रेडिओ प्रेषण : (रेडिओ प्रेक्षेपण). सर्वसाधारण जनतेच्या श्रवणासाठी रेडिओ कार्यक्रम प्रेषित करण्याची क्रिया या अर्थाने ‘रेडिओ प्रेषण’ ही संज्ञा येथे वापरली आहे. अर्थात विशिष्ट ⇨रेडिओ ग्राही संचाच्या दिशेने प्रेषित केलेल्या खाजगी रेडिओ संकेतांचा यात समावेश नाही. विखुरलेल्या व योग्य ग्रहण साधने जवळ असलेल्या श्रोत्यांकरिता मनोरंजन, माहिती, शैक्षणिक कार्यक्रम व इतर प्रसंगविशेषी कार्यक्रम यांचे एकाच वेळी पद्धतशीरपणे प्रेषण करणे असे रेडिओ प्रेषणाचे सर्वसामान्य वर्णन करता येईल. रेडिओ प्रेषण हे एकमार्गी संदेशवहन प्रस्थापित करण्याचे साधन आहे. रेडिओ प्रेषणात फक्त ध्वनीचे प्रेषण करण्यात येते, तर दूरचित्रवाणी प्रेषणात दृक् तसेच श्राव्य असे संयुक्त प्रेषण करण्यात येते. या अर्थाने रेडिओ प्रेषणास १९२० च्या सुमारास तर दूरचित्रवाणी प्रेषणाला १९३० नंतरच्या दशकात (१९३६ मध्ये) प्रारंभ झाला. कित्येक देशांत रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्या प्रेषणाचे व्यवस्थापन एकत्रितपणे करण्यात येत असल्याने प्रस्तुत नोंदीत रेडिओ प्रेषणाबरोबरच दूरचित्रवाणी प्रेषणाचीही (व अनुषंगिक बाबींची) माहिती दिलेली आहे. (दूरचित्रवाणी प्रेषणाची काही तांत्रिक माहिती ‘दूरचित्रवाणी’ या नोंदीत दिलेली आहे).

जनसंपर्काकरिता किंवा सामान्य जनांमध्ये ज्ञान व माहिती यांचा प्रसार करण्यकरिता मुद्रण तंत्राइतकीच रेडिओ प्रेषणाची पद्धत महत्त्वाची ठरलेली आहे. ट्रँझिस्टरयुक्त सुवाह्य रेडिओ ग्राही संच १९६० नंतर फार मोठ्या प्रमाणात प्रचारात आल्यावर रेडिओ कार्यक्रमांच्या प्रेषणास तितक्याच मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.

इतिहास : रेडिओ तरंगांची निर्मिती व त्याद्वारे माहितीचे प्रेषण आणि शेवटी त्यांचे अभिज्ञापन करणे (शोध घेणे) या सर्व प्रक्रिया प्रत्यक्षात येण्यास जे. सी. मॅक्सवेल, हाइन्रिख हर्ट्झ, मार्केझे मार्कोनी, आर्. ए. फेसंडेन, ली डी फॉरेस्ट वगैरे अनेक शास्त्रज्ञांचे सैद्धांतिक व तांत्रिक संशोधन कार्य कारणीभूत झाले. [⟶ रेडिओ संदेशवहन प्रणाली].

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिला ज्ञात रेडिओ कार्यक्रम आर्. ए. फेसंडेन यांनी ब्रांट रॉक, मॅसॅचूसेट्स येथील आपल्या प्रायोगिक रेडिओ केंद्रातून १९०६ मध्ये प्रेषित केला. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रेडिओवरील लष्करी निर्बंध शिथिल झाल्यावर हौशी लोकांनी चालविलेली अनेक प्रायोगिक केंद्रे स्थापन झाली. या प्रेषणाचा पल्ला काही किलोमीटर एवढाच होता व ते ऐकण्यासाठी लागणारी सामग्री बहुतांशी रेडिओ हा छंद म्हणून जोपासणाऱ्‍या इतर प्रयोगकर्त्यांकडेच होती. प्रारंभी ग्रामोफोनच्या ध्वनिमुद्रिका आणि इतर प्रयोगकर्त्यांचे मनोरंजन करण्यासाठी हौशी मंडळींनी केलेले कार्यक्रम असे प्रेषित कार्यक्रमांचे स्वरूप होते. त्याच वेळी ⇨ध्वनिग्राहकात (मायक्रोफोन- मध्ये) सुधारण करण्यासाठी व अगदी जुजबी तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तींनाही वापरता येईल अशा रेडिओ ग्राहीचा विकास करण्यासाठी प्रयोगकार्य हाती घेण्यात आले. या प्रारंभीच्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्यांत डेव्हिड सार्नॉक (पुढे त्यांनी रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका व नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी यांत काम केले) यांचा समावेश होतो आणि त्यांनी रेडिओ ग्राही प्रत्येक घरात पोहोचण्याची शक्यता १९१६ मध्येच वर्तविली होती. अगोदरच अस्तित्वात असलेल्या केंद्रांनी काही योजनाबद्ध व नियमित कार्यक्रम प्रेषित करण्यास सुरूवात केली. प्रारंभी याकरिता हौशी व पुढे स्वेच्छेने काम करणाऱ्‍या व्यावसायिक कलाकारांचा उपयोग करण्यात आला. संगीताचे कार्यक्रम ऐकू इच्छिणाऱ्‍या व्यक्तींची संख्या खूप वाढल्याने सर्वसामान्य व्यक्तीला सुलभतेने वापरता येईल अशा रेडिओ ग्राहीची मागणी वाढली. श्रोत्यांच्या वाढत्या संख्येमुळे मनोरंजक व माहितीपर कार्यक्रमांसाठी नवीन केंद्रांची स्थापना करणे उचित ठरले.

पिट्सबर्ग येथील वेस्टिंगहाऊस कॉर्पोरेशनच्या केडीकेए (KDKA) या पहिल्या व्यापारी रेडिओ केंद्राने २ नोव्हेंबर १९२० रोजी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल प्रेषित केला. या व त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संगीताच्या कार्यक्रमांमुळे अशी व्यापारी रेडिओ केंद्रे स्थापन करण्यास चालना मिळाली. १९२१ च्या अखेरीस अशी आठ केंद्रे प्रेषणकार्य करीत होती. या प्रारंभीच्या केंद्रांच्या लोकप्रियतेमुळे प्रेषणाचा खर्च भागविण्याच्या दृष्टीने रेडिओ ग्राही साधनांचे उत्पादन व त्यांची विक्री आणि रेडिओ प्रेषण हे जाहिरातींसाठी माध्यम म्हणून वापरणे अशी दोन संभाव्य साधने निर्माण झाली. अमेरिकेत सरतेशेवटी प्रेषणासाठी जाहिराती हाच प्रमुख आर्थिक आधार झाला. १९२१-२२ या काळात रेडिओ ग्राही संच व त्यांचे सुटे भाग यांच्या विक्रीला मोठी तेजी आली आणि प्रेषण केंद्रांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढून १९२२ च्या अखेरीस ५६४ प्रेषण केंद्रांना परवाने देण्यात आलेले होते.

दीर्घ अंतरासाठी वापरण्यात येणाऱ्‍या दूरध्वनी तारांचा उपयोग रेडिओ केंद्रे जोडण्यासाठी १९२२ मध्ये करण्यात आला व त्यामुळे जाळे (नेटवर्क) ही नवीन कल्पना रेडिओ प्रेषणात प्रचारात आली. १९२६ साली नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीने दररोजच्या कार्यक्रमांचे अशा प्रकारे जोडलेल्या रेडिओ केंद्राचे एक जाळे प्रस्थापित केले.यांतील काही कार्यक्रम जाहिरातदारांनी प्रायोजित केलेले असल्याने केंद्रांच्या जाळ्याला व संलग्न केंद्रांना उत्पन्न मिळू लागले. रेडिओ प्रेषणाची वाढ अमेरिकेत प्रारंभी विलक्षण जलद गतीने झाली, तर ती योजनारहित व अनियंत्रित होती. याखेरीज रेडिओ साधनसामग्रीचे प्रमुख उत्पादक व प्रमुख प्रेषणकर्ते यांच्यातील व्यावसायिक तजवीजीमुळे मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका उत्पन्न झाला. याकरिता काँग्रेसने (विधिमंडळाने) १९२७ मध्ये रेडिओ अधिनियम संमत करून प्रेषणकर्त्यांना प्रेषणासाठी रेडिओ तरंगलांब्या वाटून देण्याकरिता एक आयोग नेमला. मक्तेदारी विरूद्धच्या या शासकीय कार्यवाहीमुळे परिणामतः नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी, कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टिम, म्युच्युअल ब्रॉडकास्टिंग सिस्टिम व अमेरिकन ब्रॉडकास्टिंग सिस्टिम ही चार रेडिओ केंद्रांची जाळी प्रस्थापित झाली आणि आयोगामुळे सुव्यवस्थित वाढ होणे व शैक्षणिक रेडिओ केंद्रे टिकून राहणे शक्य झाले.

अमेरिकेशी तुलना करता ब्रिटनमध्ये रेडिओ प्रेषणाचा विकास निराळ्याच मार्गाने झाला. पहिल्या महायुद्धानंतर ज्या व्यापारी संस्थांनी पुढाकार घेतला त्यांनी रेडिओ प्रेषण हे मुख्यत्वे थेट संदेशवहनाचे एक साधन म्हणून मानले. १९१९ मध्ये अटलांटिक महासागराच्या पार मानवी आवाजाचे प्रेषण करण्यात यश मिळाल्यावर एसेक्समधील चेम्सफर्ड येथून दररोज अर्ध्या तासाचे दोन कार्यक्रम प्रेषित करण्यासाठी सहा किलोवॉट शक्तीचा प्रेषक उभारण्यात आला. लष्करी सेवांचा विरोध, अत्यावश्यक संदेशवहनांमध्ये अडथळा निर्माण होण्याची भीती व रेडिओचे व्यापारीकरण टाळण्याची इच्छा यांमुळे टपाल खात्याने या चेम्सफर्ड प्रेषणांना बंदी घातली, तरी सुद्धा मार्च १९२१ पावेतो ४,००० ग्राही संच परवाने व १५० हौशी प्रेषण परवाने देण्यात आले. पुढे नियमित कार्यक्रम प्रेषणांची मागणी वाढल्याने मार्कोनी कंपनीला दर आठवड्याला सु. १५ मिनिटे प्रेषण करण्याचा अधिकार देण्यात आला. असे पहिले अधिकृत प्रेषण चेम्सफर्डजवळील रिटल येथील केंद्रातून १४ फेब्रुवारी १९२२ रोजी करण्यात आले. नंतर अशी इतर केंद्रेही स्थापन करण्यात आली.


या वेळेपावेतो अमेरिकेतील अनुभवावरून रेडिओच्या व्यापारी उपयोगाची शक्यता तसेच अधिक सुव्यवस्था व नियंत्रण यांची आवश्यकता दिसून आली होती. टपाल खात्याने उत्पादकांमध्ये सहकार्य होण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला व १२ ऑक्टोबर १९२२ रोजी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी, लि. या खाजगी निगमाची स्थापना झाली. या कंपनीचे सर्व संचालक उत्पादकांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणारे होते. या कंपनीला ग्राहींचे परवाना शुल्क आणि ग्राही संच व सामग्री यांच्या विक्रीवरील स्वामित्व शुल्क यांतून उत्पन्न मिळत असे. प्रांतिक केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि सर्व केंद्रांनी बातम्या, माहिती, संगीत सभा, व्याख्याने, शैक्षणिक विषय, हवामान वृत्त, नाट्यात्मक मनोरंजन वगैरेंचे प्रेषण करावे अशी अपेक्षा होती.

