फुजीवारा – नो – तेइका : (११६२-१२४१). जपानचा श्रेष्ठ कवी, काव्यसंकलक आणि समीक्षक. फुजीवारा ह्या जपानमधील प्रख्यात सरदारकुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या जन्मस्थानासंबंधीची माहिती उपलब्ध नाही. राजदरबारी ह्या कुटुंबाचे मोठे प्रस्थ होते. तेइकाचे वडील फुजीवारा-नो शून्‌झेई (१११४- १२०४) हेही जपानी काव्याचे एक प्रसिद्ध संकलक. राजाश्रयाखाली निघालेल्या जपानी काव्यसंकलनांपैकी सातवे संकलन त्यांनी केले होते. सेंझाइशू (सु. ११८८, इं. शी. कलेक्शन ऑफ अ थाउझंड यीअर्स) हे त्या संकलनाचे नाव. त्यानंतरच्या आठव्या आणि नवव्या अशा दोन काव्यसंकलनांच्या संपादनात तेइकाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. अनुक्रमे शिन्‌ कोकिन्‌ वाका शू (सु. १२०५, इं. शी. न्यू कलेक्शन ऑफ एन्शंट अँड मॉडर्न टाइम्स) आणि शिन्‌चोक्‌-सन्‌शु (इं. शी. न्यू इंपीरिअल कलेक्शन) ही ती दोन काव्यसंकलने होत. ह्यांखेरीज त्याने केलेले ह्याकुनीन्‌ इश्शू (इं. शी. वन पोएम फ्रॉम ईच ऑफ अ हंड्रेड पोएट्‌स) हे एक काव्यसंकलनही प्रसिद्ध आहे. काव्यचर्चेसाठी तेइकाने ‘काव्यसंग्रह मार्गदर्शक’ (मराठी शीर्षकार्थ) ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथावर नंतरच्या अनेक टीकाकारांनी भाष्ये लिहिलेली आहेत.

तेइकाच्या स्वतःच्या कविता ‘वाका’ (तांका असेही म्हणतात) ह्या जपानी भावकविताप्रकारात मोडतात. अपार्थिव सौंदर्यांच्या ध्यासाची प्रचीती त्यांतून अनेकदा येते. ह्या कवितांची रचना संकुल आणि गुंतागुंतीची असून काव्यतंत्राचे सूक्ष्‍म भान त्यांतून प्रत्ययास येते. परंतु पुढे उत्कट भावनाशीलतेचा आणि साध्या, सुंदर रचनेचा तो पुरस्कर्ता बनला. जपानी साहित्यावर तेइकाच्या साहित्यविषयक मतांचा एवढा मोठा प्रभाव पडला, की त्याने घालून दिलेल्या साहित्यशास्त्रीय नियमांचे उल्लंघन करण्याचे धाडस त्याच्या नंतरच्या काळातही कुणी केले नाही. तथापि त्यामुळेच तेराव्या शतकानंतर जपानी काव्यात तोचतोचपणा येऊन त्यातील नावीन्य नाहीसे झाले.

तेईकाला मिळालेली वाङ्‌मयीन कीर्ती लक्षात घेऊन जपानच्या राजदरबारी त्याला सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘शोगून’चा (जपानी पंतप्रधान) साहित्यशास्त्रगुरू म्हणूनही त्याची नेमणूक झाली होती. तेइकाचा मृत्यू कोठे झाला, ह्यासंबंधीची माहिती उपलब्ध नाही.

देशिंगकर, गि. द.