सेलफोन : (मोबाइल फोन सेल्युलर रेडिओ टेलिफोन भ्रमण दूरध्वनी). दूरसंदेशवहनाकरिता वापरण्यात येणारी, नीच विद्युत् शक्तीवर चालणारी आणि रेडिओ प्रेषक व रेडिओ ग्राही एकत्रितपणे असलेली (रेडिओ ट्रान्ससीव्हर, प्रेषक-गाही), प्रयुक्ती (साधन). सर्व वयोगटांतील व थरांतील व्यक्तींना परिचित असलेला सेलफोन हस्तसंच वजनाने हलका असल्यामुळे हातात, खिशात किंवा पर्समध्ये घेऊन कोठेही जाता येते. त्याच्या साहाय्याने संदेश पाठवून कधीही व कोठेही दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो. सुरुवातीला चैनीची वस्तू म्हणून समजण्यात येणारी ही प्रयुक्ती आता हळूहळू सर्वांकरिता गरजेची ठरू लागली आहे. अपघात, मोठे संकट अशांसारख्या तातडीच्या प्रसंगी तर ही प्रयुक्ती अतिशय उपयोगी ठरणारी आहे.

बेस स्टेशन (B) असलेल्या सेलची रचना : सलग रेषेने आदर्श कॉलची व्याप्ती आणि तुटक रेषेने प्रत्यक्ष रेडिओ व्याप्ती दाखविली आहे. 

सेलफोनकरिता अनेक रेडिओ प्रेषक व रेडिओ ग्राही यांचे जालक असलेले तंत्रज्ञान आवश्यक असते. प्रत्येक सेलफोन कंपनी अशा प्रकारचे स्वतंत्र जालक तयार करते. या कंपन्या शहर किंवा राज्य अशा कार्यक्षेत्रांचे विभाग पाडतात व त्यांना सेल म्हणतात. यावरून सेल्युलर रेडिओ टेलिफोन हे नाव पडले असून सेलफोन हा त्याचा संक्षेप आहे. अशा अनेक सेलांचे मिळून जालक तयार होते. या सर्व सेलांची मांडणी मधाच्या पोळ्यासारखी असते. षट्‌कोनाकार असलेल्या प्रत्येक सेलच्या तीन टोकांना एकाआड एक सेल्युलर टेलिफोन मनोरे असतात. या प्रत्येक मनोऱ्यावर तीन दिशांना १२० कोनांत आकाशकांचा (अँटेनांचा) संच असतो. शेजारी असलेल्या तीन सेलांचे क्षेत्र परस्परव्यापी असते. प्रत्येक सेलमध्ये योग्य आकारमानांचे रेडिओ प्रेषक व ग्राही आणि ⇨ सूक्ष्मप्रक्रियक ठेवलेले असतात, त्यांना ‘बेस स्टेशन’ म्हणतात. ही केंद्रे एकमेकांशी संदेशवहन करू शकतात. जनक कंपनीने पुरविलेली किंवा नोंदविलेली सेलफोनची माहिती प्रत्येक बेस स्टेशनमधील संगणकामध्ये साठविलेली असते. त्यामुळे बेस स्टेशनला प्रत्येक वेळी चालू केलेल्या सेलफोनचे ठिकाण कळू शकते.

सेलफोनवरील अंक दाबल्यानंतर (चालू केल्यानंतर) जवळच्या बेस स्टेशनकडे विद्युत् चुंबकीय तरंगाच्या स्वरूपातील संदेशाचे प्रेषण होते. बेस स्टेशनमधील संगणकामध्ये संदेशाचे स्वरूप ठरविले जाते. संदेश जर जनक कंपनी सेवा देत असलेल्या दुसऱ्या सेलफोनकडे पाठवावयाचा असेल, तर त्या सेलफोनचे ठिकाण शोधून त्या ठिकाणच्या बेस स्टेशनकडे संदेशाचे प्रेषण होते आणि ते केंद्र त्या सेलफोन येणाऱ्या कॉलसंबंधी (बोलाव्यासंबंधी) सावध करते. संदेश जर दुसरी कंपनी सेवा देत असलेल्या सेलफोनकडे किंवा लँडलाइन (जमिनीवर तारांनी जोडलेल्या) दूरध्वनीकडे पाठवावयाचा असेल, तर कॉल संबंधित जालकाकडे वळविला जाऊन तो वरील पद्धतीप्रमाणे साठविला जातो.

