विद्युत् नियंत्रण : विद्युत् शक्तीचा वापर करताना तीपासून कोणाही व्यक्तीस इजा होऊ नये, तसेच सर्व विद्युत् यंत्रांचे व साहित्यांचे काम त्यामध्ये खंड वा बिघाड न होता अव्याहतपणे आणि व्यवस्थित चालू रहावे म्हणून विद्युत् मंडलामध्ये काही नियंत्रक साधने बसवावी लागतात. या साधनांमध्ये विविध प्रकारचे स्विच, वितळतार किंवा ⇨विद्युत् मंडल खंडक,स्थिर व चल रोधक अथवा अभिचालित्र (अत्यल्प शक्ती वापरून मोठ्या शक्तीच्या विद्युत् मंडलात हवा तो बदल घडवून आणणारे साधन) हे मुख्य घटक असतात. 

विद्युत् जनित्र नियंत्रण : विद्युत् जनित्राचे नियंत्रण करताना सर्व परिस्थितींत त्यापासून मिळणारा विद्युत् दाब व प्रवाहाची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या आवर्तनांची संख्या) ठरवून दिलेल्या मर्यादेत कायम ठेवावी लागते. यांपैकी विद्युत् दाबाचे नियंत्रण करण्यासाठी जनित्रातील चुंबकीय क्षेत्रांचे नियंत्रण करावे लागते. ते काम चुंबकीय क्षेत्र उत्पन्न करणाऱ्या गुंडाळीतून जाणाऱ्या विद्युत् प्रवाहाचे नियंत्रण करून साधले जाते. या प्रवाहाचे नियंत्रण करण्यासाठी प्रवाह नेणाऱ्या संवाहक मार्गातील रोध बदलावा लागतो. रोध बदलाचे हे काम लहान यंत्राच्या बाबतीत हातानेच करतात परंतु मोठ्या यंत्रांसाठी मात्र ते स्वयंचलित पद्धतीने केले जाते. अशा तऱ्हेची विद्युत् दाब नियंत्रणाची उपकरणे जनित्राच्या जवळच स्विच फलकावर बसवतात आणि त्याच्या शेजारीच विजेचा चालू दाब दाखविणारा विद्युत् दाबमापक बसविलेला असतो. कंप्रतेचे नियंत्रण करण्यासाठी जनित्राचा वेग कायम ठेवावा लागतो व हे काम जनित्र फिरविणाऱ्या मूलचालकांच्या (ऊष्मीय किंवा दाबाच्या रूपातील ऊर्जा यांत्रिक ऊर्जेच्या रूपात बदलणाऱ्या शक्ति-संयंत्राच्या घटकाच्या) वेगाचे नियंत्रण करून साध्य करता येते. मूलचालकाचा वेग कायम ठेवण्यासाठी साधारणतः मूलचालकाच्या बाजूलाच एक गतिनंयत्रक बसविलेला असतो. [⟶ विद्युत् जनित्र].

प्रेषण मार्गातील नियंत्रण :  प्रेषण मार्गातील प्रवाह चालू किंवा बंद करण्यासाठी कमी दाबाच्या आस्थापनेत मुख्य स्विच फलकावरच एक उघडा स्विच बसवतात आणि तो हातानेच चालू वा बंद करता येतो परंतु उच्च दाबाच्या आस्थापनेत मात्र मुख्य स्विच फलकावर फक्त एक आरंभक हस्तकच असतो. तो फिरवून अभिचालित्राच्या मदतीने मुख्य विद्युत् प्रवाह मार्गात बसविलेला मोटा स्विच चालविता येतो. तसेच मुख्य मार्गामध्ये कोठेही बिघाड झाला, तर हा मोठा स्विच आपोआप उघडावा, अशी व्यवस्था आरंभकातच केलेली असते.

कोणत्याही प्रकारच्या आस्थापनेतील प्रेषण मार्गातून जाणारा प्रवाह फार वाढला, तर त्यामुळे होणारे जनित्राचे नुकसान टाळण्यासाठी प्रेषण मार्ग आणि जनित्र यांचा संबंध आपोआप तुटावा अशी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी प्रेषण मार्गातील प्रत्येक संवाहकात एक एक ⇨वितळतारेचातुकडा गोवलेला असतो. तो मुख्य स्विच फलकावर बसवतात. संवाहकातील प्रवाह प्रमाणाबाहेर वाढला, तर त्यामुळे ही तार तापून वितळते व मुख्य मार्ग खंडित होतो. ही व्यवस्था विद्युत् प्रवाह कमी असेल त्या वेळी उपयोगी पडते परंतु विद्युत् प्रवाह जास्त असेल त्या वेळी तेथे स्वयंचलित विद्युत् मडंल खंडकच वापरतात.

