डोकेदुखी : डोक्यात होणाऱ्या वेदनांना ‘डोकेदुखी’ म्हणतात. डोकेदुखी हा एक स्वतंत्र रोग नसून अनेक रोगांत दिसणारे ते एक लक्षण आहे.मानसिक व भावनिक अस्वस्थतेमुळेही डोके दुखते. ⇨ अर्धशिशी हा डोकेदुखीचा एक विशिष्ट प्रकार आहे. कधीही डोके दुखले नाही अशी व्यक्ती विरळाच आहे. सु. ९ टक्के लोकांमध्ये डोकेदुखी चिरकारी (फार काळ राहणारी) असते. डोकेदुखीचा काळ, स्थान व तीव्रता यांवरून तिच्या कारणांची काहीशी कल्पना येते.

 डोकेदुखीच्या कारणांचे तीन प्रकार आहेत : (१) स्थानिक, (२) सार्वदेहिक (सर्व शरीराशी संबंधित) व (३) प्रतिक्षेपित (शरीराच्या एका भागातील आवेगामुळे इतरत्र झालेल्या प्रतिक्रियेमुळे). 

(१) स्थानिक कारणांमध्ये सर्दी, नासाकोटरातील शोथ (चेहऱ्याच्या हाडामधील नाकाशी जोडलेल्या हवा असलेल्या पोकळीच्या अस्तरत्वचेची दाहयुक्त सूज), डोळ्यातील काचबिंदू [⟶ नेत्रवैद्यक], त्रिशाखा तंत्रिकेच्या (मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या मज्जेच्या) कापालिक शाखेचा शोथ, मस्तिष्क शोथ (मेंदूची दाहयुक्त सूज), परिमस्तिष्क शोथ (मेंदूवरील आवरणाची दाहयुक्त सूज) व मस्तिष्कातील अर्बुदे (गाठी) यांचा अंतर्भाव होतो.

(२) सार्वदेहिक कारणांमध्ये कोणत्याही कारणाने आलेला ज्वर, वृक्कविकार (मूत्रपिंडाचा विकार), रक्तदाबाधिक्य, मद्यपान वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. 

(३) प्रतिक्षेपित कारणांमध्ये यकृताचे विकार, अपस्मार (फेफरे), तंत्रिकोन्माद (हिस्टेरिया), अतिविचार, मानसिक क्षोभ, जागरण, अतिवाचन, दृष्टिदोष, अतिशय झगझगीत प्रकाश वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो.

कपाळाशी, कानशिलाशी किंवा डोक्याच्या मागच्या भागाशी डोके दुखू शकते. तसेच त्याची तीव्रता जडपणापासून असह्य वेदनांपर्यंत असू शकते.

मूळ कारण शोधून काढून त्यावर योग्य तो उपचार करणे हे उत्तम. तात्पुरता उपाय म्हणून ॲस्पिरिनासारखी वेदनाशामक औषधे आणि मेंथॉल, सुंठ, रक्तचंदन वगैरेंचा लेप उपयुक्त असतो. 

पहा : तंत्रिका तंत्र.

कापडी, रा. सी.

आयुर्वेदीय चिकित्सा : कोणत्याही डोकेदुखीत रक्तधातूची दुष्टी असतेच. ह्याकरिता कोणत्याही प्रकारच्या डोकेदुखीत दोषांना अनुसरून शिंग, जळू, तुंबडी यांनी रक्त काढावे. वातज शिरःशूल असेल तर महावातविध्वंस, महायोगराज गुग्गुलू हे आल्याच्या रसाबरोबर द्यावे. अणुतेल वा नारायण तेल गरम करून नाकात घालावे. पित्तज शिरःशूल असेल तर प्रवाळ, सुवर्णमाक्षिक, मौक्तिक भस्म ही मोरावळ्याच्या रसात किंवा डाळिंबाच्या पाकात चाटवावीत आणि साखर, गायीच्या तुपाची निवळ व केशर यांनी सिद्ध केलेले तूप नाकात घालावे. कफज शिरःशूल असेल, तर वातज शिरःशूलातील औषधे नुसती गरम पाण्याबरोबर द्यावीत किंवा दशमूलारिष्टाबरोबर द्यावीत. तसेच डोके अतिशय जड झाले असेल, तर आल्याच्या रसाचे चार थेंब ज्या बाजूचे डोके दुखत असेल त्या बाजूच्या नाकपुडीत घालावेत. एवढ्याने शिरःशूल थांबला नाही तर वातजावर शिरोबस्ती, पित्तजावर रेचक आणि कफजावर वमन देऊन, शिरोरेचक नस्य देऊन पुनः वरील चिकित्सा करावी. याही चिकित्सेने बरे वाटले नाही, तर धातूंची दुष्टी पहावी. उदा., पाठीमागचे डोके दुखत असेल व त्याबरोबरच डोळे दुखणे, डोळ्यांची आग होणे, दाबल्याने बरे वाटणे इ. चिन्हे असली तर महायोगराज गुग्गुलू, महावातविध्वंस किंवा सूतशेखर ही सर्व दोषांना अनुसरून आवळकठी, गुळवेलसत्त्व, नागरमोथा या मज्जापाचक योगाबरोबर दिले असता कमी होते. खुरासनी ओवा दोन मासेपर्यंत कोमट पाण्याबरोबर दिला असताना डोकेदुखी थांबते व झोप येते. हे औषध म्हाताऱ्यांना देऊ नये.

पहा : शल्य व शालाक्य तंत्र.  

पटवर्धन, शुभदा अ.