अनुचित्र-प्रेषण : एखादी प्रतिमा किंवा चित्र एका ठिकाणाहून विद्युत् संदेशाच्या स्वरूपात रेडिओ तरंगांच्या किंवा तारेच्या साहाय्याने प्रेषित करणे व दुसऱ्या ठिकाणी ते हुबेहूब मूळ स्वरूपात मिळवणे, यास ‘अनुचित्र-प्रेषक’ म्हणतात. छायाचित्रे, नकाशे हाताने काढलेली चित्रे, हस्तलिखित पत्रे इ. या पद्धतीने पाठवता येतात. महत्त्वाच्या व्यक्ती अथवा प्रसंग यांची छायाचित्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या दूर ठिकाणी पाठविण्याकरिता वर्तमानपत्रे अथवा वृत्तसंस्था या पद्धतीचा उपयोग करतात. काही पुढारलेल्या देशांत तर एकाच वर्तमानपत्राच्या एका शहरात तयार केलेल्या मूळ प्रतीवरून दूरच्या अनेक शहरांत त्याच्या नकला अनुचित्र-प्रेषकपद्धतीने त्याच्या प्रती छापता येतात. अवकाशात सोडलेल्या उपग्रहाच्या साहाय्याने पृथ्वीवरील निरनिराळ्या भागांवर असलेल्या ढगांची छायाचित्रे या पद्धतीने मिळविणे व त्यावरून हवामानाचा अंदाज बांधणे, हा या पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग आहे.

अनुचित्र-प्रेषण-पद्धतीचे मूलभूत विभाग. (१) दूर पाठवायचे चित्र, (२) क्रमवीक्षण-यंत्रणा, (३) क्रमवीक्षण-यंत्रणा-गाडी, (४) गाडी सरकविणारा स्क्रू, (५) कलानियंत्रक स्पंद जनित्र, (६) संवह-संदेश-जनित्र, (७) विरूपक, (८) विवर्धक, (९) समकालिक चलित्र, (१०) समकाल-नियंत्रक.अनुचित्रण-प्रेषणपद्धती विसाव्या शतकाच्या आरंभी व्यवहारात आली. त्या वेळी होणारे प्रेषण सर्वस्वी तारेच्या साहाय्याने केले जात असे. पण १९२४ पासून हे प्रेषण रेडिओ तरंगांच्या द्वारे होऊ लागले. संवह (संदेशवाहक) तरंगांची कंप्रता (प्रतिसेकंदास होणारी कंपनसंख्या) जेवढी जास्त, तेवढ्याच प्रमाणात प्रतिसेकंदास पाठविण्यात येणाऱ्या संदेशाची संख्या वाढते. त्यामुळे १९२४-३८ या काळात संवह-रेडिओ तरंग-कंप्रतेत सारखी वाढ होत गेली. या काळात प्रेषण-संदेश व संवाह-रेडिओ तरंग यांच्यातील आंतरक्रिया परमप्रसर (महत्तम स्थानांतर) विरूपण (एखाद्या तरंगाच्या विशिष्ट लक्षणामध्ये उदा., परमप्रसारामध्ये, दुसऱ्या तरंगाच्या विशिष्ट लक्षणानुसार बदल करणे, → विरूपण) पद्धतीने केली जात होती. या प्रकारच्या विरूपण-पद्धतीत, मध्यम कंप्रतेच्या रेडिओ तरंगांच्या बाबतीत वातावरणातील रेडिओ गोंगाटामुळे [→गोंगाट ] व उच्च कंप्रता-तरंगांच्या बाबतीत संदेशाच्या तीव्रतेने होणाऱ्या कालपरिवर्ती (कालानुसार) बदलांमुळे चित्रसंदेश-ग्रहण-क्रियेत दोष निर्माण होत असत. हे दोष टाळण्याकरिता १९३८ पासून कंप्रता-विरूपणाची जास्त कार्यक्षम पद्धत उपयोगात आलेली आहे. अनुचित्र-प्रेषणपद्धतीचे मुख्य कार्यविभाग खालीलप्रमाणे असतात (पहा : आकृती). (१) मूळ चित्राचे लहान आकारमानाच्या विभागांत (उदा., ०·२५ ×०·२५ मिमी.) विभाजन करून त्यातील प्रत्येक घटकाचे प्रकाशकिरणांच्या साहाय्याने क्रमवीक्षण (क्रमानुसार नोंद करणे). (२) प्रत्येक घटकापासून मिळालेल्या प्रकाश-संदेशाचे प्रकाशविद्युत् नलिकेच्या [→प्रकाशविद्युत्] साहाय्याने विद्युत् ऊर्जेत रूपांतर. (३) विद्युत् ऊर्जारूपी संदेशाचे योग्य विरूपण क्रियेद्वारा उच्च कंप्रता-तरंगांत मिश्रण व प्रेषण. (४) उच्च कंप्रता-तरंगांचे ग्रहण व अभिज्ञान यांद्वारे मूळ विद्युत् संदेश मिळवणे. (५) विद्युत् संदेश-आकृतीचे परत मूळ दृश्य चित्रात रूपांतर. या ठिकाणी फक्त काळ्या-पांढऱ्‍या रंगांतील चित्रप्रेषणाचाच विचार केला आहे. कारण रंगीत चित्र-प्रेषणाची पद्धती अजून फारशी रूढ झालेली नाही.