रेडिओ प्रेषणासंबंधी ब्रिटनमध्ये यापूर्वीचे काही शिरस्ते प्रस्थापित झालेले होते व नंतर इतर देशांतून ते अनुसरण्यात आले. यांपैकी परवाना शुल्काचे उत्पन्न हा सर्वांत महत्त्वाचा होता. ग्राही संच व सामग्री यांवरील स्वामित्व शुल्क पद्धती पुढे ब्रिटनमध्ये सोडून देण्यात आल्यानंतरही इतर देशांत स्वीकारण्यात आली. ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी ही मक्तेदार असल्याने व यामुळे इतर देशांच्या मानाने ब्रिटिश रेडिओचा विकास अधिक व्यवस्थितपणे झाल्याने वित्त नियंत्रण, वादग्रस्त विषयासंबंधीचे प्रेषण, शासनाशी संबंध, केंद्र जाळ्याची संघटना, सार्वजनिक-सेवा प्रेषण वगैरे प्रेषणासंबंधीच्या समस्या लक्षात आल्या आणि इतर देशांच्या मानाने ब्रिटनमध्ये त्यांवर उत्तरे शोधण्याचे काम लवकर झाले. १९२५ मध्ये संसदीय समितीच्या शिफारशीवरून वरील कंपनी परिसमापित करण्यात येऊन तिच्या जागी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) या सार्वजनिक निगमाची स्थापना करण्यात आली. या निगमाचे उत्तरदायित्व शेवटी संसदेकडे असले, तरी दैनंदिन नियंत्रण नियामक मंडळाच्या तारतम्यावर सोपविण्यात आले. नियामक मंडळाच्या सदस्यांच्या नेमणुका कोणत्याही वर्गांच्या हितसंबंधाऐवजी त्यांचा दर्जा व अनुभव लक्षात घेऊनच करण्याचे ठरले. मूळ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निगमाचे महासंचालक जॉन रीथ यांची सार्वजनिक सेवा प्रेषणाची संकल्पना ब्रिटनमध्ये रूढ झाली आणि इतर अनेक देशांत तिचा प्रभाव पडला. १९५४ मध्ये इंडिपेंडट टेलिव्हिजन ॲथॉरिटी या प्राधिकरणाची स्थापना होईपर्यंत बीबीसीची मक्तेदारी टिकून राहिली. १९७० नंतरच्या दशकात शासनाने स्थानिक व्यापारी प्रेषणांना परवानगी दिल्यावर बीबीसीची रेडिओ मक्तेदारी संपुष्टात आली.

अमेरिकेतील पिट्सबर्ग येथील आद्य प्रेषण केंद्र सुरू व्हावयाच्याही आधी नेदर्लंड्समधील हेग येथून नियमित प्रेषण सुरू झाले होते आणि ते नोव्हेंबर १९१९ ते १९२४ पर्यंत चालू होते. कॅनडात माँट्रिऑल येथून १९२० मध्ये, तर ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथील लहान केंद्रातून १९२१ मध्ये पण अधिकृत रीत्या सिडनी येथून १९२३ मध्ये नियमित रेडिओ प्रेषणास प्रारंभ झाला. न्यूझीलंडमध्ये कित्येक कमी शक्तीची केंद्रे १९२१ मध्ये चालू होती पण तेथील रेडिओ ब्रॉडकास्टिंग कंपनीची स्थापना १९२७ मध्ये झाली. डेन्मार्कमध्ये प्रायोगिक हौशी प्रेषण केंद्रे १९२१ मध्ये चालू झाली व अधिकृत स्टेट ब्रॉडकास्टिंग सिस्टिम १९२५ मध्ये स्थापन झाली. फ्रान्समध्ये आयफेल मनोऱ्‍यावरून नियमित प्रेषणास १९२२ मध्ये सुरूवात झाली व त्याच वर्षी रशियातील पहिले केंद्र मॉस्को येथून प्रेषण करू लागले. १९२३ च्या अखेरीस बेल्जियम, चेकोस्लोव्हाकिया, जर्मनी व स्पेन या देशांतही रेडिओ केंद्रे स्थापन झाली. त्यानंतर रेडिओ प्रेषण करणाऱ्‍या देशांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यात फिनलंड व इटली या देशांनी १९२४ मध्ये, तर नॉर्वे, पोलंड, मेक्सिको व जपान या देशांनी १९२५ मध्ये रेडिओ प्रेषणास प्रारंभ केला. भारतात संघटित रेडिओ प्रेषणास १९२६ मध्ये सुरूवात झाली आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने मुंबई व कलकत्ता येथे १९२७ मध्ये दोन केंद्रे चालू केली. [⟶ आकाशवाणी].

वरील बहुतेक देशांत प्रेषणाच्या नियंत्रणासंबंधीची समस्या उद्‌भवली. काही देशांत खाजगी उपक्रमाला पूर्ण मुभा देण्यात आली. मात्र याकरिता एखाद्या शासकीय खात्याचा वा अभिकरणाचा परवाना मिळविणे, तसेच प्रेषणासाठी वापरावयाच्या तरंगलांब्या वा कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्‍या कंपनांची संख्या) याबाबत करार करणे आवश्यक ठरविण्यात आले. इतर काही देशांत अधिक बारीक नियंत्रण (उदा., फ्रान्स) किंवा संभाव्य परस्परविरोधी हितसंबंध असणाऱ्‍यां सहकार्य होण्यास प्रोत्साहन देणे (उदा., जपान, जर्मनी) हे मार्ग अनुसरण्यात आले. डेन्मार्क, स्वीडन व कित्येक राष्ट्रकुल देशांत तसेच काही ब्रिटीश वसाहतींत ब्रिटनचे अनुकरण करण्यात आले. कॅनडात व फ्रान्समध्ये राज्य व खाजगी उपक्रम जोडीने चालू होते. कॅनडात १९३६ मध्ये कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कमिशन स्थापन होईपर्यंत खाजगी केंद्रे सुस्थिर झालेली होती. फ्रान्समध्ये प्रारंभी टपाल व तार खात्यामार्फत रेडिओ प्रेषण हाताळले जाई. १९२३ मध्ये रेडिओ प्रेषण ही राज्य मक्तेदारी म्हणून जाहीर झाली. दुसऱ्‍या महायुद्धापर्यंत राज्य प्रेषण व्यवस्था टपाल व तार खात्याचा एक विभाग होता पण काही खाजगी केंद्रांनाही परवाने देण्यात आलेले होते. यांपैकी काही खाजगी व्यापारी केंद्रे १९४५ पर्यंत सरकारी नियंत्रणाखाली चालू होती परंतु तेव्हा त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आणि रेडिओ प्रेषण ही टपाल व तार खात्यापासून स्वतंत्र पण सरकारशी उत्तरदायित्त्व असलेली पूर्णतः राज्य मक्तेदारी बनली. जर्मनीत प्रेषणाच्या सर्व तांत्रिक सामग्रीवर टपाल खात्याचे नियंत्रण व मालकी होती, तर खाजगी कंपन्या विविध शहरांतून कार्यक्रमांचे प्रेषण करीत. लवकरच राइश ब्रॉडकास्टिंग कंपनीने या सर्व खाजगी कंपन्यांवर नियंत्रण मिळविले व १९३२ मध्ये त्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


आंतरराष्ट्रीय परिषदा : प्रेषणासाठी वापरावयाच्या तरंगलांब्यांच्या परस्पर व्यत्ययाच्या समस्यांमुळे अमेरिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला व ब्रिटनमध्ये मक्तेदारीसाठी प्रबळ कारण मिळाले. याच समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः दाट लोकवस्ती व प्रगत सार्वभौम देश असलेल्या यूरोपात, निर्माण झाल्या आणि याबाबत आंतरराष्ट्रीय करार होण्यास कारणीभूत झाल्या. एकोणिसाव्या शतकात तारायंत्रविद्येच्या वाढत्या प्रसारामुळे १८६५ मध्ये पॅरिस येथे एक परिषद भरली व तीतून पुढे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन या नावाने ओळखण्यात येऊ लागलेली संघटना स्थापन झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संदेशवहनासंबंधी चर्चा करण्यासाठी बर्लिन येथे १८८५ मध्ये, रेडिओ तारायंत्रासंबंधी बर्लिन येथेच १९०३ व १९०६ मध्ये आणि रेडिओ संदेशवहनाच्या संपूर्ण क्षेत्रासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी लंडन येथे परिषदा झाल्या. १९२५ साली लंडन येथे १० देशांची अनौपचारिक परिषद भरली व तीतून युनियन इंटरनॅशनल द रेडिओफोनी या संघटनेची स्थापना झाली. ही जिनीव्हा येथे अधिष्ठित असलेली व पहिली रेडिओ प्रेषण संघटना होती. तरंगलांब्यांचा वापर, कृतिस्वामित्वाचे प्रश्न व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम-विनियम यांसंबंधी चर्चा करण्यात आली व एक योजना आखण्यात आली. नोव्हेंबर १९२६ मध्ये अंमलात आलेला तरंगलांब्यांच्या वाटपासंबंधीचा करार हा क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि दूरध्वनी व तारायंत्र दळणवळणाची व्याप्ती यांचा अंतर्भाव केलेल्या सूत्रावर आधारलेला होता. या करारात सहभागी झालेल्या सर्व प्रगत देशांना (यांची संख्या १६ इतकी वाढली ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, आयर्लंड, इटली, नेदर्लंड्स, नॉर्वे, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड व ब्रिटन) काही प्रमाणात त्याग करावा लागला तथापि आंतरराष्ट्रीय कराराचे तत्त्व प्रस्थापित झाले. १९२७ मध्ये वॉशिंग्टन येथे भरलेल्या परिषदेत रेडिओ तारायंत्र, रेडिओ प्रेषण व तरंगलांब्यांचे (वा कंप्रतांचे) आंतरराष्ट्रीय वाटप यांच्या बाबतीतील सहकार्याची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यानंतर १९३२ च्या माद्रिद परिषदेत नियम संहिताबद्ध करण्यात आले व अधिकृत आंतरराष्ट्रीय कंप्रता यादी प्रस्थापित करण्यात आली. या करारामुळे दुसऱ्‍या महायुद्धापर्यंत प्रेषण परिस्थिती स्थिरावली परंतु महायुद्धानंतर यूरोपातील परिस्थितीत पुष्कळच बदल झाल्याने १९४८ सालच्या कोपनहेगन परिषदेत यूरोपीय प्रेषण क्षेत्रातील कंप्रतांचे पुनर्वाटप करण्यात आले. १९४७ मधील अटलांटिक सिटी येथील परिषदेत आंतरराष्ट्रीय कंप्रता नोंदणी मंडळाची स्थापना झाली. व्वेनस एअरीझ येथील १९५२ च्या परिषदेत आंतरराष्ट्रीय दूरसंदेशवहन कराराचा मसुदा तयार करण्यात आला. जिनीव्हा येथे १९५९ मध्ये या मसुद्यात तसेच रेडिओ विनियमांत सुधारणा करण्यात आली. पुढे १९६३ मध्ये जिनीव्हा येथेच अवकाशातील व पृथ्वी-अवकाश दरम्यानच्या संदेशवहनासाठी कंप्रता पट्ट्यांचे वाटप करण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय संघटना : १८६५ मध्ये स्थापन झालेल्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियनचे जगभर सदस्य आहेत. या संघटनेच्या अखत्यारीत आंतरराष्ट्रीय कंप्रता नोंदणी मंडळ, आंतरराष्ट्रीय तारायंत्र व दूरध्वनी सल्लागार मंडळ आणि आंतरराष्ट्रीय रेडिओ सल्लागार समिती या कार्य करीत आहेत. दुसऱ्‍या महायुद्धानंतर या संघटनेखेरीज इतर काही संघटनाही स्थापन झालेल्या असून त्या प्रामुख्याने प्रादेशिक स्वरूपाच्या आहेत. पूर्व आणि पश्चिमी देशांतील तणावामूळे युनियन इंटरनॅशनल द रेडिओफोनी या संघटनेस कार्य करणे अशक्य झाल्याने पश्चिम यूरोपातील देशांनी यूरोपीयन ब्रॉडकास्टिंग युनियन ही मजबूत संघटना १९५० मध्ये उभारली. या संघटनेच्या सदस्यांत पश्चिम यूरोपीय देशांबरोबरच आता सायप्रस, ग्रीस, आइसलँड, इझ्राएल, लेबानन, मोरोक्को, ट्युनिशिया, तुर्कस्तान व यूगोस्लाव्हिया या देशांचाही समावेश होतो. यांखेरीज अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बहुसंख्य राष्ट्रकुल देश व पूर्वीच्या फ्रेंच वसाहतींचे देश तसेच जपान व कित्येक लॅटिन अमेरिकन देश सहयोगी सदस्य आहेत. १९५० मध्येच स्थापन झालेली इंटरनॅशनल रेडिओ अँड टेलिव्हिजन ऑर्गनायझेशन ही समांतर संघटना बहुतेक सर्व कम्युनिस्ट देशांकरिता तसेच कम्युनिस्ट गटाच्या मित्र देशांकरिता कार्य करते. यूरोपीयन ब्रॉडकास्टिंग युनियनचे मुख्यालय जिनीव्हा येथे, तर इंटरनॅशनल रेडिओ अँड टेलिव्हिजन ऑर्गनायझेशनचे प्राग येथे आहे.

