रक्तक्लथन:द्रव स्वरूपातून रक्त घन स्वरूपात रूपांतरित होण्याच्या क्रियेला रक्तक्लथन म्हणतात. सामान्य भाषेत या क्रियेला रक्त साखळणे किंवा रक्त गोठणे असे म्हणतात. रक्तस्तंभन (एखाद्या शरीर भागातून वा वाहिनीतून जाणारा रक्तप्रवाह थांबणे) या नैसर्गिक क्रियेचा रक्तक्लथन हा एक शरीरक्रियात्मक भाग आहे. रक्त व ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे-पेशींचे-समूह) मिळून तिसापेक्षा अधिक पदार्थ या क्रियेशी संबंधित आहेत. यांपैकी काही क्लथनकारक व काही क्लथनप्रतिरोधक आहेत. रक्तक्लथन या विषयावर जीववैज्ञानिकांनी मोठ्या प्रमाणावर अभ्यास व संशोधन केले असून त्यासंबंधी अनेक ग्रंथ व हजारो शास्त्रीय निबंध आणि प्रयोगशालेय आधारसामग्री उपलब्ध आहे.

आ. १. इजा झालेल्या रक्तवाहिनीतील रक्तक्लथन क्रियेचे टप्पे : (१) तुटलेली रक्तवाहिनी, (२) बिंबाणूंचे समूहन, (३) फायब्रिनाच्या निर्मितीची सुरुवात, (४) फायब्रिनाचा क्लथ (गुठळी) तयार होणे, (५) क्लथाचे प्रत्याकर्षण (रक्तप्रवाह बाणाने दाखविला आहे).रक्तवाहिनी तुटताच तिची अवकाशिका (आतील पोकळी) ताबडतोब संकुचित बनते व रक्तप्रवाह कमी होतो. तुटलेल्या ठिकाणी खरबरीत बिंबाणू (रक्तातील वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार, २-३ मायक्रॉन व्यासाच्या तबकड्या) चिकटतात व त्यांच्या गुठळ्या तात्पुरती गुडदी बनवून रक्त बाहेर पडू देत नाहीत. बिंबाणू सिरोटोनीन नावाचा पदार्थ मुक्त करतात आणि तो वाहिनीसंकोचक असल्यामुळे वाहिनी अवकाशिका अधिक संकुचित होते.

रक्तक्लथनसिद्धांतवप्रक्रिया: विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून बरीच वर्षे रक्तक्लथनाचा चार-कारक (चार घटक) सिद्धांत रूढ होता. या सिद्धांतानुसार ऊतक इजा झाल्याबरोबर थ्राँबोकायनेज वा थ्राँबोप्लॅस्टीन नावाचा कारक मुक्त होतो आणि तो प्रोथ्राँबीन या प्रथिनास सक्रियित करतो. कॅल्श्यिम व प्रोथाँबीन यांपासून थ्राँबीन हे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडण्यास मदत करणारे प्रथिन) तयार 

आ. २. रक्तक्लथनाचा चार कारक सिद्धांत

 होते. थ्राँबीन फायब्रिनोजेनापासून फायब्रीन ते तंतुमय अविद्राव्य (न विरघळणारे) प्रथिन तयार करते. या प्रथिनापासून रक्तक्लथनाची संरचना बनते.

कालांतराने व अधिक संशोधनानंतर रक्तक्लथन ही एक जटिल क्रिया असल्याचे लक्षात आले. रक्तद्रवातील दोन प्रथिनांच्या दोन निरनिराळ्या परिवर्तनकारक विक्रियांमुळे रक्तक्लथन होते. एका विक्रियेत प्रोथ्राँबिनाचे थ्राँबिनात रूपांतर होते आणि दुसरीत फायब्रिनोजेनाचे फायब्रिनात रूपांतर होते.