प्रकाशकिरणांच्या साहाय्याने चित्र-क्रमवीक्षण : पाठवावयाचे चित्र योग्य आकारमानाच्या (६ ते १५ सेमी. व्यासाच्या) दंडगोलावर बसविले जात. या दंडगोलाला एक ठराविक परिभ्रमण गती व अक्षीय गती विद्युत् चलित्राच्या (मोटारीच्या) साहाय्याने दिली जाते. या चलित्राची परिभ्रमण गती अथवा प्रतिसेकंद होणाऱ्‍या फेऱ्‍यांची संख्या, अत्यंत स्थिर राहणे आवश्यक असल्यामुळे  या कार्याकरिता समकालिक, मंदायन व फोनिक चक्र यांपैकी एका प्रकारच्या चलित्राचा उपयोग करतात [→विद्युत् चलित्र]. यांपैकी पहिल्या प्रकारची चलित्रे सर्वत्र उपलब्ध असलेल्या ५०-६० हर्ट्‌झ कंप्रतेच्या वीज-पुरवठ्यावर कार्य करतात. यांचा परिभ्रमणवेग ६००-३,६०० फेरे/मिनिट असतो. याउलट फोनिक चक्र तत्त्वावर कार्य करणारी चलित्रे उच्च कंप्रतेच्या विद्युत् प्रवाहावर काम करू शकतात. परिभ्रमणवेग स्थिर ठेवण्याकरिता यांच्यावर इलेक्ट्रॉनीय आंदोलकाच्या साहाय्याने नियंत्रण ठेवले जाते. दंडगोलास लागणारा परिभ्रमणवेग फार कमी असल्यामुळे चलित्राबरोबर दंतचक्र-पेटी बसवावी लागते. संपूर्ण चित्राचे क्रमवीक्षण करण्याकरिता या दंडगोलाला अक्षीय गतीही आवश्यक असते. ही गती एक विशेष योजना वापरून याच चलित्रापासून मिळविली जाते. एक मर्यादित क्षेत्रफळाचा प्रकाशझोत फिरत्या दंडगोलावर असलेल्या चित्रावर टाकला जातो. सर्वसाधारणपणे एका वेळी अंदाजे ०·२५ ×०·२५ मिमी. क्षेत्रफळाच्या चित्रविभागाचे क्रमवीक्षण केले जाते. झोताखाली असलेल्या चित्रविभागापासून प्रकाश किरण परावर्तित होतात. या किरणांची तीव्रता परावर्तन करणाऱ्‍या चित्रविभागाच्या काळेपणावर अवलंबून राहील, हे उघड आहे. चित्राच्या निरनिराळ्या विभागांपासून परावर्तनामुळे मिळणाऱ्‍या प्रकाशाची तीव्रता मूळ चित्रात असलेल्या छायाप्रकाशाप्रमाणे बदलत जाते व अशा रीतीने चित्राचे क्रमवीक्षण होते. ही क्रिया करण्याकरिता दोन निरनिराळ्या पद्धती वापरतात. पहिल्या पद्धतीत क्रमवीक्षण करणाऱ्‍या प्रकाश-शलाकेचा आकार फटीच्या साहाय्याने, चित्रविभाग घटकाएवढाच म्हणजे सु. ०·२५ × ०·२५ मिमी. केला जातो. परावर्तित प्रकाश एका भिंगाच्या योगे प्रकाशविद्युत् नलिकेवर पाडला जातो व त्याचे विद्युत् प्रवाह-संदेशात रूपांतर केले जाते.दुसऱ्‍या पद्धतीत प्रकाशाच्या झोताचा आकार वरीलपेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळे एका वेळी चित्राचा ०·२५ × ०·२५ मिमी. पेक्षा जास्त भाग प्रकाशझोताखाली असतो. पण परावर्तित प्रकाशझोताचा मात्र वरील क्षेत्रफळाचाच भाग, त्या आकाराच्या फटीच्या साहाय्याने निवडला जाऊन त्यातील प्रकाश, प्रकाशविद्युत् नलिकेवर सोडला जातो. दुसरी पद्धतच व्यवहारात अधिक प्रमाणात वापरली जाते. प्रकाशविद्युत् नलिकेला एक स्थिर दाब देणारा विद्युत् घट व एक रोधक (विद्युत् प्रवाहाला रोध करणारा घटक) जोडलेला असतो. परावर्तित प्रकाशाच्या तीव्रतेनुसार जेव्हा या विद्युत् मंडलात वाहणारा प्रवाह बदलतो, तेव्हा त्यापासून रोधकावर तसाच बदलणारा विद्युत् दाब संदेश निर्माण होते. हा संदेश फार क्षीण असल्यामुळे ⇨इलेक्ट्रॉनीय विवर्धक वापरून त्याचे विवर्धन करावे लागते.

