गुंडाळ्या : रोहित्र (विद्युत्‌ दाब बदलणारे साधन), जनित्र (यांत्रिक शक्तीपासून विद्युत्‌ शक्ती निर्माण करणारे साधन), चलित्र (विद्युत्‌ शक्तीपासून यांत्रिक शक्ती निर्माण करणारे साधन) इ. विद्युत्‌ यंत्रांमध्ये वापरीत असलेल्या गुंडाळ्या, विद्युत निरोधक (ज्यातून विद्युत्‌ प्रवाह जाऊ शकत नाही अशा) पदार्थाचे वेष्टन दिलेल्या तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमाच्या तारा वापरून बनविलेल्या असतात. या तारा गोल किंवा चौकोनी छेदाच्या असतात. या तारांभोवती एनॅमल, प्लॅस्टिक, सूत किंवा रेशमाचा दोरा अशा निरोधक वस्तूंचे वेष्टन बसविलेले असते. या वेष्टनाची निरोधक शक्ती गुंडाळीवर येणाऱ्या विद्युत्‌ दाबाला जरूर असेल तितकी ठेवतात. गुंडाळी कोणत्याही यंत्रामध्ये बसविताना गुंडाळीला, यंत्राच्या धातूपासून अलिप्त ठेवण्यासाठीगुंडाळी व यंत्रभाग यांच्यामध्ये निरोधक वस्तूचे एखादे पटल बसवितात. असे पटल रोगणामध्ये मुरवलेला कागद, कापड किंवा अभ्रक अशा पदार्थापासून बनविलेले असते. गुंडाळीच्या तारेमधून विद्युत्‌ प्रवाह जात असला म्हणजे ती तापते. तारेचे तपमान फार वाढले, तर तारेभोवतालचे निरोधक वेष्टन खराब होते व एकंदर गुंडाळीची शक्ती कमी होऊ लागते. तारेचे तपमान एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये म्हणून गुंडाळीमधून जाणारा प्रवाह मर्यादीत ठेवावा लागतो.

प्रकार : एखाद्या विद्युत् यंत्रातील गुंडाळीमधून बाहेरचा विद्युत् प्रवाह पाठविला, तर गुंडाळीमध्ये चुंबकीय क्षेत्र उत्पन्न होते व तसेच यंत्रातील गुंडाळी फिरत असताना जर ती चुंबकीय क्षेत्र कापीत असेल, तर त्या गुंडाळीमध्ये विद्युत्‌ चालक (विद्युत्‌ प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारा) दाब उत्पन्न होतो. या दोन्ही प्रकारांत गुंडाळी जर पोलादाच्या गाभ्याभोवती बसविलेली असेल, तर गुंडाळीची शक्ती पुष्कळ वाढते म्हणून यंत्रात बसविलेल्या गुंडाळ्या पोलादी चकत्या जोडून बनविलेल्या गाभ्याभोवती बसविलेल्या असतात. अशा गुंडाळ्या तयार करताना गाभ्याच्या आकाराचे लाकडी फर्मे तयार करतात व प्रथम त्या फर्म्याभोवती गुंडाळी तयार करतात आणि तिची बांधणी पूर्ण झाल्यावर मग फर्म्यावरून काढून पाहिजे त्याठिकाणी यंत्रामध्ये बसवितात. गुंडाळी तयार करण्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे असतात. यंत्रातील विद्युत्‌ चुंबकीय ध्रुव उत्तेजित (कार्यकारी) करण्यासाठी बसविलेल्या गुंडाळीला चुंबकत्वप्रेरक गुंडाळी म्हणतात व चुंबकीय क्षेत्र कापून विद्युत् दाब उत्पन्न करणाऱ्या गुंडाळीला आर्मेचर गुंडाळी म्हणतात.

एकदिश प्रवाह गुंडाळ्या : एकदिश प्रवाह यंत्रातील चुंबकीय ध्रुव यंत्राच्या बाहेरच्या स्थिर भागातील दंडगोल पोकळीमध्ये वर्तुळाचे सम भाग करून बसविलेले असतात. त्यांची संख्या दोन, चार, सहा अशी सम असते ते क्रमवारीने उत्तर व दक्षिण जातीचे असतात. ध्रुवांमधील चुंबकीय क्षेत्राची दिशा ध्रुवाभोवतालच्या गुंडाळीमधून जाणाऱ्या प्रवाहाच्या दिशेवर अवलंबून असते. म्हणून सर्व ध्रुवांच्या गुंडाळ्या एका विशिष्ट योजनेप्रमाणे जोडाव्या लागतात.

