बोईथिअस : (सु. ४८०-५२४). रोमन विद्वान, तत्त्वज्ञ, ईश्वरविद्यावंत आणि मुत्सद्दी. संपूर्ण नाव अनिशिअस मॅन्‌लिअस सेव्हरायनस बोईथिअस. रोममध्ये एका उच्च व प्राचीन अशा सरदार कुळात जन्मला. अथेन्स किंवा अलेक्झांड्रिया येथे त्याचे शिक्षण झाले असावे. ग्रीक भाषा आणि तत्त्वज्ञान ह्यांचा उत्तम अभ्यास त्याने केला होता. धर्मांने तो खिस्ती होता. ऑस्ट्रोगॉथ सम्राट थीओडोरिक द ग्रेट (४५४ ? – ५२६) ह्याच्या तो सेवेत होता. त्याने ५१० मध्ये बोईथिअची कॉन्सल (रोममधील एक सन्माननीय पद) म्हणून नेमणूक केली होती. तथापि ५२३ च्या सुमारास, बोईथिअस हा आपली सत्ता उलथून पाडावयाच्या कटात सहभागी असल्याचा संशय थीओडोरिकला आल्यामुळे त्याने बोईथिअसला पाव्हिआ येथे तुरुंगात टाकले. तेथेच त्याला देहान्ताची सजा देण्यात आली. तुरुंगवासाच्या काळात त्याने De Consolatione Philosophiae (इं. शी. ऑन द कन्सोलेशन ऑफ फिलॉसफी) हा त्याचा विख्यात ग्रंथ लिहिला.

‘ऑन द कन्सोलेशन ऑफ फिलॉसफी’ ह्या ग्रंथाचे पाच खंड असून तो गद्यपद्यात्मक आहे. तेरा विविध छंदांत रचलेल्या ३९ सुंदर कविता ह्या ग्रंथात आहेत. आपल्यावर अन्याय झाला आपण केलेल्या सेवेची फेड सम्राटाने कृतघ्नपणे केली, ही बोईथिअसची भावना त्याने ह्या ग्रंथात आरंभीच व्यक्तविली आहे. तथापि आपल्या दुःस्थितीबद्दल हळहळणाऱ्या बोईथिअसच्या समोर, तत्त्वज्ञान एका सुंदर स्त्रीच्या रुपाने येऊन उभे राहते व त्याचे सांत्वन करते. सॉक्रेटीससारख्या थोर विचारवंतांनाही यातना भोगाव्या लागल्या, ह्याचे स्मरण ही स्त्री त्याला करून देते. सत्ता, संपत्ती, मानसन्मान ह्या साऱ्या गोष्टी व्यर्थ असून नियतीची लहर केव्हा फिरेल हे सांगता येत नाही, हेही ती त्याला सांगते. थोर, दयावंत परमेश्वर अस्तित्वात असताना? ह्या जगात अन्याय कसा होतो आणि दुष्ट शक्तींना शिक्षा कशी होत नाही, असा प्रश्न बोईथिअस तिला विचारतो. त्यावर तत्त्वज्ञान त्याला सांगते, की अन्याय घडत असले, तरी ‘अत्युच्च शिव’ (समम बोनम, इं. अर्थ, द हायेस्ट गुड) हेच ह्या विश्वाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करीत असते भाग्य आणि दुर्भाग्य ही दोन्ही ईश्वरी अनुसंधानाच्या तुलनेत कनिष्ठच आहेत आणि न्यायान्यायाचा देखावा वरवर काहीही दिसत असला, तरी सद्‌गुणांची कदर ही होतेच.

बोईथिअस हा खिस्ती असला, तरी त्याचा हा ग्रंथ खिस्ती धर्माच्या दृष्टिकोणातून लिहिलेला नसून तत्त्वज्ञानात्मक आहे. प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा त्याच्यावरील प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. मात्र ह्या ग्रंथातील तात्त्विक विचार खिस्ती धर्मविचारांशी विसंगत वाटत नाहीत, ही बाब लक्षणीय आहे.

मध्ययुगात ह्या ग्रंथाला फार मोठा वाचकवर्ग मिळाला आणि प्लेटोचा तत्त्वविचार त्या काळात ह्या ग्रंथाद्वारे प्रसृत झाला. आज ह्या ग्रंथाची सु. ४०० हस्तलिखिते उपलब्ध आहेत. यूरोपीय देशी भाषांतून त्याचे अनुवाद होत गेले. प्राचीन इंग्रजी गद्याचा उदय ज्याच्या कारकीर्दीत झाला, त्या राजा, ॲल्फ्रेडने (८४९-९०१) ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला. ह्या ग्रंथाच्या अन्य इंग्रजी अनुवादांत चॉसर (चौदावे शतक) आणि इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ (सोळावे शतक) ह्यांनी केलेल्या अनुवादांचा अंतर्भाव होतो. झां द म्यून (तेरावे शतक) आणि नोटकर लॅबिओ (९५२ ? – १०२२) ह्यांनी ह्या ग्रंथाचा अनुक्रमे फ्रेंच व जर्मन अनुवाद केला आहे.

ॲरिस्टॉटल व प्लेटो ह्या दोन ग्रीक तत्त्ववेत्यांचे सर्व लेखन लॅटिन भाषेत अनुवादून ह्या दोघांच्या विचारांचा समन्वय करण्याचा बोईथिअसचा संकल्प होता. ॲरिस्टॉटलकृत ‘ऑन इंटरप्रिटेशन्स’ (इं. शी.) व ‘कॅटेगरीज’ (इं. शी.) ह्या दोन ग्रंथांपुरताच हा संकल्प सिध्दीला गेल्याचे दिसते. पॉर्फिरी (सु. २३४ – सु. ३०५) ह्या ग्रीक तत्त्वज्ञाने ॲरिस्टॉटलकृत ‘कॅटेगरीज’ ह्या ग्रंथावर केलेल्या भाष्याचा अनुवादही बोईथिअसने केलेला आहे व त्यावर स्वतःचे भाष्य लिहिले आहे. ह्यांखेरीज खिस्ती धर्म, अंकगणित, संगीत, भूमिती ह्या विषयांवरही त्याने लेखन केले. खगोलशास्त्रावर त्याचे लेखन उपलब्ध नाही परंतु त्याही विषयावर त्याने लिहिले असावे, असा काही अभ्यासकांचा तर्क आहे.

खिस्ती धर्मसिद्धांतांवर बोईथिअसने पाच विवेचक ग्रंथ (ट्रॅक्ट्‌स) लिहिले. ते लिहिताना त्याने ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्रीय पद्धतीचा आणि परिभाषेचा वापर केला, हे त्याचे वैशिष्ट्य होय. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान आणि खिस्ती धर्मश्रद्धेत अंतर्भूत असलेले सिद्धांत ह्यांच्यात समन्वय साधू पाहणाऱ्या ⇨ सेंट टॉमस अक्वाय्‌नस (तेरावे शतक) सारख्या स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञांचा बोईथिअस हा पूर्वसूरी गणला जातो, तो ह्यामुळेच. अक्वाय्‌नसच्या सुमा थिऑलॉजिया ह्या ग्रंथात बोईथिअसच्या विचारांचे उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत.

संदर्भ : 1. Barrett, H. M. Boethius : Some Aspects of His Times and Work, New York, 1940. 2. Hadas, Moses, A History of Latin Literature, New York, 1964.

कुलकर्णी, अ. र.