉ. तास क्षमतेची असेल. होंडा सिव्हिक हॅचबँक गाडीत विद्युत् घटमाला वापरून सीयूव्ही -४ (क्लीनअर्बन व्हीईकल -४) ही विद्युत् गाडी बनविण्यात येत आहे. हिचा वेग ताशी १२८ किमी. व पल्ला ६४ ते ११२ किमी. राहील. हिच्यातील शिसे-अम्ल घटमालेच्या पुनर्भारणासाठी ६ ते ८ तास लागतील.

जर्मनीत डॉइश बुंडेस्पोस्ट डायंन्स्ट ही कंपनी टपाल व्हॅनमधील डीझेल एंजिनाच्या जागी जस्त-हवा विद्युत् घटमाला वापरून पाहत आहे. साठ गाड्यांत अशी योजना केली असून त्यांपैकी मर्सिडीज वेंटसच्या ४·५टनी१५ व्हॅनही आहेत. हिचा पल्ला ३२० किमी. आहे. विद्युत् घटमाला व त्यांत इंधन परत भरण्यासाठी लागणारी खास प्रकारची यंत्रसामग्री इझ्राएलच्या इलेक्ट्रीक फ्येल कॉर्पोरेशनने बनविली आहे. तिच्यामार्फत जस्त धनाग्र (ॲनोड) कॅसेट काढता व घालता येते. या प्रकारे नवीन कॅसेट बसविण्यासाठी १० मिनिटे  लागतात. वापरलेली कॅसेट पुनर्भरित करून परत वापरता येते. डीझेल खर्चाच्या तुलनेत (मागणी कमी असतानाच्या विजेच्या दराने लागणारा पुनर्भारणाचा खर्च विचारात घेतल्यास) विद्युत् घटमालेचा खर्च ४० टक्क्यांनी कमीयेतो. चाचणी यशस्वी ठरल्यास कंपनी आपल्या निम्म्या गाड्यांत अशी सुधारणा करणार आहे. 

भारतीय प्रयत्न : भारतातही विद्युत् मोटारगाडी तयार करण्यासाठी  प्रयत्न चालू आहेत.  

भारत हेवी इलेक्ट्रकल्स लिमिटेड (बीएचईएल) येथे विद्युत् वाहन बनविण्यासाठी संशोधन व विकासाचे काम मोठ्या प्रमाणात सर्वप्रथम हाती घेण्यात आले आहे. येथे बनविलेल्या विद्युत्  मिनीबसची मूळ प्रतिकृती दिल्ली परिवहन निगम वापरून पाहत आहे.  

मुंबईच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) येथे विविध प्रकारच्या विद्युत् घटमाला आणि विद्युत् मोटारगाडीसाठी भावी काळात उपयुक्त ठरणारे  कायेचे आकार यांच्यावर प्रयोग करण्यात येत आहेत.  

द सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिटयूट (सीईईआरआय) या राजस्थानातील पिलानी येथील संस्थेत विद्युत् व्हॅनची चाचणी गेतली आहे. एका प्रत्यावर्ती चलित्रावर चालणाऱ्या या गाडीत आठजण बसू शकतात. व हिचा वेग पल्ला ७० किमी. आहे. 