पहिली विक्रिया एक जटिल प्रपातमालाच असते. ती पूर्ण होण्याकरिता काही विशिष्ट रक्तद्रव प्रथिनांची आवश्यकता असते. या प्रथिनांचा उल्लेख रक्तक्लथनकारक किंवा नुसताच ‘कारक’ असा करतात. या कारकांचा उल्लेख रोमन आकडा लावूनही करतात. त्यांच्याविषयीची माहिती कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. १. रक्तक्लथनकारक 

कारक

मूळ नाव

कारक I

कारक II

कारक III

कारक IV

कारक V

कारक VI

कारक VII

कारक VIII

कारक IX

कारक X

कारक XI

कारक XII

कारक XIII

फायब्रिनोजेन

प्रोथ्राँबीन

ऊतक थ्राँबोप्लॅस्टीन

कॅल्शियम आयन (विद्युत्‌ भारित अणू)

प्रोॲक्सेलरीन परिवर्तीकारक

हल्ली संज्ञा वापरण्यात नाही

प्रोकन्व्हर्टीन स्थिरकारक

अँटिहोमोफिलीक ग्लोब्युलीन

ख्रिसमस रोगप्रतिबंधक कारक

प्रोथ्राँबिनेज स्टूअर्ट*- प्रॉवर*कारक

प्लाझ्मा थ्राँबोप्लॅस्टीन अँटिसिडंट

ग्लास*कारक हेजमनϯकारक

फायब्रीन स्थिरीकरणकारक लाकी*-लोरँड*कारक

*ज्या रुग्णांमध्ये कारक प्रथम सापडला त्यांच्या नावावरून पडलेली नावे ϯ ज्या रुग्णात कारकाची न्यूनता प्रथम आढळली त्याच्या नावावरून दिलेले नाव.

अलीकडील संशोधनानुसार प्रोथ्राँबीन परिवर्तनाकरिता दोन निरनिराळ्या प्रक्रिया मालिकांची आवश्यकता असते व त्यांना (१) अंगभूत तंत्र आणि (२) बाह्यागत तंत्र अशी नावे आहेत.

(१)अंगभूततंत्र:वाहिनीच्या पृष्ठभागात बदल होताच ही विक्रिया ताबडतोब सुरू होते. प्रथम कारक XII अथवा हेजमन कारक क्रियाशील बनतो. तो कारक XI ला व नंतर एका पाठोपाठ एक IX, VIII, X आणि V क्रियाशील होतात. या प्रतिक्रियेत वरील कारकांशिवाय कॅल्शियम व फॉस्फोलिपिड आवश्यक असतात. त्यांपैकी रक्तद्रवात कॅल्शियम असतेच व बिंबाणू फॉस्फोलिपिड मुक्त करतात.

(२)बाह्यागततंत्र:वाहिनीस झालेल्या प्रत्यक्ष इजेमुळे तसेच आजूबाजूच्या ऊतकास होणाऱ्या इजेमुळे ही विक्रिया सुरू होते. यामध्ये चार कारक भाग घेतात : (अ) ऊतकजन्यकारक (अजून निश्चित ज्ञात नसलेला), (आ) कारक VII, (इ) कारक X, (ई) कारक V. अंगभूत तंत्राप्रमाणेच कॅल्शियम व फॉस्फोलिपिड उत्प्रेरकाचे (रासायनिक विक्रियेचा वेग बदलण्यास मदत करणाऱ्या पण स्वतः विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेणाऱ्या पदार्थाचे) कार्य करतात. मात्र येथे फॉस्फोलिपिड ऊतकजन्य असते.


आ. ३. प्रोथ्राँबिनाचे थ्राँबिनात रूपांतरणवरील दोन्ही तंत्रांची प्रोथ्राँबिनाचे थ्राँबिनात रूपांतरण होण्याकरिता आवश्यकता असते. रक्तद्रवात फायब्रिनोजेन नावाचे ग्लोब्युलीन असते आणि कॅल्शियम आयनांच्या उत्प्रेरण कार्यामुळे त्याचे फायब्रिनात रूपांतर होते. फायब्रीन तंतुमय प्रथिन असते आणि त्याची निर्मिती म्हणजेच रक्तक्लथन पूर्णता होय.

वरील वर्णनावरून काही जटिल प्रक्रिया पूर्ण झाल्यासच रक्तक्लथन शक्य असते, हे लक्षात येईल. प्राकृतिक (सर्वसाधारण) रक्तक्लथित होण्यास फक्त ४ ते ८ मिनिटे लागतात.