दंडगोलाचा आकार, त्याची परिभ्रमण गती, क्रमवीक्षण करण्याची वारंवारता या सर्व गोष्टी विचारात घेता मूळ चित्र क्रमवीक्षणापासून मिळणाऱ्‍या कालपरिवर्ती संदेशाच्या कंप्रतेचा पल्ला ०-५०० हर्ट्‌झ असतो. या कंप्रता पल्ल्यातील संदेश, प्रेषण अथवा विवर्धन करण्याकरिता सोईस्कर ठरत नाही. त्यामुळे हा संदेश उच्च कंप्रतेच्या संवह-विद्युत् तरंगांमध्ये मिसळून त्यापासून मिळणारा विरूपित संदेश पुढे पाठवला जातो. तारेच्या साहाय्याने जेव्हा संदेश पाठवावयाचा असतो, तेव्हा संवह तरंगांची कंप्रता १,३००-१९,०० हर्ट्‌झ ठेवतात. रेडिओ तरंगांच्या द्वारे जेव्हा प्रेषण केले जाते, तेव्हा संवह तरंगांची कंप्रता अर्थातच अनेक पटींनी जास्त असते.

तारेच्या साहाय्याने जेव्हा संदेशप्रेषण करावयाचे असते तेव्हा संवह तरंगांचे विरूपण करण्याकरिता अनेक पद्धती उपलब्ध आहेत.

