शेनॉल्ट, क्लेअरली : (६ सप्टेंबर १८९० – २७ जुलै १९५८). अमेरिकेच्या हवाईदलातील प्रसिद्ध बिगेडियर जनरल. त्याचा जन्म टेक्सस प्रांतातील कॉमर्स ह्या गावी झाला. कॉमर्स येथे शिक्षण घेऊन त्याने अध्यापन-व्यवसाय अंगीकारला. पहिल्या महायुद्धाच्या (१९१४ – १९) काळात तो अमेरिकेच्या भूसेनेत दाखल झाला. राखीव पायदळात त्याला बढती (कमिशन) मिळाली (१९१७). पुढे त्याने वैमानिक दलात प्रवेश मिळविला (१९१९). युद्ध चालू असताना हवाई पाठलाग करण्याचे डावपेच त्याने आत्मसात केले. पुढे हवाई बेटातील लढाऊ विमानांच्या तुकडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तीन वर्षे त्याच्यावर सोपविण्यात आली. १९३५ मध्ये मॅक्सवेल फील्ड (ॲलाबॅमा) येथील लष्करी विमानतळावर प्रमुख प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली. आपल्या द रोल ऑफ डिफेन्सिव्ह पर्‌स्यूट (१९३५) या पुस्तकात त्याने लढाऊ वैमानिकांचे कार्य व महत्त्व विशद केले आहे. बाँबफेकी विमानांना संरक्षण लागत नाही, या तत्त्वासही त्याने छेद दिला.

किंचित बहिरेपणामुळे त्याला निवृत्त व्हावे लागले (१९३७). पुढे चिनी शासनाचा सल्लागार म्हणून त्याची नेमणूक झाली. अमेरिकेतून विमाने मागवून त्याने चीन मध्ये एक छोटे हवाईदल तयार केले.चीनमध्ये वैमानिकांची उणीव भासताच त्याने अमेरिकन वैमानिक आणून हे दल सजविले. त्याला ‘ फ्लाइंग टायगर्स ’ म्हणतात. त्याच्या साहाय्याने जनरल ली याने प्रयोग करून सिद्ध करून दिले की, बाँबर व फायटर यांच्या सहकार्याने एक नवीन हवाई युद्धतंत्र निर्माण होऊ शकते.

अमेरिकन भूदलाने त्यास परत बोलाविले (१९४२) व त्याला चीनमधील अमेरिकन हवाई युद्धाचे प्रमुख नेमले. या पदावरून तो २५ जुलै १९४५ रोजी सेवानिवृत्त झाला आणि पुन्हा चीनला गेला (१९४६).तेथे त्याने जनरल चँग-कै-शेककरिता मुलकी हवाई वाहतुकीची उभारणी करून ती १९५८ पर्यंत चालविली. चीनच्या वास्तव्यात ॲना या महिलेशी त्याचा परिचय झाला आणि ते विवाहबद्ध झाले. दोघेही अखेरपर्यंत चँग-कै-शेकचे समर्थक होते. द रोल ऑफ डिफेन्सिव्ह पर्‌स्यूट हे लीचे पुस्तक विमानविद्येचे पाठय्पुस्तक म्हणून गाजले. अल्पशा आजाराने त्याचे न्यू ऑर्लीअन्स येथे निधन झाले.

ॲना शेनॉल्टने १९६३ मध्ये त्याच्या आठवणी लिहिल्या.

संदर्भ : Scott, Robert L. Flying Tiger: Chennault of China, New York, 1973.

पित्रे, का. ग.