सेलफोन हस्तसंचाचे अंतर्गत भाग : सेलफोन पामटॉप (तळहातावर ठेवता येण्याजोगा) संगणकासारखा असतो. त्यामध्ये अनेक प्रकारच्या चिपा (संकलित मंडले) असलेला मंडलफलक, आकाशक, द्रव स्फटिक दर्शकपटल (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले एलसीडी) कळफलक, ध्वनिग्राहक, ध्वनिवर्धक आणि पुनर्भरणयोग्य बॅटरी (विद्युत् घटमाला) इ. भाग असतात.

मंडलफलकावरील एका चिपेमुळे ध्वनिग्राहकाजवळ बोलत असलेल्या सदृश आवाजाचे अंकीय संदेशामध्ये आणि ध्वनिवर्धकामध्ये येणाऱ्या अंकीय संदेशाचे सदृशामध्ये रूपांतर होते. विद्यत् संदेश अखंडित आणि पृथक् असे दोन प्रकारचे असतात. ध्वनिग्राहकाने निर्माण केलेले विद्युत् संदेश अखंडित प्रकारचे असून त्यांना ‘सदृश संदेश’ म्हणतात. संचामध्ये आणि संदेशवहनामध्ये वापरण्यात येणारे संदेश पृथक् प्रकारचे असून त्यांना अंकीय संदेश म्हणतात. सेलफोनमध्ये चांगल्या आवाजाकरिता छोटे ध्वनिवर्धक व ध्वनिग्राहक असतात. ध्वनिवर्धकाचे आकारमान २५ पैसे नाण्याच्या आकारमानाएवढे आणि ध्वनिग्राहकाचे आकारमान त्यापेक्षा लहान असते. वापरकर्त्याला कळफलकाच्या साह्याने दूरध्वनिक्रमांक इ. माहिती समाविष्ट करता येते.

मंडलफलकावरील सूक्ष्मप्रक्रियक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपेमुळे कळफलक आणि दर्शकफलक हाताळता येतात. त्यामुळे आदेश व नियंत्रण, बेस स्टेशनला संदेश पाठविणे आणि फलकावरील इतर कार्यांमध्ये सुसूत्रता साधणे इ. गोष्टींची देवघेव केली जाते. मंडलफलकावर काही स्मृती चिपा असतात. त्यांमध्ये अगोदर पुरविलेल्या अनेक सूचनांप्रमाणे सेलफोनला कार्य करता येते. रेडिओ कंप्रता संकेतांचे प्रेषण व ग्रहण करण्याकरिता सेलफोनमध्ये आकाशकाची आवश्यकता असते. ही सर्व कामे करून घेण्यासाठी सेलफोनमध्ये ऊर्जा पुरविण्याकरिता कमीत-कमी ३·७ व्होल्ट (व्हो.) विद्युत् दाब असलेल्या लिथियम आयनाची पुनर्भरण बॅटरी वापरण्यात येते.

सेलफोनमध्ये पोष्टाच्या तिकिटाएवढ्या आकारमानाचे सिम कार्ड (सबस्क्रायबर आयडेण्टी मॉड्युल) वापरता येते. ते सेलफोनच्या मागील बाजूस पुनर्भरण बॅटरीच्या खाली सहज बसविता येते. विविध मूलभूत सेवा पुरविणाऱ्या सेलफोन कंपन्या विविध सिम कार्डे तयार करतात. वापरकर्ता एकापेक्षा अधिक सिम कार्ड सोयीप्रमाणे वापरू शकतो.

सेलफोन संकेतावली : सर्व सेलफोनांमध्ये त्यांच्याशी संबंधित विशिष्ट संकेत असतात. प्रत्येक सेलफोन धारकाला विशिष्ट दूरध्वनी क्रमांक दिलेला असतो. या अंकांवरून फोनचे मालक आणि सेवा देणारे ओळखता येतात.

