लुइझिॲना : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी दक्षिण-मध्य भागातील एक राज्य. हे मेक्सिको आखाताच्या वायव्य किनाऱ्यावर मिसिसिपी नदीच्या मुखाशी वसले आहे. याची लोकसंख्या ४२,०६,३१२ (१९८०) ४४,६०,५७८ (१९८७ अंदाज) असून बॅटनरूझ हे राजधानीचे शहर (२,४२,१८४:१९८७) आहे. याच्या उत्तरेला आर्कॅन्सॉ, पूर्वेला मिसिसिपी राज्य व मेक्सिको आखात, दक्षिणेस मेक्सिको आखात आणि पश्र्चिमेला टेक्सस ही राज्ये येतात. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २९ ते ३३ उत्तर आणि ८९ ते ९४ पश्र्चिम यांदरम्यान. क्षेत्रफळ १,२३,६७७ चौ किमी., यांपैकी ८,३६६ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांखाली उबदार व ओलसर हवामान आणि नद्यांनी सिंचित केलेले क्षेत्र यांमुळे लुइझिॲना हे सोयाबीन, भात, कापूस, ऊस, रताळी यांसारख्या शेतमाल-उत्पादनांत महत्त्वाचे राज्य ठरले आहे राज्यातील वनसंपदा तसेच खनिज तेल, वायू, गंधक, मीठ, इत्यादींचे समृद्ध साठे यांच्यायोगे राज्यातील विविध उद्योगांकरिता कच्चा माल व साधनसामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. न्यू ऑर्लीअन्स या राज्याच्या प्रमुख बंदरातून मिसिसिपी व मेक्सिकोचे आखात हे जलवाहतुकीचे व्यापारमार्ग आहेत. 

भूवर्णन : राज्याचे विभाजन दोन प्रमुख विभागांत करता येईल: (१) पूर्व व पश्र्चिम आखातांचा किनारी उच्च भूमिप्रदेश व (२) जलोढीय (गाळाचा) भूमिप्रदेश-मिसिसिपी जलोढीय मैदानी प्रदेश (हा मिसिसिपी नदी व तिच्या उपनद्या यांच्या किनारी भागात आढळून येतो.) सबंध लुइझिॲना राज्य म्हणजे किनारी मैदानाचाच एक भाग समजण्यात येतो. उच्च भूमिप्रदेश सखल भाग व लाटीव डोंगराचे बनलेले असून राज्यातील ड्रिस्कल मौंटन (सस. पासून १६३ मी.) हे सर्वांत उंच शिखर समजले जाते. मिसिसिपी नदीमुळे उच्च भूमिप्रदेशाचे पूर्व विभाग (पूर्वीय आखाती किनारी मैदानी प्रदेश)-याच्या दक्षिणेला व पश्र्चिमेला अनुक्रमे पाँचरट्रेन सरोवर व पूर्व मिसिसिपी नदी आणि पश्र्चिम विभाग (पश्र्चिम आखाती किनारी मैदानी प्रदेश) असे दोन भाग बनले आहेत. पूर्वीय आखाती किनारी मैदानी प्रदेशातील ‘पर्ल’ ही प्रमुख नदी असून तीच लुइझिॲना-मिसिसिपी य राज्यांच्या सरहद्दीचा एक भाग बनली आहे. पश्र्चिम आखाती किनारी मैदानावरील ‘रेड’ व ‘वॉशिटॉ’ या मिसिसिपीच्या उपनद्या आणि अचॅफालाइआ, कॅलकशू आणि सॅबीन या प्रमुख नद्या आहेत. सॅबीन नदीमुळे लूइझिॲना-टेक्सस या राज्यांची सरहद्द बनली आहे. 

मिसिसिपी जलोढीय मैदानी प्रदेश (सखल प्रदेशांचा मध्य विभाग) हा मिसिसिपी नदीच्या मुखापर्यंत पट्ट्याच्या स्वरूपात पसरत गेला आहे. न्यू ऑर्लीअन्सच्या खाली मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश लागतो. याच्या पश्चिम भागात किनाऱ्यालगतच पाच घुमटाकारी ‘बेटे’ आजूबाजूंच्या दलदली प्रदेशांतून वर डोकावताना दिसतात. ही बेटे म्हणजे भूपृष्ठावर दृश्यमान होणारे भूमिगत स्वरूपातील सैंधवाचे निरपेक्षच होत.

दक्षिण लुइझिॲनामध्ये पाँचरट्रेन (सर्वांत मोठे), सॅबीन, कॅलकशू, मोरपा व सॅल्व्हॅडॉर ही मचूळ पाण्याची सरोवरे आहेत. रेड व तिच्या उपनद्या यांच्यापासून कॅडो, कॅटहूला, बिस्ट्नो ही गोड्या पाण्याची सरोवरे निर्माण झाली आहेत. टोलिडो बेंड रेझरव्हॉर हा मोठ्या आकाराचा मानवनिर्मित जलाशय सॅबीन नदीवर असून त्याचा लुइझिॲना व टेक्सस या दोन राज्यांसाठी वापर होतो. 

हवामान : लुइझिॲनाचे हवामान आर्द्र, उपोष्ण कटिबंधीय असून वर्षभर पडणारा मुबलक पर्जन्य तसेच उबदार उन्हाळे व सौम्य हिवाळे अशी येथील हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. दक्षिण लुइझिॲनाचे सरासरी तानमान १३ से. (जानेवारी) ते २८ से. (ऑगस्ट) असे असते. न्यु ऑर्लीअन्स येथे प्रतिवर्षी सरासरी १,१४० मिमी. पर्जन्यप्रमाण आहे. या भागातील शेतीच्या दृष्टीने लागवडकाल सरासरीने २२० दिवस असा धरला जातो. 

मृदा : लुइझिॲना उच्चभूमिप्रदेशातील वळ्याच्या पर्वतराजीतील मृदा तसेच अवसादी (गाळाच्या) खडकांपासून बनलेल्या मृदा पोषक मूल्याच्या दृष्टीने हिणकस होत आहेत. नेर्ॠत्य लुइझिॲनामध्ये चिकणमातीच्या मृदा आणि दुमट मृदा विशेष प्रमाणात आढळतात. या प्रकारच्या मृदा भातपिकाला अप्रतिम आहेत. अत्यंत सुपीक जलोढीय मृदा नद्या व प्रवाह यांच्या तीरप्रदेशात विशेषत्वाने आढळत असून त्यांचा वापर प्रामुख्याने कपास शेतीसाठी होतो. 

