आंतरसंदेशवहन पद्धति: विद्युत् प्रयुक्तीच्या साहाय्याने दोन केंद्रांमध्ये खाजगी संभाषणासाठी उपयोगी पडणारी योजना. या पद्धतीमध्ये दूरध्वनीप्रमाणे मध्यवर्ती नियंत्रण नसते. या पद्धतीचे कार्यक्षेत्र मोठे कार्यालय, कारखाना किंवा वाहन (उदा., आगगाडी, विमान) यांपुरतेच मर्यादित असून हिच्या एकंदर कार्यालाही काही मर्यादा असतात. एकाच इमारतीत असलेल्या

आ. १. साधी एकमार्गी बहुशाखी आंतरसंदेशवहन पद्धती. (१) मध्यवर्ती प्रेषक केंद्र, (२) विद्युत् पुरवठा, (३) विवर्धक, (४) निवड करणारा स्विच, (५, ६, ७) दुय्यम केंद्रे.

निरनिराळ्या कार्यविभागांमधील कोणत्याही केंद्राला त्वरित संदेश पाठविण्याकरिता आंतरसंदेशवहन पद्धती ही एक सोपी, कार्यक्षम व अल्पखर्चाची पद्धत आहे. साध्या एकमार्गी पण बहुशाखी आंतरसंदेशवहन पद्धतीचे कार्य आ. १ वरून समजून येईल. आ. १ मधील मध्यवर्ती प्रेषक केंद्राजवळ असलेला ध्वनिक्षेपक एका कमी शक्तीच्या

इलेक्ट्रॉनीय विवर्धकास जोडलेला असतो. या केंद्रातून फक्त संदेश धाडण्याचे कार्य होत असल्यामुळे येथील ध्वनिक्षेपक नेहमीच ध्वनिग्राहक म्हणून कार्य करतो. त्याच्या समोर बोलले म्हणजे

आ. २. उभयमार्गी संभाषण आंतरसंदेशवहन पद्धती. (अ) ऐका, (ब) बोला. १) मध्यवर्ती केंद्र, २) दुय्यम केंद्र, ३) विवर्धक, ४) विद्युत् पुरवठा (समाइक).

शब्दध्वनिसंदेशाचे विद्युत् स्वरूपात रूपांतर होऊन विवर्धकाच्या साहाय्याने त्याचे योग्य प्रमाणात विवर्धन होते. विवर्धकाला कार्यान्वित करण्याकरिता मध्यवर्ती केंद्रजवळच विद्युत् पुरवठा असतो. आ. १ मध्ये दाखविलेल्या बहुशाखी निवड करणाऱ्या स्विचाच्या साहाय्याने पाहिजे त्या दुय्यम केंद्राची निवड करता येते. या स्विचाच्या द्वारे विवर्धित विद्युत् प्रवाह दुय्यम केंद्राच्या ध्वनिक्षेपकात जातो, तेव्हा त्या केंद्रापाशी मध्यवर्ती केंद्रातील ‘बोलणे’ ऐकू येते. या रीतीने प्रेषक केंद्र फक्त ‘बोलणे’ व दुय्यम केंद्रे फक्त ऐकणेएवढीच कार्ये करू शकतात.