उच्च दाबाचा प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशांनी वाहणारा) प्रवाह नेणाऱ्या प्रेषण मार्गामध्ये विद्युत् दाब बदलणारे ⇨रोहित्र बसविलेले असते त्याच्या द्वितीयक दाबाचे नियंत्रण करण्यासाठी प्राथमिक गुंडाळीमधील वापरातील वेढ्यांची संख्या बदलतात. हे काम रोहित्रातच बसविलेला एक हस्तक फिरवून साधता येते. [⟶ विद्युत् वितरण पद्धति].

विद्युत् चलित्र नियंत्रण : एकदिश (एकाच दिशेत वाहणाऱ्या) प्रवाहावर चालणाऱ्या चलित्राच्या वेग नियंत्रणासाठी चंबकीय क्षेत्रामध्ये बदल करतात व त्यासाठी त्याच्या चुंबकीय गुंडाळीमधून जाणाऱ्या प्रवाहात बदल करतात. हे काम करण्यासाठी त्याच्या एकसरीत जोडलेल्या चलरोधकाचा [⟶ विद्युत् रोधक] उपयोग करतात.

त्रिकला (तीन तारांमधून जाणाऱ्या) ⇨प्रत्यावर्ती प्रवाहावर चालणाऱ्या प्रवर्तन चलित्राचा [⟶विद्युत् चलित्र] वेग बदलण्यासाठी घूर्णकावरच्या गुंडाळ्यांच्या मंडलातील रोध बदलावा लागतो. यासाठी घूर्णकावरील गुंडाळीच्या एकसरीत जोडलेल्या चलरोधकांचा उपयोग करतात. रोहित्रांच्या साहाय्याने चिलित्राचा विद्युत् दाब बदलूनसुद्धा चलित्राच्या वेगाचे नियंत्रण करता येते.

एकदिश प्रवाहावर चालणाऱ्या चलित्रांची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी साधारणतः चुंबकीय गुंडाळीमधून जाणारा प्रवाह उलट करतात. हे काम करण्यासाठी गुंडाळीच्या टोकांवरील स्पर्शकांची अदलाबदला करावी लागते. 

 त्रिकला प्रत्यावर्ती प्रवाहावर चालणाऱ्या प्रवर्तन चलित्राची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी त्यांपैकी कोणत्याही दोन कलांच्या स्पर्शकांची अदलाबदल करावी लागते. [⟶ विद्युत् चलित्र].

संयुक्त स्विच नियंत्रक : मोठ्या चलित्रांचे नियंत्रण करण्यासाठी एकाच हस्तकाने सर्व कामे करणारी संयुक्त स्विच यंत्रणा वापरतात. ती एका लांबट दंडगोलाकार डब्यात बसवितात. या डब्याच्या अक्षावर एक दंड असतो. तो डब्याच्या झाकणाच्या बाहेर आलेल्या टोकावर बसविलेल्या हस्तकाने फिरविता येतो. या दंडावर निरनिराळ्या विद्युत् मंडलांचे चल स्पर्शक बसवितात आणि त्यांना जोडणारे स्थिर स्पर्शक डब्याच्या भिंतीवर बसवितात. हा दंड फिरवून निरनिराळ्या खुणा केलेल्या जागी आणला म्हणजे निरनिराळ्या स्पर्शकांची जोडणी होते आणि त्यायोगे चलित्राच्या मंडलामध्ये पाहिजे तसा बदल करता येतो. या प्रकारचा दंडगोलाकार डब्याचा संयुक्त स्विच ट्रामगाडीचे नियंत्रण करण्यासाठी चालकाच्या पुढच्या बाजूस उभा करतात. तसेच कर्मशाळेत वरच्या भागातून सरकणाऱ्या मोठ्या यारीचे नियंत्रण करण्यासाठीही असाच स्विच वापरतात.

अशा नियंत्रकात काही वेळा मध्यवर्ती दंडावर प्रत्यक्ष स्पर्शक न बसविता फक्त निरनिराळे स्विच चालू करणारे अनेक कॅम [जी पट्टी वा दंडगोल त्याच्या कडेमार्फत अथवा त्यावर पाडलेल्या खाचेमार्फत त्याच्या अनुगामीला गती पोचविते असे दंडगोल वा पट्टी ⟶ कॅम] बसवितात आणि कॅमदंड निरनिराळ्या ठिकाणी फिरविला असता तेथील चल स्पर्शक सरकविला जाऊन निरनिराळे स्विच उघडतात अथवा बंद होतात.

मध्यवर्ती स्विच : एकत्रित काम करणाऱ्या अनेक चलित्रांचे संयुक्तरीत्या नियंत्रण करावयाचे असेल, त्या वेळी अभिचालित्राच्या मदतीने काम करणारा एकच संयुक्त स्विच वापरतात. उदा., स्थानिक रूळगाड्यांमधील सर्व चलित्रांचे एकाच ठिकाणाहून नियंत्रण करण्यासाठी असे स्विच वापरतात.

पहा : अभिचालित्र वितळतार विद्युत् मंडल खंडक विद्युत् स्विच फलक स्विच.

संदर्भ : Vinogradov, N. The Industrial Electrician, Moscow, 1960.

ओक, वा. रा.