आशिया व पॅसिफिक प्रदेशातील राष्ट्रीय प्रेषण संघटनांची एकत्रित संघटना एशियन ब्रॉडकास्टिंग युनियन या नावाने १९६४ मध्ये स्थापन झाली. या संघटनेचे मुख्यालय टोकिओ येथे असून जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिलिपीन्स तसेच इराण, तुर्कस्तान, ईजिप्त व आशियातील बहुतेक कम्युनिस्टेतर देश तिचे सदस्य आहेत. युनियन ऑफ नॅशनल रेडिओ अँड टेलिव्हिजन ऑर्गनायझेशन्स ऑफ आफ्रिका या १९६२ मध्ये स्थापन झालेल्या संघटनेत बहुतांश पूर्वीच्या फ्रेंच व ब्रिटीश वसाहतींचा समावेश आहे. या संघटनेचे अधिष्ठान सेनेगलमधील डाकार येथे, तर तांत्रिक केंद्र मालीतील मार्काला येथे आहे. १९३९ मध्ये अरब स्टेट्स ब्रॉडकास्टिंग युनियन ही अरब लीगच्या चौकटीत आंतर शासकीय संघटना स्थापन झाली. तिचे सचिवालय कैरो येथे व अभियांत्रिकी केंद्र सूदानमधील खार्टूम येथे आहे. ॲसोसिॲसिऑन इंटरअमेरिकाना द रेडिओडिफ्यूजन या संघटनेत उत्तर, मध्य व दक्षिण अमेरिकेतील देशांचा समावेश असून तिचे मध्यवर्ती कार्यालय यूरग्वायमधील माँटेव्हिडिओ येथे आहे. कॉमनवेल्थ बॉडकास्टिंग ॲसोसिएशन ही १९४५ मध्ये स्थापन झालेली संघटना राष्ट्रकूल देशांतील राष्ट्रीय सार्वजनिक-सेवा प्रेषण संघटनांची स्थायी संघटना असून तिचे सचिवालय लंडन येथे आहे.

वरील संघटनांखेरीज इतर आंतरराष्ट्रीय प्रेषण संस्था असून त्यांत संयुक्त राष्ट्रे आणि यूनेस्कोचा वृत्तपत्र व दृक्-श्राव्य माहिती विभाग यांचा समावेश होतो. लंडन येथे मुख्यालय असलेला इंटरनॅशनल ब्रॉडकास्ट इन्स्टिट्यूट हा १९६८ मध्ये उदार प्रतिष्ठानांच्या मदतीने स्थापन झालेला लाभरहित व बिनसरकारी संघ माहिती प्रसार तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक हेतूंसाठी मुक्तपणे संदेशवहन होण्यासाठी प्रयत्न करतो. धार्मिक प्रेषण संस्थाही बऱ्‍याच असून त्यांपैकी काही प्रादेशिक व काही जागतिक प्रमाणावरील आहेत. यांतील सर्वांत महत्त्वाच्या संस्था म्हणजे १९६८ मध्ये लंडन येथे स्थापन झालेली वर्ल्ड ॲसोसिएशन फॉर ख्रिश्चन कम्युनिकेशन्स आणि ब्रूसेल्स येथील ॲसोसिएशन कॅथलिक इंटरनॅशनल पूर ला रेडिओडिफ्यूजन एट ला टेलिव्हिजन या होत.

दूरचित्रवाणी प्रेषण : ग्रेट ब्रिटन, यूरोप, रशिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील तांत्रिक विकासाद्वारे १९३१ मध्ये दूरचित्रवाणी तांत्रिक दृष्ट्या साध्य झाली. त्या वर्षी ब्रिटनमध्ये आयझॅक शनबर्ग यांच्या हाताखाली एक संशोधन गट स्थापन करण्यात आला. शनबर्ग यांना रेडिओ प्रेषणासंबंधीचा व्यापक अनुभव मिळालेला होता. अनेक वर्षे टिकू शकेल अशी दूरचित्रवाणी प्रेषण प्रणाली प्रस्थापित करणे आवश्यक आहे. कारण मूलभूत मानकांत होणाऱ्‍या नंतरच्या बदलांमुळे गंभीर तांत्रिक व आर्थिक समस्या उद्भवतील, हे शनबर्ग यांनी ओळखले होते. शनबर्ग यांची इलेक्ट्रॉनीय क्रमवीक्षण पद्धती [दृक् प्रतिमेचे प्रेषण करण्यासाठी इलेक्ट्रॉन शलाकेने तिचे ठराविक क्रमाने निरीक्षण करण्याची पद्धती ⟶ दूरचित्रवाणी] जॉन बेअर्ड यांच्या यांत्रिक क्रमवीक्षण पद्धतीपेक्षा अतिशय सरस होती. सरकारने बीबीसीला शनबर्ग यांची मानके (प्रत्येक चौकटीत ४०५ रेषा) लंडन येथे १९३६ मध्ये चालू झालेल्या जगातील पहिल्या उत्तम स्पष्टता असलेल्या दूरचित्रवाणी सेवेसाठी वापरण्यास परवानगी दिली. ही मानके इतकी उपयुक्त ठरली की, ब्रिटनमध्ये १९६२ पर्यंत ती वापरात होती व त्यानंतर ६२५ रेषांचे यूरोपीय मानक हळूहळू त्यांच्या जागी प्रचारात आले.

अमेरिकेतील दूरचित्रवाणी प्रेषणाचा विकास त्या मानाने मंद गतीने झाला. ३० एप्रिल १९३९ रोजी न्यूयॉर्क वर्ल्ड्स फेअरच्या उद्घाटनाच्या वेळी नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीने दूरचित्रवाणी प्रात्यक्षिक करून दाखविले व त्याच वर्षी या कंपनीने दर आठवड्याला दोन तास प्रेषण सुरू करण्याची तयारी असल्याची घोषणा केली. कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टिम व द्यूमाँ नेटवर्क यांनी दूरचित्रवाणी प्रेषणास अनुक्रमे १९३९ मध्ये व १९४० मध्ये प्रारंभ केला. १९४० च्या मध्यास अमेरिकेत २३ दूरचित्रवाणी केंद्रे होती. त्यानंतर दुसऱ्‍या महायुद्धामुळे इलेक्ट्रॉनीय कारखान्यांचे युद्धोपयोगी उत्पादनासाठी रूपांतर करण्यात आल्याने दूरचित्रवाणीसंबंधीचे कार्य जवळजवळ थंडावले. फक्त मर्यादित व्यापारी प्रेषण कार्यास परवानगी देण्यात आली होती (पहिले प्रायोजित दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रेषण १९४१ मध्ये चालू झाले) आणि हळूहळू केंद्रे बंद करण्यात आली. सु. १०,००० दूरचित्रवाणी ग्राही संचांच्या मालकांसाठी मर्यादित कार्यक्रमांचे प्रेषण करणारी फक्त सहा केंद्रे राहिली होती. महायुद्ध संपल्यावर ग्राही संचांचे उत्पादन करण्यावरील बंधने काढून टाकण्यात आली व अमेरिकेतील दूरचित्रवाणी प्रेषण उद्योगाच्या जलद वाढीचा टप्पा सुरू झाला. १९४९ पावेतो १० लक्ष ग्राही संच वापरात आले, १९५१ मध्ये हा आकडा १ कोटीपर्यंत व आठ वर्षांनंतर ५ कोटीपर्यंत पोहोचला. ब्रिटनमध्ये बीबीसीची दूरचित्रवाणी सेवा जून १९४६ मध्ये पुन्हा सुरू झाली. १९४९ पावेतो १,२६,५६७ दूरचित्रवाणी ग्राही परवाने देण्यात आले आणि १९५० मध्ये ही संख्या ३,४३,८८२ पर्यंत पोहोचली. इतर देशांत १९५० नंतरच्या दशकापर्यंत दूरचित्रवाणी प्रेषण विस्तृत प्रमाणात म्हणण्याइतपत सुरू झाले नाही.


युरोपातील व उत्तर अमेरिकेतील दूरचित्रवाणी जाळी परस्परांना जोडण्याचा प्रारंभिक प्रयत्न १९६२ मध्ये करण्यात आला. त्यासाठी अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीने मेनमधील अँडोव्हर, कॉर्नवॉलमधील गुनहिली डाउन्स व ब्रिटानीतील-प्ल्यूमर-बूदाँ यांच्या दरम्यान दूरचित्रवाणी संकेत पुनःप्रेषित करण्यासाठी टेलस्टार या कृत्रिम उपग्रहाचा उपयोग केला. पहिले प्रायोगिक स्वरूपाचे प्रेषण १० जुलै १९६२ रोजी अमेरिकेतून करण्यात आले. दुसऱ्‍या दिवशी फ्रान्स व इंग्लंडमधून अमेरिकेला प्रेषण करण्यात आले. प्रेषण व ग्रहण करणाऱ्‍या केंद्रांच्या दृष्टिपथात हा उपग्रह दिवसातून फक्त सु. १५ मिनिटेच असल्याने संकेत ग्रहणाचा कालावधी तितकाच मर्यादित होता. प्रेषण अखंड चालू ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी किमान एक उपग्रह प्रेषणासाठी उपलब्ध होईल अशा उपग्रहांच्या मालिकेची योजना मांडण्यात आली. तथापि १९६३ नंतर समकालिक (पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमण काळाइतकाच ज्याचा पृथ्वीभोवतीचा परिभ्रमण काळ म्हणजे २४ तास आहे अशा) उपग्रहाची पर्यायी योजना पुढे आली. असा उपग्रह भूपृष्ठावरील एकाच बिंदूच्या वर सु. ३६,००० किमी. उंचीवर राहतो. या पद्धतीचे पहिले प्रात्यक्षिक म्हणून १० ऑक्टोबर १९६४ रोजी पॅसिफिक महासागरावर असलेल्या सिंकॉम–३ उपग्रहाद्वारे ऑलिंपिक सामन्यांच्या उद्घाटनाचा दूरचित्रवाणी वृत्तांत टोकिओहून उत्तर अमेरिकेला प्रेषित करण्यात आला. १९७० नंतरच्या दशकाच्या प्रारंभी असे उपग्रह अशा स्थानी ठेवण्यात आले की, पृथ्वीवरील कोणतेही क्षेत्र अवकाश पुनःप्रेषण मंडलाच्या द्वारे दुसऱ्‍या कोणत्याही क्षेत्राशी संपर्क साधू शकेल. अवकाशात वापरण्यात येणारे प्रेषक व ग्राही हे दूरध्वनी व इतर संदेशवहनांबरोबरच अनेक दूरचित्रवाणी परिवाह (संदेशवहन मार्ग) एकाच वेळी कार्यान्वित ठेवू शकतात. १९६९ मध्ये अमेरिकेच्या अंतराळवीरांच्या चंद्रावरील पदार्पणाचा कार्यक्रम १० कोटींपेक्षाही अधिक दर्शकांनी उपग्रहाद्वारे पाहिला. [⟶ उपग्रह संदेशवहन दूरचित्रवाणी].

प्रेषण व्यवस्थापन : कोणतीही प्रेषण संघटना पूर्णपणे सरकारी नियंत्रणापासून मुक्त असू शकत नाही, कारण या सर्व संघटनांना आंतरराष्ट्रीय करारानुसार परवाना असणे आवश्यक असते. लोकशाही देशांतील प्रेषणकर्ते जरी सरकारपासूनच्या स्वातंत्र्याबद्दल अभिमानाने बोलत असले, तरी ते भागधारक व जाहिरातदार यांच्या दडपणापासून नेहमी मुक्त असतातच असे नाही. त्याचप्रमाणे जर कोणत्या तरी कारणाने दडपणाखाली असलेले वरिष्ठ अधिकारी संपादनाच्या कामात हस्तक्षेप करीत असतील, तर कार्यक्रमांचे निर्माते आणि संपादक हेही खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र नसतात. यामुळे प्रेषणाच्या संदर्भात स्वतंत्रता ही संज्ञा सापेक्षच आहे.

सर्वसाधारणपणे प्रेषण व्यवस्थापनाचे पुढील चार पद्धतींत वर्गीकरण करण्यात येते : (१) राज्य संचालित, (२) सरकारी निगमाच्या वा प्राधिकरणाच्या आस्थापनाद्वारे संचालित, (३) सरकारी प्राधिकारी व खाजगी हितसंबंधी यांच्यातील संमिश्र भागीदारीद्वारे संचालित, (४) खाजगी व्यवस्थापनाद्वारे संचालित.

(१) राज्य संचालित : सरकारी खात्याकडे किंवा प्रशासनाकडे सोपविलेल्या, कदाचित वैध स्वरूप आणि आर्थिक व प्रशासकीय बाबतींत स्वातंत्र्य असलेल्या परंतु सरकारी अमलाखाली असलेल्या व मूलतः स्वायत्त नसलेल्या प्रेषण व्यवस्थापनांचा यात समावेश करण्यात येतो. रशियात मंत्रिमंडळाच्या थेट अधिकाराखाली असलेल्या व १९५७ मध्ये स्थापन केलेल्या खास समितीकडे रेडिओ व दूरचित्रवाणी यांचा कार्यभार सोपविलेला आहे. अशाच स्वरूपाचे पण स्वतंत्र वैध स्वरूप असलेले व्यवस्थापन चेकोस्लोव्हाकिया व पोलंड या देशांत आहे. भारतात ‘आकाशवाणी’ (ऑल इंडिया रेडिओ) आणि ‘दूरदर्शन’ हे माहिती व नभोवाणी खात्याचे दोन विभाग आहेत [⟶ आकाशवाणी दूरदर्शन]. अशाच प्रकारचे व्यवस्थापन बहुतेक कम्युनिस्ट देशांत आणि दुसऱ्‍या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या व पूर्वी वसाहती असलेल्या बहुतेक देशांत प्रचलित आहे.