वनस्पती व प्राणी : अझेलिआ, कॅमीलिआ, चिनाई मेंदी, रेडबड इ. फुलझाडे या प्रदेशात विपूल प्रमाणात आढळतात. आयरिस वनस्पतीच्या अनेक जाती दक्षिण लुइझिॲनामध्ये आहेत. मॅग्नोलिया(कवठी चाफा) वनस्पती मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडे उगवलेली आढळते. तिच्या विपुलतेमुळे लुईझिॲनाला ‘मॅग्नोलिया राज्य’ असेही संबोधण्यात येते. स्पॅनिश शेवाळे जलप्रवाहांच्या कडेला वाढणारे सुरू व ओक वृक्ष यांच्या फांद्यांवर वाढते. दलदलींच्या प्रदेशांकडे जाताना वाटेत रानटी वेताची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून कठीण वृक्षांच्या व पाइन वृक्षांच्या अरण्यांमध्ये बुटके ताडवृक्ष विपुलतेने वाढलेले आढळतात.  

राज्यातील प्राण्यांची संख्या आणि वैविध्य यांमुळे लुईझिॲनाला कित्येकदा ‘शिकाऱ्यांचे नंदनवन’ असेही संबोधले जाते. श्‍वेतपुच्छाची हरणे सबंध राज्यभर, तर काळी अस्वले बव्हंशी दलदल प्रदेशांतील अरण्यांत सापडतात. लहान स्तनी प्राण्यांपैकी ऑपॉस्सम, रॅकून, ऊद, मांजर, स्कंक, वीझल, चिचुंद्री, पाणथळ हरिण हे प्राणी प्रकर्षाने पाणथळ प्रदेशात, तर ससा, मोल, करड्या रंगाचा कोल्हा हे प्राणी विशेषेकरून उच्चभूमिप्रदेशात राहतात. सरीसृप प्राण्यांपैकी सुसर वा मगर हे पाच मी. लांबीपर्यंत आढळतात. प्रवालसर्प, कॉपरहेड, खडखड्या साप, केनब्रेक साप ह्याच कायत्या विषारी सापांच्या जाती राज्यात आहेत. 

उपोष्ण कटिबंधीय हवामान आणि अनुकूल भौगोलिक स्थान या दोही गोष्टींमुळे लुईझिॲना राज्यात विविध प्रकारचे पक्षी विपुलतेने दिसून येतात. टर्की, बदक, हंस, लावा, कबूतर हे शिकारीचे पक्षी तसेच श्‍वेत आयबिस, ईग्रेट, मार्टिन यांशिवाय निळे बगळे, निळे हंसपक्षी, विविध बदके हे हिवाळी पक्षी मोठ्या संख्येने आहेत. वर्षभर आढळणाऱ्या पक्ष्यांत विरळ केसांचे गरूड, किलडिअर, हसणारे कुरव, गाणारा पक्षी, नीलकंठ, काळी मैना, पाण्यावरून उडणारे पक्षी (ब्लॅक स्किमर) यांचा समावेश होतो.  

राज्यातील नद्या, कालवे, लघुप्रवाह (बेयूज), मेक्सिकोचे आखात इत्यादींमधून मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांना तसेच मासेमारीचा व जलक्रिडेचा आनंद मिळविणाऱ्या प्रवाशांना विपुल व विविध प्रकारचे मासे पकडता येतात. त्यांमध्ये कोळंबी, मेनहॅडन, ऑयस्टर (ही सर्व खाऱ्या पाण्यातील) असून गोड्या पाण्यातील माशांमध्ये क्रॉफिश, कॅटफिश व बुलहेड यांचा अंतर्भाव होतो. क्रीओल लोकांच्या आहारात पाँपॅनो रेडफिश, रेड स्नॅपर, ठिपक्यांचा ट्राउट, खेकडे इत्यादींचा समावेश असतो. 

जंगलसंपत्ती : राज्यातील पाइन, सायप्रस, ओक, ट्यूपेलो ही बिनलागवडीची वृक्षवने तोडण्यात आली असूनही सु. ५६ लक्ष हेक्टर क्षेत्र (किंवा राज्यातील एकूण क्षेत्रापैकी सु. निम्मे क्षेत्र) वनाच्छादित आहे. पाइनवृक्ष ही राज्यातील, सर्वांत मौल्यवान जंगलसंपत्ती आहे.दलदलीच्या प्रदेशात सायप्रस वृक्ष वाढलेले आहेत निम्न भूमिप्रदेशात स्लॅशपाइन, स्वीटगम व ट्यूपेलोगम या वृक्षांची अरण्ये आढळतात.उच्च भूमिप्रदेशात हिकरी, आखूड व लांब पानांचे पाइन, भूर्ज, ओक वृक्ष विपुल प्रमाणात वाढलेले आहेत.


खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या साठ्यांच्या बाबतीत लुईझिॲना राज्य देशातील अग्रेसर राज्यांमध्ये मोडते. सैंधवाचे मोठे निक्षेप राज्याच्या किनारी भागात आहेत. यांशिवाय गंधक, वाळू व सिलिका, चुनखडी व चिनी माती यांचे व्यापारी उत्पादन होऊ शकेल इतपत साठे आहेत.  

इतिहास व राजकीय स्थिती : यूरोपीयांनी जेव्हा प्रथम लुईझिॲना राज्यात प्रवेश केला, तेव्हा तेथे सु. १५,००० इंडियन राहत होते. कॅडो ट्युनिका, आटाकापा, नॅचेझ, मस्कोगी आणि चिडमॅश या सहा प्रमुख गटांमध्ये त्यांचा अंतर्भाव होत होता. सु. १५१० पूर्वी लुइझिॲना राज्याच्या किनारी भागात स्पॅनिश समन्वेषक गेले असावेत. आलोंसो हे पिनेदा (१५१९), आल्व्हार न्यूनेझ काबेझा दे वाका (१५३०) आणि एरनांदो दे सोतोच्या मोहिमेतील उत्तरजीवी लोंकानी १५४३ मध्ये मिसिसिपीच्या उगमाकडील भागापर्यंत अन्वेषण केले असावे, असे मानले जाते. हे क्षेत्र १६८० पर्यंत वसाहतीकरणाला दूर्लक्षित असेच राहिले. फ्रेंचांना मिसिसिपी खोरे हे ब्रिटिश व स्पॅनिश आक्रमणांना अडसर त्याचप्रमाणे संपत्तीचा स्त्रोत असे वाटले. १६८२ मध्ये रेने-रॉबेर काव्हल्ये, स्यूर द ला साल या फ्रेंच समन्वेषकाने मेक्सिकोच्या आखातापर्यंत मिसिसिपी नदीचे समन्वेषण केले, समन्विष्ट भूमी फ्रान्सची म्हणून घोषित केली त्याचप्रमाणे फ्रान्सचा राजा चौदावा लूई याच्या सन्मानार्थ या भूमीला लुइझिॲना असे नाव दिले. १६८४ मध्ये ला सालने मिसिसिपीच्या उगमाजवळ फ्रेंच वसाहत स्थापण्याचा अयशस्वी प्रयत्न केला नदीचा शोध न लागल्यामुळे त्याने मॅटॅगॉर्ड उपसागराजवळच्या भागात सेंट लूई हा किल्ला उभारला. हे क्षेत्र म्हणजेच सांप्रतचे टेक्सस राज्य होय. 

