थिओडोर डब्ल्यू हान्शहान्श, थिओडोर डब्ल्यू : (३० ऑक्टोबर १९४१). अमेरिकन भौतिकीविज्ञ. लेसर आधारित परिशुद्ध (काटेकोर) वर्णपट-विज्ञान विकसित केल्याबद्दल हान्श आणि जॉन लेविस हॉल यांना २००५ सालचे भौतिकीचे अर्धे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले (नोबेल पारितोषिकाचा दुसरा अर्धा भाग रॉय जे. ग्लाउबर यांना मिळाला).

 

हान्श यांचा जन्म हायडल्बर्ग (जर्मनी) येथे झाला. त्यांनी हायडल्बर्ग विद्यापीठातून पीएच्.डी पदवी संपादन केली (१९६९). त्यानंतर त्यांनी अनेक विद्यापीठे आणि शाळांमध्ये अध्यापनाचे काम केले. ते कॅलिफोर्निया येथील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक होते (१९७५–८६). नंतर ते पुंज प्रकाशकीच्या माक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे संचालक झाले (१९८६). सध्या हान्श हे माक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, तसेच लूटव्हिख मॅक्सिमिलन युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिक येथे प्रा यो गि क भौतिकी आणि लेसर वर्णपटविज्ञान या विषयांचे प्राध्यापक आहेत.

 

हान्श यांचे प्रकाशीय कंप्रतांचे (दृश्य प्रकाशाच्या कंप्रतांचे) मापन करणे हे प्रमुख सं शो ध न कार्यहोते. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी प्रकाशीय कंप्रता फणी तंत्राची संकल्पना मांडली.या तंत्रामध्ये लेसर प्रकाशाचे अतिसूक्ष्म स्पंद हे परिशुद्ध अवकाश असलेल्या कंप्रतांचे शिखरबिंदूंचा संच तयार करतात. हे संच समान अवकाश असलेल्या केसांच्या फणीच्या दातांसारखे दिसतात आणि व्यावहारिक दृष्ट्या मिळालेली प्रकाशीय कंप्रता अचूकपणे म्हणजेच पंधरा दशांश स्थळापर्यंत अथवा क्वाड्रिलिअनचा एक भाग (म्हणजे १/१०¹⁵ किंवा १०¹⁵) इतकी मोजून मिळविता येते, असे त्यांनी दाखविले. जॉन लेविस हॉल यांच्या महत्त्वाच्या सहभागामुळे हान्श यांनी २००० सालामध्येच सिद्धांताच्या तपशिलासह माहितीचे काम पूर्ण केले. या दोन्ही शास्त्रज्ञांनी केलेल्या व्यावहारिक उपयोजनांच्या कार्यात संगणकीय प्रदत्त जालकां-मधील समकालीकरण याचा सुद्धा अंतर्भाव होतो. जगातील अनेक प्रयोग-शाळांमध्ये प्रकाशीय कंप्रतेच्या मापनासाठी हान्श यांच्या कंप्रता फणी तंत्राचा वापर केला जातो.

 

हान्श यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक (१९८३), फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे आल्बेर्ट मायकेलसन पदक (१९८६), गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स पारितोषिक, फिलिप मॉरिस रिसर्च पारितोषिक (१९९८), ओटो हान पुरस्कार (२००५) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

खोब्रागडे, स्नेहा दिलीप