उभयमार्गी संभाषण योजना:या पद्धतीत स्विचाच्या साहाय्याने वरील दोन ध्वनिक्षेपकांच्या कार्याची जरूरीप्रमाणे अदलाबदल करता येऊन दोन केंद्रांमध्ये संभाषण करता येते. कोणताही एक ध्वनिक्षेपक एका वेळी फक्त ऐकणे किंवा बोलणे यांपैकी एकच क्रिया करू शकतो. केंद्रामधील अंतर जास्त नसल्यास मध्यवर्ती ध्वनिक्षेपकाच्या जवळच फक्त एक विवर्धक ठेवला म्हणजे पुरतो. पण अंतर जास्त असेल तर प्रत्येक केंद्राजवळ एक स्वतंत्र विवर्धक ठेवावा लागतो. या पद्धतीच्या कार्याची रूपरेषा आ. २ मध्ये दाखविली आहे. या पद्धतीत मध्यवर्ती केंद्राजवळ एक बहुशाखी फिरती स्विच योजना असते. हिच्या साहाय्याने कोणत्याही दुय्यम केंद्राबरोबर संपर्क साधून त्यास संदेश धाडता येतो किंवा त्यापासून येणारा संदेश ग्रहण करता येतो. सुलभतेकरिता आ. २ मध्ये एक मध्यवर्ती केंद्र व एक दुय्यम केंद्र दाखवले असून त्यामध्ये एकच साध्या प्रकारची स्विच योजना दाखविली आहे. प्रत्यक्षामध्ये अनेक दुय्यम केंद्र असल्यास मध्यवर्ती केंद्राजवळचा स्विच बराच गुंतागुंतीचा असतो. आ. २ मध्ये प्रत्येक केंद्रापाशी तीन विभाग असलेली स्विच योजना दाखविली आहे. हे विभाग ऐकमेकांबरोबर अशा रीतीने निगडीत केलेले असतात की, ते सर्व कोणत्याही वेळी एकाच अवस्थेत असू शकतात. ऐकाअवस्थेत (स्विच ला जोडलेला) ध्वनिक्षेपक ऐकण्यासतयार असतो. बोलाअवस्थेत (स्विच ला जोडलेला) ध्वनिक्षेपकाचा संदेशप्रेषण करण्याकरिता उपयोग होतो. मंडळ कार्यान्वित नसताना प्रत्येक केंद्राजवळचा स्विच ऐकाया अवस्थेत असतो. या स्थितीत विद्युत् मंडल पूर्ण होत नाही व त्यामुळे विद्युत् ऊर्जेचा विनाकारण व्यय होत नाही तथापि विवर्धकातील निर्वांत नलिकांना थोडासा विद्युत् पुरवठा करावा लागतोच. आ. २ मध्ये मध्यवर्ती केंद्र संदेश धाडताना व दुय्यम केंद्र तो संदेश ग्रहण करताना असणारी अवस्था दाखविली आहे. कोणत्याही केंद्रापासून बोलणेसुरू करावयाच्या अवस्थेत स्विच नेला, तर तेथील ध्वनिक्षेपकाचा प्रेषण-संदेश तेथील विवर्धकाच्या ग्राही अग्रांना पुरवला जातो. विवर्धकामधून मिळणारा प्रेषण-संदेश दुसऱ्या केंद्राच्या ध्वनिक्षेपकास देण्यात येतो.

या पद्धतीमध्ये बोलणे व ऐकणे या क्रिया एकाच वेळी करता येत नाहीत व दुय्यम केंद्रे एकमेकांबरोबर बोलू शकत नाहीत.

आ. ३. उभयमार्गी आंतरसंदेशवहन पद्धती (ट्रँझिस्टरयुक्त). (अ) ऐका, (ब) बोला.

ट्रँझिस्टर-विवर्धक उपलब्ध झाल्यापासून आतरसंदेशवहन पद्धतीत मोठी क्रांती घडून आली आहे. निर्वात नलिका-विवर्धकाशी तुलना केली, तर या नवीन विवर्धकात त्याच्या विश्रांतिकालात होणारा विद्युत् ऊर्जेचा व्यय अगदी उपेक्षणीय असतो. निर्वात नलिका-विवर्धकात बाह्य संदेश असो किंवा नसो, त्यामधील इलेक्ट्रॉन-उत्सर्जक तंतू सतत प्रज्वलित ठेवावे लागतात. हे तपमान कायम ठेवण्याकरिता विद्युत् ऊर्जेचा बराच भाग खर्च करावा लागतो. ट्रँझिस्टर विवर्धकाच्या बाबतीत हा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच ट्रँझिस्टराला कार्यान्वित करण्याकरिता लागणारा विद्युत् दाब अत्यंत कमी असल्यामुळे लहान आकारमानाच्या विद्युत् घटमालेवर ही यंत्रणा चालू शकते. या जातीच्या योजना आकाराचे लहान, सुटसुटीत व हालवावयास सुलभ असतात. ट्रँझिस्टरांची मंडले अधिक कार्यक्षम, बळकट व किंमतीने कमी ठरतात. ट्रँझिस्टरयुक्त संदेशवहन पद्धतीचे एक विद्युत् मंडल आ. ३ मध्ये दाखविले आहे.

संदर्भ : Ramanowitz, H. A. Puchett, R. E. Introduction to Electronics, London, 1968.

चिपळोणकर, व. त्रिं.