एडी करंट कंट्रोल्स (इंडिया ) लिमिटेड या चलाकुडी येथील खाजगी कंपनीने पाच वर्षे संशोधन करून लव्हबर्ड नावाची विद्युत्  मोटारगाडी बनवून विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. या गाडीत दोघेजण बसू शकतात. खंडक (विद्युत् प्रवाह खंडीत करणारी यंत्रणा) नियंत्रित ५ अश्वशक्तीचे एकदिश चलित्र व त्याला वीज पुरविणारी ३६० व्होल्ट व १५० अँपिअर-तारू क्षमतेची शिसे अम्ल विद्युत् घटमाला हे या गाडीचे मुख्य भाग आहेत. याच चलित्राने दंतचक्र पेटी व विभेदक कार्यरत होतात, तर खंडक गतिनियमकाद्वारे चलित्राची गती नियंत्रित होते. हिची काया तंतुप्रबलित प्लॅस्टिकाची (एफआरपी) व चौकट नळ्यांची बनविलेली असून गाडीचे वजन ६५० किग्रॅ. व तिच्यातून वाहून न्यावयाचे वजन १५० किग्रॅ. (दोनजण) आहे. हिचा कमाल वेग ताशी सु. ३५ किमी. असून पल्ला सु. ४४ किमी. आहे. हा पल्ला १०० किमी. करावयाचा झाल्यास घटांची संख्या दुप्पट करावी लागून गाडीचे वजन वाढेल. घटमाला पुनर्भारणाचा काळ ८ तास असून हिचे आकारमान २१२०X १४१६ X १३४० (उंची) मिमी. आहे. हिला पुढील दिशेतील चार व उलट (मागील) दिशेतील एक अशी पाच वेगबदल दंतचक्रे (गिअर) आहेत. या गाडीला १ किमी. अंतर कापण्यासाठी सु. ३१ पैसे खर्च येईल, असा कंपनीचा दावा आहे. असा रीतीने शहरातल्या शहरात प्रवासासाठी ही उपयुक्त ठरू शकेल.

लव्हबर्ड गाडीचा फक्त आकृतिबंध हा सर जॉन सॅम्युएल यांचा असून सर्व भाग देशीच आहेत. अहमदनगर येथील व्हीईकल रिसर्च अँड डिव्हेलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (व्हीआरडीई) लव्हबर्डची चाचणी घेऊन प्रमाणपत्र दिले आहे. 

याच कंपनीने विद्युत् फोर्कलिफ्ट व फलाट-वाहन बनविले असून त्यांतील चलित्र स्वतःच विकसित केले आहे. शिवाय चॅरिअट नावाची बिनटपाची विद्युत् गाडीही कंपनीने बनविली आहे. ही गाडी विमानतळ कारखाने, गोल्फ मैदान, रूग्णालये इ. ठिकाणी वापरायला  सोयीचे आहे.  

बंगलोरच्या सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीपीआरआय) मदतीने ही कंपनी पॉलिमर विद्युत् घट बनविण्याचे प्रयत्न करीत आहे. यामुळे घटमालेचे  आकारमान व वजन कमी होऊन शक्ती वाढेल आणि चारजणांची विद्युत् मोटारगाडी बनविणे शक्य होईल. चार जमांच्या अशा गाडीच्या कायेचा तंतूप्रबलीत प्लॅस्टिकाचा मूळ नमुना येथे बनविण्यात येत आहे.  

फायदे व तोटे : पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या परंपरागत मोटारगाड्यांच्या तुलनेत विद्युत् मोटारगाडीचे प्रमुख फायदे व तोटे पुढील प्रमाणे आहेत (अधिच्या वर्णनात या पैकी काहींचा उल्लेख आलेला आहेच)  