वरील रक्तक्लथन यंत्रणेशिवाय रक्तामध्ये तयार झालेल्या क्लथाचे विद्रावण करण्याचीही यंत्रणा असते. या यंत्रणेला फायब्रीन अपघटन तंत्र म्हणतात. रक्तद्रवातील प्रथिनामध्ये प्लाझ्मिनोजेन नावाचे प्रथिन असते व त्याचे प्रथिनविघटक एंझाइमात (प्लाझ्मिनात) रूपांतर होते. त्याकरिता लागणारे काही सक्रियकारक (क्रियाप्रवर्तक) सर्व ऊतकांत असतात. गर्भाशय, फुप्फुसे, ⇨अष्ठीलाग्रंथी व ⇨अवटूग्रंथी या अवयवांत ते अधिक प्रमाणात असतात. यांशिवाय काही क्रिया प्रतिरोधकही असतात. शरीरक्रियाविज्ञानदृष्ट्या आवश्यक तेवढी फायब्रीन अपघटन क्रिया चालू असते परंतु शारीरिक व मानसिक ताण, ॲड्रेनॅलिनाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) व इतर काही उद्दीपनांमुळे ती वाढते. क्लथनजागी प्लाझ्मीन हे फायब्रीन तंतू, कारक V, कारक VIII, कारक XII इत्यादींचे पाचन करते व क्लथ नाहीसे होतात.

या तंत्राचा प्रमुख उपयोग म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील क्लथ नाहीसे करून रक्तप्रवाहात अडथळा येऊ न देणे हा असतो. ऊतकात नको त्या जागी शिरलेले रक्त याच यंत्रणेमार्फत काढून टाकले जाते. कधीकधी क्लथामुळे वाहिनी अवकाशिका बंद झाल्यास, ही यंत्रणा क्लथाच्या विद्रावणाने वाहिनी रक्तप्रवाह जाण्याकरिता मोकळीही करते. मात्र मोठ्या आकारामानाच्या वाहिन्यांतील अवकाशिका सहसा मोकळी होत नाही.

अंतर्वाहिनीक्लथन: रक्तवाहिनीतील रक्तक्लथन होण्याला अंतर्वाहिनीक्लथन म्हणतात. निरोगी शरीरात रक्त नेहमी वाहते राहण्याकरिता द्रव अवस्थेतच असणे आवश्यक असते. रक्तस्रावाद्वारे होणारा संभाव्य रक्तनाश थोपवणारी जशी रक्तस्तंभक योजना आहे तशीच अंतर्वाहिनीक्लथन न होऊ देणारी यंत्रणाही रक्तामध्ये आहे.

त्यातील दोन प्रमुख योजनांमध्ये प्रथम वाहिनीच्या आतील पृष्ठभागावरील अंतःकला (सपाट, खवल्यांसारख्या कोशिकांनी बनलेल्या पटलाच्या) अस्तराच्या गुळगुळीतपणाचा उल्लेख केला पाहिजे. त्यामुळे संपर्कजन्य अंगभूत तंत्र कार्यान्वित होण्यास प्रतिबंध होतो. हा पृष्ठभाग ऋण विद्युत्‌ भारयुक्त असल्यामुळे रक्तरसातील कारक व बिंबाणू प्रतिसारित होऊन क्लथन विक्रिया थोपवली जाते.

क्लथनरोधके: रक्तामध्ये काही क्लथनरोधकेही असतात. ही रोधके रक्तातील थ्राँबीन निष्प्रभ बनवतात. क्लथनाच्या वेळी तयार होणारे फायब्रीन तंतू व अँटिथ्राँबीन III नावाचे ग्लोब्युलीन हे कार्य करतात. तयार होणाऱ्या थ्राँबिनापैकी ८५ ते ९०% थ्राँबीन या तंतूंवर अधिशोषित होते (पृष्ठभागावर सांद्रित होते) व उरलेले अँटिथ्राँबीन निष्क्रिय बनवते. यामुळे थ्राँबीन उर्वरित रक्तात पसरण्यास प्रतिबंध होऊन क्लथ प्रमाणाबाहेर पसरत नाही.