(२) सरकारी निगमाच्या वा प्राधिकरणाच्या आस्थापनाद्वारे संचालित : या पद्धतीच्या व्यवस्थापनाचा बीबीसी हा आद्यनमुना आहे. सनदेचे आणि परवान्यातील अटींचे पालन केल्यास बीबीसीला निधीचा विनियोग, कार्यक्रमाची निर्मिती व वेळापत्रक आणि संपादनावरील नियंत्रण यांच्या बाबतीत महत्तम स्वातंत्र्य आहे. मात्र ज्यापासून निगमाला निधी उपलब्ध होतो त्या दूरचित्रवाणी वा रेडिओ ग्राहींच्या परवाना शुल्काची रक्कम सरकारच्या निर्णयानुसार ठरविली जाते. परदेशात कार्यक्रम विकून मिळणारा फायदा आणि विविध ध्वनिमुद्रिका व प्रकाशने यांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे वगळल्यास उत्पन्नाची बाब केवळ परवाना शुल्क हीच आहे. बहिःप्रेषणासाठी (देशाच्या सीमेपलीकडील क्षेत्रांना करावयाच्या प्रेषणासाठी) वेगळी वित्तव्यवस्था केलेली असते. अध्यक्ष व नियामक मंडळ हे बीबीसीचे वैध स्वरूप असून त्यांचा दर्जा व अनुभव या आधारावरच सरकारतर्फे त्यांची निवड करण्यात येते. सत्तेवरील राजकीय पक्षांनी या नेमणुकांबाबत राजकीय पूर्वग्रह काटेकोरपणे टाळलेला आहे.

जपान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची बीबीसीप्रमाणेच एकेकाळी प्रेषणाची मक्तेदारी होती पण नंतर त्याने ती गमावली. १९५० मध्ये संमत करण्यात आलेल्या अधिनियमाद्वारे निपॉन होझो क्योकाय (एनएचके) कडे सर्व जपानभर ग्रहण करता येईल अशा प्रकारे प्रेषण व्यवस्था उभारण्याची जोखीम सोपविण्यात आली. एनएचके च्या नियामक मंडळाची नेमणूक डाएटच्या (संसदेच्या) दोन्ही गृहांच्या संमतीने पंतप्रधान करतात. या व्यवस्थापनाचा खर्च जवळजवळ ग्राही संचांच्या परवाना शुल्कातूनच केला जातो.

या व्यवस्थापन पद्धतीत फ्रान्समधील ऑफिस द रेडिओडिफ्यूजन टेलिव्हिजन फ्रांकेस (ओआरटीएफ) याचा समावेश केला जातो पण यात बरेच फरक आहेत. १९४५ पासून या फ्रेंच व्यवस्थापनाची मक्तेदारी आहे पण फ्रान्सच्या सीमेच्या बाहेरून फ्रेंच भाषेत होणाऱ्‍या रेडिओ प्रेषणाला तोंड देणे त्याला भाग पडते. ही व्यवस्थापन पद्धती थेट मंत्रिमंडळाच्या अध्यक्षांच्या देखरेखीखाली काम करते किंवा सरकारच्या प्रमुखाने एखाद्या मंत्र्याकडे (सामान्यतः माहितीकरिता जबाबदार असलेल्या मंत्र्याकडे) सोपविलेली असते. यामुळे वित्त व संपादकीय धोरण या बाबतींत ही व्यवस्था ब्रिटीश व्यवस्थेपेक्षा अधिक निकट सरकारी नियंत्रणाखाली आहे. या व्यवस्थापनात एक प्रशासकीय मंडळ असून त्यावर एका अध्यक्षाची देखरेख असते व महासंचालक हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. १९६८ पर्यंत फ्रेंच व्यवस्थापनेचे उत्पन्न जवळजवळ पूर्णपणे ग्राही संच परवान्यांच्या शुल्कावर अवलंबून होते पण त्यानंतर त्याला जाहिरातींचे पूरक उत्पन्न मिळू लागले.

पश्चिम जर्मनीच्या प्रेषण व्यवस्थापनाचा या पद्धतीत समावेश करण्यात येत असला, तरी तेथील परिस्थिती बरीच भिन्न आहे. कारण मूलभूत रेडिओ व दूरचित्रवाणी सेवा या बाबी संघ सरकारच्या अखत्यारीत नसून व्यक्तिगत राज्यांच्या अखत्यारीत आहेत. सहकार्याद्वारे पहिले दूरचित्रवाणी जाळे कार्यान्वित करण्यासाठी नऊ राज्यांतील प्रेषण संघटनांनी एकत्रित अशी एक राष्ट्रीय संघटना स्थापन केलेली आहे. काही थोडे भेद सोडल्यास प्रत्येक राज्यात विधिमंडळाने नेमलेले अथवा चर्च, विद्यापीठे, मालक वर्गाच्या किंवा कामगार संघटना, राजकीय पक्ष वा वृत्तपत्रे यांनी नामनिर्देशित केलेले प्रेषण मंडळ, तसेच प्रशासकीय मंडळ व महासंचालक यांची तरतुद केलेली आहे. त्यांना ग्राही संचांच्या परवान्यांपासून व काही वेळा जाहिरातींद्वारेही उत्पन्न मिळते.

बेल्जियममध्ये असलेले प्रेषण व्यवस्थापन हे द्विभाषिक देशातील प्रश्राला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी योजलेल्या उपायाचे चांगले उदाहरण आहे. तेथे तीन सरकारी प्राधिकरणे आहेत. त्यांपैकी एक फ्रेंच प्रेषणासाठी, दुसरे फ्लेमिश प्रेषणासाठी आणि तिसऱ्‍याची मालमत्तेवर मालकी व तांत्रिक साधनसामग्रीवरही मालकी असून ती चालविण्याची जबाबदारी तसेच सिंफनी वाद्यवृंद, ध्वनिमुद्रिकांचा संग्रह व मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय यांचीही जबाबदारी आहे.


(३) सरकारी प्राधिकारी व खाजगी हितसंबंधी यांची संमिश्र भागीदारी : बहुतेक वेळा अशी भागीदारी भरीव व प्रत्यक्ष असण्याऐवजी नाममात्र व ऐतिहासिक स्वरूपाची असल्याचे दिसून येते. याचे ठळक उदाहरण रेडिओटेलिव्हिजन इटालियाना हे आहे. याची स्थापना १९२४ मध्ये झाली व १९२७ मध्ये सरकारबरोबर प्रेषणासाठी सवलतींचा २५ वर्षांचा करार करण्यात आला. १९५२ मध्ये दूरचित्रवाणीचा अंतर्भाव करण्यासाठी सनदेचा विस्तार करण्यात आला. दोन वर्षांनंतर सरकारी अभिकरणाने या व्यवस्थापनाचा ताबा घेतला व ७५ टक्क्यांहून अधिक भाग प्राप्त केले. याच्या व्यवस्थापक मंडळाचे दहा सदस्य खास संसदीय आयोगाने निवडलेले असतात व उरलेल्या सहा सदस्यांची निवड महासभा करते. यामुळे या व्यवस्थापनावर सरकारची बारीक नजर असते. दोन विधिमंडळांच्या अध्यक्षांनी नेमलेल्या या सर्व राजकीय पक्षांच्या मिळून एकूण ३० जणांच्या तदर्थ समितीकडे राजकीय स्वातंत्र्य व वस्तुनिष्ठ वृत्तनिवेदन यांच्या खात्रीची जबाबदारी सोपविलेली असते. या संघटनेला कार्यक्रमांची त्रैमासिक रूपरेखा तयार करावी लागते आणि ती टपाल व दूरसंदेशवहन खात्याला मान्यतेसाठी सादर करावी लागते. या कामी सांस्कृतिक, कलात्मक व शैक्षणिक धोरणाशी संबंधित असलेली सल्लागार समिती मदत करते. जाहिरातींच्या प्रेषणाचे कार्य निराळी संघटना करते. जाहिराती आणि ग्राही संच परवाने यांपासून संघटनेला उत्पन्न मिळते. या संघटनेखेरीज १९८५ च्या सुमारास ५०० खाजगी दूरचित्रवाणी केंद्रे इटलीत चालू होती.

स्वीडनमध्ये तांत्रिक दृष्ट्या स्व्हेर्या रेडिओ या खाजगी मालकीच्या निगमाकडे प्रेषणाची मक्तेदारी आहे आणि त्यात सरकारी वित्तीय हितसंबंध नाहीत. या निगमाचे २०% भाग स्वीडिश वृत्तपत्रे, ६०% भाग मोठ्या बिनव्यापारी राष्ट्रीय संस्था वा चळवळी आणि २०% भाग व्यापार व उद्योग यांच्याकडे असले पाहिजेत. नियामक मंडळात एक अध्यक्ष व सरकारने नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती आणि तितक्याच भागधारकांनी निवडलेल्या व्यक्ती असतात. यांखेरीज स्व्हेर्या रेडिओच्या कर्मचारी वर्गाचे दोन प्रतिनिधी या मंडळावर असतात. ग्राही संच परवान्यांपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न निश्चित करण्याचा हक्क सरकारने राखून ठेवलेला आहे आणि यामुळे गुंतवणूक व प्रेषणाचे मान यांवर सरकारचे नियंत्रण राहते. मात्र उत्पन्न कशा प्रकारे खर्च केले जाते यावर सरकारचे नियंत्रण नाही. अशा रीतीने या निगमाला भरपूर प्रमाणात स्वातंत्र्य आहे.

स्वित्झर्लंडमध्येही खाजगी हितसंबंध व सरकारी प्राधिकारी यांमधील भागीदारीची मूळ तत्त्वे दिसून येतात परंतु संघीय घटनेनुसार तीन भाषांत कार्यक्रमांचे प्रेषण करण्याची आवश्यकता व भौगोलिक कारणे यांमुळे येथील प्रेषण व्यवस्थापन नऊ प्रादेशिक संस्थांच्या सहकार्यावर आधारलेले आहे.

(४) खाजगी व्यवस्थापन : यात समाविष्ट होणाऱ्‍या बहुतेक प्रेषण संघटना व्यापारी संस्था असून त्यांना जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळते. या जाहिराती दिवसभरात नियमित कालावधीने करण्यात येणाऱ्‍या. संक्षिप्त घोषणांच्या स्वरूपाच्या असतात. काही वेळा एखादा कार्यक्रम (उदा., खेळांचे सामने किंवा संगीत सभा) एकच जाहिरातदार वा जाहिरातदारांचा गट प्रायोजित करतो. सरकारी नियंत्रणाच्या पद्धती व प्रमाण यांत निरनिराळ्या देशांत फरक आढळतात आणि यासंबंधीची सर्वसाधारण वैशिष्ट्ये अलग काढणे शक्य नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत व लॅटिन अमेरिकेत रेडिओ प्रेषणावर खाजगी उपक्रमांचे वर्चस्व आहे. या देशात अशाच प्रकारची नियंत्रणे असलेली व फायदारहित अनेक शैक्षणिक प्रेषण केंद्रे कार्य करीत आहेत. ही केंद्रे विद्यापीठे, खाजगी वर्गण्या व प्रतिष्ठाने यांच्या वित्त साहाय्यातून चालविली जातात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस हे लोकसेवा प्रेषण जाळे आहे.

तार व केबल यांच्याद्वारे श्राव्य व दृक् कार्यक्रमांचे वितरण करण्याच्या इतर पद्धतींना काटेकोरपणे प्रेषण म्हणता येणार नाही. तारेद्वारा वितरण करणाऱ्‍या उपक्रमांचा मुख्य उद्देश प्रेषित करण्यात येणारे कार्यक्रम हे दाट लोकवस्तीची क्षेत्रे, इमारतींचे गट व हॉटेले यांत चांगल्या प्रकारे ग्रहण करता यावेत हा असतो. उदा., एखाद्या उंच इमारतीच्या छपरावर एकच दूरचित्रवाणी आकाशक (अँटेना) बसवून त्याला इमारतीतील रहिवाशांना आपले ग्राही संच जोडता येतात. खेळ, विशेष घटना, चित्रपट, रंगभूमीवरील कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम सरळ केबलद्वारे वर्गणीदारांना पुरविण्याच्या पद्धतीची लोकप्रियता वाढत आहे. अमेरिकेत १९८० नंतरच्या दशकाच्या प्रारंभीच्या काळापावेतो केबल दूरचित्रवाणी दोन कोटीपेक्षा अधिक घरांमध्ये पोहोचली होती. यामुळे घरे केबलद्वारे जोडणे व कार्यक्रम पुरविणे हे प्रेषणाशी संबंधित असे दोन नवीन उद्योग निर्माण झाले. केबल दूरचित्रवाणीमुळे प्रमुख व्यापारी दूरचित्रवाणी जाळ्यांपासून प्रेक्षक अधिकाधिक दुरावत चालले आहेत, असे दिसून आले आहे.