प्येर ल म्वान या फ्रेंच समन्वेषकाने १६९९ मध्ये सांप्रतच्या बिलक्सी (मिसिसिपी राज्य) गावाजवळ एक वसाहत स्थापिली. १७१० पर्यंत अशाच प्रकारच्या लहानमोठ्या वसाहती मोबील बे, मोबील (ॲलाबॅमा राज्य), डॉफिन आयलंड  (मिसिसिपी राज्य) या ठिकाणी उभारण्यात आल्या, हीच लुइझिॲना राज्यातील स्थायी स्वरूपाची वसाहत यथार्थपणे मानावी लागेल. १७१२-१७ यांदरम्यान लुइझिॲनावर आंत्वान क्रोझॅट याने मालकी हक्क प्रस्थापित केले होते, कारण त्याने फ्रेंच राजसत्तेकडून या प्रदेशातील व्यापारी हक्क संपादिले होते. तथापि १७३२ मध्ये लूइझिॲना ही शाही वसाहत म्हणून घोषित करण्यात आली. सु. अर्ध्या शतकाच्या काळापर्यंत या वसाहतीमध्ये झां बातीस्त ल म्वान (ब्यांव्हील) हा मुख्य प्रवर्तक म्हणून काम पहात होता. हा १६९९ मध्ये या ठिकाणी पहिल्या वसाहतकऱ्यांबरोबर आला आणि १७४३ मध्ये येथून वसाहत सोडून गेला. ‘लूइझिॲनाचा जनक’ हे बिरूद दिले गेलेल्या ब्यांव्हीलने काही काळ येथील वसाहत प्रदेशाचा गव्हर्नर वा कार्यकारी गव्हर्नर तसेच सल्लागार म्हणूनही काम पाहिले. १७१८ मध्ये त्याने फिलिप-ड्यूक डी ऑर्लीअन्स याच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ न्यू ऑर्लीअन्स ह्या गावाची स्थापना केली १७२२ मध्ये ते लूइझिॲनाचे राजधानीचे शहर बनले. पुढे फ्रेंच व इंडियन यांच्यामधील सप्तवर्षीय युद्धसमात्पीनंतर फाँतनब्लोच्या तहान्वये (१७६२) लूइझिॲना हे स्पॅनिशांच्या आधिपत्याखाली गेले. मात्र मिसिसिपीच्या उत्तरेकडील लुइझिॲनाचा सर्व भूप्रदेश हा पॅरिस तहानुसार (१७६३) ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली गेला. डॉन आंतोन्यो दे ऊल्योआ या पहिल्या स्पॅनिश गव्हर्नरला बंडकरी फ्रेंच वसाहतवाल्यांनी १७६८ मध्ये हुसकावून लावले. पुढल्याच वर्षी कॅप्टन जनरल डॉन अलेक्झांडर ओ-रायली याच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश सैन्यपथकाने बंडकरी फ्रेंच वसाहतवाल्यांच्या पाच नेत्यांना फाशी दिले व इतरांना कारावासात टाकले. तथापि नंतरच्या डॉन लूई दे ऊंझागा यी ॲमाझागा या गव्हर्नरच्या व त्याच्यानंतर आलेल्या गव्हर्नरांच्या काळात स्पेनने फ्रेंच वसाहतकऱ्यांबरोबर समेट-धोरण अवलंबिले. अमेरिकन राज्य-क्रांतिकाळात, ग्रेट ब्रिटनविरोधी युद्धात स्पेन सहभागी झाला (१७७९), डॉन बेर्नार्दो दे गाल्बेथ या गव्हर्नराच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश सैन्याने प्रथम बॅटनरूझ (१७७९), व नंतर प. फ्लॉरिडामधील ब्रिटिश ठाणी काबीज केली. पिंकनी तहानुसार (१७९५) मिसिसिपी नदीतून जलवाहतूक तसेच वाहनांतरणाकरिता न्यू ऑर्लीअन्स बंदरात माल उतरविण्याची मुभा असे दोन्ही हक्क अमेरिकेला मिळाले. लुइझिॲनावर फ्रेंचांचे नियंत्रण असताना या वसाहतीमध्ये बाहेरून जर्मन, स्विस व इतर अनेक गट प्रविष्ट झाले स्पॅनिशांच्या आधिपत्यकाळात काही स्पॅनिश व कानेरी द्वीपवासी लोक आले. अर्थातच अकेडियाहून (सांप्रतचा नोव्हास्कोशा प्रांत) आलेल्या फ्रेंच वसाहतकऱ्यांचे (केजन लोक) प्रमाण सर्वाधिक होते. जुन्या फ्रेंच व स्पॅनिश वसाहतकऱ्यांच्यावंशजांना ‘क्रीओल’-यूरोपीय पूर्वजांचे वारस-असे नाव पडले. अमेरिकन राज्यक्रांतीनंतर इंग्रज व अमेरिकन निर्वासितांचा मोठी जथा या वसाहतीत गेला. १७१२ च्या सुमारास वसाहतीत सु. २० कृष्णवर्णीय गुलाम होते. 

फ्रेंचांचा लुइझिॲनावर अंमल असताना ओहोयओ व मिसिसिपी ही दोन्ही खोरी तसेच मिसिसिपी नदीचे पूर्व व पश्र्चिम अशा दोन्ही दिशांकडील मेक्सिको आखाती किनारी प्रदेश यांचा त्या जुन्या प्रांतामध्ये अंतर्भाव होत होता. अशा वेळी लुइझिॲनाचे प्रथमच १७६२ मध्ये विभाजन करण्यात आले. स्पॅनिशांना मिसिसिपीच्या पश्र्चिमेकडील प्रदेश, तर ब्रिटिशांना पूर्वेकडील प्रदेश व स्पॅनिश फ्लॉरिडा हे भाग मिळाले (१७६३). सम्राट नेपोलियन बोनापार्टचे आशियातील फ्रेंच साम्राज्याच्या उभारणीचे स्वप्न भंगल्यानंतर, त्याने वसाहतीचे साम्राज्य स्थापनेच्या उद्देशाने आपले लक्ष अमेरिकेकडे वळविले. फ्रेंच रिपब्लिकचा पहिला कौन्सल या नात्याने नेपोलियनने सान इल्दफान्सोच्या गुप्त तहान्वये (१८००) स्पेनला लुइझिॲना प्रदेश पुन्हा फ्रान्सकडे सुपूर्द करण्यास भाग पाडले.  