शरीरातील अनेक प्रकारच्या कोशिकांत हेपारीन नावाचा संयुग्मित पॉलिसॅकॅराइड पदार्थ असतो. हा पदार्थ एक शक्तिशाली क्लथनरोधक आहे. रक्तातील क्षारककर्षी (क्षारकीय रंजकाने अभिरंजित होणाऱ्या) कोशिकांत, फुप्फुसांत व यकृतातील केशवाहिन्यांत हेपारीन पुष्कळ असते. या दोन अवयवांमध्ये नीला रक्तात मंद प्रवाहात सूक्ष्म क्लथ तयार होत असतात व ते वाढू न देण्याचे कार्य हेपारीन करते. प्राकृतिक रक्तामध्ये हेपारीन फक्त ०·०१ मिग्रॅ./१०० मिली. असते. हेपारीन एक जलद परिणामकारक क्लथनरोधक म्हणून औषधी उपयोगात आहे. गुरे व डुकरे या प्राण्यांच्या आतड्यातील श्लेष्मकलास्तरापासून (बुळबुळीत पातळ अस्तरापासून) शुद्ध हेपारीन बनवतात. औषधी मात्रा १० ते १०० पट अधिक असूनही प्राकृतिक रक्तातील हेपारिनाचे अत्यल्प प्रमाण अंतर्वाहिनीक्लथन थोपवण्यास समर्थ असते.

रक्तक्लथनासंबंधाचेरोग: या रोगांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (१) जन्मजात आणि (२) उपार्जित.

जन्मजातरोग: जन्मजात रोगांत बहुधा एकाच कारकाचा (रक्तक्लथनकारक प्रथिनाचा) दोष असतो व तो आनुवंशिक असतो. पुष्कळ वेळा कारक योग्य प्रमाणात असूनही सदोष असतो. पुढील विकृतींचा समावेश या प्रकारात होतो.

आ. ४. रक्तस्त्रावी रोगाचा लिंग-गुणसूत्रबद्ध प्रसाररक्तस्रावीरोगअथवारक्तस्रावीरोग-अ : रक्तस्रावी रोग-रोधीकारक अथवा कारक VIII ची न्यूनता. रक्तरसाच्या ग्लोब्युलीन भागात हा कारक समाविष्ट असतो. एकूण रक्तक्लथनासंबंधीच्या रोगांत सर्वाधिक आढळणाऱ्या या रोगाचे प्रमाण १०,००० लोकसंख्येत १ असे आहे. अल्पशा कारणावरून अती रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती आणि प्राकृतिक रक्तक्लथन काल (सर्वसाधारणपणे ४ ते ८ मिनिटे) बराच वृद्धिंगत होणे या रोगाची प्रमुख लक्षणे असून तो आनुवंशिक आणि लिंग-गुणसूत्रबद्ध [लिंगाशी संबंधित असलेल्या गुणसूत्रातील जीनांशी संबंध असलेला ⟶ आनुवंशिकी] आहे. त्याचा कौटुंबिक प्रसार आ. ४ दर्शविल्याप्रमाणे होतो.


रोगी मातेकडून तिच्या पुल्लिंगी संततीत रोग प्रसृत होतो. रोगवाहक पिता व निरोगी माता यांच्या संततीतीतल मुली नेहमी रोगवाहक असतात परंतु मुलगे निरोगी असतात.

अत्यंत मामुली स्वरूपाच्या आघातामुळे स्नायूंत व मऊ ऊतकामध्ये अनियंत्रित रक्तस्राव होतो. गंभीर रोगात उदरगुहेतील निरनिराळ्या अवयवांतील रक्तस्राव चिंताजनक असतो. दात उपटल्यानंतर रक्तस्राव नेहमीप्रमाणे लवकर बंद न होता बराच वेळ चालू राहतो. सांध्यामध्ये वारंवार रक्तस्राव होऊन अपंगत्व येते. गुडघ्याचा सांधा, घोटा, नितंब, खांदे व कोपर या सांध्यांमध्येही रक्तस्राव होतो. रक्तसंधी (सांध्यामध्ये रक्तस्राव होणे) अकस्मात उद्‌भवतो व वेदनामय असतो. रुग्णास अंतःस्नायू अंतःक्षेपण केलेल्या जागी मोठा रक्तस्राव होण्याचा धोका असतो व म्हणून तो उपचार नेहमी टाळावा. अंतर्नीला अंतःक्षेपण केलेल्या जागी कमीत कमी पाच मिनिटे बोटांनी दाबून ठेवणे आवश्यक असते.

