बिळे करणारे साप : सगळ्या सर्पकुलांपैकी मुख्यतः टिफ्लॉपिडी, ग्लॉकोनिडी, इलिसायडी आणि युरोपेल्टिडी या चार कुलांतील साप बिळे करणारे असल्याचे दिसुन येते. टिफ्लॉपिडी कुलातील ⇨आंधळा साप सामान्यतः जगभर आढळतो. ग्लॉकोनिडी कुलातील ग्लॉकोनिया या सापाचा एक प्रकार भारतात पंजाबात सापडतो. इतर प्रकार सिंध, बलुचिस्तान, इराण, उत्तर आफ्रिका, इ. प्रदेशांत आढळतात. इलिसायडी कुलातील साप ब्रह्मदेश, श्रीलंका, मलाय द्वीपकल्प, इंडोचायना आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांत सापडतात. युरोपेल्टिडी कुलातील सापांच्या एकंदर ४४ जाती असून त्या भारत व श्रीलंकेमध्ये आढळतात.

हे साप जमिनीखाली बिळात राहतात. यांचे डोके लहान व पुढच्या बाजूकडे किंचित निमुळते असल्यामुळे बिळे करण्याकरिता त्याचा उपयोग होतो. तोंड लहान असते. गांडुळे, इतर कृमी, किडे आणि अळ्या हे यांचे भक्ष्य होय. हे मंद गतीने सरपटत जाणारे असून स्वभावाने भित्रे असतात.हे बिनविषारी आणि निरुपद्रवी असतात.

युरोपेल्टिडी कुलातील ६ वंश आणि ३३ जाती भारतात (मुख्यतः दक्षिण भागात) आढळतात यांपैकी एका वंशाच्या दोन जाती महाराष्ट्रात आढळतात. यांपैकी एकाला कंटकपुच्छ (युरोपेल्टिस ऑसेलेटस) म्हणतात. याची लांबी ५४ सेंमी. व जाडी २.५ सेंमी. असते. डोके पुढच्या बाजूकडे किंचित निमुळते आणि शेपूट बोथट असते. शेपटाच्या टोकाजवळील खवले खडबडीत असतात शेवटचा खवला रुंद असून त्याच्या टोकावर दोन काटे असतात. डोळे अतिशय लहान असतात. कधीकधी हा दिवसादेखील हिंडताना दिसतो.

कर्वे, ज. नी.