पौर्वात्य मोल (टाल्पा मायक्रुरा मायक्रुरा)

मोल : सस्तन प्राण्यांच्या इन्सेक्टिव्होरा (कीटकभक्षक) या गणातील टाल्पिडी या कुलात या प्राण्याचा समावेश होतो. या कुलात सु. १२ प्रजाती व २० जाती आहेत आणि त्या यूरोप, आशिया व उत्तर अमेरिका या प्रदेशांत आढळतात. हे प्राणी बिळे करून राहतात. यांची शरीररचना अशा राहणीस अनुकूल अशीच आहे. क्रायसोल्कोरिडी या कुलातही केप गोल्डन मोल ही जाती सामावली आहे.

आशियातील झोकोर, भूमध्य प्रदेशातील मोलरॅट, आफ्रिकेतील स्ट्रॅडमोल हे कृंतक (भक्ष कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) गणाचे प्राणी व ऑस्ट्रेलियातील शिशुधान (मादीच्या उदरावर असलेली व जिच्यात पिलाची वाढ पूर्ण होते अशी पिशवी असलेल्या) प्राण्यांपैकी काही कोष्ठधारी जाती यांनाही मोल असे म्हणतात. येथे इन्सेक्टिव्होरा गणातील जातींचाच विचार केला आहे. टाल्पा मायक्रुरा मायक्रुराटा. मायकुरा ल्यूक्युरा या दोन जाती भारतात आढळतात. यांपैकी पहिली मध्य-पूर्व हिमालय व आसाम येथे तर दुसरी खासी व नागा टेकड्यांत आढळते.

यूरोपात आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव टा. युरोपिया व उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या जातीचे स्कॅलोपस ॲक्वाटिकस असे आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका व ऑस्ट्रलिया या प्रदेशांत मोल आढळत नाहीत.

टा. मायक्रुरा मायक्रुरा या जातीच्या मोलाच्या शरीराची लांबी सु. १० सेंमी. असते. याच्या शरीराचे अनुकूलन जमिनीखाली बिळात राहण्यास योग्य असे झाले आहे. शरीर दंडगोलाकार असून मान अगदी आखूड असते. त्यामुळे याचे डोके व खांदे पुढील पायांमधून बाहेर आल्यासारखे दिसतात. डोक्याची बाजू निमुळती असते व तशीच शेपटाची बाजूही असते. शेपूट अगदी लहान, अविकसित व केसांनी झाकलेले असते. पुढील पायाचे तळवे मजबूत, रुंद व जमीन खणण्यास योग्य अशा आकाराचे असतात. ते सपाट असून बाजूस पसरलेले असतात व त्यावर पाच बोटे असून प्रत्येक बोटावर तीक्ष्ण व बळकट अशी नखे असतात. डोळे फार लहान असून केसांनी झाकलेले असतात व त्यामुळे पंज्यांनी उडविलेली माती डोळ्यात जात नाही. मोलच्या शरीराला उग्र असा वास येतो. याच्या अंगावर लहान मऊ केस असतात. या केसांचा रंग काळ्या मखमलीसारखा असून त्याला चमक असते. दार्जिलिंगजवळ १,५२५ मी. ते २,४४० मी. या उंचीवर आणि जेथे जंगल तोडले आहे व झाडांच्या बुंध्यावर बुरशी वाढली आहे, अशा ठिकाणी यांची वस्ती असते कारण येथे याला गांडूळे व किटकांचे डिंभ (अळ्या) हे खाद्य मोठ्या प्रमाणात मिळते. टा. मायक्रुरा ल्यूक्युरा या जातीच्या मोलची शेपटी लांब असते व त्यावर पांढरे केस असतात.

यूरोपीय मोलच्या सवयी वर वर्णन केलेल्या भारतीय मोलच्या सवयीपेक्षा निराळ्या असतात. हा मोल आपले बीळ टेकडीच्या पायथ्याशी किंवा झाडांच्या मुळाशी करतो. या बिळात द्विस्तरीय (दोन पातळ्यांवर) अशा दोन वर्तुळाकार गॅलऱ्या (सज्जे) असतात. यांपैकी एक लहान व वरच्या स्तरावर असते. या गॅलरीचा उपयोग अन्न साठविण्यासाठी व भक्ष्य खाण्यासाठी केला जातो. दुसरी गॅलरी खालच्या स्तरावर असून पहिलीपेक्षा मोठी असते. हिचा उपयोग राहण्यासाठी केला जातो. मोठ्या गॅलरीपासून निरनिराळ्या दिशांनी लांबवर जाणारे बोगद्यासारखे मार्ग असतात. भक्ष्याच्या शोधार्थ जाताना हे बोगदे तयार केले जातात. हे करताना बाहेर काढलेली माती जमिनीवर भोक पाडून त्यातून बाहेर टाकली जाते. या मातीचे जमिनीवर लहान उंचवटे (ढिगारे) तयार होतात. त्यांनाच ‘मोलहील’ म्हणतात. मोलहीलची उंची साधारण १५ ते २५ सेंमी. असते व व्यास १८ ते ३६ सेंमी. असतो.