एकदिश प्रवाह यंत्रातील विद्युत् दाब उत्पन्न करणारी आर्मेचर गुंडाळी व दिक्‌परिवर्तक भाग (प्रवाहाची दिशा बदलणारा भाग, कॉम्युटेटर) यंत्राच्या फिरणाऱ्या भागावर बसविलेले असतात. आर्मेचर गुंडाळीमधील सर्व वेटोळ्यांची टोके दिक्‌परिवर्तकाच्या निरनिराळ्या पट्ट्यांना डाख लावून जोडलेली असतात. दिक्‌परिवर्तकाच्या सर्व पट्ट्या एकमेकींपासून व त्यांच्या आधाराच्या पोलादी गाभ्यापासूनही विद्युत्‌ दृष्ट्या अलग ठेवलेल्या असतात. या कामाकरिता अभ्रकासारख्या निरोधक पदार्थाचे पडदे वापरतात. आ. १ मध्ये आर्मेचराच्या वेटोळ्यांचे दोन प्रकार आणि त्यांची दिक्‌‌‌‌‌परिवर्तकाबरोबरची जोडणी दाखविली आहे.

आ.१. विद्युत् दाब उत्पन्न करणारी वेटोळी : (१) एक वेढ्याचे वेटोळे, (२) अनेक वेढ्यांचे वेटोळे, (३) खाचेत बसणारा भाग, (४) वेटोळ्याभोवतालचे आवरण, (५) आवरण नसलेला संवाहक, (६) दिक्‌परिवर्तक पट्ट्या. आ. २. रेललेल्या गुंडाळीमधील वेटोळी : (उ) उत्तर ध्रुव, (द) दक्षिण ध्रुव, (प) दिक्‌परिवर्तक पट्ट्या. आ. ३. चक्राकार विस्तारित केलेली रेललेली गुंडाळी. (अ) विस्तारित गुंडाळी : (द) दक्षिण ध्रुव, (उ) उत्तर ध्रुव, अखंड रेषांनी गुंडाळीचा वरचा भाग व तुटक रेषांनी गुंडाळीचा खालचा भाग दाखविले आहेत, (ब) ब्रश (आ) मोठ्या करून दाखविलेल्या खाचांत बसविलेले वेटोळ्यांचे भाग. आ. ४. (अ) रेललेल्या पद्धतीची वेटोळी : (१-२, ५-६) वेटोळ्यांची डावी बाजू, (३-४) वेटोळ्यांची उजवी बाजू (आ) तरंगी पद्धतीची वेटोळी : (१-२, ५-६) वेटोळ्यांची डावी बाजू, (३-४) वेटोळ्यांची उजवी बाजू, (७) दिक्‌परिवर्तक पट्ट्या. आ. ५. चार ध्रुवांच्या एकदिश यंत्रातील उघडून दाखविलेली रेललेल्या वेटोळ्यांची विद्युत्‌ दाब उत्पन्न करणारी गुंडाळी : (१-२-३....३५-३६) खाचेमध्ये बसविलेले वेटोळ्यांचे भाग, (उ) उत्तर ध्रुव, (द) दक्षिण ध्रुव, (प) दिक्‌परिवर्तक पट्ट्या, (ब) ब्रश.


विद्युत् यंत्रातील फिरणाऱ्या आसावर, पोलादी चकत्या जोडून तयार केलेला दंडगोल भाग बसविलेला असतो व त्याच्या पृष्ठभागावर अक्षाला समांतर अशा खाचा पाडलेल्या असतात. या खाचांमध्ये गुंडाळीची वेटोळी विशिष्ट पद्धतीने बसविलेली असतात. गुंडाळीतील प्रत्येक वेटोळ्याचे शेवटचे टोक दुसऱ्या वेटोळ्याच्या आरंभ टोकाला जोडतात व हा जोड दिक्‌परिवर्तकाच्या एका पट्टीला जोडतात (आ. २). प्रत्येक वेटोळ्याची एक बाजू एका ध्रुवाखालील खाचेच्या वरच्या भागात ठेवतात व दुसरी बाजू शेजारच्या दुसऱ्या  ध्रुवाखालील खाचेच्या खालच्या भागात ठेवतात. अशा रीतीने सर्व वेटोळी बसवून झाली म्हणजे शेवटच्या वेटोळ्याचे शेवटचे टोक पहिल्या वेटोळ्याच्या आरंभ टोकाला जोडले जाते व गुंडाळीमधील सर्व वेटोळी एकसरीत येतात व त्यांचे एक अखंड मंडल तयार होते (आ. ३). प्रत्येक वेटोळ्याच्या दोन बाजू परस्परविरुद्ध ध्रुवांच्या क्षेत्रामध्ये असल्या म्हणजे दोन्ही भागांत उत्पन्न होणारा विद्युत् दाब एकमेकाला पूरक होतो. सर्व वेटोळी एकमेकांना एकसरीत जोडलेली असली, तर सर्व वेटोळ्यांतून उत्पन्न होणारा विद्युत् दाबही एकमेकांना पूरक होईल. वेटोळी एकमेकांत जोडताना दुसऱ्या वेटोळ्याची डावीकडील बाजू पहिल्या वेटोळ्याच्या डावीकडीलबाजू ठेवलेल्या खाचेच्या लगतच्या खाचेत बसवीत गेले, तर त्या जोडणीस रेललेली गुंडाळी म्हणतात (आ. ४ अ). असे न करता दुसऱ्या वेटोळ्याची डावीकडील बाजू शेजारच्या ध्रुवाखालील खाचेमध्ये ठेवीत गेले, तर त्या मांडणीस तरंग गुंडाळी म्हणतात. (आ. ४ आ).

