डाम, (कार्ल पिअटर) हेन्रिक : (२१ फेब्रुवारी १८९५–२४ एप्रिल १९७६), डॅनिश जीवरसायनशास्त्रज्ञ. के जीवनसत्त्वाचा शोध लावल्याबद्दल त्यांना १९४३ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयातील नोबेल पारितोषिक ⇨ ई. ए. डॉइझी यांच्याबरोबर विभागून मिळाले.

त्यांचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झाला व तेथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून १९२० साली त्यांनी रसायनशास्त्राची पदवी मिळविली. कोपनहेगन विद्यापीठाच्या शरीरक्रियाविज्ञान विभागात १९२३ मध्ये ते दाखल झाले व १९२८ पासून त्याच विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागात काम करू लागले. अमेरिकन स्कँडिनेव्हियन फाउंडेशनतर्फे १९४० मध्ये ते कॅनडात व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व्याख्याने देण्याकरिता गेले व १९४६ पर्यंत तेथेच राहिले. अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी रॉचेस्टर विद्यापीठात (१९४२–४५) वरिष्ठ संशोधक म्हणून आणि न्यूयॉर्क येथील रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेत (१९४५–४६) सहकारी सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या गैरहजेरीतच कोपनहेगन येथील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची १९४१ साली नेमणूक झाली. डॅनिश फॅट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून १९५६–६३ या काळात त्यांनी काम केले. के जीवनसत्त्वासंबंधीचे संशोधनकार्य त्यांनी १९२९ पासून मुख्यत्वे कोपनहेगन येथे आणि ई जीवनसत्त्वासंबंधीचे कार्य १९३७ पासून कोपनहेगन व अमेरिकेत केले. पित्ताश्मरीसंबंधीही (पित्ताशयात वा पित्तवाहिनीत तयार होणाऱ्या खड्यासंबंधीही) त्यांनी कोपनहेगन येथे १९५१ पासून संशोधन केले. कोंबड्यांच्या पिलांना ⇨ कोलेस्टेरॉलरहित खाद्य दिल्यास त्यांच्यात रक्तस्त्राव होणे तसेच रक्तक्लथन (रक्त गोठण्याची क्रिया) लवकर न होणे ही लक्षणे डाम यांना आढळून आली होती परंतु ही लक्षणे कोलेस्टेरॉलाच्या न्यूनतेमुळे नसून (कारण कोंबड्या त्यांना लागणारे कोलेस्टेरॉल स्वतःच्या शरीरात तयार करू शकतात) एका वसा-विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणाऱ्या) जीवनसत्त्वामुळे उद्‌भवतात, असे डाम यांनी सिद्ध केले. या जीवनसत्त्वाला पुढे १९३५ मध्ये के जीवनसत्त्व असे नाव देण्यात आले. रक्तस्त्रावाची प्रवृत्ती असलेल्या मानवी रोगांतील के जीवनसत्त्वाच्या कार्यासंबंधीही डाम यांनी संशोधन केले. केशिकांमधून (सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधून) मोठ्या प्रमाणावर प्लाविका (रक्तरस) बाहेर येणे या विकाराला कोंबड्यांची पिले बळी पडण्याचे कारण ई जीवनसत्त्वाची न्यूनता हे आहे, असे डाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविले. पुढे १९५७ मध्ये ई जीवनसत्त्वाबरोबरच सिलीनियमाची न्यूनता हेही कारण असते, असे सिद्ध झाले. प्रयोगशाळेतील हॅम्स्टर या प्राण्याच्या आहारात बहुअसंतृप्त (ज्यातील रेणूमध्ये इतर अणू वा अणुगट तृप्त होईपर्यंत सामाविले जातात अशा) वसाम्लांची न्यूनता असल्यास व कार्बोहायड्रेट सहजशोषिल्या जाणाऱ्या शर्करेच्या स्वरूपात दिल्यामुळे त्यांना कोलेस्टेरॉलयुक्त पित्ताश्मरीचा विकार होतो, असे डाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५२ मध्ये दाखवून दिले. या संशोधनाच्या संबंधात मिळालेल्या माहितीमुळे मनुष्यातील पित्त आणि त्यातील कोलेस्टेरॉलाचे प्रमाण यांच्या संशोधनास चालना मिळाली.

डाम हे डॅनिश ॲकॅडेमी ऑफ टेक्निकल सायन्सेस, रॉयल ॲकॅडेमी ऑफ मेडिसीन इ. संस्थांचे सदस्य होते. स्टेरॉले, के आणि ई जीवनसत्त्वे आणि वसा या विषयांवरील त्यांचे ३१५ पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले. ते कोपनहेगन येथे मृत्यू पावले.    

                                    भालेराव, य. त्र्यं.