अंतर्गत व्यवस्थापन : प्रेषण संघटनांची रचना व प्रशासन हे लहान स्वतंत्र केंद्राच्या बाबतीत सापेक्षतः साधे असून धोरणे सुलभतेने कार्य-वाहीत आणता येतात. मोठ्या संघटनांच्या बाबतीत मात्र केवळ आर्थिक प्राप्तीच्या आधारावर यश वा अपयश ठरविता येत नसल्याने त्यांची समस्या जटिल स्वरूपाची असते. मक्तेदारी असलेल्या संघटनांच्या बाबतीत तत्त्वतः लोकसेवा हाच त्यांचा एकमात्र हेतू असला, तरी व्यवहारात त्यांना सरकारी दृष्टिकोन बऱ्‍याचदा विचारात घ्यावेच लागतात. उत्पन्नाकरिता परवाना शुल्कावर अवलंबून असलेल्या पण व्यापारी स्पर्धेला तोंड द्यावे लागणाऱ्‍या नफाविरहित लोकसेवांच्या बाबतीत मूल्यमापनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालत नाही. या संघटनांना आपल्या अस्तित्वाचे समर्थन करण्यासाठी काही प्रमाणात सामुदायिक प्रेक्षकवर्ग मिळविण्याकरिता (व त्यासाठी या प्रेक्षकवर्गाचे नुकसान झाले तरीही) स्पर्धा करावीच लागते.

प्रेषण व्यवस्थापनाची मुख्य कार्ये म्हणजे निधीची वाटणी व कार्यक्रमांचे वेळापत्रक तयार करणे आणि कार्यक्रमांची निर्मिती ही होत. कार्यक्रमांच्या वेळापत्रकाची योजना करणे व निधीची वाटणी करणे हा कार्यभार ज्यांच्याकडे असतो त्यांच्या सत्तेवर नियंत्रण न ठेवल्यास ती निरंकुश बनण्याचा संभव असतो. याउलट योजना तयार करणारे हे निर्मिती व पुरवठा खात्यांच्या सदिच्छेवर अवलंबून असतात.

चालू घडामोडीतील वादग्रस्त विषय हाताळताना एक मुख्य समस्या उद्भवते. तेथे (उदा., नेदर्लंड्समध्ये) प्रेषणकर्त्यावर निःपक्षपातीपणाचे बंधन नसते किंवा जेथे सर्वंकष राज्याप्रमाणे फक्त एकच दृष्टिकोन मांडला तरी चालते तेथे ही समस्या येत नाही. लोकशाही देशांत जेथे प्रेषणकर्त्याला स्वातंत्र्य असते व जेथे एकूण निःपक्षपातीपणा राखणे आवश्यक असते तेथे ही समस्या गंभीर असते. जरी चर्चा करून व मतैक्य घडवून आणून निर्णय घेतले, तरी सर्वसाधारणपणे एकाच व्यक्तीला शेवटी जबाबदारी पत्करावी लागते. संपादकीय व निर्मिती कर्मचारी वर्गावरील कडक नियंत्रण आणि त्यांच्या स्वातंत्र्यावरील अतिक्रमण यांचा अंतर्भाव नसलेले असे या समस्येवरील उत्तर कोणत्याच प्रेषण संघटनेला अद्याप पूर्णपणे सापडलेले नाही.


काही निवडक देशांतील प्रेषणाची सद्य परिस्थिती : भारतातील रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषणांसंबंधीची माहिती ‘आकाशवाणी’ व ‘दूरदर्शन’ या नोंदींत दिलेली आहे. काही निवडक देशांतील प्रेषण परिस्थितीचे विवरण येथे थोडक्यात दिलेले आहे.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने : या देशातील रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषण कार्य इतर देशांच्या मानाने फार मोठ्या प्रमाणावर आहे. तेथील रेडिओ व दूरचित्रवाणी केंद्रांची संख्या अतिशय मोठी असून प्रेषण कार्याच्या शाखा व इतर उद्योगांशी असणारे संबंध फार विस्तृत आहेत. तेथील संघीय संदेशवहन आयोगाने प्राधिकृत केलेल्या विविध प्रकारच्या प्रेषण केंद्रांची जून १९८१ मधील संख्या पुढीलप्रमाणे होती : परमप्रसर-विरूपण रेडिओ ४,६१९ कंप्रता-विरूपण रेडिओ ३,३२४ शैक्षणिक परमप्रसर-विरूपण रेडिओ १,१०६ व्यापारी दूरचित्रवाणी (अत्यधिक-उच्च कंप्रता) २४२ व्यापारी दूरचित्रवाणी (अति-उच्च कंप्रता) ५२२ शैक्षणिक दूरचित्रवाणी (अत्यधिक-उच्च कंप्रता) १६२ शैक्षणिक दूरचित्रवाणी (अति-उच्च कंप्रता) १०७ दूरचित्रवाणी पुनःप्रेषण केंद्रे (अत्यधिक-उच्च कंप्रता) १,६८१ व दूरचित्रवाणी पुनःप्रेषण केंद्रे (अति-उच्च कंप्रता) २,६१६ म्हणजे एकूण १४,४०० पेक्षाही अधिक प्रेषण केंद्रे होती. (परमप्रसर-विरूपण व कंप्रता-विरूपण या संज्ञांचे स्पष्टीकरण ‘विरूपण’ या नोंदीत दिलेले आहे. अत्यधिक उच्च कंप्रता व अति-उच्च कंप्रता यांचे स्पष्टीकरण प्रस्तुत नोंदीतच पुढे दिले आहे). शैक्षणिक कंप्रता-विरूपण रेडिओ केंद्राच्या संख्येत सर्वांत जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे. व्यापारी रेडिओ प्रेषणावर पूर्वी अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी, कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टिम व नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी या तीन देशव्यापी जाळ्यांचे वर्चस्व होते आणि याच तीन जाळ्यांचे व्यापारी दूरचित्रवाणी प्रेषणावरही वर्चस्व आहे. रेडिओ प्रेषणात आता जाळ्यांचे प्राबल्य राहिलेले नसले, तरी वरील तीन जाळ्याखेरीज म्युच्युअल ब्रॉडकास्टिंग सिस्टिम हे जाळेही या क्षेत्रात आहे. बहुतेक रेडिओ केंद्रे मोठ्या जाळ्यांपासून तसेच सरकारपासून स्वतंत्र आहेत. अनेक व्यापारी केंद्रे एकाच विशेष प्रकारचे प्रेषण करतात आणि त्यात विविध प्रकारचे लोकप्रिय संगीत, शास्त्रीय संगीत, बातम्या किंवा वाहतुकीसंबंधीच्या माहितीचाही समावेश होतो. काही केंद्रे राष्ट्रीय अथवा स्थानिक लहान जाळ्यांच्या मालकीची किंवा त्यांच्याशी संलग्न आहेत. काही लहान स्थानिक केंद्रे आसपासच्या गप्पागोष्टी, ध्वनिमुद्रीत संगीत व जाहिराती अशा स्वरूपाचे कार्यक्रमही प्रेषित करतात. दूरचित्रवाणीच्या मोठ्या चढाईनंतर रेडिओ प्रेषणाला मंदी आली पण पुन्हा रेडिओ प्रेषण (जाळ्याच्या रूपातील प्रेषणही) फायदेशीर होऊ लागले आहे. दूरचित्रवाणीच्या बाबतीत तीन प्रमुख जाळी काही मोठ्या शहरांत स्वतःच्या मालकीची केंद्रे चालवितात व बऱ्‍याच प्रमाणात संलग्न केंद्रावर नियंत्रण ठेवतात.

अमेरिकेत बिनव्यापारी प्रेषणातही वाढ झालेली आहे. नॅशनल अँसोसिएशन ऑफ एज्युकेशनल ब्रॉडकास्टर्स हा संस्था आपल्या सदस्यांनी व इतर देशांतर्गत तसेच परदेशी प्रेषणकर्त्यांनी तयार केलेली प्रतिलेखने शैक्षणिक केंद्रांना पुरविते. नॅशनल पब्लिक रेडिओ हा बऱ्‍याच अंशी शैक्षणिक असून प्रतिष्ठानांच्या व इतर देणग्यांतून चालविला जातो. श्रोत्यांनी दिलेल्या वर्गण्या व देणग्यांतूनही काही रेडिओ केंद्रे चालविली जातात. पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या जाळ्याची संघटना शिथिल स्वरूपाची आहे व ते बिनव्यापारी केंद्रांचा उपयोग करते. काँग्रेस विनियोजनाद्वारे तसेच प्रतिष्ठाने, सार्वजनिक देणग्या व दरेक प्रेषण केंद्रे यांच्याद्वारे या जाळ्यांचा खर्च भागविला जातो.

सामूहिक आकाशक दूरचित्रवाणी (किंवा आता केबल चित्रवाणी किंवा केबलव्हिजन वा केबल टीव्ही या नावाने ओळखण्यात येणारी) ही प्रणाली मूलतः दूरचित्रवाणी संकेतांचे ग्रहण चांगल्या प्रकारे होत नसलेल्या क्षेत्रांत किंवा ग्रहण होणाऱ्‍या दूरचित्रवाणी सेवांमध्ये निवडीस इतर ठिकाणांहून अधिक वाव मिळण्यासाठी उभारण्यात आली. १९६४ च्या सुमारास अशा १,००० प्रणाली कार्यवाहीत आलेल्या होत्या. त्या वेळी केबल चित्रवाणी कंपन्यांनी स्वतःचे कार्यक्रम सुरू करावेत ही कल्पना नव्हती पण नंतर असे कार्यक्रम प्रेषित करणे अनेक क्षेत्रांत यशस्वी ठरले आहे. केबल चित्रवाणीचे प्रेषण प्रत्येक दुरचित्रवाणी संचाला थेट जोडलेल्या केबलीद्वारे होते. या प्रणालीमुळे प्रेक्षकांना कार्यक्रमांच्या निवडीला पुष्कळ मोठा वाव मिळण्याबरोबरच त्यांचे उत्तम प्रकारे ग्रहण होण्याची खात्री राहते.

अधिकृत विदेशी सेवा आंतरराष्ट्रीय प्रेषण मंडळातर्फे चालविण्यात येतात व त्या व्हॉइस ऑफ अमेरिका या नावाने ओळखल्या जातात. या सेवांचे प्रेषण जगातील सर्व भागांना केले जाते व त्यांची परदेशात कित्येक पुनःप्रेषण केंद्रे आहेत. इंग्रजीखेरीज २९ भाषांचा उपयोग केला जातो. याखेरीज परदेशात अधिष्ठित अशा रेडिओ फ्री यूरोप व रेडिओ लिबर्टी या संघटना आहेत. याशिवाय इंटरनॅशनल ब्रॉडकास्ट स्टेशन (केजीईएस) तर्फे लघुतरंग सेवा लॅटिन अमेरिकेला इंग्रजी, स्पॅनिश व जर्मनीमध्ये आणि आशियाला रशियनमध्ये देण्यात येते. रेडिओ न्यूयॉर्क वर्ल्ड वाइडतर्फे यूरोप व आफ्रिकेला इंग्रजीत आणि कॅरिबियन प्रदेशाला इंग्रजी व स्पॅनिश भाषांत व्यापारी प्रेषण केले जाते. वर्ल्ड इंटरनॅशनल ब्रॉडकास्टर्स ही संघटना धार्मिक पार्श्वभूमी असलेली लघुतरंग सेवा इंग्रजीत यूरोपला, निकट पूर्वेकडील देशांना व उत्तर आफ्रिकेला प्रेषित करते. अमेरिकन फोर्सेस रेडिओ अँड टेलिव्हिजन सर्व्हिस या सेवेचे जगभर लघुतरंग केंद्रांचे जाळे आहे.