प्रकाश-विरूपण-पद्धती : या पद्धतीत चित्रविभागापासून परावर्तित होणाऱ्‍या प्रकाशकिरणांच्या मार्गात चित्र व प्रकाशविद्युत् नलिका यांमध्ये एक फिरणारी तबकडी असते. या तबकडीच्या परिघाभोवती सारख्या आकाराचे दाते असतात. तबकडीच्या काही अवस्थांत प्रकाश दोन आनुक्रमिक दात्यांमधील फटीतून अविरोध जाऊ शकतो. तबकडी जर एका ठराविक उच्च परिभ्रमणगतीने फिरवली, तर त्यामुळे प्रकाश-शलाका ठराविक कंप्रतेने खंडित होते. अशा प्रकारे परिणामी चित्र-संदेशाने ज्याचे परमप्रसर-विरूपण झाले आहे अशा उच्च कंप्रतेचे संवह तरंग निर्माण होतात (उदा., ७,२०० हर्ट्‌झ). या पद्धतीच्या दुसऱ्‍या एका प्रकारात मूळ प्रकाश-शलाकाच, वरीलप्रमाणे दाते असलेल्या फिरत्या तबकडीच्या किंवा कंपित्राच्या (कंपन पावणाऱ्‍या साधनाच्या) साहाय्याने ठराविक कालानंतर सतत खंडित केली जाते. या पद्धतीच्या तिसऱ्या प्रकारात प्रकाश-विरूपण करण्याकरिता ही यांत्रिक रीत वापरत नाहीत. हे कार्य इलेक्ट्रॉनीय पद्धतीने केले जाते. यामध्ये प्रकाश-शलाकेला लागणारा प्रकाश उत्तेजक दिव्यापासून (एका विशेष प्रकारच्या दिव्यापासून) पुरवला जातो. या दिव्यामधून मिळणाऱ्‍या प्रकाशाची तीव्रता त्याला लावलेल्या विद्युत् दाबाच्या रैखिक (एकघाती) प्रमाणात अवलंबून असते. संवह-कंप्रता असलेल्या एका इलेक्ट्रॉनीय आंदोलकापासून या दिव्याला विद्युत् दाब पुरवला जातो. त्यामुळे त्यापासून मिळणारा प्रकाश त्याच प्रत्यावर्ती कंप्रतेचा बनतो. हा प्रकाश चित्रविभागावरून परावर्तित झाला म्हणजे त्याचे परमप्रसर-विरूपण होते.

व्यवहारात आणखी एक पद्धत वापरतात. तिला ‘समतोल सेति-विरूपण-पद्धती’ म्हणतात. त्यामध्ये दोन प्रकाशविद्युत् नलिका एकसरीत (एकापुढे एक) अशा रीतीने जोडतात की, एकीची ऋणाग्र दुसरीच्या धनाग्राशी जोडलेला असतो. दोन रोधक-धारित्र (विद्युत् भार संग्रहित करणारे साधन, → विद्युत् धारित्र) जाल वापरून एक सेतुरचना केली जाते. याच्या एका बाजूमध्ये एक रोधक व एक धारित्र असते. यांची मूल्ये बदलता येतात. दुसऱ्‍या बाजूमध्ये परत एक रोधक असून त्याच्या एकसरीत वरील नलिका जोडी जोडलेली असते. या सेतूला इष्ट संवह-कंप्रतेचा वीज-पुरवठा असून,


सेतू समतोल झाला आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता एक प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणारा) विद्युत् प्रवाहदर्शक व त्याचबरोबरच एक रोधक भार सेतूच्या दोन टोकांना जोडतात. जेव्हा नलिकांवर प्रकाश पडत नाही (म्हणजे नलिका अंधारात असतात) तेव्हा रोधक व धारित्र यांची मूल्ये बदलून समतोल साधला जातो. विद्युत् क्षरण (झिरपणे) वगैरे कारणांमुळे निर्माण होणारे एकदिश विद्युत् प्रवाह एकमेकांस नष्ट करतात. प्रकाश दोन्ही नलिकांवर टाकला असता सेतूचा समतोल भंग पावतो व रोधक भारावर बदलत्या प्रकाशामुळे परमप्रसर-विरूपण झालेला एक संवह-संदेश निर्माण होतो.