अमेरिकन खंडात उदय पावणाऱ्या नवीन फ्रेंच साम्राज्याला शह देण्यासाठी ‘अमेरिकेपुढे ब्रिटिश काफिला व देश यांच्याशी सोयरीक बांधण्यावाचून अन्य पर्याय उरलेला नाही’ अशा आशयाचे पत्र अमेरिकन अध्यक्ष टॉमस जेफर्सन (कार. १८०१-०८) याने पॅरीसस्थित अमेरिकन मंत्री रॉबर्ट आर्. लिव्हिंगस्टन यास लिहिले. तथापि ब्रिटिश राजदूतीय आधार मिळविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न व्यर्थ ठरला. अखेरीस सबंध लुइझिॲना प्रांत अमेरिकेस विकण्याचा नेपोलियन बोनापार्टचा जो मनोदय होता, त्याच्या पाठीशी इंग्लंडशी पुनश्र्च युद्ध खेळावे लागेल, हे एक, द्रव्याची आत्यंतिक निकड हे दुसरे आणि हैतीची फसलेली मोहीम हे तिसरे कारण, अशी सर्व कारणे नेपोलियनाच्या लुइझिॲना अमेरिकेस विकत देण्यामागे होती. अर्थातच या व्यवहारातील नेपोलियनचा अतिमहत्त्वाचा हेतू म्हणजे अमेरिकेला इंग्लंडचा प्रतिस्पर्धी म्हणून अधिक मजबूत आणि सामर्थ्यवान करणे, हा होता. 


म्हणूनच १८०३ मध्ये फ्रान्सने सबंध लुइझिॲना प्रांत अमेरिकेला १.५ कोटी डॉलरांना विकला. त्यायोगे मिसिसिपी नदीपासून मेक्सिको आखातापर्यंतचा विस्तीर्ण भूप्रदेश अमेरिकेला मिळाला. एका अर्थाने लुइझिॲना खरेदी उपक्रमामुळे अमेरिकेचा खंडपार विकास (ट्रान्सकाँटिनेंटल डिव्हलपमेंट) साध्य होऊ शकला. अनुक्रमे ग्रेट ब्रिटन (१८१८) व स्पेन या दोन राष्ट्रांशी करण्यात आलेल्या तहान्वये अमेरिकेस हा विस्तीर्ण भूप्रदेश मिळण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या खरेदीमुळे अमेरिकेसारख्या नवीन उदयास आलेल्या प्रजासत्ताकाच्या प्रगतिपथावरील फ्रान्सचा अडसर दूर होऊ शकला. ३० एप्रिल १८१२ रोजी अमेरिकन संघराज्यात लुइझिॲना राज्याचा समावेश करण्यात आला. सी. सी. क्लेबॉर्न ह्याला राज्याचा पहिला गव्हर्नर नेमण्यात आला. ॲडम्स-ओनिस तहान्वये (१८१९) अमेरिकेने स्पेनकडून फ्लॉरिडाचा उर्वरित प्रदेश संपादन केला, तसेच लूइझिॲना राज्याच्या पश्र्चिम सरहद्दी निश्र्चित करण्यात आल्या. यादवी युद्धापर्यंत इंग्रजी व फ्रेंच अशा दोन्ही राजभाषा मानण्यात येत होत्या. १८४८ मध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हिग पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेला झॅकरी टेलर हा लुइझिॲनिअन होता. मिसिसिपी व तिच्या उपनद्या यांमधून होणाऱ्या जलवाहतुकीच्या योगे परदेशांशी निर्यात व्यापार तसेच खंडांतर्गत सुदूर भागांशी अंतर्गत व्यापार ह्या गोष्टी शक्य झाल्या. यामुळे न्यू ऑर्लीअन्स बंदराचा सम्यक् विकास होत जाऊन ते बंदर म्हणजे सबंध मिसिसिपी खोऱ्याचा प्रमुख निर्गममार्ग ठरला. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धकात कापूस-लागवडीचाराज्याच्या उत्तर भागात जलद विकास होत गेला. २१ मार्च १८६१ रोजी लुइझिॲना राज्य दक्षिणी राज्यांच्या ‘कॉन्फेडरेटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ या संघराज्यात सामील झाले. लुइझिॲना राज्याच्या १८६८ साली करण्यात आलेल्या नवीन संविधानानुसार राज्यातील कृष्ण-वर्णियांना प्रथमच मतदानाचा हक्क (अधिकार) प्राप्त झाला व हे राज्य संघराज्यात सामील करून घेण्यात आले. पूर्वीच्या संघराज्यीय सैन्यातील एक अधिकारी हेन्री क्ले वॉरमॉथ याला राज्याचा गव्हर्नर करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाने हे राज्यशासन पुढे आठ वर्षे चालविले. या काळात रिपब्लिकनांमधील दुफळी तसेच शासकीय नियंत्रणाला श्र्वेतवर्णियांकडून होत असलेला प्रचंड विरोध यांमुळे राज्याचे राजकारण अतिशय वादळी ठरले. त्याचाच परिपाक ‘कू क्लक्स क्लॅन’ व ‘नाइट्स ऑफ द व्हाइट कॅमीलिआ’ यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या अतिरेकी कारवायांत प्रकट झाला. भ्रष्टाचार व अव्यवस्था यांचा विस्तृत प्रमाणावर फैलाव झालेला असला, तरी रिपब्लिकन सरकारने विद्यानिकेतन व्यवस्थेचे पुनर्संघटन व विस्तार कार्यक्रम तसेच सार्वजनिक इमारती, रस्ते, पूल, पूरतट यांची पुनर्रचना यांसारखे विधायक कार्यक्रम पार पाडले. यानंतरच्या काळात (१८७३-१९८०) राज्याला डेमॉक्रॅट गव्हर्नर लाभले. अमेरिकेच्या यादवी युद्धसमाप्तीनंतरच्या काळात (१८६७-७७) संघराज्याची पुनर्रचना व पुन:संघटना झाली. पुनर्रचनेच्या कालखंडानंतर कापसाच्या पिकाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली, तर साखर उद्योगाला ही स्थिती प्राप्त करावयास १८९३ साल उजाडावे लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अंतिम चतुर्थकात भात हे या भागातील लोकांचे प्रमुख शेती उत्पन्न म्हणून गणले जाऊ लागले. इमारती लाकूड-काप उद्योगानेही या काळात चांगला जोर धरला. एकोणिसाव्या शतकाच्या अंतिम टप्प्यात, अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले त्यांच्या योगे भावी आर्थिक विकासाचा दृढ पायाच रचण्यात आला. मिसिसिपी नदीच्या उगमापाशी तिच्या खाडीचे पात्र अधिक खोल करण्यात आले. यामुळे जहाजवाहतूक व रेल्वेमार्गांचा विस्तार शक्य झाला. नदीवर अनेक पूरतट बांधण्यात आले. केंद्र शासनाच्या साहाय्याने अनेक पूरनियंत्रण प्रकल्प कार्यवाहीत आणण्यात आले. पीतज्वर नियंत्रित करण्यात यश मिळाले. हे शतक संपत असतानाच लुइझिॲना राज्यात आधुनिक उद्योग स्थापण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येते. १८९१ मध्ये हरमन फ्राश याने खाणीतून गंधक-उत्पादनाचे नवीन तंत्र शोधून काढले. १९०१ मध्ये स्टँडर्ड ऑइल ऑफ लुइझिॲना या कंपनीने बॅटनरूझ येथे जगातील सर्वात मोठे खनिज तेल परिष्करणकेंद्र उभारले. राज्यातील गंधक, खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या साधनसामग्रीवर आधारित असा रसायन उद्योग मिसिसिपी नदीकाठी न्यू ऑर्लीअन्स व बॅटनरूझ यांदरम्यान विस्तारला. राज्याच्या उत्तर भागात कागद उद्योगाने लक्षणीय विकास-झेप घेतली. दुसऱ्या महायुद्धकाळात आणि नंतर यांसारख्या उद्योगांची वेगाने वाढ होत गेली. आर्थिक बदल व कृष्णवर्णियांसाठी नागरी हक्कप्रदान यांमुळे लुइझिॲना राज्याला दुसऱ्या महायुद्धानंतर महत्त्वपूर्ण राजकीय बदल अनुभवावयास मिळाले. राज्याने १९५२, १९६० व १९७६ या निवडणूक वर्षांतील अध्यक्षीय निवडणुकांत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला आपली मते देऊ केली राज्याची निर्वाचक मते राईट डेमॉक्रॅटिक उमेदवाराला १९४८ मध्ये मिळाली तर १९५६, १९६४, १९७२, १९८० आणि १९८४ या निवडणुकांत ती रिपब्लिकन उमेदवारांना लाभली. फक्त १९६८ मध्यील निवडणुकीत ही मते जॉर्ज वॉलेसच्या अमेरिकन इंडिपेंडंट पार्टी या पक्षास प्राप्त झाली. तथापि राज्य व स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवरील राजकारणात डेमॉक्रॅटिक पक्ष हा प्रभावी ठरला. १९७२ च्या निवडणुकीमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर रिपब्लिकन पक्षाचा मोठाप्रभाव असूनही, एड्विन डब्ल्लू. एडवर्ड्स हा गव्हर्नरपदावर निवडून आला. त्यायोगे दक्षिणेकडील वाढत्या  औद्योगिकीकरणाचा प्रभाव स्पष्ट झाला. त्याच्या कारकीर्दीत (१९७२-८० व पुन्हा १९८४-८८) राज्याचे १९२१ मधील संविधान बदलण्यात येऊन सुटसुटीत करण्यात आले (१९७४). त्याच्यानंतर डेव्हिड सी. ट्रीन हा संघराज्याच्या पुनर्रचनेनंतरच्या (१८७३-७७ नंतर) काळातील पहिला रिपब्लिकन गव्हर्नर झाला (१९८०). १९८८ मध्ये चार्ल्स इ. रोमर हा डेमॉक्रॅटिक गव्हर्नर म्हणून निवडण्यात आला.