आ. ६. त्रिकला प्रत्यावर्ती जनित्रातील विद्युत् दाब उत्पन्न करणारी गुंडाळी : (१, २, .... २४, २५) खाचेमध्ये बसविलेले वेटोळ्यांचे भाग. (उ) उत्तर ध्रुव, (द) दक्षिण ध्रुव, (क१-क२) पहिली कला, (ख१-ख२) दुसरी कला, (ग१-ग२) तिसरी कला. आ. ७. एका गुंडाळीच्या बाहेर दुसरी गुंडाळी बसविलेली रोहित्र : (१-१) आतील गुंडाळी, (२-२) बाहेरची गुंडाळी, (३) पोलादी गाभा. आ. ८. एका गुंडाळीच्या बाजूला दुसरी गुंडाळी बसविलेले रोहित्र : (१-१) पहिली गुंडाळी, (२-२) दुसरी गुंडाळी, (३) पोलादी गाभा.आर्मेचराची सबंध गुंडाळी दाखविण्याची सामान्य पद्धत आ. ५ मध्ये दाखविली आहे. आ. ५ मध्ये दाखविलेली गुंडाळी साधारणतः दोन स्तरांमध्ये ठेवलेली असते. प्रत्येक खाचेत निरनिराळ्या वेटोळ्यांचे दोन भाग ठेवलेले असतात. आ. ५ मध्ये १ व २, ३ व ४, ५ व ६ असे दोन दोन भाग एकेका खाचेमध्ये ठेवलेले आहेत. त्यांपैकी अखंड रेषेने दाखविलेले १, ३, ५,…,३३, ३५ हे भाग खाचांच्या वरच्या भागातले आहेत व २, ४, ६,…, ३४, ३६ हे तुटक रेषेने दाखविलेले भाग खाचांच्या खालच्या भागातले आहेत.

प्रत्यावर्ती प्रवाह : प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणारा) प्रवाह निर्माण करणाऱ्या जनित्रातील आर्मेचराकरिता एककला (एकच गुंडाळी असलेल्या) किंवा त्रिकला (तीन स्वतंत्र विद्युत्‌ मंडले असलेल्या) पद्धतीची गुंडाळी बसवतात. त्रिकला जनित्राची सामान्य पद्धतीची गुंडाळी आ. ६ मध्ये दाखविली आहे.

रोहित्रातील गुंडाळ्या : प्रत्यावर्ती प्रवाहाच्या रोहित्रामध्ये प्रत्येक कलेसाठी विजेच्या पुरवठ्याला जोडावयाची प्राथमिक गुंडाळी व प्रवर्तनाने (चुंबकीय क्षेत्रातील बदलाने) विद्युत्‌ चालक दाब उत्पन्न करणारी द्वितीयक गुंडाळी अशा दोन स्वतंत्र गुंडाळ्या बसवाव्या लागतात. गुंडाळ्या बसविण्याच्या दोन मुख्य पद्धती आ. ७ व आ. ८ मध्ये दाखविल्या आहेत. आ. ७ मध्ये दाखविलेल्या पद्धतीत पोलादी गाभ्याभोवती प्रथम द्वितीयक गुंडाळी बसविलेली आहे व नंतर तिच्यावरून प्राथमिक गुंडाळी बसविलेली आहे. आ. ८ मध्ये दाखविलेल्या पद्धतीत गाभ्यावर प्राथमिक गुंडाळी व द्वितीयक गुंडाळी एकमेकींशेजारी बसविलेल्या आहेत.

संदर्भ : 1. Dawes,C. L. Electrical Engineering, 2. Vols., New York, 1951.

           2. Siskind, C.S. Direct Current Armature Windings : Theory and Practice, New York,  1949.

केळकर, आ. रा.