आधुनिक प्रयोगशालेय तपासणीत रोगाचे निश्चित्त निदान करता येते. रक्तरसातील कारक VIII व त्याची क्लथनकारक क्रियाशीलता तपासून ठरवता येतात. या क्रियाशीलतेवर रक्तस्रावाच्या गांभीर्याचा अंदाजही बांधता येतो. (कोष्टक क्र. २).

कोष्टक क्र. २. कारक VIII व रक्तस्त्राव प्रमाण 

कारक VIII ची क्रियाशीलता %

(प्राकृतिक १००%).

रक्तस्राव प्रमाण

५० – १००

२५ – ५०

५ – २५

१ – ५

अजिबात नाही

गंभीर आघातानंतर अती रक्तस्त्राव

शस्त्रक्रियेनंतर गंभीर रक्तस्त्राव, उत्स्फूर्त रक्तस्त्राव होत नाही.

अतिशय मामुली आघाताने गंभीर रक्तस्त्राव कधी कधी उत्स्फूर्त रक्तस्त्राव.

गंभीर विकृती स्नायूंत व सांध्यांत उत्स्फूर्त रक्तस्त्राव.

कौटुंबिक इतिहासावरून तसेच आधुनिक प्रयोगशालेय तपासणीत निदान ७०% रोगवाहक स्त्रिया ओळखता येतात. गर्भारपणात गर्भदर्शक उपकरणाद्वारे गर्भाचे रक्त तपासता येऊन निदान करता येते. उल्ब पारवेधाने उल्बद्रव तपासणी [⟶ प्रसवपूर्व परिचर्या] करून गर्भाचे लिंग अगोदर सोळा आठवड्याच्या सुमारास ठरवून पुल्लिंगी असल्यास गर्भपाताचा सल्ला देता येतो.

उपचारात सर्व रुग्णांची रक्तस्रावी रोगोपचार केंद्रामार्फत देखभाल होणे अत्यावश्यक आहे. पाश्चात्त्य देशांतून, विशेषतः अमेरिकेत बहुतेक राज्यांतून, अशी केंद्रे आहेत. गंभीर रोग असलेल्या मुलांच्या सर्वच कुटुंबियांची नोंद, तपासणी व आनुवंशिकीय सल्ला या केंद्रांतून दिला जातो.

औषधी उपचारामध्ये कारकाची उणीव भरून काढणे हाच मुख्य हेतू असतो. कारक VIII चे सांद्रण व क्रायोग्लोब्युलिनाचा (रक्तद्रवातून ४·४ ते २१ से. तापमानात अवक्षेपित होणाऱ्या म्हणजे न विरघळणाऱ्या साक्याच्या रूपात तयार होणाऱ्या अपसामान्य प्रथिनांचा) अवक्षेप वापरतात. हे दोन्ही रक्तदात्यांच्या ताज्या रक्तापासून बनतात. कारक VIII चे सांद्रण मानवी रक्ताशिवाय प्राणिरक्तापासूनही बनवतात. क्रायोग्लोब्युलिनाचा अवक्षेप योग्य त्याच रक्तगटाच्या रक्तापासून बनलेला असला पाहिजे. रुग्णांना स्वतः विद्राव बनवून त्याचे अंतःक्षेपण घेण्याचे पाश्चात्य देशांत शिकवितात. सहा ते बारा संच शीतपेटीत ठेवता येतात.

ख्रिसमसरोगअथवारक्तस्रावीरोग-ब: सर्व प्रकारे रक्तस्रावी रोग – अ सारखीच असणारी विकृती कारक IX च्या न्यूनतेमुळे उद्‌भवते. उपचारामध्ये याच कारकाचे सांद्रण वापरतात.