फ्रान्स व स्पेन या दोन्ही देशांच्या सत्ताधाऱ्यांनी लुइझिॲनावर अनुक्रमे गव्हर्नर व वरिष्ठ परिषद आणि गव्हर्नर व ग्रामपरिषद यांमार्फत निरंकुश सत्ता गाजविली. त्यांनी प्रस्थापित केलेला दिवाणी विधी (कायदा) हा रोमन संहितांपासून बनविलेला व देशविधीपेक्षा संविधीवर आधारित असा होता. लुइझिॲना खरेदीनंतर जेव्हा अमेरिकन सत्ता लुइझिॲनावर प्रस्थापित झाली, तेव्हापासून मताधिकार व पदभारकाल या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन लोकशाही संरचनात्मक कार्यपद्धती प्रशासनात रूळण्यास सुरुवात झाली. तथापि, रोमन विधी हा पाया (आधार) धरण्यात येऊन दिवाणी संहितांचे जतन व संवर्धन करण्यात आले. १८२४ मध्ये लुइझिॲनाने दिवाणी संहितांचा वापर चालू करण्यास प्रारंभ केल्यामुळे देशात सर्वत्र देशविधीचा वापर चालू असताना लुइझिॲनाचे स्थान मात्र इतर सर्व राज्यांच्या तुलनेत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण राहिले. १८१२ मध्ये राज्यदर्जा प्राप्त झाल्यानंतर पहिले संविधान बनविण्यात आले, ते १९७४ मध्ये अकराव्यांदा बदलण्यात आले. या नव्या संविधानामध्ये न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचे निवडणुकीने प्रत्यावाहन करण्याचे अधिकार विधानमंडळाला देण्यात आलेले आहेत. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील निर्वाचित प्रतिनिधींपैकी दोनतृतीयांश संख्येने व मतदारांच्या बहुमताने संविधान दुरूस्ती संमत करता येते. शासनाच्या कार्यकारी मंडळात गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर, राज्यसचिव, अटर्नी जनरल, कोषाध्यक्ष, कृषी, विमा, निर्वाचन यांचा प्रत्येकी एक आयुक्त व शिक्षण अधीक्षक असे नऊ अधिकारी असून प्रत्येकाला चार वर्षांसाठी निवडून दिलेले असते. गव्हर्नर हा जास्तीतजास्त आठ वर्षे (सलग दोन वेळा) त्या पदावर राहू शकतो. विनियोजन विधेयकाबाबत गव्हर्नरला नकाराधिकार वापरता येतो. त्याचा नकाराधिकार विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहातील दोन-तृतीयांश निर्वाचित सदस्यांना एकमताने फेटाळता येऊ शकतो. अनुक्रमे ३५ व १०५ निर्वाचित सदस्य असलेली राज्यविधान मंडळाची सीनेट व लोकप्रतिनिधिगृह अशी दोन गृहे असून प्रत्येक निर्वाचित सदस्याची मुदत चार वर्षांकरीता असते. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दोन्ही गृहांचे कामकाज सुरू होते व ते ८५ कॅलेंडर दिवसांपैकी ६० दिवस चालते. गव्हर्नरच्या अनुमतीने किंवा प्रत्येक गृहातील बहुमतवाल्या पक्षाच्या लेखी अर्जाने विशेष अधिवेशने आमंत्रित करता येतात. राज्यातून काँग्रेसवर दोन सीनेटर व आठ प्रतिनिधी निवडून दिले जातात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे ६४ परगण्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.


राज्याच्या न्यायशाखेत एक सर्वोच्च न्यायालय, चार अपील न्यायालये, तिसांवर जिल्हा न्यायालयेआणि ऑर्लीअन्स परगण्यासाठी प्रत्येकी एक दिवाणी व फौजदारी जिल्हा न्यायालय आहे. यांशिवाय राज्यात अनेक प्रकारची लघुन्यायालये असून त्यांत बाल, कुटुंब, महापौर, जस्टिस ऑफ द पीस यांसारख्या न्यायालयांचा अंतर्भाव होतो. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश व सहा सहयोगी न्यायाधीश दहा वर्षांकरिता निवडण्यात आलेले असतात.  