फायदे : विद्युत् मोटारगाडी निर्मितीस सोपी असून तिच्यातून धोकादायक निष्कास वायू बाहेर पडत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. तसेच खनिज तेलाची बचत होऊ शकते. हिच्यात हवा स्वच्छ किंवा गरम करण्याची अथवा गाडी थंड करण्यासाठी पाणी वा हवेची व गुतांगुतीच्या वंगण प्रणालीची गरज नसते. हिच्यातील चलित्राचे आयुष्य पुष्कळ जास्त असते ही आवाज न कराता  चालत  आसल्याने ध्वनिप्रदूषणही होत नाही. घरी किंवा कार्यालयात असातानाच्या फावल्या वेळात घटमालेचे पुनर्भारण करून घेता येते व यामुळे वेळेची बचत होऊ शकते. हीच चालवायला सोपी असते. म्हणजे एका स्विचाच्या सहाय्याने ती चालू व बंद करता येते. (उदा., लव्हबर्ड गाडीत मुख्य स्वीच चालू करून चालक विद्युत् घटमाला कार्यान्वित करतो . नंतर त्याने एक सुरी-स्वीच खाली दाबले की , चलित्र नियामक चालू होते. मग गिअर टाकणे व क्लच सोडणे या परिचीत कृती केल्या की  गाडी चालू लागते.) ही चालताना कंपपावत नाही व धक्के बसत नाही. हिच्यात यांत्रिक भाग पुष्कळच कमी असतात. व पुरक भागाची अवश्यकता नसते. हिचे धूर्णी परिबल सुरूवातीस जास्त असते. त्यामुळे स्थिर स्थीतून गाडी चालू करण्यास याचा फायदा होतो व ती झटपट सुरू होते. हिची देखभाल किमान असल्याने देखभालीचा खर्च कमी असतो. तसेच दुरुस्तीसाठी विविध इत्यारे असणाऱ्या मोठ्या यंत्रशाळेची गरज नसते. ही सापेक्षतः कमी धोकादायक असून मर्यादीत पल्ल्यामुळे तरून मुलांना चालवायला देणे सुरक्षितेचे असते. या गाड्यांची कार्यक्षमता अधिक असल्याने वापरल्या जाणाऱ्या एकून उर्जेत बचत होऊ शकेल.

तोटे : एका पुर्ण पुनर्भारणात जाण्याचे अंतर २६० किमी. पर्यंत असते, तर पेट्रोल गाड्यांचा असा पल्ला ८०० किमी. पर्यंत ही असतो. विद्युत् घटमाला महाग असून त्या मोटारगाडीच्या आयुष्यात २-३ वेळा बदलाव्या लागतात. शिवाय त्या कमी जागेत बसवायवयाच्या असल्याने ऊर्जेचासाठा मर्यादित प्रमाणातच करता येतो. परिणामी प्रवेग व कमाल गतीवरही मर्यादा पडतात. पुनर्भारणासाठी लागणारी वीज ही बहुतेक ठिकाणी दगडी कोळसा, नैसर्गिक वायू यांसारख्या इंधनापासून निर्माण केली जाते. यांमुळे विद्युत् मोटारगाड्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्यास वीजनिर्मीती केंद्राजवळ प्रदुषण वाढू शकेल आणि खनिज संपत्तीची बचत होईलच असे नाही नवीन प्रकारचे   काही विद्युत् घट हे उच्च तापमानालाच कार्य करू शकत असल्याने ते धोकादायक ठरू शकतात. व त्यांची आवेष्टाने लवकर खराब होऊ शकतात.

इलेक्ट्रिक ऑटो ॲसोसिएशन नावाची संस्था अमेरिकेत स्थापन झाली आहे. तसेच पोर्टर कॉर्पोरेशन या कंपनीतर्फे इलेक्ट्रिक व्हीईकल न्यूज नावाचे त्रैमासिक प्रसिद्ध होते. त्यात वर्षातून एकदा विद्युत् गाड्यांना सेवा पुरविणाऱ्या जगभराच्या केद्रांची यादी दिली जाते.

पहा : मोटारगाडी, विद्युत् घट विद्युत् चलित्र. 

भदे, व. ग. ठाकूर, अ. ना.

भारतीय विद्युत मोटारगाड्या: लव्हबर्ड (निळ्या) व चॅरिअट (लाल)प्युगांत - सीत्रांए कंपनीची प्रस्तावित छोटी 'ट्युलिप' विद्युत मोटारगाडी सनराइझ विद्युत मोटारगाडी होंडा कंपनीची क्लीन अर्बन व्हीइकल - ४विद्युत मोटारगाडी बेकर विद्युत मोटारगाडी (१९१४)EV-1 ही ॲल्युमिनियमाची संपूर्ण चौकट असलेली व १९९०-२००० या दशकांत ग्राहकाला विकण्यात आलेली पहिली विद्युत मोटारगाडी (जून १९९६)मित्सुबिशी मोटार कंपनीच्या संकरीत विद्युत मोटारगाडीचा मूळ नमुना