एंटरोबॅक्टिरिएसी : सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टिरिएलीझ गणातील तेरा कुलांपैकी एक कुल. या कुलातील सूक्ष्मजंतू सरळ, शलाकाकार  (दंडाकार), ग्रॅम-रंजक-अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजक क्रियेने तयार होणारा जांभळसर रंग नाहीसा होणारा), चल असल्यास कशाभिका (हालचालीस उपयुक्त असणारे नाजूक धागे) अनेक अथवा अचल असून त्यांना बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) नसतात. सर्व प्रकारच्या संवर्धकांवर (वाढ करणाऱ्या माध्यमांवर) वाढवतात. त्यांच्यामुळे ग्लुकोज शर्करेपासून अम्ल व वायू निर्मिती होते. काही पेक्टिनांवरही ते वाढतात. नायट्रेटाचे विनायट्रीकरण होते. ते प्रामुख्याने मानव व प्राणी यांच्या आतड्यांत वाढतात. काही सूक्ष्मजंतू मानव, प्राणी व वनस्पती यांना रोगोत्पादक असतात, परंतु बरेचसे मृतोपजीवी (मृत जैव पदार्थांवर उपजीविका करणारे) असून सर्वत्र आढळतात. या कुलातील एश्चेरिकिया कोलाय यासारखे संवर्धकावर जलद वाढणारे सुलभ सूक्ष्मजंतू प्रयोगाकरिता निवडले जातात.

ए. कोलाय जातीतच प्रथम लिंगभेद तसेच त्यांचे शिगेला वंशीय सूक्ष्मजंतूंशी संकरण होऊ शकते, असेही आढळून आले आहे.

या कुलात प्रामुख्याने दोन प्रकारच्या किण्वनक्रिया (ज्या क्रियांमध्ये सूक्ष्मजंतू शर्करेचे विघटन करून अम्ल व काही वेळेस कार्बन डाय-ऑक्साइड व अल्कोहॉल तयार करतात) आढळतात. एका प्रकारात मिश्र कार्बनी अम्ले व वायू यांची निर्मिती होऊन सक्सिनिक, लॅक्टिक, ॲसिटिक व फॉर्मिक ही अम्ले तयार होतात. कार्बन डाय-ऑक्साइड व हायड्रोजन या वांयूचे प्रमाण १ : १ असते. दुसर्‍या प्रकारात एथिल अल्कोहॉल व ब्युटिलीन ग्लायकॉल यांची निर्मिती होते, परंतु कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण हायड्रोजनपेक्षा अधिक असते. सूक्ष्म जंतूंच्या वर्गीकरणात विशिष्ट शर्करेची किण्वनक्षमता तसेच किण्वनक्रियेचा प्रकार हे गुणधर्म महत्त्वाचे मानतात.

या कुलातील सूक्ष्मजंतूंत प्रतिजने [ज्या पदार्थांचा शरीरात प्रवेश झाल्यामुळे त्यांना रोध करणारी प्रतिपिंडे तयार होतात असे पदार्थ, → प्रतिजन] आढळतात. नुसत्या साल्मोनेला वंशातच सु. ५०० प्रकारची कायिक व कशाभिकीय प्रतिजने आढळली आहेत.

वर्गीकरण कुल : एंटरोबॅक्टिरिएसी (१) उपकुल-एश्चेरेशी यातील सूक्ष्मजंतू शलाकाकार, चल, क्वचित अचल, अनेक कशाभिकायुक्त, ग्लुकोज व लॅक्टोज शर्करांचे अपघटन (साध्या रेणूंमध्ये वा अणूंमध्ये रूपांतर) करणारे, त्यामुळे अम्ल व वायू यांची निर्मिती २४ तासांत ३७० से. वर किंवा ४८ तासांत २५०_३०० से. वर होते. काही सूक्ष्मजंतू ही क्रिया कालावधीने करतात अथवा करीतही नाहीत. या उपकुलात पाच वंश आहेत.

यातील सूक्ष्मजंतूमुळे (अ) अल्जिनिक अम्लाचे अपघटन होत नाही, (आ) लॅक्टोज शर्करेचे ४८ तासांत किण्वन होते आणि (इ) त्यांच्याबाबतीत मिथिल रेड या रंजकद्रव्याची अम्लता दर्शविणारी चाचणी व्यक्त (दाखवितात) पण ॲसिटील-मिथिल-कार्बिनॉल चाचणी (सूक्ष्मजंतूंमधील भेद दर्शविणारी एक चाचणी) अव्यक्त (दाखवीत नाहीत) असते.

वंश एश्चेरिकिया : प्रमुख जाती ए. कोलाय. हे सूक्ष्मजंतू आतड्यात व विष्ठेत तसेच दुग्ध पदार्थ, धान्य इत्यादींत आढळतात. पाण्यात आढळल्यास पाणी दूषित समजले जाते. शहरास पुरवावयाच्या पाण्यात त्यांचे अस्तित्व धोक्याचे समजतात कारण विष्ठेतील या सूक्ष्मजंतूंबरोबर रोगात्पादक सूक्ष्मजंतू असण्याचीही शक्यता असते. सामान्यतः हे रोगोत्पादक नाहीत, तथापि ते अशक्त रोगाच्या मूत्राशय विकारास कारणीभूत असतात. या वंशातील सूक्ष्मजंतूंना कोशिका (पेशी) आवरण बहुधा नसते.

