फायफर (पफायफर), रिखार्ट फ्रीड्रिख योहान : (२७ मार्च १८५८-? १९४५). जर्मन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ. ⇨ इन्फ्ल्यूएंझा या रोगास कारणीभूत समजल्या जाणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या शोधावरून त्या सूक्ष्मजंतूंना त्यांच्या नावावरून ‘फायफर सूक्ष्मजंतू’ असे नाव देण्यात आले. या रोगात हे सूक्ष्मजंतू नेहमी आढळत असल्यामुळे काही काळपर्यंत ते या रोगास कारणीभूत असल्याचा समज रूढ होता. १९३३ मध्ये इन्फ्ल्यूएंझा व्हायरसामुळे होतो हे सिद्ध झाले.

त्यांचा जन्म पोलंडमधील झ्दूनी येथे झाला. १८७९-८९ या काळात ते लष्करी शस्त्रक्रियाविशारद म्हणून काम करीत होते. १८८७ – ९१ मध्ये सुप्रसिद्ध सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख यांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. बर्लिन येथील इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शस डिसीझेस या संस्थेचे प्रमुख म्हणून १८९१ मध्ये फायफर यांची नेमणूक झाली. १८९९ मध्ये कोनिग्झबर्ग येथील इन्स्टिट्यूट ऑफ हायजिन या संस्थेचे ते प्रमुख झाले.

इन्फ्ल्यूएंझा प्रतिबंधक लस शोधण्याकरिता फायफर यांनी बरेच संशोधन केले. सूक्ष्मजंतुशास्त्रातील एका महत्त्वाच्या आविष्काराला ‘फायफर आविष्कार किंवा प्रतिक्रिया’ असे नाव देण्यात आले आहे. ही प्रतिक्रिया पटकीचे (कॉलऱ्याचे) अस्तित्व ठरविण्याकरिता उपयुक्त आहे. फायफर यांच्या यासंबंधीच्या प्रयोगाची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे : पटकीचे सूक्ष्मजंतू प्रतिरक्षित (ज्यामध्ये रोगप्रतिकारक्षमता उत्पन्न झालेली आहे अशा) प्राण्याच्या उदा., गिनीपिगच्या पर्युदर गुहेत [→ पर्युदर] अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) सोडल्यास ते पूर्णपणे बदलतात व नाश पावतात. प्रतिरक्षाविरहित प्राण्यात हाच प्रयोग करतेवेळी दुसऱ्या प्रतिरक्षित प्राण्याच्या रक्तरसाचे त्याच वेळी अंतःषेपण केले, तरीही वरीलप्रमाणेच सूक्ष्मजंतू नाश पावतात. पहिल्या प्राण्यात असलेली प्रतिरक्षा ‘सक्रिय’ व दुसऱ्या प्राण्यातील प्रतिरक्षा ‘परकृत’ म्हणतात. रोगोत्पादक सूक्ष्मजंतू प्रयोगशालीय प्राण्याच्या पर्युदर गुहेत वाढत्या मात्रेने टोचल्यास कालांतराने त्यामध्ये त्या विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधी प्रतिरक्षा उत्पन्न होते. [→ रोगप्रतिकारक्षमता].

फायफर यांनी स्वच्छताविज्ञान व सूक्ष्मजंतुशास्त्र या विषयांवर ग्रंथ लिहिले. ते कोठे व नक्की कोणत्या तारखेस मरण पावले यांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

भालेराव, य. त्र्यं.