एसआयडी (सिस्टिम आयडेंटिफिकेशन कोड) ही एकमेव पाच अंकी संख्या असून ती शासनाकडून प्रत्येक सेलफोन कंपनीला नेमून दिलेली असते. सेलफोन चालू केल्यानंतर तो नियंत्रण परिवाहामधील एसआयडीला समजू शकतो. नियंत्रण परिवाह म्हणजे विशिष्ट कंप्रता असून तिचा वापर सेलफोन आणि बेस स्टेशन येथे एकमेकांशी बोलण्यासाठी होतो. जर सेलफोनकरिता कोणताही नियंत्रण परिवाह उपलब्ध होऊन एसआयडीबरोबर जुळणी झाल्यास तो सेलफोन जनक कंपनीचा भाग असल्याचे समजते.

सेलफोन तयार करतेवेळी त्यामध्ये ईएसएन (इलेक्ट्रॉनिक सिरियल नंबर) हा एकमेव ३२ बीट क्रमांक घातलेला असतो. प्रत्येक वेळी या क्रमांकाचे प्रक्षेपण बेस स्टेशनकडे होते. या क्रमांकावरून बिनतारी वाहकाचे मोबाईल स्विचिंग कार्यालय कॉलची सत्यता पडताळून पाहू शकते.

जीएसएम, डब्ल्यूसीडीएमए, आयडीईएन, स्मार्ट फोन इ. संचांसाठी विशिष्ट आंतरराष्ट्रीय ओळख अंक (आयएमईआय नंबर) असतात.


इतिहास : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील काही अभियंते १९४७ पूर्वी मोबाइल कार फोन तयार करण्याकरिता प्रयत्न करीत होते. त्या वेळेस त्यांच्या लक्षात आले होते की, कंप्रतेचा पुनर्वापर होऊ शकेल असे लहान लहान सेल तयार केल्यास मोबाइल फोनच्या संदेशवहनाची क्षमता वाढविता येते. अमेरिकेमध्ये हवेतील तरंगांमार्फत संकेतांचे प्रक्षेपण व प्रेषण करण्याकरिता एफसीसी (फेडरल कम्युनिकेशन कमिशन) या आयोगाची परवानगी लागत असे. सेलफोन म्हणजे एक प्रकारचा द्विमार्गी रेडिओ असल्यामुळे एटी अँड टी या अमेरिकन कंपनीने आयोगाकडे कंप्रतांची मोठी संख्या असलेल्या रेडिओ-वर्णपटाची परवानगी मागितली होती. १९६८ मध्ये एफसीसी या आयोगाने एटी अँड टी आणि बेल लॅबोरेटरीज या अमेरिकन कंपन्यांना ठराविक रेडिओ- वर्णपटाची परवानगी दिली. सेल्युलर पद्धतीमध्ये अनेक लहान व कमी विद्युत् शक्तीचे मनोरे उभारण्यात आलेले असतात. प्रत्येक मनोरा नेमून दिलेल्या एकूण कंप्रतांपैकी फक्त थोडा भाग वापरतो. सर्व कॉल्स एका मनोऱ्याकडून दुसऱ्या मनोऱ्याकडे वाहून नेले जातात.

मोटोरोला या अमेरिकन कंपनीचे सरव्यवस्थापक मार्टिन कूपर यांनी पहिल्या आधुनिक सुवाह्य सेलफोन हस्तसंचाचा शोध लावला. त्यांनी एप्रिल १९७३ मध्ये सेलफोनवरून पहिला कॉल जोएल एंजल या प्रतिस्पर्ध्यास केला. १९७० च्या दशकात शेवटी इलिनॉय बेल लॅबोरेटरीने पहिल्या व्यापारी सेल्युलर टेलिफोनची चाचणी घेतली. १९८० दशकाच्या मध्यास सेल्युलर सर्व्हिस कॅरिअरने ८०० ते ९०० मेगॅहर्ट्झ कंप्रता पट्टा वापरून देशभर काम सुरू केले. १९९० दशकाच्या मध्यास फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने प्रत्येक सेवा क्षेत्राकरिता सहा मोबाइल टेलिफोन सेवा पुरविणाऱ्यांना अधिकृत मान्यता दिली. १९९१ मध्ये गीसेके आणि डेव्हरींट यांनी सर्वप्रथम सिम कार्ड तयार केले. सर्वच जीएसएम (ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाइल) सेलफोनांसाठी सिम कार्ड वापरावे लागतात. काही सीडीएमए (कोड डिव्हिजन मल्टीपल ॲक्सेस) सेलफोनकरिता सिम कार्ड ऐवजी आरयूआय एम (रिमूव्हेबल यूजर आयडेंटी मोबाइल) कार्ड वापरावे लागते. स्मार्टफोन सिम कार्डाशिवाय वापरता येतात.