या ठिकाणी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. ज्या रोगामध्ये रक्त अथवा रक्तजन्य औषधे वारंवार वापरावी लागतात, त्या रोगाच्या रुग्णांमध्ये ⇨यकृतशोथ आणि उपार्जित रोगप्रतिकारक्षमता न्यूनताजन्य लक्षण समूह अथवा एड्स [⟶ रोगप्रतिकारक्षमता] या विकृतीचा अधिक धोका असतो.


उपार्जितरोग: उपार्जित रक्तक्लथन दोष अगदी कमी प्रमाणात आढळतात. क्लथनरोधक औषधामुळे व यकृत विकृतीमुळे काही वेळा हे रोग उद्‌भवतात. कधीकधी अपाभिशोषणजन्य (प्राकृतिक अभिशोषणात विकृती उद्‌भवल्याने) रक्तक्लथन दोष निर्माण होण्याची अत्यल्प शक्यता असते. यकृतामध्ये कारक II, VII, IX आणि X संश्लेषित होण्याकरिता (मूळ घटकांपासून तयार होण्याकरिता) के जीवनसत्त्व आवश्यक असते. हे जीवनसत्त्व वसाविद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारे) असल्यामुळे पुष्कळ वेळा त्याचे योग्य अभिशोषण होत नाही. नवजात अर्भकामध्ये विशेषेकरून अकाल प्रसूत अपक्व अर्भकामध्ये नाकात व जठरांत्र मार्गात (जठर व दोन्ही आतडी मिळून बनणाऱ्या अन्नमार्गात) रक्तस्राव होणारी विकृति कधीकधी आढळते व ती के जीवनसत्त्वन्यूनताजन्य रक्तक्लथन यंत्रणेतील बिघाडामुळे होते. अशा अर्भकांना हल्ली जन्मानंतर १ मिग्रॅ. के जीवनसत्त्वाची मात्रा अंतःस्नायू अंतःक्षेपणाने देण्याची पद्धत रूढ झाली आहे.

उपार्जित रक्तक्लथनासंबंधीच्या रोगामध्ये अकस्मात उद्‌भवणाऱ्या सार्वदेहिक स्वरूपाच्या, पर्याप्त किंवा बहुविध वाहिनीक्लथन नावाच्या विकृतीची थोडक्यात माहिती येथे दिली आहे. प्रत्यक्षात पर्याप्त वाहिनीक्लथन हा स्वतंत्र रोग नसून इतर अनेक रोगांत उद्‌भवणारे एक लक्षण म्हणता येईल. गुंतागुंतीचे विकृतिविज्ञान असलेल्या या विकृतीत थ्राँबीन उत्पादन, रक्तक्लथनकारकांचे सक्रियण, फायब्रीन निर्मिती व विलयन इ. यंत्रणा एकाच वेळी क्रियाशील असतात. सूक्ष्मजंतू संसर्ग, प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर), सर्पविषाक्तता (सर्पाचे विष शरीरात भिनणे), भाजणे, विरुद्धधर्मी रक्ताधान, ⇨श्वेतकोशिकार्बुद, पूतिगर्भपात (गर्भाशय ऊतकात जंतुसंसर्गामुळे होणारा गर्भपात), उल्बद्रव अंतर्कीलन (भ्रूणाभोवतीच्या कोशातील द्रव रक्तवाहिनीत अडकून तेथील रक्तप्रवाह बंद पडणे), ऊष्माघात इ. विकृतींमध्ये विर्कीण वाहिनीक्लथनाचा धोका असतो. गंभीर विकृतीत मुख, नाक, कान इत्यादींमधून रक्तस्राव होतो. सर्व शरीरावर नीलारुण (श्लेष्मकलेच्या व त्वचेच्या खाली जागजागी आपोआप रक्तस्राव होणे) दिसते.

उपचारांमध्ये मूळ रोगावरील इलाजाशिवाय रक्तक्लथनकारक, फायब्रीन विलयनरोधक औषधे (उदा., ॲमिनोकॅप्रॉइक अम्ल) इत्यादींचा उपयोग करतात.

