चक्रधर (श्रीचक्रधर) : (सु. ११९४ — १२७४). भरवस (भडोच, गुजरात) येथील मल्लदेव राजाचा प्रधान विशालदेव व त्याची पत्नी माल्हणदेवी यांचा पुत्र हरिपाळदेव म्हणजेच चक्रधर. वयाच्या सोळाव्या वर्षी हरिपाळदेव मृत्यू पावले. तेव्हा द्वारवती येथील चक्रपाणी या ईश्वरावताराने योगमार्गाने देहत्याग करून, त्यांच्या शरीरात प्रवेश केला व नवीन अवतार धारण केला. तेच पुढे चक्रधर या नावाने प्रसिद्ध झाले. हरिपाळदेवांच्या पत्नीचे नाव कमळाइसा. तिच्यावर त्यांचे अत्यंत प्रेम होते. हरिपाळदेवांनी त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचा विचार करून सर्व जाति-धर्माच्या लोकांना भक्तिमार्गाने एकत्र आणण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले. सर्व जीवांच्या उद्धारासाठी विरक्त होऊन त्यांनी गृहत्याग केला. रामयात्रेच्या मिषाने ते महाराष्ट्रात आले. ऋद्धिपूर (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथे गोविंदप्रभू या ईश्वरावताराचे त्यांना दर्शन झाले. त्यांच्यापासून त्यांनी शक्तिस्वीकार केला. गोविंदप्रभूंनीच त्यांचे नाव ‘चक्रधर’ ठेवले.

शक्तिस्वीकारानंतर उन्मनस्क स्थितीत चक्रधर अनेक वर्षे भ्रमण करीत होते. मोर्शीजवळील सालबर्डीच्या डोंगरावर त्यांनी काही वर्षे काढली. त्यानंतर विदर्भ व मराठवाडा या प्रदेशांत भ्रमण करीत ते तेलंगणात (आंध्र प्रदेश) गेले. आंध्र प्रदेशात तुंगभद्रेपर्यंत त्यांचा संचार होता. तेथील श्रीशैलम् पर्वतावर नाथ योग्यांच्या सहवासात ते कित्येक दिवस होते. तेथून परत आल्यावर आपल्या आयुष्याची शेवटची आठ वर्षे त्यांनी महाराष्ट्रातच घालविली. खेडोपाडी जाऊन आपल्या तत्त्वज्ञानाचा आणि आचारधर्माचा ते उपदेश करू लागले. त्यांच्या तत्त्वज्ञानाने व व्यक्तिमत्त्वाने आकृष्ट होऊन अनेक वैदिक पंडित वेदमार्गाचा त्याग करून चक्रधरांचे शिष्य झाले. त्यांच्या अवैदिक तत्त्वज्ञानाच्या व वर्णाश्रमधर्माला हादरे देणाऱ्या आचारधर्माच्या उपदेशामुळे प्रस्थापित धर्मपंथाच्या पुरोहितांनी त्यांच्यावर भलतेच आरोप ठेवून त्यांना फार त्रास दिला. अशाही परिस्थितीत त्यांनी आपले संपूर्ण तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना रुचेल, समजेल अशा तत्कालीन मराठी भाषेत सांगितले. अखेरच्या काळात त्यांनी उत्तरापंथे प्रयाण कले. हिमालयात अजूनही ते विद्यमान आहेत, अशी त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आहे.

 चक्रधर हे स्वरूपसुंदर होते. आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि मधुर वाणीने जनतेला आकृष्ट करण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होते. गुजराती ही त्यांची मातृभाषा होती, तरी मराठीवरही त्यांचे उत्तम प्रभूत्व होते. संस्कृत भाषेचा व ग्रंथांचाही त्यांचा चांगला व्यासंग होता. जीव व देवता ह्या परमेश्वर नाहीत त्यांच्या उपासनेने तात्कालिक फळे मिळतात, पण आत्यंतिक मोक्ष मिळत नाही. दत्तात्रेय, कृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू व स्वतः आपण या ईश्वरावतार असलेल्या ‘पंचकृष्णां’च्या भक्तीनेच तो मिळतो, हे त्यांच्या उपदेशाचे सार होय. ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते. वर्णविषमता, विटाळचांडाळ इ. त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या अनुयायांचा जो पंथ वा मार्ग निर्माण झाला, त्यालाच आज ⇨महानुभाव पंथ  असे म्हणतात. त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य यांनी त्यांच्यानंतर या पंथाचा प्रचार व प्रसार केला. चक्रधरांचे चरित्र लीळाचरित्र  या आद्य मराठी ग्रंथात  ⇨म्हाइंभटाने संकलित केलेले आहे. त्यातून निवडलेली चक्रधरांची वचने व त्यांनी निरूपलेले दृष्टांत, केसोबासाने (केशवराज सूरी) सुत्रपाठ  व दृष्टांतपाठ  या ग्रंथांत संकलित केलेले आहेत. महानुभाव तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे हे आधारग्रंथ होत.

 संदर्भ :  कोलते, वि. भि. श्री चक्रधर चरित्र, मलकापूर, १९५२. 

कोलते, वि. भि.