आर्थिक स्थिती : खनिज तेल, नैसर्गिक वायू, गंधक, व मीठ यांचे व्यापारी स्वरूपात उत्पादन ही राज्यातील सर्वांत महत्त्वाची आर्थिक क्रिया होय. या खनिजांचे एकूण उत्पादनमूल्य निर्मिति-उद्योगांकडून केल्या जाणाऱ्या उत्पादनमूल्यापेक्षा कितीतरी जास्त असते. रसायननिर्मिती, खनिज तेल परिष्करण, खाद्यान्न प्रक्रिया, धातूजोडकाम उद्योग या उद्योगांपासून प्रामुख्याने उत्पन्न मिळते. जहाजबांधणी, कागद उत्पादने, इमारती लाकूड उत्पादनतसेच लाकडी वस्तूउद्योग हे रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानण्यात येतात.  

कृषी : सोयाबीन, कापूस, ऊसव भात ही प्रमुख कृषिउत्पादने असून दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस यांकरिता गाईगुरांचे सुयोग्य प्रकारे संवर्धन करणे या गोष्टी कृषिउद्योगात अंतर्भूत होतात. १९८६ मध्ये राज्यात सु. ३६,००० शेते होती. सरासरीने एक शेत साधारणतः ११२.५ हे. एवढे होते. १९८५ मध्ये राज्यात ८९,९१० दूध देणाऱ्या गाई १२ लक्ष गाईगुरे, २५,१०४ मेंढ्या व १,३३,३४९ डुकरे होती. १९८६ मधील राज्यातील एकूण मच्छीमारी १७० कोटी पौंड एवढी झाली. सोयाबीन हे राज्यातील प्रमुख पीक समजले जाते. १९६१-६५ च्या दरम्यान त्याचे उत्पादन प्रतिवर्षी सरासरी ७७.४२ लक्ष बूशेल एवढे होत असे. १९८३ च्या सुमारास हेच उत्पादन ६८१.२० लक्ष बुशेल एवढे झाले. याच वर्षी कापूस उत्पादनाच्या बाबतीत या राज्याचा देशात पाचवा क्रमांक आला. यादवी युद्धकाळापासून राज्यात ऊस-उत्पादनास लक्षणीय प्रारंभ झाल्याचे दिसून येते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात, या राज्यात भातपिकास अधिक महत्त्व आले. १९८३ मध्ये लुइझिॲनाचा भात उत्पादनात सर्व राज्यांत तिसरा क्रमांक आला. रताळी-उत्पादनात राज्य आघाडीवर आहे. पेरिक तंबाखू (प्येर चेनेनामक अमेरिकन तंबाखू-उत्पादकाने ही तंबाखू प्रथम प्रसृत केली) आणि टॅबॅस्को काळी मिरी या दोन विशेष पिकांसाठी लुइझिॲना राज्य खासकरून सुविख्यात आहे.  

खनिज संपत्ती : खनिज उत्पादनाच्या बाबतीत लुइझिॲनाचा सबंध देशात टेक्सस राज्यानंतर दुसरा क्रम लागतो. लुइझिॲनाचा मीठ उत्पादनात देशात पहिला (१९८६ मधील उत्पादन ११६ लक्ष शॉर्ट टन), नैसर्गिक वायू व गंधक यांच्या उत्पादनात टेक्सस राज्यानंतर दुसरा व खनिज तेल उत्पादनात टेक्सस व अलास्का या राज्यांनंतर तिसरा क्रमांक लागतो. १९८७ मध्यील राज्याचे खनिज तेल उत्पादन १,४४० लक्ष बॅरल होते. त्याच वर्षी नैसर्गिक वायूचे उत्पादन सु. ४४,५३,७६८ कोटी घ. मी. झाले. राज्यात समृद्ध गंधक-खाणी सापडल्या असून १९८६ मधील त्याचे उत्पादन ५.२४ लक्ष टन झाले.  

निर्मिति-उद्योग : खनिजतेल, रसायने, लाकूड ओंडके, अन्नप्रक्रिया, सरबते, कागद हेच राज्यातील प्रमुख निर्मिति-उद्योग होत. दुसऱ्या महायुद्धामुळे खनिज तेल उत्पादन, रसायने व खते तसेच खाद्यान्ने व ॲल्यूमिनियम  यांची संयंत्रे उभारणे या उद्योगांस मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. १९३९ ते १९८२ या काळात औद्योगिक कामगारांची संख्या सु. ८०,००० वरून २,००,००० वर गेली. १९८७ मध्ये निर्मिति-उद्योगांत १,६७,६०० व्यापारात ३,६८,५०० तर सेवा उद्योगांत ३,२७,२०० लोक गुंतलेले होते. निर्मिति-उद्योगांकडून मिळणारे उत्पन्न २० कोटी डॉलरवरून १८० कोटी डॉलरवर गेले. राज्यातील औद्योगिक संयंत्रांची उभारणी बॅटनरूझपासून न्यू ऑर्लीअन्स क्षेत्रांत मिसिसिपी नदीच्या काठाने होत गेल्याचे आढळते. लेक चार्लस्, श्रीव्हपोर्ट, मन्रो या भागांतही विविध उद्योगांची स्थापना झाली. लेक चार्लस्च्या क्षेत्रात तसेच बॅटनरूझ व न्यू ऑर्लीअन्स या शहरांत खनिज तेल परिष्करणउद्योग, तसेच रसायने, ॲल्यूमिनियम व खते यांची संयंत्रे उभारण्यात आली. राज्याच्या दक्षिण भागात पाक (सिरप) उत्पादनाचे उद्योग व कारखाने आणि साखर परिष्करण उद्योग एकवटलेले आहेत. नैर्ॠत्य लुइझिॲनामध्ये भात सडण्याच्यागिरण्या मुबलक प्रमाणात आहेत. न्यू ऑर्लीअन्स हे राज्यातील निर्मिति-उद्योगांचे मोठे क्षेत्र समजले जाते. राज्यातील २५% रोजगार या भागात उपलब्ध होतात. शहरामध्ये ॲव्हनडेल शिपयार्डस् हा प्रचंड जहाज निर्मिति-कारखाना तसेच विमानाच्या तुटलेल्या भागांची जुळणी करणारा मोठा कारखाना आहे.  

मासेमारी : गोड्या पाण्याचे प्रवाह, तसेच किनारी भागातील खारट प्रवाह आणि उपसागर यांमधून माशांचे अनेक प्रकार उपलब्ध होतात. मेक्सिकोच्या आखातावरील कॅमरन या बंदरातून १९८३ मध्ये सर्वाधिक मासे पकडण्यात आले. (३,७२,००० शॉर्ट टन) त्याच वर्षीच्या सर्वाधिक मासे पकडण्यात आलेल्या प्रमुख बंदरांमध्ये एंपायर, व्हेनिसया मिसिसिपी त्रिभुज प्रदेशातील तसेच ड्यूलॅक, शोव्हिन या बॉद्रो सरोवरावरील बंदरांचा समावेश होता. १९८६ मधील राज्यातील एकूण मासे उत्पादन १७० कोटी पौंड (३,२१५ लक्ष डॉलर किंमतीचे) एवढे झाले.  