ऑस्ट्रेलिया : या देशातील प्रेषणावर ऑस्ट्रेलियन प्रेषण नियंत्रण मंडळाची देखरेख असते. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कमिशन ही प्रमुख संघटना असून तिचा खर्च संसदीय विनियोजन, प्रकाशनांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न, सार्वजनिक संगीत सभांतून मिळणारा फायदा व सिंफनी वाद्यवृंदांना मिळणारे अर्थसाहाय्य यांतून केला जातो. ग्राही संचाच्या परवान्यांच्या विक्रीतून सरकारला पुष्कळ उत्पन्न मिळते. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कमिशन तसेच व्यापारी प्रेषण केंद्रे यांना रास्त प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मात्र सरकार आणि अधिकारी यांच्याशी वारंवार सल्लामसलत करण्यात येते. कमिशनतर्फे ९० रेडिओ केंद्रे चालविण्यात येतात व त्यांपैकी १४ विदेशी सेवेसाठी (रेडिओ ऑस्ट्रेलिया) वापरण्यात येतात. यांखेरीज १२५ व्यापारी रेडिओ केंद्रे असून त्यांपैकी २५ राज्यांच्या राजधान्यांत आहेत. ही केंद्रे फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन कमर्शियल ब्रॉडकास्टर्स या संघाशी संलग्न असून त्यांपैकी कित्येक निरनिराळ्या जाळ्यांत समाविष्ट आहेत. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कमिशनची ५० दूरचित्रवाणी केंद्रे आहेत व त्यांपैकी सहा राज्यांच्या राजधान्यांत आहेत. या केंद्रांचे जवळजवळ निम्मे कार्यक्रम आयात केलेले असतात. एकूण कार्यक्रमांपैकी २५% नाटक, १९% बातम्या व सार्वजनिक हिताचे कार्यक्रम, १३% क्रीडा व सु. ७% सांस्कृतिक (शैक्षणिक सोडून) अशी सर्वसाधारण विभागणी असते. फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलियन कमर्शिअल टेलिव्हिजन स्टेशन्स या संघाचे ४३ सदस्य असून १५ राज्यांच्या राजधान्यांत आहेत. बरेचसे व्यापारी कार्यक्रम आयात केलेले असतात. एकूण कार्यक्रमांपैकी ४५% नाटक, ९% वार्ता, माहिती व चालू घडामोडी आणि २६% सुगम करमणूक अशी विभागणी असते.


कॅनडा : कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (सीबीसी) ही या देशातील प्रमुख प्रेषण संघटना असून तिची फ्रेंच व इंग्रजी या भाषांतील मुख्य दूरचित्रवाणी जाळी आहेत, तसेच या प्रत्येक भाषेतील एक परम-प्रसर-विरूपण रेडिओ जाळे आहे. यांखेरीज लहान कंप्रता-विरूपण रेडिओ जाळी व काही लघुतरंग प्रेषण केंद्रे आहेत.अनेक प्रादेशिक जाळी असून त्यांतील दोन फ्रेंच दूरचित्रवाणीसाठी, पाच इंग्रजी दूरचित्रवाणीसाठी, दोन फ्रेंच रेडिओसाठी व आठ इंग्रजी रेडिओसाठी आहेत. सीबीसी ची ३८ प्रमुख रेडिओ केंद्रे व ३२४ कमी शक्तीचे पुनःप्रेषण करणारे प्रेषक आहेत. यांखेरीज ५२ खाजगी मालकीची केंद्रे संलग्न आहेत. फ्रेंच दूरचित्रवाणी सेवेसाठी १० केंद्रे व १७२ खाजगी मालकीची संलग्न केंद्रे आहेत. इंग्रजी दूरचित्रवाणी सेवेकरिता १७ प्रमुख केंद्रे व ५३९ खाजगी मालकीची संलग्न केंद्रे आहेत. सीबीसी च्या केंद्रांखेरीज ४०० हून अधिक रेडिओ व सु. १०० दूरचित्रवाणी केंद्रे खाजगी मालकीची व व्यापारी स्वरूपाची आहेत. शैक्षणिक कार्यक्रम वगळता कॅनडातील सरकारी व खाजगी प्रेषणांमध्ये माहिती (वार्ता, चालू घडामोडी व धार्मिक रेडिओ २५% व दूरचित्रवाणी ३४%), सुगम करमणूक (सुगम संगीत, नाटक इ. रेडिओ ६५% व दूरचित्रवाणी ४७%), सांस्कृतिक कार्यक्रम (शास्त्रीय संगीत, नाटक इ. रेडिओ ४% व दूरचित्रवाणी २ ते ३%) आणि उरलेल्यात क्रीडा व विविध वांशिक कार्यक्रम यांचा समावेश होतो.

इतर बहुतेक तुलनीय देशांच्या मानाने कॅनडाची विदेशी प्रेषण सेवा लहान आहे. विदेशी असलेल्या कॅनडियन सैन्य दलासाठी लघुतरंग प्रेषण आणि यूरोप व लॅटिन अमेरिकेतील देशांसाठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश वगैरे एकूण ११ भाषांत आंतरराष्ट्रीय सेवा आहे.

जपान : निपॉन होझो क्योकाय (एनएचके) या निगमाची दोन दूरचित्रवाणी आणि तीन रेडिओ जाळी (दोन परमप्रसर-विरूपणाची व एक कंप्रता-विरूपणाचे) आहेत. यांपैकी एक दूरचित्रवाणी जाळे व एक परमप्रसर-विरूपण जाळे बहुशः शैक्षणिक कार्यक्रमांसाठी राखून ठेवलेली आहेत. ‘जनरल टेलिव्हिजन’ कार्यक्रम तसेच पहिली (परमसर-विरूपण) रेडिओ सेवा यांच्यातर्फे संतुलित सेवा दिली जाते. कंप्रता-विरूपण (अति-उच्च कंप्रता) सेवा मुख्यत्वे सांस्कृतिक व स्थानिक संगीत कार्यक्रमांशी संबंधित आहे. जपानमध्ये सापेक्षतः फारच थोडे राजकीय स्वरूपाचे प्रेषण करण्यात येते.

एनएचकेने वेळापत्रक, उत्पन्नाची वाटणी व प्रेषण कार्य ठरविण्यासाठी संगणकयुक्त स्वयंचलित प्रणाली बसविलेली आहे. निर्मिती क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला सर्जनशील निर्मिती करण्यास जास्तीत जास्त मोकळीक मिळावी असा ही प्रणाली बसविण्यामागील उद्देश आहे आणि ही प्रणाली कदाचित जगातील सर्वांत प्रगत असावी. एनएचकेपाशी पहिल्या रेडिओ जाळ्याकरिता १७३ मध्यम तरंगलांबीचे प्रेषक, दुसऱ्‍या जाळ्याकरिता १४१ प्रेषक आणि कंप्रता-विरूपण (अति-उच्च कंप्रता) जाळ्यांसाठी ४७४ प्रेषक आहेत. जनरल व शैक्षणिक दूरचित्रवाणी प्रत्येकी २,८०० प्रेषकांचा उपयोग करतात आणि त्यांपैकी बहुतेक पुनःप्रेषण केंद्रे आहेत. प्रादेशिक प्रेषण मुख्यत्वे बातम्या व व्यवहारोपयोगी माहिती यांसंबंधी असते. स्थानिक दूरचित्रवाणीचे कार्यक्रम दररोज सरासरीने दीड तास व स्थानिक रेडिओचे साडेतीन तासांपेक्षा अधिक असतात. एनएचकेखेरीज ८५ प्रेषणसंघटना असून त्या जपानमधील नॅशनल असोसिएशन ऑफ कमर्शियल ब्रॉडकास्टर्स या संस्थेच्या सदस्य आहेत. या संघटनेतर्फे ४९० अतिउच्च कंप्रता दूरचित्रवाणी केंद्रे, ४,११५ अत्यधिक उच्च कंप्रता दूरचित्रवाणी केंद्रे, ४५ परमप्रसर-विरूपण रेडिओ केंद्रे व चार कंप्रता-विरूपण रेडिओ केंद्रे, चालविली जातात. एनएचकेकडे जपानच्या विदेशी प्रेषण सेवांचीही जबाबदारी आहे. या सेवांची सर्वसाधारण व प्रादेशिक अशी विभागणी केलेली असून पहिलीत इंग्रजी व जपानी भाषांत दररोज होणाऱ्‍या प्रेषणांच्या आणि दुसरीत अमेरिका, यूरोप, आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांना सु. २५ भाषांत होणाऱ्‍या प्रेषणांचा समावेश होतो.

नेदर्लंड्स : सर्व लोकशाही देशांतील सरकारांना अल्पसंख्याकांचे दृष्टिकोन प्रेषणात प्रतिबिंबित करणे अवघड असल्याचे दिसून आले आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी नेदर्लंड्सने कदाचित सर्वांत निर्धांरपूर्वक प्रयत्न केलेला आढळून येतो. डच प्रणालीत सर्व कार्यक्रमांच्या प्रेषणाला जबाबदार असणारी एक राष्ट्रीय संघटना (नेदरर्लंड्स ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) व सदस्यांच्या संख्येनुसार कार्यक्रमांच्या निर्मितीचा हक्क प्राप्त झालेल्या अनेक प्रेषण संस्था वा संघटना अशी रचना आहे. नेदर्लंड्स ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर तथाकथित संयुक्त कार्यक्रमांची निर्मिती करण्याचीही जबाबदारी आहे. या कार्यक्रमांचे रेडिओच्या बाबतीत २५% व दूरचित्रवाणीच्या बाबतीत ४०% प्रमाण असते. १९६६ मधील अधिनियमानुसार जबाबदार असलेल्या मंत्र्याकडे काही विशिष्ट अटींची (विशेषतः पुरेशी सदस्य संख्या) पूर्तता करणाऱ्‍या संस्थांनाच रेडिओ व दूरचित्रवाणी यांवरील प्रेषणाच्या वेळेची वाटणी करण्याचे काम सोपविण्यात आले. १९७१ पावेतो या संस्थांत प्रेषण संस्था वा संघटना, प्रेषण संस्था म्हणून मान्यता मिळविण्याची आकांक्षा असलेल्या संस्था, चर्चेस, चर्चशी तुलनीय अशा स्वरूपाच्या संस्था, राजकीय पक्ष मान्यताप्राप्त हेतूकरिता स्थापन झालेल्या इतर लौकिक संस्था व शैक्षणिक संस्था यांचा समावेश झालेला होता. स्वयंपूर्ण संस्थांच्या बाबतीत त्यांच्या वर्गानुसार प्रेषणाचा कालावधी निर्धारित केला जातो. हा वर्ग वर्गणीदारांच्या संख्येवर अवलंबून असतो. किमान ६०,००० सदस्य असलेल्या संघटनांना दर आठवड्याला एक ते चार तास कार्यक्रम प्रेषित करण्यासाठी विनंती अर्ज करता येतो. इतक्या अनेक संस्थांत प्रेषण वेळ विभागला गेल्याने हिशेबाच्या दृष्टीने अवघड होते. ग्राही संच परवान्यांचे शुल्क व जाहिरातींतून मिळणारा फायदा यांतूनच उत्पन्न मिळते.

नेदर्लंड्स ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनखेरीज सहा रेडिओ प्रेषण सेवा असून तीन स्वतंत्र दूरचित्रवाणी सेवा आहेत. नेदर्लंड्समध्ये प्रादेशिक दूरचित्रवाणी नाही पण कित्येक प्रादेशिक रेडिओ संघटना आहेत. एकूण रेडिओ कार्यक्रमांत बातम्या, सार्वजनिक घडामोडी व माहिती २५%, शास्त्रीय संगीत २२%, सुगम संगीत १४% आणि मनोरंजन व इतर सुगम कार्यक्रम २८% अशी सर्वसाधारण विभागणी असते. दूरचित्रवाणी कार्यक्रमांत अधिक विविधता असून त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे असते. मनोरंजन (यांपैकी निम्म्याहून अधिक परदेशी उद्गमांपासून) ३२·३%, डचनिर्मित नाटक २·९%, चित्रपट (बहुशः परदेशी) ५% आणि बातम्या, सार्वजनिक घडामोडी आणि माहिती ३१·२%. डच विदेशी प्रेषण सेवा दररोज सु. ४५ तास लघुतरंग प्रेषण जगातील बहुतेक भागांना डच व इतर सात भाषांत करते.


पश्चिम जर्मनी : रेडिओ प्रेषणाला प्रारंभ करणाऱ्‍या पहिल्या देशांपैकी जर्मनी हा एक होता (ऑक्टोबर १९२३). तथापि नऊ राज्य संघटनांवर आधारलेली व्यवस्था दुसऱ्‍या महायुद्धाच्या शेवटी हा देश व्यापणाऱ्‍या सत्तांनी स्थापन केली. सर्व राज्य संघटनांची पहिली मध्यम तरंगलांबीवरील व तिला आधार देणारी कंप्रता-विरूपण रेडिओ सेवा आहे. सर्व संघटनांची दुसरी व तिसरी सेवा कंप्रता-विरूपित आहे आणि कोलोन गटाची चौथी सेवा आहे. बर्लिन येथे एक परमप्रसर-विरूपण सेवा व तीन कंप्रता-विरूपण सेवा आहेत. बऱ्‍याच वेळा दोन अगर अधिक राज्य संघटना सहकार्याने एकच कार्यक्रम त्यांच्या एका कंप्रता-विरूपण सेवेवर एकाच वेळी प्रेषित करतात. हा कार्यक्रम रोज फक्त तीन ते चार तास प्रेषित करण्यात येतो व तो बहुधा प. जर्मनीत काम करणाऱ्‍या परदेशीयांसाठी परदेशी भाषेत असतो. पहिल्या व दुसऱ्‍या रेडिओ सेवांद्वारे काही प्रमाणात मिश्र स्वरूपाचे पण दुसऱ्‍या सेवेद्वारे अधिक गंभीर स्वरूपाचे (विशेषतः उत्तम संगीताचे) कार्यक्रम प्रेषित करण्यात येतात.