मोलचे पुढचे पाय माती उकरण्यास योग्य असेच असतात. तो बीळ करत असताना जसा काही पाण्यात पोहत आहे अशी हालचाल करतो. अगोदर एक पाय व मग दुसरा सरकून माती उकरली जाते. नंतर मोल पुढे सरकतो व उकरलेली माती मागे ढकलतो. ही माती पुढे बाहेर टाकली की, त्याचे उंचवटे तयार होतात. मोलचे डोळे अगदी बारीक असतात. काही जातींत तर डोळ्यांचा पूर्ण अभाव आहे. यांना बाह्यकर्णही नसतात. कानाचे एक भोक असते व ते केसांनी झाकलेले असते. मोलचे स्पर्शज्ञान तीक्ष्ण असते. तोंडावरील मिशा आणि शेपटीवरील व पायावरील केस ह्यांमुळे मिळालेल्या स्पर्श ज्ञानाने तो बिळातून व बोगद्यातून आपला मार्ग काढतो. काही जातींच्या मोलच्या मुस्काटावर २२ अभिमर्श (मिशांसारखे केस) असतात. यांची रचना ताऱ्याप्रमाणे असते व याचा उपयोग स्पर्शेंद्रियांसारखा होतो.

मोलला पुष्कळ अन्न लागते. एका दिवसात स्वतःच्या वजनाइतके अन्न हा फस्त करतो. दर तीन चार तासांनी हा भक्षाच्या शोधार्थ जातो. गांडुळे, किटकांचे डिंभ, कोळी, पाली व उंदीर हे याचे मुख्य भक्ष होय. काही मोल आपल्या बिळापासून जलप्रवाहापर्यंत बोगदे करतात व पाण्यातील कीटक, मासे, कवचधारी प्राणी व बेडूक यांवरही ताव मारतात. मोल पाण्यात चांगला पोहू शकतो. जर १२ तास याला अन्न मिळाले नाही, तर हा जगू शकत नाही.

आपल्या बिळातील मोठ्या गॅलरीत गवताचे अंथरुण करून त्यावर हा झोपतो. याची दृष्टी अधू असूनही आपल्या आयूष्याचा बराचसा काळ तो एकटा राहून आपल्या अंधाऱ्या बिळात काढतो. भारतातील मोलच्या बिळासंबंधी विशेष माहिती उपलब्ध नाही.

मोल हा जरी एकटा राहणारा प्राणी असला, तरी काही वेळा एका जातीचे अनेक मोल एका बिळात आढळले आहेत. यांचा विणीचा हंगाम मार्चच्या सुमारास येतो. त्या वेळी नर व मादी एकत्र येतात. गर्भधारणेचा काळ चार ते सहा आठवडयांचा असतो. मादी ४ ते ६ पिलांना जन्म देते. दोन महिन्यांत पिलांची वाढ पूर्ण होते व सहा ते बारा महिन्यांत लैंगीक दृष्ट्या ती वयात येतात. एका वर्षात मादीच्या जास्तीत जास्त दोन विणी होतात. मोलच्या शरीराला एक प्रकारचा उग्र वास येतो. मांजर मोलला मारते पण या वासामुळे त्याला खात नाही. इतर काही सस्तन प्राणी व पक्षी हेही मोलला मारतात.

मोल झाडांची मुळे खातात व बागेतील हिरवळीचा नाश करतात. हा उपद्रव टाळण्यासाठी यांना सापळ्यात पकडून किंवा विषारी द्रव्याचे फवारे मारून यांचा नाश केला जातो. बिळे करताना जमिनीची माती खालवर करणे व उपद्रवी कीटकांचा नाश करणे हे त्यांचे उपयुक्त कार्य आहे. पूर्वी काही प्रदेशांत यांच्या फरचा फार मोठ्या प्रमाणावर व्यापार होत असे. आता हा वापर कमी झाला आहे.

उत्तर अमेरिकेत ऑलिगोसीन ते रिसेंट (सु. ३·५ कोटी ते ११,००० वर्षांपूर्वीच्या), यूरोपात इओसिन ते रिसेंट (सु. ५·५ कोटी ते ११,००० वर्षांपूर्वीच्या) आणि आशियात रिसेंट (सु. ११,००० वर्षांपूर्वींच्या) या भूवैज्ञानिक कालखंडांतील यांचे अवशेष सापडले आहेत.

इनामदार, ना. भा. जमदाडे, ज. वि.