वंश एरोबॅक्टर : प्रमुख जाती : ए. एरॉजिनिस. हे सूक्ष्मजंतू विष्ठेत आढळले, तरी प्रामुख्याने त्यांचे अस्तित्व वनस्पतींवर व मृदेत असते. या वंशातील सूक्ष्मजंतूंना कोशिका आवरण बहुधा असते. त्यांचे  अस्तित्व प्रामुख्याने श्वसनमार्ग, आतडी आणि मूत्रमार्गात आढळते.

वंश क्लेबसिएल्ला : प्रमुख जाती : क्ले. न्यूमोनी. हे सूक्ष्मजंतू न्यूमोनियास कारणीभूत होतात. या वंशातील सूक्ष्मजंतूंमुळे लॅक्टोज शर्करेचे किण्वन दीर्घकालाने होते अथवा क्वचित होतही नाही.

वंश पॅराकोलोबॅक्ट्रम : प्रमुख जाती : पॅ. इंटरमेडीयम. हे सूक्ष्म जंतू क्वचित हगनणीसारख्या विकारास कारणीभूत हो तात. या वंशातील सूक्ष्मजंतूंमुळे अल्जिनिक अम्लाचे अपघटन होऊन अम्ल व वायू यांची निर्मिती होते.


वंश अल्जिनोबॅक्टर.

( २ ) उपकुल-एर्विनी : या उपकुलातील सूक्ष्मजंतू चल, शलाकाकार असून त्यांना सेंद्रिय नायट्रोजनाची जरूरी असते. या सूक्ष्मजंतुमुळे अनेक शर्करांपासून वायूरहित किंवा वायूसह अम्लोत्पादन होते. लॅक्टोज शर्करेचे किण्वन होत नाही. नायट्रेटाचे नायट्राइटामध्ये रूपांतर होते अथवा होतही नाही. पेक्टिनाचे उत्पादन होते. हे वनस्पतींवरील गाठी, मर, मऊ कुजव्या ह्या रोगांस कारणीभूत होतात.

वंश एर्विनिया : प्रमुख जाती : ए. अमिलोव्होरा. वनस्पतीवर सूक्ष्म जंतूमुळे रोग होतात असे प्रथमच यासूक्ष्मजंतूमुळे सिद्ध झाले.

(३) उपकुल-सिरेशी : या उपकुलातील सूक्ष्म जंतू लघुशलाकाकार, चल, अनेक कशाभिकायुक्त, ताम्र रंगद्रव्योत्पादक असून जिलेटिनाचे त्वरित द्रवीकरण करतात. या सूक्ष्मजंतूमुळे ग्लुकोज व इतर शर्करांपासून कार्बन डाय-ऑक्साइड आणि हायड्रोजन वायू व अनेक कार्बनी अम्लां चे उत्पादन होते. तसेच नायट्रेटाचेही ⇨ क्षपण होते. प्रामुख्याने हे मृतोपजीवी आहेत.

वंश सिरेशिया : प्रमुख जाती : सि. मार्सीसेन्स हे सूक्ष्म जंतू ताम्र रंगद्रव्योत्पादक आहेत.

(४) उपकुल-प्रोटी : या उपकुलातील सूक्ष्म जंतू सरळ शलाकाकार, चल, अनेक कशाभिकायुक्त असून संवर्ध कावरची वाढ प्रोटोझोआसारखी आढळते. यांच्यामुळे लॅक्टोज शर्करेव्यतिरिक्त इतर शर्क रांपासून अम्ल व वायू यांची निर्मिती होते.

वंश प्रोटियस   : प्रमुख जाती : प्रो. व्हल्गॅरिस.

(५) उपकुल-साल्मोनेली : या उपकुलातील सूक्ष्मजंतू चल असल्यास अनेक कशाभिकायुक्त असतात. त्यांची जिलेटीन, दूध, यरिया इत्यादींवर विक्रिया होत नाही. त्यांच्यामुळे अनेक शर्करांपासून अम्ल व वायू यांची निर्मिती होते. त्यांची लॅक्टोज, सुक्रो ज शर्करा व सॅलिसीन यांच्यावर विक्रिया होत नाही. हे रोगोत्पादक आहेत.

या उपकुलातील चल व अनेक कशाभिकांनी युक्त असलेले सूक्ष्मजंतू हायड्रो जन सल्फाइडाचे उत्पादन करतात, परंतु अमोनियम सायट्रेटावर त्यांची विक्रिया होत नाही.

वंश साल्मोनेला : प्रमुख जाती : (१) सा. टायफोसा. हे विषमज्वरास (टायफॉइडास) कारणीभूत होतात. ( २ ) सा. एंटेरिटिडीस. हे अन्नविषबाधेस कारणीभूत होतात. या वंशातील सूक्ष्मजंतू अचल असून हायड्रोजन सल्फाइडाचे उत्पादन करीत नाहीत, परंतु अमोनियम सायट्रेटावर त्यांची विक्रिया होते.

वंश शिगेला : प्रमुख जाती : शि. डिसेंटेरी. हे आमांशास कारणीभूत होतात.

पहा : आमांश न्यूमोनिया सूक्ष्मजीवशास्त्र.

संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamental of Microbiology, Tokyo, 1961.

           2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, New York, 1961.

कुलकर्णी, नी. वा.