सुरुवातीला जालकाकरिता लागणारी सामग्री आणि लागणारा खर्च मोठा होता. त्यामुळे ग्राहकांना द्यावी लागणारी किंमतही जास्त होती. पुरवठादात्यांनी सेवा पॅकेजेस (एक गठ्ठा) निर्माण करण्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे आणि सामान्य नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी विपणन व्यवस्था वाढविल्यामुळे सेलफोन आणि जालक व्यवस्था यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. सेल्युलर जालकाने व्यापलेले भौगोलिक क्षेत्र मोठे झाल्यामुळे आणि त्यांचे दर कमी झाल्यामुळे नवीन वर्गणीदार व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी आणि इतर सेवांकरिता सेल्युलर सेवा विकत घेऊ लागले.

बहुगुणी सेलफोन : लोकांनी एकमेकांशी फक्त बोलण्याकरिता सेलफोन उपयोगी नसून दिलेली कामे करून घेण्यासाठीही उपयुक्त आहे. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.

फोनबुक, दैनंदिनी, गजर आणि घड्याळ : दूरध्वनी वापरकर्त्यांना नेहमी आपल्या परिचयाच्या व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवावे लागत असते. सध्या सर्व सेलफोनांमध्ये शंभरापेक्षा अधिक दूरध्वनी क्रमांक साठवून ठेवता येतात. तसे हे सर्व क्रमांक नावाच्या अकारविल्हेप्रमाणे दर्शक पटलावर दिसू शकतात. सेलफोनांमध्ये अगोदर फिरविलेले क्रमांक, आलेले क्रमांक आणि चुकलेले कॉल यांची यादीसुद्धा साठवून ठेवता येते. त्यामुळे हे क्रमांक तत्क्षणिक फिरविता येऊ शकतात.

एखादी व्यक्ती सेलफोनचा वैयक्तिक दैनंदिनी म्हणून सुद्धा वापर करू शकते. वापरकर्त्याला उपयुक्त असलेल्या तारखा किंवा भविष्यातील भेटीसंबंधीची माहिती साठवून ठेवता येते. तसेच विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला गजर होईल अशी व्यवस्था त्यामध्ये करता येते. सेलफोनच्या दर्शक पटलावर तारीख, वार व वेळ कधीही पाहता येते. मजकुराचा संदेश पाठविणे व स्वीकारणे : सेलफोनच्या साहाय्याने छोट्या मजकुराचा संदेशसुद्धा पाठविता येतो. या संदेशांना एसएमएस (शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस) म्हणतात. ज्याला संदेश पाठवावयाचा त्याच्या सेलफोनात हे संदेश साठवून ठेवले जातात आणि ते कधीही त्याला वाचता येतात.

व्हॉइस मेल : दूरध्वनी कॉलमुळे त्रास होऊ नये तसेच एखादा तातडीचा संदेश राहिला जाऊ नये याकरिता व्हॉइस मेलची सोय फार उपयुक्त आहे. या सोयीमुळे जनक कंपनीच्या संगणकात हा संदेश नोंदवून साठविला जातो. वापरकर्ता पाहिजे असेल तेव्हा हे संदेश प्राप्त करू शकतो.