विद्युत्उत्पादन : १९८४ च्या सुमारास राज्याची विद्युत्निर्मितिक्षमता १५६ लक्ष किवॉ. एवढी होती. १९८५ मध्ये टॅफ्ट येथे अधुशक्ति-संयंत्रापासून विजेचे व्यापारी स्वरूपात उत्पादन सुरू झाले, तर सेंट फ्रॅन्सिसव्हिल येथे दुसरे अणुशक्ति संयंत्र कार्यान्वित करण्यात आले.  

जंगलसंपत्ती : राज्यातील एकूण क्षेत्रफळाच्या ४९% क्षेत्र (५६,२५,१०० हे.) जंगलव्याप्त आहे. प्रतिवर्षी लाकूड उद्योगापासून सु. २५,००० लक्ष डॉ. एवढे उत्पन्न प्राप्त होते. १९८६ मध्ये लाकडाच्या लगद्याचे उत्पादन ५१ लक्ष कॉर्ड, तर इमारती (कापीव) लाकूड उत्पादन सु. १५,००० लक्ष बिल्डिंग फूट इतके उत्पादन झाले.  

व्यापार व अर्थकारण : देशातील व्यापार उलाढालींबाबत अग्रेसर बंदरांपैकी दोन बंदरे लुइझिॲना राज्यात आहेत. १९८३ मध्ये एकूण माल हाताळणीमध्ये न्यू ऑर्लीअन्स व बॅटनरूझ या बंदरांचा अनुक्रमे पहीला व पाचवा क्रम लागला. लेक चार्लस् या तिसऱ्या बंदरातून तांदूळ, तेले, खनिज तेलपदार्थ यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.  

वाहतूक : मिसिसिपी नदी म्हणजे एक महत्त्वाचा व्यापारी दुवा आणि जलमार्ग समजला जातो. मिसिसिपी व इतर नदीमार्गांतून सु. १२,०६७ किमी. जलवाहतूक उपलब्ध होते. लोहोमार्गबांधणीला १८३४ मध्ये प्रारंभ झाला, परंतु बहुतेक सर्व मार्ग १८८०-१९१० यांदरम्यान बांधण्यात आले आहेत. महामार्गांच्या विकासाबरोबर लोहमार्गांचे महत्त्व कमी झाले. १९८६ मध्ये राज्यात ५,३८५ किमी. लांबीचे लोहमार्ग वापरात होते. १९८३ मध्ये राज्यात सु. १,१२,००० किमी. लांबीचे रस्ते होते. ऑक्टोबर १९८८ पर्यंत राज्यात ४० लक्षांवर वाहने नोंदविण्यात आली होती. न्यू ऑर्लीअन्स, बॅटनरूझ, व्हिडालिया व डेल्टा या शहरांपाशी मिसिसिपी नदीवर प्रचंड पूल बांधण्यात आले आहेत. न्यू ऑर्लीअन्स व सेंट टॅमानी यांना जोडणारा पूल हा जगातील सर्वांत लांब अशा पुलांपैकी (सु. ३८.३ किमी.) एक मानला जातो.


लोक व समाजजीवन : सार्वजनिक शाळांमधून चालत आलेले वांशिक पृथक्वासन हे असांवैधानिक असल्याचा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने १९५४ मध्ये अधिनिर्णय देऊनही लुइझिॲना राज्याने गौरवर्णीय व कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या शाळा कार्यवाहीत ठेवण्याचे आपले धोरण पुढे राबविले. १९७० पासून सर्व सार्वजनिक शाळांमध्ये वांशिक पृथक्वासन पद्धती बंद करण्याचा न्यायालयीन आदेश जारी करण्यात आला. असे असूनही १९८०-८१ मध्ये राज्यातील सु. ३७ टक्के कृष्णवर्णीय विद्यार्थी गौरवर्णीय विद्यार्थ्यांचे आधिक्य असलेल्या शाळांत उपस्थित राहू शकले.

विद्यापीठीय विद्वत्सभा मंडळामार्फत सार्वजनिक साहाय्यित अशा तीन प्रकारच्या उच्च शिक्षणपद्धती राज्यात कार्यान्वित करण्यात येतात राज्याने प्रसृत केलेल्या १९१५ च्या एका कायद्यान्वये वयाच्या सातव्या वर्षापासून ते पंधराव्या वर्षापर्यंत शालेय उपस्थिती ही प्रत्येकास सक्तीची असते. १९८६-८७ मध्ये सार्वजनिक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८,०४,६४५ व शिक्षक संख्या ४२,०१९ एवढी होती. चार वर्षांचे उच्च शिक्षण देणारी १७ सार्वजनिक महाविद्यालये व विद्यापीठे, तर ११ खासगी उच्च शिक्षण संस्था होत्या (१९९०-९१). यांशिवाय व्यापार, धंदेशिक्षण व तंत्रशिक्षण देणाऱ्या ४७ सरकारी शाळा आहेत. १९८७ मध्ये राज्यातील पाच विद्यापीठांमधून ७६,८५२ एवढी विद्यार्थिसंख्या होती. राज्यातील अनेक शहरांमधून कर-साहाय्यित ग्रंथालये चालविण्यात येतात. न्यू ऑर्लीअन्स सार्वजनिक ग्रंथालय (१८४३) हे राज्यातील सर्वांत मोठे ग्रंथालय आहे. अनेक परगण्यांमार्फत सार्वजनिक ग्रंथालये व ग्रामीण भागांसाठी फिरती ग्रंथसेवा उपलब्ध केली जाते.  

रोमन कॅथलिक चर्च हा राज्यातील सर्वांत मोठा संप्रदाय, तर सदर्न बॅप्टिस्ट व मेथडिस्ट हे प्रमुख प्रॉटेस्टंट चर्च संप्रदाय आहेत. १९३० पासून राज्याच्या ह्यूई पिअर्स लाँग (१८९३-१९३५) ह्या गव्हर्नरच्या प्रभावामुळे सबंध राज्यभर निर्धनसाहाय्य पद्धतीचा प्रारंभ करण्यात आला. तेव्हापासून राज्याने प्रगत सार्वजनिक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. वार्धक्य, वैद्यकीय मदत, कुटुंबांना (अवलंबित मुलांसह) तसेच विकलांग व गरजू अंध व्यक्तींना साहाय्य यांसारख्या कार्यक्रमांसाठी राज्यशासनाने १९८४ मध्ये सु. १०० कोटी डॉ. खर्च केले. १९८८ मध्ये राज्यात अनुज्ञप्तिपात्र १८६ रुग्णालये व तीन शासकीय मनोरुग्णालये होती. 

