दलील, झोझेफ नीकॉला: (४ एप्रिल १६८८–११ सप्टेंबर १७६८). फ्रेंच ज्योतिर्विद आणि भूगोलज्ञ. सूर्याभोवती कधीकधी आढळणारी रंगीत वलये ही सूर्यप्रकाशाचे एखाद्या ढगातील जलबिंदूंमुळे झालेल्या विवर्तनाने (अडथळ्याच्या कडेवरून प्रकाशकिरण वळण्याच्या क्रियेने) दिसतात, अशी उपपत्ती त्यांनी मांडली होती. सूर्यबिंबावरून बुध व शुक्र यांच्या होणाऱ्या ⇨अधिक्रमणाच्या स्पर्श व मोक्ष स्थितींचे पृथ्वीवरील दोन ठिकाणांहून वेध घेऊन आणि सूर्याचा ⇨पराशय  काढून पृथ्वी सूर्य अंतर निश्चित करण्याची नवी पद्धत त्यांनी शोधून काढली.

दलील यांचा जन्म पॅरिस येथे झाला. काही काळ शाही वेधशाळेत काम केल्यावर १७१४ मध्ये त्यांना ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्ये ज्योतिषशास्त्राचे अध्ययन करण्याची संधी मिळाली. १७१८ मध्ये कॉलेज रॉयलमध्ये त्यांची गणिताच्या अध्यासनावर नेमणूक झाली. पीटर द ग्रेट यांच्या निमंत्रणावरून दलील सेंट पीटर्झबर्ग येथे नवीन वेधशाळा स्थापन करण्यासाठी १७२५ मध्ये रशियाला गेले. तेथे २२ वर्षे वास्तव्य करून त्यांनी रशियन ज्योतिर्विदांची पहिली प्रशिक्षित पिढी तयार केली. तेथे असताना त्यांनी गुरूच्या उपग्रहांचे बरेच वेध घेतले आणि वातावरणविज्ञानात हरकामी उपयोगी पडेल असा तापमापकही तयार केला. १७३८ मध्ये त्यांनी सूर्यावरील डागांचे स्थान दर्शविण्यासाठी सूर्यकेंद्रीय सहनिर्देशक (सूर्यकेंद्राच्या सापेक्ष अंतरे) काढण्याची पहिली पद्धत शोधून काढली. १७४७ साली ते पॅरिसला परतले. त्यानंतर नौदलात भौगोलिक ज्योतिर्विद म्हणून त्यांची नेमणूक झाली. हॉतेल द क्ल्यूनी येथे त्यांनी एक वेधशाळा स्थापन केली. भूगोल व ज्योतिषशास्त्र या विषयांवरील त्यांनी जमा केलेला अमूल्य कागदपत्रांचा प्रचंड संग्रह फ्रेंच सरकारने विकत घेतला आणि त्यांना सन्माननीय पदवी व वर्षासन देऊन त्यांचा गौरव केला. १७६१ मध्ये झालेल्या शुक्राच्या अधिक्रमणाचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्रथमच जागतिक पातळीवर संघटित योजना कार्यवाहीत आणली. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

मराठे, स. चिं.