तीळ२ : त्वचेवरील नैसर्गिक गर्द काळ्या, करड्या, तपकिरी किंवा लाल रंगाच्या लहान डागांना तीळ म्हणतात. मस या दुसऱ्या नावानेही ते ओळखले जातात. अशा डागांवर जेव्हा केस प्रामुख्याने दिसतात तेव्हा त्यांना ‘लास’ किंवा ‘लासरू’ म्हणतात. त्वचेतील छोट्या रक्तवाहिन्यांची काही छोटी छोटी अर्बुदेही (गाठीही) डागासारखी दिसतात, त्यांना जन्मखुणा म्हणतात. सर्वसाधारणपणे तीळ वा मस आणि लासरू यांचाही समावेश ‘जन्मखूण’ या संज्ञेतच करतात.

अशा जन्मखुणा अगदी जन्मवेळेपासूनच दिसतील असे नाही. जन्मानंतर पहिल्या काही महिन्यानंतर किंवा किशोरावस्थेच्या शेवटीच त्या प्रथम दिसू शकतात. बहुतेक तीळ हानिरहित कोशिकासमूहांपासून बनतात. पुष्कळांच्या त्वचेवर तीळ असतात. त्यांचे प्रमाण कमीजास्त असते. बहुसंख्य तीळ चेहरा, मान व पाठ या भागांवर आढळतात. चेहऱ्यावर विशिष्ट ठिकाणी असणारा तीळ सौंदर्यात भर घालू शकतो. कधीकधी त्यामुळे विद्रूपताही संभवते.

तिळाचे आकारमान अगदी २ मीमी. पासून त्वचेचा मोठा भाग व्यापणाएवढे असू शकते. तीळ उत्पन्न झाल्यानंतर जन्मभर टिकून राहतात. न्यायवैद्यकात व्यक्तीची ओळख पटविण्याकरिता किंवा ओळखपत्रावर शरीरावरील कमीत कमी दोन तिळांचे सूक्ष्मवर्णन लिहून ठेवतात. तिळाचे काही प्रकार आढळतात. काही तीळ फक्त सपाट काळे डागच असतात, तर काहीचा पृष्ठभाग खडबडीत व त्वचेपेक्षा वर आल्यासारखा दिसतो. या दुसऱ्या प्रकाराच्या तिळाला ‘फुगीर तीळ’ म्हणतात. फुगीर तिळामध्ये कधीकधी कर्करोग उद्‌भवण्याचा संभव असतो. हा कर्करोग कृष्णकर्क या नावाने ओळखला जातो. केसयुक्त तिळामध्ये कर्करोगाचा प्रादुर्भाव होत नाही. सूक्ष्मदर्शकीय रचनेमध्ये तिळांचे दोन प्रकार आढळतात. त्वचेच्या वरच्या थरातच मर्यादित असणारे आणि अंतःस्तरांवर शिरलेले. सर्वसाधारणपणे आढळणारे तीळ पहिल्या प्रकारात मोडतात. दुसऱ्या प्रकारच्या तिळांमध्ये कर्करोग होण्याचा संभव असतो. आकारमान मोठे होणे, रंगात फरक पडणे, वारंवार सुजणे, व्रणोत्पत्ती आणि रक्तस्राव होणे ही लक्षणे कर्करोग झाल्याचे दर्शवितात. अशा वेळी शस्त्रक्रियाविशारदांचा सल्ला घेऊन तो समूळ काढून टाकणे हितावह असते. तीळ असलेल्या जागी वारंवार धक्का बसण्याची किंवा घर्षण होण्याची शक्यता असल्यास तेथील तिळामध्ये कृष्णकर्क होण्याचा संभव असल्यामुळे तो काढून टाकावा. चेहरा विद्रूप करणारा तीळ पुनर्रचनात्मक (प्लॅस्टिक) शस्त्रक्रिया करून काढून टाकता येतो [→ कर्करोग, शस्त्रक्रिया तंत्र]. इतर तिळांवर इलाज करण्याची सहसा गरज नसते.

ढमढेरे, वा. रा.  भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय चिकित्सा : तिळाचा काळा भाग शस्त्राने उकरून काढून टाकावा. नंतर यथायोग्य क्षाराने किंवा अग्नीने तो भाग जाळावा, त्या व्रणाचे अनुरूप व्रणोपचार करावे. विशेषतः त्या व्रणावर त्वचेच्या वर्णासारखी त्वचा यावी या दृष्टीने उपचार करावे.

पटर्वधन, शुभदा अ.

संदर्भ : Boyd, W. Textbook of Pathology, Philadelphia, 1961.