ऑस्ट्रॅकोडर्म : प्राण्यांच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) प्रथम उत्पन्न झालेल्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांना ऑस्ट्रॅकोडर्म हे नाव दिलेले आहे. हे लुप्त आद्य प्राणी माशांसारखे असून सरोवरांत आणि नद्यांत उत्पन्न झाले असावेत आणि तेथे त्यांचा विस्तार होऊन ते समुद्रात गेले असावेत, असा शास्त्रज्ञांचा तर्क आहे. सिल्युरियन आणि डेव्होनियन कल्पांत (३६ ते ४२ कोटी वर्षांपूर्वी) त्यांची फार भरभराट झाली होती. यांच्या शरीराचा पुढचा भाग जाड अस्थि-कवचाने आणि शेपटी लहान, जाड खवल्यांनी झाकलेली होती जबडे नव्हते आणि मुख वाटोळे चूषकासारखे होते. ऑस्ट्रॅकोडर्म आणि त्याचे जिवंत वंशज सायक्लोस्टोमाटा यांचा ॲग्नॅथा वर्गात समावेश केला आहे.

कर्वे, ज. नी.