पहिली जर्मन दूरचित्रवाणी सेवा राष्ट्रीय स्तरावर समन्वित करण्यात येते व त्याकरिता प्रत्येक राज्य संघटना अंशदान करते. प्रत्येक संघटना आपापल्या प्रदेशांतील प्रेक्षकांकरिता भरपूर प्रमाणात प्रादेशिक कार्यक्रम प्रेषित करते. दुसऱ्‍या दूरचित्रवाणी सेवेची योजना आखणी व निर्मिती मध्यवर्ती असून तिचे मुख्यालय माइन्त्स येथे आहे. प्रत्येक संघटनेची दिवसातून काही तास तिसरी दूरचित्रवाणी सेवाही आहे. ही सेवा बहुधा शैक्षणिक स्वरूपाची असून तिसऱ्‍या रेडिओ सेवेप्रमाणे दोन वा तीन राज्य संघटनांद्वारे निर्मिती व एकाच वेळी प्रेषण केले जाते. संघराज्य सरकारला प. जर्मन प्रदेशात प्रेषणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. प्रेषणासंबंधीचे वैधानिक व प्रशासकीय अधिकार राज्याकडे असले, तरी राज्य सरकारांना व संसदांना सांविधिक देखरेखीच्या पलीकडे ढवळाढवळ करण्यास कायद्याने बंदी आहे आणि ते प्रेषण संघटनांच्या मूलभूत स्वातंत्र्यात हस्तक्षेप करीत नाहीत.

पश्चिम जर्मनीच्या दोन विदेशी प्रेषण सेवा आहेत. डॉइशलांडफुंकचा पहिला कार्यक्रम मध्यम व दीर्घ तरंगांवर जर्मनमध्ये आणि दुसरा कार्यक्रम फक्त मध्यम तरंगावर प्रेषित होतो. ही सेवा फ्रान्स, ब्रिटन, नेदर्लंड्स आणि उत्तर व पूर्व यूरोप यांकरिता असून ती जर्मनखेरीज डच, इंग्रजी वगैरे १३ भाषांत प्रेषण करते. डॉइश वेले ही सेवा ३० परदेशी भाषांत जगातील बहुतेक भागांना आठवड्यातून एकूण सु. ८०० तास प्रेषण करते.

फ्रान्स : ऑफिस द रेडिओडिफ्यूजन-टेलिव्हिजन फ्रांकेस (ओआर-टीएफ) ही संघटना तीन राष्ट्रीय रेडिओ जाळ्यांवर प्रेषण कार्य करते. (१) फ्रान्स-इंटर : ही करमणूक व वार्ता यांकरिता २४ तास सेवा असून ती प्रादेशिक केंद्रांनी तयार केलेल्या कार्यक्रमांचे प्रेषण करणाऱ्‍या फ्रान्स-व्हरायटीज या प्रादेशिक प्रेषकांवरील सेवेशी आणि पॅरिस व सभोवतालचा प्रदेश यांकरिता लोकप्रिय संगीत व महत्त्वाच्या वार्ता यांसाठी असलेल्या फ्रान्स-इंटरपॅरिस या प्रातःकालीन सेवेशी एकत्रित करण्यात आलेली आहे. (२) फ्रान्स कल्चर : या जाळ्याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच माहिती व सार्वजनिक घडामोडी यांचे प्रेषण करण्यात येते. (३) फ्रान्स-म्युझिक : या जाळ्याद्वारे संगीताचे कार्यक्रम प्रेषित करण्यात येतात. नियमित दूरचित्रवाणी सेवा १९३८ मध्ये सुरू झाली. दुसऱ्‍या महायुद्धामुळे तीत खंड पडला व १९४५ मध्ये ती पुन्हा सुरू झाली.

प्रादेशिक प्रेषण ११ प्रदेशांत संघटित केलेले असून त्यांच्याद्वारे ३० कार्यक्रम निर्मिती केंद्रांवर व २३ वृत्त कार्यालयांवर नियंत्रण ठेवले जाते. फ्रान्समधील प्रादेशिक रचनेचा हेतू प्रत्येक प्रदेशातील वार्तांची आणि कलात्मक व सांस्कृतिक घडामोडींची माहिती तेथील रहिवाशांना देणे तसेच राष्ट्रीय जाळ्यात प्रत्येक प्रदेशाच्या प्रतिबिंबाचे संकलन व्हावे हा आहे.

ओआरटीएफला उत्पन्नाचा सर्वांत मोठा वाटा ग्राही संचांच्या परवान्यांपासून मिळत असला, तरी ते प्रकाशने, ध्वनिमुद्रिका व चित्रपट यांच्या विक्रीसारख्या व्यापारी गोष्टींना पुरस्कृत करण्याचे कार्य करते.यांखेरीज दूरचित्रवाणी जाळी व फ्रान्स-इंटर रेडिओ जाळे यांवरील जाहिरातींपासून काही मर्यादित प्रमाणात उत्पन्न मिळविण्याचा तिला अधिकार देण्यात आलेला आहे. रेडिओ व दूरचित्रवाणी यांकरिता नेमलेल्या दोन समित्या मध्यवर्ती प्रशासकीय मंडळाला कार्यक्रम, वेळापत्रक व निरनिराळ्या प्रकारच्या कार्यक्रमांतील संकलन यासंबंधी सल्ला देते. या समित्यांना भावी प्रकल्पांवर भाष्प करण्यास व प्रस्ताव मांडण्यासही सांगण्यात येते. रेडिओ कार्यक्रमांची साधारण विभागणी (शैक्षणिक कार्यक्रम सोडून) पुढीलप्रमाणे असते : वार्ता, माहिती व खेळ १४% सुगम करमणूक ३३% कला, साहित्य व विज्ञान ३८% नाटक व वाड्मयीन कार्यक्रम ८%. दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे सर्वसाधारण वर्गीकरण पुढीलप्रमाणे असते : वार्ता, माहिती व खेळ ४२%, अनुबोधपट ९%, सुगम करमणूक १०%, नाटक व रंगभूमी ५% आणि युवा कार्यक्रम (शालेय कार्यक्रमांखेरीज) ५%.

फ्रान्सची विदेशी प्रेषण सेवा आठवड्याला सु. १०० तास प्रेषण करते आणि त्यांपैकी निम्मे फ्रेंच भाषेतील असते. रेडिओ फ्रान्स इंटरनॅशनलतर्फे उत्तर व मध्य अमेरिका, जर्मनी व आफ्रिका यांना नियमितपणे प्रेषण होते.

ब्राझील : या देशात सु. १,५०० रेडिओ केंद्रे व १०० हून अधिक दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. यांतील बहुतांशी केंद्रे व्यापारी स्वरूपाची आहेत. सर्वसाधारणपणे ही केंद्रे संदेशवहन खात्याच्या अखत्यारीखाली आहेत. सर्व प्रेषण कार्यक्रम अभ्यवेक्षणाधीन असून कोणतेही केंद्र सरकारच्या इच्छेच्या विरूद्ध प्रेषण कार्य करीत असल्यास ते बंद करता येते. रीओ दे जानेरो व ब्राझील्या येथे शिक्षण खात्याची रेडिओ केंद्रे आहेत. काही राज्यांची अधिकृत रेडिओ व दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. काही विद्यापीठीय रेडिओ व दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. यांखेरीज रोमन कॅथलिक शैक्षणिक रेडिओ जाळे आहे.उरलेली केंद्रे स्वतंत्रपणे चालविली जाणारी अथवा एखाद्या जाळ्याला जोडलेली खाजगी व्यापारी स्वरूपाची आहेत. मोठी रेडिओ जाळी लघुतरंग प्रेषणाचा उपयोग करतात व त्यामुळे प्रांतिफ मध्यम तरंग केंद्रांवरून एकाच वेळी प्रेषण करता येते. प्रांतिक दूरचित्रवाणी केंद्रे स्वतःची बातमीपत्रे बहुधा स्थानिक वृत्तपत्र व रेडिओ केंद्र यांच्या सहकार्याने तयार करतात. इतर केंद्रे स्थानिक निर्मितीला पूरक म्हणून चित्रपट, दूरचित्रवाणी-चित्रपट (टेलिफिल्म) व दृक्फीत यांचा उपयोग करतात. सर्व रेडिओ केंद्रांनी रोज एक तास सरकारी बातमीपत्राला दिला पाहिजे व दर आठवड्यास किमान पाच तास शैक्षणिक कार्यक्रम प्रेषित केले पाहिजेत असा दंडक आहे. एजन्सिया नॅशनलने तयार केंलेले कार्यक्रम–मुख्यत्वे सरकारी निवेदने आणि मंत्र्यांची व अध्यक्षीय भाषणे–प्रेषित करण्याचे दूरचित्रवाणी केंद्रांना आदेश देण्यात येतात. दूरचित्रवाणीवरील मनोरंजनात मुख्यत्वे ब्राझीलमध्ये तयार झालेल्या मालिका तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत तयार केलेले व परभाषीकरण (डबिंग) केलेले चित्रपट यांचा समावेश असतो.


ब्रिटन : ब्रिटनमध्ये १९५४ सालापर्यंत ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची (बीबीसीची) मक्तेदारी होती. बीबीसीची चार रेडिओ जाळी आहेत. पहिल्या जाळ्याद्वारे प्रामुख्याने दिवसा बहुतांशी लोकप्रिय संगीताचे प्रेषण केले जाते. दुसरे जाळे मुख्यत्वे सुगम संगीत व मनोरंजनाचे कार्यक्रम प्रेषित करते. तिसऱ्‍या जाळ्यावर मुख्यत्वे दिवसा शास्त्रीय संगीत, सायंकाळच्या प्रारंभी शैक्षणिक कार्यक्रम व सायंकाळच्या अखेरीस सांस्कृतिक कार्यक्रम होतात. चौथ्या जाळ्याद्वारे मुख्यत्वे भाषित कार्यक्रम, सकाळच्या मध्यास व दुपारच्या प्रारंभी शालेय कार्यक्रम आणि सायंकाळी मिश्र कार्यक्रम प्रेषित होतात. एकूण प्रेषणापैकी मुख्य घटकांची टक्केवारी साधारणपणे पुढीलप्रमाणे असते : करमणूक व संगीत ४२·९% शास्त्रीय संगीत २१·२% बातम्या व बाह्य प्रेषण ९·१% नाटक ४·८%, शैक्षणिक ३·६% व प्रसंगविशेष २·२%. १९६७ पासून बीबीसीला २० स्थानिक केंद्रे जोडण्यात आलेली आहेत. बीबीसीच्या दोन दूरचित्रवाणी सेवा आहेत. पहिली दर आठवठ्याला ८२ तास, तर दुसरी ४२ तास प्रेषण करते. दूरचित्रवाणी प्रेषणातील मुख्य घटकांची टक्केवारी पुढीलप्रमाणे : बातम्या, अनुबोधपट व माहिती ३१% ब्रिटिश व परदेशी चित्रपट व मालिका १५·५% बाह्य-प्रेषण–मुख्यत्वे क्रीडा व क्रीडावार्ता १४% नाटक ८% कौटुंबिक कार्यक्रम व सुगम करमणूक १३·३% शैक्षणिक ११·१% व धार्मिक २·२%.

रेडिओ व दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांत प्रादेशिक स्तरावर बऱ्‍याच प्रमाणात प्रेषण करण्यात येते. बऱ्‍याच प्रमाणात स्वायत्त असलेल्या पूर्वीच्या सहा प्रदेशांपैकी स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड हे तीनच ‘राष्ट्रीय’ प्रदेश उरलेले आहेत. राहिलेल्या तीन प्रदेशांच्याऐवजी २० रेडिओ व दूरचित्रवाणी निर्मिती केंद्रे स्थापण्यात आलेली आहेत. हे प्रदेश जाळ्यातील आपापल्या भागाचा विनियोग करून स्वतःचे कार्यक्रम प्रेषित करतात. सरकारने ५० स्थानिक कंप्रता-विरूपण (अति-उच्च कंप्रता) केंद्रांना अधिकृत म्हणून मान्यता दिलेली आहे. ही केंद्रे बहुशः मोठी शहरी क्षेत्रे अंतर्भूत करतील अशा स्थानी आहेत. इंडिपेंडंट ब्रॉडकास्टिंग ॲथॉरिटीच्या देखरेखीखाली २५ स्पर्धात्मक व्यापारी स्थानिक केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत.

