हॅमस्टर : स्तनी वर्गाच्या कृंतक (रोडेंशिया) गणातील क्रिसेटिडी कुलामधील एक प्राणी. याच्या सात प्रजाती असून अठरा जाती आहेत. त्यांपैकी चार प्रजाती सर्वपरिचित आहेत. यूरोप व आशियामध्ये क्रिसेटस, आशियात व यूरोपच्या दक्षिण भागात क्रिसेट्यूलस, आशिया मायनर व बाल्कनमध्ये मेसोक्रिसेटस आणि आशियात सर्वत्र फोडोपस या प्रजातींचा प्रसार आहे. क्रिसेट्यूलस प्रजातीतील प्राणी सामान्यतः खुजा वा चिनी हॅमस्टर आणि मेसोक्रिसेटस प्रजातीतील प्राणी सिरियन हॅमस्टर या नावांनी ओळखले जातात.

 

हॅमस्टर (क्रिसेटस क्रिसेटस)हॅमस्टर हा धष्टपुष्ट शरीराचा, आखूड शेपटीचा, एकटा राहणारा व बिळात राहणारा प्राणी आहे. त्याचे कान लहान व फरयुक्त असून पाय मजबूत आणि पंजा रुंद असतो. त्याच्या अंगावरील फर मऊ असते. त्याला कपोल-कोष्ठ (गालाच्या पिशव्या) असतात. या पिशव्यांचा वापर तो अन्न साठवून बिळात वाहून नेण्यासाठी करतो. तो निशाचर प्राणी आहे. तो शाकाहारी असून फळे व भाजीपाला यांवर आपली उपजीविका करतो,परंतु त्याच्या काही प्रजाती कीटक व लहान प्राणीसुद्धा खातात. तो आपले अन्न कुरतडून खातो. हिवाळ्यामध्ये हॅमस्टराच्या काही प्रजातींमधील लठ्ठ प्राणी बिळांत काही दिवस ते अनेक आठवडे सुप्तावस्थेत जातात.

 

क्रिसेटस प्रजातीमध्ये सामान्य हॅमस्टराचा आणि मेसोक्रिसेटस प्रजातीमध्ये सोनेरी हॅमस्टराचा समावेश होतो. सामान्य हॅमस्टर हाआकाराने सर्वांत मोठा प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव क्रिसेटस क्रिसेटस असे आहे. त्याच्या शरीराची शेपटीसहित लांबी २०–३० सेंमी. असते. शेपटी लहान असून ३–६ सेंमी. असते. शरीराची वरील बाजू फिकट तपकिरी किंवा भुरी व खालील बाजू काळ्या रंगाची असून दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे असतात. त्याचे वजन २२०–४६० ग्रॅ. असून आयुर्मर्यादा२-३ वर्षे असते. तो झाडावर चढू शकत नाही, परंतु जमिनीमध्ये सज्जा व कोठी असलेली बिळे तयार करतो. त्यामध्ये अन्नधान्य साठविण्या-साठी व पिलांसाठी वेगवेगळ्या कोठ्या असतात. या कोठ्यांमध्ये तो हिवाळ्यासाठी भरपूर अन्नधान्य साठवितो. ते शेतातील पिकांची खूपनासाडी करतात.

 

सिरियन (सोनेरी) हॅमस्टर हा सामान्य हॅमस्टरपेक्षा आकारानेलहान असून त्याचे शास्त्रीय नाव मेसोक्रिसेटस ऑरॅटस असे आहे.त्याच्या शरीराची शेपटीसहित लांबी १५–२० सेंमी. असते. त्याच्या शरीरावर दाट फर असून वरील बाजू तांबूस भुरकट रंगाची व खालील बाजू करड्या रंगाची असते. त्याचे वजन १४०–२०० ग्रॅ. असून आयुर्मर्यादा २-३ वर्षे असते. तो दिसावयास आकर्षक असून सहज माणसाळविता येतो. तसेच तो स्वच्छता ठेवणारा असल्याने त्याची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.

 

क्रिसेट्यूलस प्रजातीतील खुजा वा चिनी हॅमस्टर (क्रि. बॅरॅबेन्सिस) या जातीच्या अंगावरील फर करड्या रंगाची असून पाठीवर काळा पट्टा असतो. फोडोपस प्रजातीतील पट्टेदार केसाळ पायांचा हॅमस्टर (फो. सनगोरस) ही जाती सर्वांत लहान असून तिच्या शरीराची शेपटीसहित लांबी ५–१० सेंमी., वजन १९–४५ ग्रॅ. व आयुर्मर्यादा १–३ वर्षे असते.

 

हॅमस्टराचा विणीचा हंगाम एप्रिल – ऑक्टोबर असा असतो. वर्षातून२–५ वेळा त्याची वीण होते. गर्भावधी काल १३–२२ दिवसांचा असून एकावेळी मादीला १–१३ पिले होतात. जन्माच्यावेळी ती आंधळी असून त्यांच्या अंगावर फर नसते. त्यांची वाढ झपाट्याने होते व तीन आठवड्यांत ती चालायला लागतात.

 

हॅमस्टर उग्र स्वभावाचा असून इतर कृंतक प्राणी, सरडे व लहानपक्षी यांवर तो हल्ला करतो. मांसाहारी प्राणी त्याची शिकार करतात. त्याची आयुर्मर्यादा सरासरी एक वर्ष आहे परंतु काही प्राणी जवळजवळ दोन वर्षांपर्यंत जगू शकतात.

 

हॅमस्टर हा प्रयोगशाळेतील संशोधनासाठी उपयुक्त असून सोनेरी हॅमस्टर पाळण्याच्या दृष्टीने यशस्वी झाले आहेत. १९३० मध्ये सिरियातील आलेप्पो येथे पकडलेल्या हॅमस्टराच्या एका वेतीपासून तयार झालेल्या प्राण्यांचा हिब्रू विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत प्रथम उपयोग करण्यातआला होता.

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.