कॅमेरा व ध्वनिमुद्रक : काही सेलफोनांमध्ये छोटासा कॅमेरा असतो. या कॅमेऱ्याच्या साहाय्याने एखाद्या ठिकाणचे किंवा व्यक्तीचे छायाचित्र आणि चलच्चित्रण घेता येऊन सेलफोनांमध्ये ठेवता येते. तसेच त्यासारखा सेलफोन असलेल्या व्यक्तीला ते छायाचित्र किंवा चलच्चित्र दूरवर पाठविता येते. याचप्रमाणे काही सेलफोनांमध्ये ध्वनीचे (उदा., भाषण, गाणे) मुद्रण करण्याची सोय असते आणि आपल्या सवडीप्रमाणे त्या ध्वनीचे पुनरुत्पादन करता येते.

खेळ खेळणे : सेलफोनच्या निर्मात्यांनी त्यामध्ये मनोरंजक, खेळांचे निरनिराळे प्रकार असलेले सॉफ्टवेअर समाविष्ट केलेले असते. वापरकर्ता प्रवासात किंवा एकटाच असताना कंटाळा आल्यास वेळ घालविण्याकरिता हस्तसंचाचा वापर खेळ खेळण्याकरिता करू शकतो.

गणकयंत्र : काही सेलफोन गणितक्रिया करण्यासाठी उपयुक्त असू शकतात. त्यामध्ये गणकयंत्राप्रमाणे कळफलक आणि दर्शकफलक असल्यामुळे गणितक्रिया करणे शक्य होते.

इंटरनेटवरील माहिती प्राप्त करणे : एखाद्याला माहिती प्राप्त करण्यासाठी संगणक आणि दूरध्वनी यांची आवश्यकता असते. काही सेलफोनांमध्ये संगणकासारखा सूक्ष्मप्रक्रियक असतो. काही सेलफोन कंपन्या अशा हस्तसंचांकरिता इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देतात. म्हणून सेलफोन वापरकर्ते लॅपटॉप (मांडीवर ठेवता येण्याजोगा) संगणकाप्रमाणे इंटरनेटच्या साहाय्याने अनेक प्रकारची माहिती प्राप्त करू शकतात.

सुरक्षितता व धोके : प्रत्येक सेलफोनद्वारे बाहेर सोडल्या जाणाऱ्या तरंगांचे प्रमाण वेगवेगळे असते. या तरंगांचे प्रमाण स्पेसिफिक ॲब्सॉर्प्शन रेट (एसआर) या मापकात मोजतात. हा दर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार १·६ वॅट/किग्रॅ. असा निश्चित करण्यात आलेला आहे. आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने एसआर जितका कमी तितका तो सेलफोन वापरण्यास योग्य असतो.

सेलफोनवर सातत्याने आणि दीर्घकाळ बोलत राहिल्यामुळे सेलफोन गरम होतो. पहिल्या ५ ते १० मिनिटांपर्यंत ही वाढ आटोक्यातील असते परंतु त्यानंतरच्या कालावधीत म्हणजे १० ते २० मिनिटे या काळात वापरकर्त्याच्या डोक्याचे तापमान दोन अंशांनी वाढू शकते.

सेलफोनमधून निघणारे सूक्ष्मतरंग (प्रारण) डोक्यात घुसण्याचे प्रमाणदेखील वापरकर्त्याच्या वयानुसार बदलते. लहान मुलांच्या कवटीची वाढ सुरू असल्याने ती तुलनेने पातळ असते, तसेच मेंदूभोवतीच्या द्रवाचे प्रमाणदेखील जास्त असते. त्यामुळे सूक्ष्मतरंगांना मेंदूपर्यंत पोहोचणे सोपे जाते व ते हानीकारक ठरू शकतात. मनोऱ्यातून निघणाऱ्या विविध तरंगांमुळे थकवा येणे, डोकेदुखी, झोप न लागणे, स्मृतिभ्रंश, कानात गुणगुणल्यासारखे आवाज येत राहणे इ. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुष्परिणाम होऊ शकतात. मोठे सुसज्ज दवाखाने, कारखाने, विमाने इ. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनीय साधने असलेल्या ठिकाणी सेलफोनचा कमीत कमी वापर करणे चांगले असते. [ चित्रपत्र].

पहा : दूरध्वनिविद्या.

सूर्यवंशी, वि. ल.