अधिवृद्धि : कोशिका (सजीवाच्या शरीराचा सूक्ष्म घटक), ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) किंवा एखादे अंतस्त्य (शरीराच्या आतील भागातील इंद्रिय) यांच्या आकारमानात वयोमानाने होणाऱ्या वाढीशी संबंध नसणारी व प्राकृतिक (स्वाभाविक) क्रियाक्षमता वाढविणारी वाढ झाली म्हणजे अधिवृद्धी झाली असे म्हणतात. ही वाढ कुठल्याही प्रकारच्या क्षोभकावाचून झालेली व केवळ क्रियाक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने झालेली असावी लागते. अन्यथा त्या वाढीला ‘अधिवृद्धी’ म्हणत नाहीत. कोशिका अथवा ऊतक यांच्या संख्येतील वाढीचाही अधिवृद्धीत समावेश होत नाही. अशा वृद्धीला ‘संख्यावृद्धी’ म्हणतात. संख्यावृद्धी सामान्यत: बाह्य क्षोभकामुळे होते व त्या वाढीची मर्या दाही निश्चित नसते. अशा वाढीची क्वचित अर्बुदातही (कोशिकांच्या प्रमाणाबाहेरील वाढीमुळे झालेल्या व शरीरास निरुपयोगी असलेल्या गाठीतही) परिणती होणे संभवनीय असते.

अधिवृद्धीचे तीन प्रकार कल्पितात. (१) प्राकृतिक, (२) संघायी (बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी झालेली) व (३) क्षतिपूरक. गर्भाशयात गर्भ वाढत असताना गर्भाशयाच्या स्नायुंवर ताण पडून ते लांब व जाड बनतात, हे प्राकृतिक अधिवृद्धीचे उदाहरण होय. नियमित व्यायाम घेणारे खेळाडू व मल्ल यांच्या त्या त्या स्नायुतंतूंची लांबी व जाडी वाढते व स्नायूंचे सामर्थ्य वाढते, हे प्राकृतिक तसेच संधायी अधिवृद्धीचे उदाहरण समजले जाते. पोकळ व स्नायूंच्या बनलेल्या इंद्रियांतही अधिवृद्धी होते. ह्रदयात काही विकारांमुळे आकुंचनाबरोबर रक्त निलय (ह्रदयाचा शुद्ध रक्त घेणारा कप्पा) किंवा अलिंदात (हृदयाचा अशुद्ध रक्त घेणारा कप्पा) परत येण्याची स्थिती निर्माण होते. त्या वेळी प्रत्येक आकुंचनाच्या वेळी रक्तप्रवाहात जाणारे रक्त तेवढेच रहावे म्हणून ह्रदयातील निलयाच्या स्नायूंची अधिवृद्दी होते. कधीकधी निलयाचे प्राकृतावस्थेच्या दुप्पट किंवा तिप्पटही आकारमान होते. जठर निर्गमद्वारातील रोधाने जठराची व मूत्रमार्गातील रोधाने मूत्राशयाचीही अधिवृद्दी होते, ही संधायी अधिवृद्धीची उदाहरणे होत. अन्नात आयोडिनाचे प्रमाण कमी पडल्यास उपलब्ध आयोडिनाचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून अवटू ग्रंथीची (घशाच्या भागातील एक अंत:स्त्रावी ग्रंथी,  अवटू ग्रंथि) होणारी अधिवृद्धी तसेच प्रसूतीनंतर  पोष ग्रंथीच्या अंत:स्त्रावातील प्रवर्तकाने [→ हॉर्मोने] होणारी स्तनग्रंथीची अधिवृद्धी ही अंशत: संधायी व अंशत: प्राकृतिक अधिवृद्धीची उदाहरणे समजता येतील. फुप्फुसे, वृक्क (मूत्रपिंड) अशा जोडीने असणाऱ्या इंद्रियांपैकी एखादे अकार्यक्षम झाले तर जोडीच्या इंद्रियांमध्ये पहिल्यातील क्षती (हानी) भरून काढण्यासाठी अधिवृद्धी आढळून येते. यात नवीन निर्मिती नसून असलेल्या ऊतकाच्या आकारात वाढ होते. अशा अधिवृद्धीस ‘क्षतिपूरक अधिवृद्धी’ म्हणतात. यकृत किंवा अवटू ग्रंथी यासारख्या इंद्रियातील काही भागाचा नाश झाल्यास त्या इंद्रियात वाढ होऊन त्याचे आकारमान पूर्ववत होते. याला क्षतिपूरक अधिवद्धीम्हणण्याचा प्रघात आहे, पण वस्तुत: ती संख्यावृद्धी असते. गिर्यारोहकांना उंचीवरील विरळ वातावरणातून पुरेसा ऑक्सिजन मिळावा म्हणून रक्तारुणाचे (हीमोग्लोबिनाचे) प्रमाण वाढविण्यासाठी तांबड्या कोशिकांच्या संख्येत वाढ होते. यामुळे पुरेसा ऑक्सिजन शोषिला जाण्यास साहाय्य होते. कोशिकांतील ही वाढ प्लीहेतील राखीव कोशिका रक्तप्रवाहात मिसळल्याने होते. हेही संख्यावृद्धीचे उदाहरण होय.

अधिवृद्ध ऊतकांना अधिक रक्तप्रवाहाचा पुरवठा लागतो. असा पुरवठा न झाल्यास त्या ऊतकाची अववृद्धी होऊन कार्य नीट चालेनासे होते. हृदयाच्या अधिवृद्ध स्नायूंमध्ये अधिवृद्धीचे मूळ कारण दूर झालेले नसल्यास कार्याचा ताण तर वाढतच राहतो व पुरेसे रक्त न मिळाल्याने स्नायू मऊ व बिलबिलीत होतात. त्यांचे आकुंचन-प्रसरण नीट होत नाही. त्यामुळे हृदकोष्ठांचे (हृदयाच्या कप्प्यांचे) आकारमान वाढते व त्यात रक्त साठून रहाते. या अवस्थेला ‘अभिस्तीर्ण (आकाराने वाढलेले) ह्रदय’ असे म्हणतात. संधायी अधिवृद्धीतील पुरेसे पोषण न मिळाल्याने होणार्या दुष्परिणामाचे हे उदाहरण होय.

ढमढेरे, वा. रा.