रेनवॉटर, (लीओ) जेम्स : (९ डिसेंबर १९१७–३१ मे १९८६). अमेरिकन भौतिकीविज्ञ. अणुकेंद्रातील सामूहिक गती व कण गती यांच्यातील संबंधाचा शोध आणि या संबंधावर आधारलेल्या अणुकेंद्राच्या संरचनेच्या सिद्धांताचा विकास या कार्याबद्दल रेनवॉटर यांना ⇨ऑगे नील्स बोर व ⇨ बेंजामिन रॉय (बेन आर्.) मॉटेलसन या डॅनिश भौतिकीविज्ञांबरोबर १९७५ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. काही ठराविक अणुकेंद्रे का व कशा प्रकारे विविध असममित आकार धारण करतात, हे त्यांनी दाखविले.

रेनवॉटर यांचा जन्म काउन्सिल (आयडाहो, अमेरिका) येथे झाला. त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची बी. एस्. (१९३९) आणि कोलंबिया विद्यापीठाच्या एम्. ए. (१९४१) व पीएच्. डी. (१९४६) या पदव्या संपादन केल्या. दुसऱ्या महायुद्धात अणुबाँब विकसित करण्यासाठी योजलेल्या मॅनहॅटन प्रकल्पात त्यांनी काम केले (१९४२–४६). कोलंबिया विद्यापीठात त्यांनी भौतिकीचे साहाय्यक (१९३९– ४२), निदेशक (१९४६–४७), साहाय्यक प्राध्यापक (१९४७–४९), सहयोगी प्राध्यापक (१९४९–५२) व प्राध्यापक (१९५२ पासून) या पदांवर काम केले. १९८३ मध्ये याच विद्यापीठात मायकेल प्यूपिन प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. कोलंबियाच्या नेव्हिस सायक्लोट्रॉन लॅबोरेटरीजचे संचालक म्हणून त्यांनी दोन वेळा (१९५१–५३ आणि १९५६–६१) काम केले. अणुऊर्जा मंडळाच्या आणि नौदलाच्या संशोधन प्रकल्पांतही त्यांनी काम केले (१९४७–७६).

इ. स. १९४९ मध्ये त्यांनी सर्व अणुकेंद्रांचे आकार त्या काळी सामान्यतः मान्य असल्याप्रमाणे गोलाकार नसतात, असा सिद्धांत विकसित करण्यास प्रारंभ केला. याकरिता त्यांनी पुढील नवीन संकल्पना मांडली. काही ठराविक अणुकेंद्रांच्या बाबतीत नजीकच्या कवचाबाहेरील जादा न्यूक्लिऑनांच्या (न्यूट्रॉन व प्रोटॉन यांच्या) उरलेल्या अणुकेंद्रीय गाभ्याशी होणाऱ्या आंतरक्रियांमुळे अणुकेंद्राचा गोलाकार विरूप होऊ शकतो. नजीकच्या कवचाबाहेर फिरणाऱ्या न्यूक्लिऑनांमध्ये अणुकेंद्राचे पृष्ठ विरूप करण्याची प्रवृत्ती आढळते. गोलाव्यतिरिक्त इतर आकारांच्या शक्यतेमुळे असे वाटते की, अणुकेंद्राचा आकार व दिक् स्थिती यांच्यात बदल करणाऱ्या अणुकेंद्रीय गतीचे संकलित प्रकार शक्य आहेत. ही कल्पना त्यांना १९४९ मध्ये सुचली व ते पुन्हा अणुकेंद्राच्या द्रवबिंदू प्रतिमानाकडे [⟶ अणुकेंद्रीय भौतिकी] वळले. शेवटच्या तृप्त (वा बंद) कवचाबाहेरील न्यूक्लिऑनांचा गट एकत्रित अशा पृष्ठताणयुक्त पिशवीत कक्षेत फिरत असून ही पिशवी इतर न्यूक्लिऑन बिंदुकांची बनली आहे, अशी त्यांनी कल्पना केली. ज्याप्रमाणे फुग्यामध्ये घरंगळतीला गोलक ठेवले तर या घरंगळण्यामुळे फुग्याचा आकार गोलाकार न राहता विरूप होईल, त्याचप्रमाणे याबाबतीत घडेल, असे रेनवॉटर यांचे मत होते. ही कल्पना त्यांनी ऑगे बोर यांना विशद केली व बोर यांना तिचे महत्व पटले. या मूलभूत कल्पनेवर आधारलेले अणुकेंद्राचे एकीकृत वा संकलित प्रतिमान बोर व मॉटेलसम यांनी १९६० साली पूर्णावस्थेस नेले.

नेव्हिस सायक्लोटॉन लॅबोरेटरीजमध्ये असताना म्यू मेसॉनीय क्ष किरणावर प्रयोग करीत असताना रेनवॉटर व व्हाल फीच यांनी सध्या मान्य असलेली अणुकेंद्रीय भार त्रिज्या १९५३ मध्ये प्रस्थापित केली. याखेरीज रेनवॉटर यांनी न्यूट्रॉन व इतर मूलकणांविषयी संशोधन केले असून त्यांना परिसरविज्ञान, भूविज्ञान, ज्योतिषशास्त्र, हवेच्या प्रदूषणाच्या समस्या इ. विषयांतही गोडी होती.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना अमेरिकेच्या अणुऊर्जा मंडळाच्या ई. ओ. लॉरेन्स स्मृती पुरस्काराचा मान मिळाला. नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, न्यूयॉर्क ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस वगैरे मान्यवर वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. ते याँकर्स (न्यूयॉर्क) येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.