विद्युत संदेशाचे ग्रहण, अभिज्ञान व रूपांतर : ग्रहणकेंद्रावर येणारे विद्युत् तरंग स्थानिक आंदोलकांच्या तरंगांबरोबर मिसळून संकरण (दोन भिन्न कंप्रतांच्या बेरीज व वजाबाकीइतक्या कंप्रता असलेले तरंग निर्माण करण्याच्या) पद्धतीने मूळ संदेश संवह-तरंगापासून अलग केला जातो. या कमी कंप्रतेने बदलणाऱ्‍या विद्युत् प्रवाहाचे प्रकाशात परत रूपांतर करण्याकरिता मुख्यतः दोन रीती उपलब्ध आहेत. पहिल्या पद्धतीत हा विद्युत् प्रवाह उत्तेजक दिव्याला पुरवला जातो. या दिव्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यापासून मिळणाऱ्‍या प्रकाशाची तीव्रता विद्युत् प्रवाहाप्रमाणेच बदल दाखविते. दुसऱ्‍या पद्धतीत ‘डडेल दोलनदर्शक यंत्र’ या कार्याकरिता वापरतात. या दर्शकात एक तारेचे वेटोळे असून ते ताणलेल्या दोन बारिक तारांच्या आधाराने एका कायम चुंबकीय क्षेत्रात ठेवलेले असते. वेटोळ्यावर एक अतिसूक्ष्म आकाराचा आरसा बसवलेला असतो. एक फट व भिंग योजनेच्या साहाय्याने एका दिव्यापासून मिळणारा प्रकाश या आरशावर टाकला जातो. त्यापासून परावर्तित होणारा प्रकाश दुसऱ्‍या बाजूस योग्य ठिकाणी ठेवलेल्या फटीतून बाहेर पडतो. संदेशातून मिळणारा कालपरिवर्ती विद्युत् प्रवाह दर्शकाच्या वेटोळ्यात सोडला असता ते वेटोळे व त्यावर बसवलेला आरसा हा दोन्ही विचलित होतात. दुसऱ्‍या फटीची दिशा व आरशाच्या विचलनाची दिशा अशा योजलेल्या असतात की, विचलनामुळे फटीतून बाहेर पडणाऱ्‍या प्रकाश-ऊर्जेचे परिमाण बदलत जाते. अशा रीतीने मिळालेल्या बदलत्या प्रकाश-ऊर्जेतून मूळ चित्र मिळण्याकरिता प्रेषणकेंद्रात असलेल्या फिरत्या दंडगोलासारखीच योजना ग्रहणकेंद्रावर वापरतात. मिळणारे चित्र निर्दोष व स्पष्ट येण्याकरिता हे दोन्हीही दंडगोल एकाच कायम परिभ्रमण गतीने फिरणे आवश्यक तर आहेच पण त्यांच्या गती समकालिक होऊन त्यांच्या कलासुद्धा (आवर्त गतीतील कोनामध्ये मोजण्यात येणारी स्थितीसुद्धा)एकसारख्या राहतील, अशी विशेष योजना करावी लागते. याकरिता त्यांना गती देण्याकरिता वापरलेल्या चलित्रांच्या गतीवर कंपन-द्विशूलाच्या (ठराविक कंप्रता देणारे दोन काटे असलेल्या Y अशा आकाराच्या साधनाच्या) साहाय्याने नियंत्रण केले जाते.

दंडगोल एकाच कलेत आणण्याकरिता प्रेषणकेंद्रातून प्रत्येक आवर्तनानंतर एक विद्युत् सांकेतिक संदेश पाठवला जातो. त्यामुळे दोन्ही दंडगोल एकाच वेळी सुरू करणे शक्य होते.

ग्रहणकेंद्रावरील फिरत्या दंडगोलावर एक छायाचित्रण-कागद चढवून, त्यावर बदलत्या तीव्रतेचे प्रकाशकिरण सोडले असता त्यावर कच्चे चित्र उमटते. त्यावर योग्य रासायनिक विक्रिया करून त्यापासून मूळ चित्र मिळवता येते.

बिनतारी चित्रप्रेषण : वरील विवेचन तारेद्वारा पाठविण्याच्या चित्रासंबंधी आहे. एका सेकंदात पाठविलेल्या संदेशांची संख्या वाढवावयाची असेल तर संवह-तरंगांची कंप्रता वाढवून ती कित्येक सहस्त्र अथवा लक्ष हर्ट्‌झ करणे शक्य होते. याकरिता परमप्रसर आणि कंप्रता-विरूपण-पद्धती वापरतात. रेडिओ प्रेषणात श्राव्य संदेश प्रेषित करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्‍या पद्धतींसारख्याच पद्धती हे कार्य करण्याकरिता योजतात.

संदर्भ : Henney, K. Radio engineering Handbook, New York, 1959.

 मोडक, बृ. वि.