बेरांझे,प्येअरझांद : (१९ ऑगस्ट १७८०-१६ जुलै १८५७). फ्रेंच कवी. पॅरिस शहरी एका गरीब कुटुंबात जन्मला. पेरॉ येथे त्याचे बालपण गेले. वयाच्या चवदाव्या वर्षी एका मुद्रणालयात तो उमेदवारी करु लागला. १८०० च्या सुमारास तो पॅरिसला परतला. त्यानंतर सु. दोन वर्षांनी त्याने कवी म्हणून आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ केला. साधी, आवेगपूर्ण, नेहमीच्या जीवनातील उपरोध टिपून घेणारी अशी सुंदर गीते त्याने लिहिली. कधीकधी त्याची गीतरचना काहीशी अश्लीलतेकडे झुकलेली दिसते.१८०४ मध्ये नेपोलियनचा भाऊ लूस्यँ बोनापार्ट ह्याच्या वाचनात बेरांझेची गीते आली व ती त्याला फार आवडली. त्याच्याच मदतीने बेरांझेला काही मानवेतन मिळू लागले आणि आर्थिक स्वास्थ्य प्राप्त झाले. असे असले, तरी लर्‌वा दिव्हतो (१८१३, इ.शी. द किंग ऑफ ईव्ह्‌तो) ह्या आपल्या एका गीतातून नेपोलियनची हुकूमशाही प्रवृत्ती आणि त्याचा महत्त्वाकांक्षी स्वभाव ह्यांवर त्याने उपरोधपूर्ण पण कडवटपणाचा संपूर्ण अभाव असलेली टीका केली होती. शाँसाँ मॉराल ए ओत्र १८१५ ह्या त्याच्या गीतसंग्रहात हे गीत अंतर्रभूत आहे. शाँसाँ द्याझिएम रक्पय १८२१ ह्या त्याच्या नंतरच्या काव्यसंग्रहाने फ्रान्समध्ये पुनःप्रस्थपित झालेल्या बूरबाँ राजसत्तेचा त्याच्यावर रोष झाला. त्यासाठी त्याला दंड द्यावा लागला तुरुंगवासही भोगणे प्राप्त झाले. शाँसाँ नुव्हॅल ह्या आपल्या गीतसंग्रहातील गीतांची रचना त्याने ह्या तुरुंगवासातच सुरू केली. नेपोलियनच्या अधिकारपतनानतंर त्याच्या बद्दल सर्वसामान्यांना वाटणारा निस्सीम आदर आणि प्रेम व्यक्त करणारी सुंदर हदयस्पर्शी गाणी (शाँसाँ इनेदी,१८२८) त्याने लिहिली आणि राज्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली. ह्या खेपेलाही दंडाची व तुरुंगवासाची शिक्षा त्याला देण्यात आली. तथापि फ्रेंच प्रजासत्तकवाद्यानी त्याचा गौरव केला आणि त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. त्याचा दंड जनतेने वर्गणी काढून भरला. राष्ट्रकवीचा मान त्याला मिळाला. १८३३ नंतर तो निवृत्तीचे जीवन जगू लागला. साँग्ज ऑफ बेरांझे (१८७८) ह्या नावाने त्याच्या काही गीतांचा इंग्रजी अनुवावद पुस्तकरूप झाला आहे. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

टोणगावकर, विजया