कैरो : अल् काहिरा. संयुक्त अरब प्रजासत्ताकाचे मुख्य शहर व ईजिप्तची राजधानी. लोकसंख्या ४९,६१,००० (१९७० अंदाज). नाईल नदीच्या पूर्वतीरावर, त्रिभुज प्रदेशाच्या शिरोभागाच्या दक्षिणेला १९ किमी. आफ्रिका खंडातील हे सर्वांत मोठे शहर वसले आहे. जुन्या कैरोच्या जागी पूर्वी रोमन-बायझंटिन शहर बॅबिलन होते. नवव्या शतकात अहमद इब्न तुलुनने बॅबिलनजवळ अल् कटाई शहर वसविले.

नाईल नदीवरील कैरोचे एक विहंगम दृश्य

त्याजवळच दहाव्या शतकात फातिमींचा नेता जौहर अल् रूमी याने अल् काहिरा ‘विजयी’ ही नवी राजधानी वसविली. जुने अवशेष तेथे दिसतात. तेराव्या ते सोळाव्या शतकांत मामलुकांच्या कारकीर्दीत शहराचे सौंदर्य वाढले. ऑटोमन तुर्कांच्या अमदानीत कलेला गौणत्व आले. १७९८ मध्ये फ्रेंचांनी कैरो जिंकले. परंतु तुर्की व ब्रिटिश फौजांनी १८०१ मध्ये त्यांना हुसकून लावले. महमद अलीने मामलुकांची कत्तल करून आपले वर्चस्व कायम केले. १८८२ मध्ये ब्रिटिशांनी कैरो व्यापले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश मध्यपूर्व सैन्यदलाचे ते ठाणे होते. १९४६ मध्ये ब्रिटिशांनी कैरो ईजिप्शियन लष्कराच्या हाती दिले.

ह्या शहराचे हवामान कोरडे व भूमध्य सागरी आहे. पाऊस तुरळक पण फक्त हिवाळ्यात पडतो. जानेवारीत दिवसाचे सरासरी तपमान १८से. व जुलै-ऑगस्टमध्ये ३६ से. असते. डिसेंबर ते मार्च वाळवंटाकडून येणारे थंड वारे रात्री पाणी गोठवितात, तर एप्रिल-मे मध्ये खमसिन वारे तपमान ३८  से. पर्यंत नेतात. आधुनिक कैरोच्या पूर्वेस अल्-मोकात्तम ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकड्या आहेत. ह्या दोर्होमध्ये जुने कैरो शहर वसले आहे. तेथे बाराव्या शतकात सलादीनने बांधलेल्या बालेकिल्ल्यात मिसरचा सुलतान महंमद अली याने बांधलेली एक मोठी तुर्की पद्धतीची मशीद आहे. ह्या मशिदीच्या आवारात त्याची कबर आहे. ह्या चौकाच्या जवळच ९७० मध्ये आफ्रिकन फातिमींनी बांधलेली अल्-अझार मशीद असून येथे कुराण, इस्लामी कायदा व न्यायतत्त्वशास्त्र, अरबी भाषा, अरबी तत्त्वज्ञान, अरबी इतिहास ह्या विषयांच्या खास अभ्यासासाठी एक खास विद्यापीठही आहे. ह्या विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग अजूनही अझारी लोक वापरीत असत, तसा झगा व पागोटे नेहमी वापरतात.

अहमद इब्न तुलुन ही दक्षिण कैरोमधील सर्वांत प्रसिद्ध मशीद होय. कैरोच्या जवळच नाईल नदीच्या पात्रात जझिरा व रोडा ह्या नावाची दोन बेटे आहेत. ही दोन बेटे हल्ली कैरो शहराशी मोठमोठ्या पुलांनी जोडली गेल्यामुळे, ती शहराची भागच बनली आहेत. त्यांवर अनेक नव्या, जुन्या प्रसिद्ध इमारती असून, रोडा बेटावर ७१६ मध्ये बांधलेले नाईलच्या पाण्याची पातळी मोजण्याचे नाईलीमीटर आहे. कैरोमध्ये आता सिमेंट, लोखंड व पोलाद, काच, कापड, औषधे, रसायने, वाहने इत्यादींचे कारखाने सुरू झाले आहेत. कातडी, तंबाखू, अन्नप्रक्रिया, पेट्रोलियम उद्योग, बांधकाम, चित्रपट असे अनेकविध व्यवसाय सुरू झाले आहेत. यांशिवाय शैक्षणिक, शासकीय, वैद्यकीय, तांत्रिक, वैज्ञानिक इ. व्यवसायांत हजारो लोक गुंतलेले आहेत. ज्ञानार्जनाच्या बाबतीत अखिल अरब जगतात कैरो हे एक अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र समजले जाते. अल्-अझारशिवाय गीझा येथील कैरो विश्वविद्यालय व ऐन शम्स विद्यापीठ अशी दोन राष्ट्रीय विश्वविद्यालये व १९१९ मध्ये स्थापलेले अमेरिकन विद्यापीठ आहे. अनेक विद्या व कालाकेंद्रांनी आणि सांस्कृतिक संस्थांनी कैरो गजबजलेले आहे. इस्लामप्रमाणेच ख्रिस्ती, यहुदी धार्मिक केंद्रेही येथे आहेत.

१८५५ मध्ये मिसरमध्येच नव्हे, तर अखंड आफ्रिकेतील पहिला लोहमार्ग कैरो व ॲलेक्झांड्रिया यांच्या दरम्यान सुरू झाला. कैरो हे सुएझ, पोर्ट सैद, इस्मेइलीया, सोखना, फायूम, माज्आडी वगैरे ठिकाणांशीही लोहमार्गांनी व रस्त्यांनी जोडण्यात आले आहे. कैरोचा आंतरराष्ट्रीय विमानतळ कैरोपासून सु. २६ किमी. आहे. फळे, भाजीपाला व इतर व्यापारी मालाची बहुतेक वाहतूक नाईलमधून होते.

कैरो शहरात अनेक विस्तीर्ण चौक व आधुनिक इमारती आहेत. प्रशस्त रस्त्यांवरून मोटारी, बसगाड्या व पादचारी यांची गर्दी असते. जुन्या भागात अरुंद रस्त्यांच्या दुतर्फा गालिचे, कपडे इत्यादींची दुकाने खच्चून भरलेली असतात व रस्त्याने रोटी आणि पेये विकणारे फेरीवाले दिसतात. ताहरीर चौकातील परराष्ट्र कचेरी, अरब लीगची इमारत, नाईल हिल्टन हॉटेल, नवीन नगरपालिकाभवन, ईजिप्शियन वस्तुसंग्रहालय, कैरो टॉवर इ. आधुनिक इमारती, रॅमसीझ चौकातील रॅमसीझचा भव्य प्राचीन पुतळा, नाईलच्या काठाने गेलेला कॉर्निस रोड, जुन्या शहरातील मशिर्दीचे उंच मनोरे व घुमट, दाटीवाटीची घरे, राजवाडे, उपनगरातील प्रशस्त उद्याने, क्रीडांगणे, रुग्णालये या सर्वांची पार्श्वभूमी शोभणारी नाईल नदी व तिच्यावरील डौलदार शिडाच्या नौका, लांबवर प्राचीन गूढ वातावरणात गुरफटलेले व वाळवंटात उभे असलेले पिरॅमिड, या सर्वांमुळे कैरोचे संमिश्र गूढरम्य दृश्य आपल्या मनावर खोल ठसा उमटवून जाते.

लिमये, दि. ह.