बुद्धघोष : (इ. स. च्या पाचव्या शतकाचा पूर्वार्ध). बौद्ध भिक्षू आणि अट्‌ठकथाकार. पारंपरिक समजुतीनुसार बुद्धघोषाचा जन्म इ. स. च्या चवथ्या शतकात, गयेच्या आसपास, एका ब्राह्मणकुळात झाला पतंजलीच्या योगशास्त्रात तो पारंगत होता एके दिवशी, एका बौद्ध विहारात, रेवत नावाच्या एका बौद्ध भिक्षूबरोबर झालेल्या वादात पराभूत झाल्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याची विद्वत्ता पाहून रेवताने त्याला सिंहलद्वीपास जाऊन सिंहल भाषेतील अट्‌ठकथांचे मागधीत रूपांतर करण्यास व त्या अट्‌ठकथा भारतात आणण्यास सांगितले. बुद्धघोष तेथे गेला. आपली लायकी सिद्ध करण्यासाठी ⇨ विसुद्धिमग्‍न हा ग्रंथ त्याने लिहिल्यानंतर त्याला सिंहली अट्‌ठकथांचे मागधीत भाषांतर करण्याची परवानगी देण्यात आली. बुद्धदत्त, उपसेन, महापाल आणि ⇨ धम्मपाल ह्यांनी लिहिलेल्या अट्‌ठकथांखेरीज बाकीच्या सर्व अट्‌ठकथा बुद्धघोषानेच लिहिल्या, अशीही पारंपरिक समजूत आहे. तथापि ही पारंपरिक समजूत बरोबर नाही, हे धर्मानंद कोसंबी ह्यांनी विसुद्धिमग्‍न ह्या ग्रंथाला लिहिलेल्या चिकित्सक प्रस्तावनेत दाखवून दिले आहे. तसेच बुद्धघोषाचा जन्मही गयेच्या आसपास झालेला नसून दक्षिण भारतात एका शेतकरी कुटुंबात झाला असल्याचे त्यांनी दाखविले आहे. विसुद्धिमग्‍न ह्या ग्रंथाच्या शेवटी मोरण्डखेटक हे आपले राहण्याचे ठिकाण असल्याचा उल्लेख बुद्धघोषाने केलेला आहे. तसेच त्याने लिहिलेल्या अट्‌ठकथांतून दक्षिणेतील काही ठिकाणी राहिल्याचा उल्लेख आहे. पुराणवस्तुसंशोधक डॉ. आर्. सुब्रह्यण्यम ह्यांना गुंतूर जिल्ह्यात कोटनेमालिपुरी (नेमालि = मोर) आणि गुण्डलपल्ली (गुण्डलू=अंडे). ही दोन जवळजवळची खेडी पुराणावशेषांनी भरलेली आढळली. ही दोन खेडी म्हणजेच विसुद्धिमग्‍गात उल्लेखिलेले मोरण्यखेटक होय, असे त्यांनी निश्चित केले आहे.

विसुद्धिमग्‍गाखेरीज दीघ, मज्झिम, संयुत्त अंगुत्तर ह्या चार निकायांवरील अनुक्रमे सुंमगलविलासिनी, पपंचसूदनी, सारत्थप्पकासिनी आणि मनोरथपूरणी ह्या अट्‌ठकथा बुद्धघोषाने लिहिलेल्या आहेत.

बापट, पु. वि.