अंतर्क्लथनअथवावाहिनीक्लथन: रक्तवाहिनीत रक्तक्लथन होण्याला अंतर्क्लथन अथवा वाहिनीक्लथन म्हणतात. निरोगी शरीरात रक्त नेहमी प्रवाही राहण्याकरिता ते द्रव स्वरूपातच असणे आवश्यक आहे. रक्तस्तंभनाकरिता आवश्यक असलेली रक्तक्लथनकारक यंत्रणा जशी सज्ज असते तशीच रक्तक्लथनरोधक यंत्रणाही रक्तात आहे. रक्तवाहिन्यांतून रक्त वाहत असताना रक्तक्लथनकारक यंत्रणा जवळजवळ निष्क्रिय असते, तर प्रतिरोधक यंत्रणा कार्यक्षम असते.

अभिसृत रक्ताचे क्लथन न होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत असतात : (१) त्यात थ्राँबीन नसते. (२) प्रोथ्राँबीन, थ्राँबोप्लॅस्टीन अक्रिय पूर्वगामी अवस्थेत असतात. (३) सर्व बिंबाणू शाबूत असतात. (४) वाहिनीचा अंतःस्तरीय पृष्ठभाग गुळगुळीत असतो. त्यावर बिंबाणू चिकटून राहू शकत नाहीत. (५) रक्तप्रवाहाची गती ठराविक असते.

अलीकडील संशोधनानुसार वाहिनीच्या अंतःस्तर कोशिका प्रोस्टासायक्लिन (इपोप्रोस्टेनॉल) नावाचा पदार्थ संश्लेषित करतात. अत्यल्प काळ टिकणारा (अर्धायुकाल २ ते ३ मिनिटे) हा पदार्थ बिंबाणूच्या समूहनास प्रतिबंध करतो, अपघटनास मदत करतो व वाहिनीचा विस्फार करतो. यामुळे थ्राँबिनाच्या निर्मितीस विरोध होतो.

खालील कारणांमुळे अंतर्क्लथन होण्याची शक्यता निर्माण होते : (१) वाहिनी भित्ती दोष : (अ) रोहिणी विलेपीविकार (रोहिणी अंतःस्तरावर लिपिडाचे थर जमून तो जाड बनणे). (आ) आघात उदा., अंतःक्षेपणाच्या सुया, प्रवेशिका (शरीरात घालावयाची नलिका) वगैरे. (इ) वाहिनी भित्तीत अर्बुदाचे अंतःस्यंदन (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली गाठ आत झिरपणे).

(२) रक्तप्रवाह दोष : (अ) कोणत्याही कारणामुळे रक्तप्रवाहाची गती मंद होऊन रक्तस्तंभन होणे. (आ) अतिश्यानता (अति दाटपणा) उदा., रक्तकोशिकाधिक्यात रक्तातील तांबड्या कोशिकांची संख्या वाढल्यामुळे त्याची श्यानता वाढते. (इ) संक्षोभ उदा., रोहिणीस पीळ पडल्यास बिंबाणू भित्तीवर ढकलले जातात.

(३) रक्त दोष : (अ) बिंबाणुआधिक्य. (आ) शस्त्रक्रियेनंतरच्या काळात व इतर कारणांमुळे रक्तक्लथनकारकांची वाढलेली सक्रियता. (इ) प्रोस्टासायक्लिनाची न्यूनता, वाहिनीक्लथन, मग ते नीलेतील किंवा रोहिणीतील असले, तरी शारीरिक विकृतीचे व मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. हृद्‌रोहिणी, मस्तिष्क रोहिणी (मेंदूला रक्तपुरवठा करणारी रोहिणी) व आंत्रबंध रोहिणी (उदरीय महारोहिणीची एक प्रमुख शाखा) यांतील अंतर्क्लथन गंभीर विकृतीस व पुष्कळ वेळा मृत्यूस कारणीभूत होते. नीलेतील अंतर्क्लथन पुष्कळ वेळा फुप्फुसातील ⇨अंतर्कीलनास कारणीभूत होऊन मृत्यू ओढवतो.

संदर्भ : 1. Berkow, R. and others, Ed., The Merck Manual of Diagnosis and Therapy, Rathway, 1982.

    2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

    3. Macleod, J., Ed., Davidson’s Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1984.

   4. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.      

भालेराव, य. त्र्यं.