न्यू ऑर्लीअन्समधील ली मॉनिल्यूर दे ला लुइझिॲन हे राज्यातील १७९४ मध्ये चालू झालेले पहिले वृत्तपत्र होय. १९८२ मध्ये राज्यात २५ दैनिके व १६ साप्ताहिके होती. टाइम्स पिकॅयून अँड स्टेट्स आइटेम (न्यू ऑर्लीअन्स) हे सर्वाधिक खपाचे दैनिक आहे.१९२२ पासून राज्यात नभोवाणी केंद्रे न्यू ऑर्लीअन्स व श्रीव्हपोर्ट येथे, तर पहिले दूरचित्रवाणीकेंद्र १९४८ मध्ये कार्यान्वित झाले. १९८५ मध्ये राज्यात १८० नभोवाणी केंद्रे व १९ दूरचित्रवाणी केंद्रे होती.  

वॅटनरूझ (मानवशास्त्र), न्यू ऑर्लीअन्स (रेड इंडियननिर्मित वस्तू, निसर्गेतिहास व राज्येतिहास), श्रीव्हपोर्ट (नैसर्गिक साधनसंपत्ती व राज्याने साधलेली भौतिक प्रगती) मॅन्सफील्ड (यादवी युद्धविषयक) व सेंट फ्रन्सिसव्हिल (जॉन जेम्स् ऑडबॉन-निसर्गवैज्ञानिक व कलाकार यांच्या कलाकृती) येथील संग्रहालयांची व्यवस्था शासनामार्फत पाहिली जाते. इतर संग्रहालयांमध्ये ‘ग्राइंडस्टोन ब्लफ’ (श्रीव्हपोर्ट-पुरातत्वविद्या), ‘आर्ट सेंटर फॉर साउथवेस्टर्न लुइझिॲना’ (लाफायेत-अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांतील राज्यकलाकारांच्या कलाकृती), ‘न्यू ऑर्लीअन्स कलासंग्रहालय’ (महत्वाच्या यूरोपीय, अमेरिकन व लॅटिन अमेरिकन कलाकृती) ही सुविख्यात गणली जातात. लुइझिॲना हिस्टॉरिकल असोसिएशन ही संस्था ‘कॉन्फेडरेट म्यूझीयम’ हे संग्रहालय चालविते व लुइझिॲना हिस्टरी हे त्रैमासिक प्रकाशित करते. यांशिवाय मोठ्या शहरांतील लघुरंगभूमिविषयक संस्था विविध नाट्यप्रयोग व कलाप्रयोग, तर विविध वाद्यंवृंद नवनवीन संगीतिका सादर करतात. केजन लोकनृत्ये, लोकसाहित्य व कलाकृतीही सादर केल्या जातात.  

राज्याची १ एप्रिल १९८० रोजी ४२,०५,००० एवढी लोकसंख्या होती. १९८७ मध्ये ती अंदाजे ४४,६०,५७८ झाली. १९८६ मध्ये जनांकिकीविषयक इतर आकडेवारी अशी होती : जन्म ७७,९४४, दरहजारी १७.३ मृत्यू ३६,२८७, दरहजारी ८.१ बालमृत्यू ९२५, दरहजारी ११.९ विवाह ३७,४५९ घटस्फोट १५,१६४. 

महत्वाची स्थळे : राज्यातील मोठी शहरे पुढीलप्रमाणे (लोकसंख्या-१९८७). न्यू ऑर्लीअन्स ५,५५,६४१ बॅटनरूझ (राजधानी) २,४२,१८४ श्रीव्हपोर्ट २,१७,७१८ लाफायेत ९१,०८४ लेक चार्ल्स ७६,५९९ केनर ७४,८५१. 

अवर्णनीय सृष्टिसौंदर्यामुळे आकृष्ट होऊन लक्षावधी पर्यटक प्रतिवर्षी लुइझिॲना राज्याला भेट देतात. यादवी युद्धकाळापूर्वी बांधलेल्या श्र्वेतस्तंभयुक्त भव्य हवेल्या जुन्या दक्षिणी राज्यांचे नेतृत्व लुइझिॲनाने केल्याची स्मृती जागवितात याउलट खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या विहिरी अर्वाचीन औद्योगिक लुइझिॲनाची समृद्धी प्रकट करतात. १९६० च्या पुढील काळात लुइझिॲना हे राज्य अवकाशसंशोधनातील महत्त्वपूर्ण औद्योगिक केंद्र गणण्यात येऊ लागले. किनारी भागात मोठ्या प्रमाणात वसती करणाऱ्या तपकिरी पाणकोळ्यांमुळे लुइझिॲनाला ‘पेलिकन स्टेट’, तर राज्यातील सरोवरे व नद्या यांच्या संथगतिप्रवाहांमुळे या राज्याला ‘बेयु स्टेट’ असेही संबोधण्यात येते.  

न्यू ऑर्लीअन्सजवळील ‘झा लाफिक राष्ट्रीय ऐतिहासिक उपवन’ हे न्यू ऑर्लीअन्स लढाईच्या स्मृतीस उजाळा देते ‘लाँगफेलो इव्हँजेलाई’ हे उपवन सुविख्यात इंग्रज कवी लाँगफेलो याच्या इव्हँजेलाइन या काव्याची स्मृती जागविते. यांशिवाय राज्यात ‘फेअर व्ह्यू रिव्हरसाइड’, ‘लेक ब्रूइन’ यांसारखी अनेक रम्य उपवने असून ती मत्स्यक्रीडा, जलक्रीडा, नौकाविहार, सहलस्थाने अशा विविध सुविधांनी संपन्न आहेत. मृगया व मासेमारी यांसाठी राज्यात अनेक स्थाने प्रसिद्ध आहेत. 

लुइझिॲना राज्य अनेक वार्षिकोत्सवांकरिता प्रसिद्ध आहे. त्यांपैकी सर्वांत जुना व सुविख्यात असा न्यू ऑर्लीअन्समधील ‘मार्दी ग्रा’ हा उत्सव होय. चित्रविचित्र वेशभूषेने सजलेल्या मिरवणुका, विविधरंगी चलदृश्ये व नृत्ये यांचा हा कार्यक्रम प्रतिवर्षी सहा जानेवारीस सुरू होतो व लेंटच्या पहिल्या दिवशी समाप्त होतो. न्यू ऑर्लीअन्समधीलच इतर वार्षिक उत्सवांमध्ये नववर्षारंभीचा ‘शुगर बाउल फुटबॉल खेळ’, एप्रिलमधील वसंतोत्सव (स्प्रिंग फिएस्टा), डिसेंबरमधील हिवाळी क्रीडा उत्सव यांचा समावेश होतो. मॉर्गन सिटीमधील सप्टेंबर महिन्यातील कोळंबी उत्सव (श्रिंप फेस्टिव्हल), न्यू आयबेरियातील सप्टेंबरचा ऊस उत्सव, ऑक्टोबरमध्ये साजरे केले जाणारे क्रुली येथील आंतरराष्ट्रीय भात उत्सव, ओपलऊस येथील सुरण उत्सव, श्रीव्हपोर्टचा लुइझिॲना राज्य उत्सव हेही महत्वाचे उत्सव गणले जातात.  

गद्रे, वि. रा.