ब्रिटनच्या विदेशी प्रेषण सेवेची जबाबदारीही बीबीसीकडे आहे. याकरिता सरकारी अनुदान देण्यात येते. ७० प्रेषकांच्या द्वारे (यांतील २६ पुनःप्रेषण केंद्रे परदेशांत आहेत) जगभर लघुतरंग सेवा आणि युरोप (वर्लिन व म्यूनिक येथून), पश्चिम आशिया व पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेश यांच्यासह अनेक क्षेत्रांत मध्यम तरंग सेवा पुरविली जाते. दर आठवड्यातील सु. ७४० तासांच्या प्रेषणाच्या जागतिक सेवेमधील जवळजवळ एक तृतीयांश इंग्रजीमध्ये असून बाकीची सेवा सु. ४० परदेशी भाषांत असते. यांत अरबी, फ्रेंच, रशियन, जर्मन, स्पॅनिश, पोलिश, झेक, हंगेरीयन व पोर्तुगीज या भाषा मुख्य आहेत.

इंडिपेंडंट ब्रॉडकास्टिंग ॲथोरिटी (मूळ नाव इंडिपेंडंट टेलिव्हिजन ॲथोरिटी) या प्राधिकरणाची स्थापना संसदेने संमत केलेल्या अधि-नियमांद्वारे १९५४ मध्ये झाली व त्याच्या नियंत्रणाखाली प्रेषणकार्य नंतर एक वर्षाने सुरू झाले. या प्राधिकरणाला पुष्कळ प्रमाणात स्वातंत्र्य आहे पण त्याच्यातर्फे कार्यक्रम वा जाहिराती तयार करण्यात येत नाहीत. हे कार्य कार्यक्रम तयार करणाऱ्‍या व्यापारी कंपन्या करतात. या कंपन्या प्रादेशिक स्तरावर संघटित केलेल्या असून बातम्याखेरीज सर्व प्रेषण कार्यक्रम पुरवितात. बातम्यांकरिता या कंपन्यांच्या संयुक्त मालकीचा व त्यांच्या वित्तव्यवस्थेखाली असलेला इंडिपेंडंट टेलिव्हिजन न्यूज हा निराळा गट स्थापन केलेला आहे.

कार्यक्रम तयार करणाऱ्‍या कंपन्या बऱ्‍याच प्रमाणात इंडिपेंडंट ब्रॉडकास्टिंग ॲथॉरिटीच्या नियंत्रणाखाली असतात. या कंपन्यांच्या नेमणुका, कार्यक्रम नियंत्रण व जाहिरातींची निर्मिती व प्रेषण या सर्वांना प्राधिकरण जबाबदार असते. जाहिराती व पडद्यावरील हिंसाचार या बाबतींत संहिता प्राधिकरण अंमलात आणते. कार्यक्रमनिर्मात्या कंपन्यांची वित्तव्यवस्था पूर्णपणे जाहिरातींवर अवलंबून आहे (प्रायोजित कार्यक्रमांना कायद्याने बंदी केलेली आहे). या जाहिराती दोन कार्यक्रमांच्या मधल्या काळात व कार्यक्रमांतील स्वाभाविक खंडांत दाखविल्या जातात. या कंपन्या प्राधिकरणाला प्रेषणाचा, प्रशासनाचा व इतर खर्च भागविण्यासाठी भाडे देतात. कार्यक्रमनिर्मात्या कंपन्या जाळ्याच्या समितीत सहकार्य करतात. पुष्कळसे प्रमुख कार्यक्रम सर्व कंपन्या प्रेषित करतात. जाळ्यातील प्रत्येक कंपनीचा वाटा तिचे आकारमान व साधने यांनुसार निरनिराळा असतो. प्रत्येक कंपनीचे उत्पन्न तिच्या क्षेत्रात इंडिपेंडंट ब्रॉडकास्टिंग ॲथॉरिटीचा प्रेषित संकेत दूरचित्रवाणी ग्राही असलेल्या किती घरांत ग्रहण होऊ शकतो यावर अवलंबून असते. ही संख्या चॅनेल बेटांत ३२,००० मिडलँड्समध्ये २६,३०,००० आणि लंडन क्षेत्रात ४३,००,००० आहे. इतक्या विविधतापूर्ण प्रकारचे कार्यक्रम सादर करण्यात येत असल्याने त्यांचे टक्केवारीनुसार विश्लेषण करणे शक्य नाही. तथापि कार्यक्रमांचे प्रमुख प्रकार आकारमानानुसार पुढीलप्रमाणे असतात : नाटक (दूरचित्रवाणी चित्रपट मालिकांसह) बातम्या, प्रसंगविशेषी कार्यक्रम व अनुबोधपट खेळ करमणूक चित्रपट (ब्रिटीश व परदेशी) शैक्षणिक मुलांचे कार्यक्रम धार्मिक. या प्राधिकरणाकडे स्थानिक व्यापारी रेडिओ केंद्रांवर देखरेख करण्याचे कामही सोपविण्यात आल्याने त्याचे इंडिपेंडंट टेलिव्हिजन ॲथॉरिटी हे मूळ नाव बदलण्यात आले.

मेक्सिको : या देशात सु. ३८० रेडिओ केंद्रे असून त्यांपैकी सु. ५० कंप्रता-विरूपण प्रेषण करतात. बहुतेक सर्व केंद्रे व्यापारी आहेत व त्यांपैकी सु. १३० केंद्रे दोन देशव्यापी जाळ्यांत समाविष्ट आहेत. दूरचित्रवाणी केंद्रांची संख्या कमी असून त्यांपैकी कित्येक विविध आकारमानाच्या जाळ्यांत अंतर्भूत आहेत. या जाळ्यांपैकी टेलिव्हिसा हे सर्वांत मोठे व एकच देशव्यापी असलेले जाळे आहे. दूरचित्रवाणीही बहुशः व्यापारी आहे पण काही विद्यापीठीय केंद्रे असून राजधानीत एक सांस्कृतिक केंद्र आहे. तत्त्वतः मेक्सिकोत प्रेषणावर सरकारी नियंत्रण नाही पण प्रत्यक्षात सरकारवर वा अग्रेसर राजकीय पक्षावर टीका करणारे कोणतेही राजकीय प्रेषण केले जात नाही. बहुतेक केंद्रे दर रविवारी सकाळी एक तासाचा अधिकृतरीत्या तयार केलेला कार्यक्रम प्रेषित करतात. सर्व रेडिओ व दूरचित्रवाणी केंद्रांच्या एकूण प्रेषण वेळेपैकी १२·५% वेळ वापरण्याचा सरकारला हक्क आहे. काही थोडी बिनव्यापारी केंद्रे सोडल्यास बहुतेक रेडिओ केंद्रे ध्वनिमुद्रित संगीत, बातम्या व जाहिराती यांचेच प्रेषण करतात. काही थोडे अपवाद ठेवल्यास दूरचित्रवाणी बहुशः करमणूकप्रधान आहे. बऱ्‍याचशा कार्यक्रमांचे मूळ उद्‌गम अमेरिकेची संयुक्त संस्थाने असून काही कार्यक्रम ब्रिटनमधूनही येतात. स्पॅनिश बोलणाऱ्‍या इतर देशांसाठी कार्यक्रमांची निर्मिती वाढत्या प्रमाणात होत असून ती प्वेर्त रीको, डोमिनिकन प्रजासत्ताक, मध्य अमेरिकेतील देश, पेरू, एक्कादोर, अर्जेटिना, चिली इ. देशांकरिता करण्यात येते.


रशिया : या देशांच्या मंत्रिमंडळाच्या अखत्यारीतील दूरचित्रवाणी व रेडिओ प्रेषणाकरिता असलेली राज्य समिती प्रेषणाचे बहुतांश कार्य चालविते. समितीच्या अध्यक्षाच्या हाताखाली दूरचित्रवाणी, विदेशी सेवा, देशांतर्गत रेडिओ आणि प्रशासन व वित्तव्यवस्था या प्रत्येकाकरिता एक उपाध्यक्ष असून १३ सदस्यांचे संपादक मंडळ असते. समितीचे प्रेषण कार्यक्रमांवर नियंत्रण असून दूरचित्रवाणी केंद्रांतील सामग्री व सर्व कर्मचारीवर्ग यांच्या बाबतीतील जबाबदारी तिच्यावरच असते परंतु सर्व प्रेषण परिवाह, रेडिओ केंद्रे व कलागृहे यांच्यावर संदेशवहन खात्याचे नियंत्रण असते. समितीच्या अखत्यारीतील सात प्रमुख संपादकीय मंडळे देशांतर्गत रेडिओ चालवितात आणि त्यांच्याकडे कार्यक्रमांची योजना आखणे व ते सादर करणे, प्रचार, माहिती (बातम्या), शिशू, युवक, साहित्य व नाटक आणि संगीत, सुखात्मिका व उपहासिका या बाबी सोपविलेल्या आहेत. खेळांकरिता संयुक्त रेडिओ व दूरचित्रवाणी खाते आहे. योग्य संपादकीय मंडळातील प्रमुख संपादकाच्या (वा उपसंपादकाच्या) मान्यतेशिवाय कोणताही कार्यक्रम प्रेषित केला जात नाही. प्रादेशिक केंद्रांना काही प्रमाणात स्वायत्तता असली, तरी वर उल्लेखिलेल्या समितीचे विविध प्रजासत्ताके, प्रदेश व प्रांत यांतील रेडिओशी संबंधित असलेल्या प्रादेशिक समित्यांवर नियंत्रण असते. रशियातील रेडिओ प्रेषण जाळ्याकरिता व प्रादेशिक प्रेषणाकरिता ३०० ते ४०० प्रेषक लागतात. जास्तीत जास्त व्याप्तिक्षेत्रासाठी रेडिओ प्रेषण करण्याकरिता दीर्घ, मध्यम व लघू तरंग तसेच कंप्रता-विरूपण वापरण्यात येते.

मॉस्कोहून पुढील पाच प्रकारची प्रेषणे होतात. पहिला कार्यक्रम मिश्र स्वरूपाचा असून देशव्यापी असतो. दुसरा कार्यक्रमही देशव्यापी असून २४ तास चालू असतो आणि त्यात दर अर्ध्या तासाला बातम्या व भाष्ये असतात. तिसरा कार्यक्रम मुख्यत्वे रशियाच्या यूरोपीय प्रदेशाकरिता असून तो लघुतरंग व कंप्रता-विरूपण यांद्वारे दूरवरच्या प्रदेशांत पोहोचतो. चौथ्या कार्यक्रमात दररोज नऊ तास अभिजात संगीत कंप्रता-विरूपणाद्वारे प्रेषित करण्यात येते. पाचवा कार्यक्रम परदेशांत असलेल्या रशियन लोकांकरिता असतो. रशियात प्रचलित असलेल्या ७० भाषांतील कार्यक्रम प्रादेशिक प्रेषणाद्वारे प्रसारित करण्यात येतात. २३ प्रमुख प्रादेशिक केंद्रे आहेत. प्रेषणातील विविधतेमुळे कार्यक्रमांचे टक्केवार वर्गीकरण करणे शक्य नाही तथापि इतर देशांशी तुलना करता रशियन रेडिओ सामान्यतः माहिती, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम यांना अधिक आणि मनोरंजनाला कमी वेळ देतो, असे म्हणता येईल.

मॉस्को दूरचित्रवाणी केंद्र १९३९ मध्ये सुरू झाले. दुसऱ्‍या महायुद्धातील खंडानंतर पुन्हा सुरू होणारे ते पहिलेच यूरोपीय केंद्र होते. जवळजवळ चारपंचमांश लोकसंख्येला दूरचित्रवाणी संकेत पोहोचू शकतो आणि त्याकरिता २८० प्रमुख व सु. २,००० पुनःप्रेषण करणारे प्रेषक आहेत. उपग्रहांच्या उपयोगामुळे संभाव्य प्रेषकांची संख्या पुष्कळच वाढलेली आहे. मॉस्कोहून एकाच वेळी सहा दूरचित्रवाणी परिवाह चालू असतात (बहुतेक प्रमुख शहरांत किमान दोन परिवाह उपलब्ध आहेत). चार मुख्य परिवाहांपैकी पहिला फक्त मॉस्को क्षेत्राकरिता दुसरा रशियातील बहुतांश प्रजासत्ताकांसाठी तिसरा प्राथमिक, माध्यमिक व विद्यापीठीय स्तरांवरील शैक्षणिक कार्यक्रमांसाठी आणि चौथा सामाजिक व राजकीय प्रश्न, कला व क्रीडा यांकरिता वापरण्यात येतात. प्रादेशिक केंद्रांतूनही मोठ्या प्रमाणावर दूरचित्रवाणी प्रेषण होते.

रशियाची विदेशी प्रेषण सेवा इतर कोणत्याही देशापेक्षा मोठी आहे. या सेवेची पुढील सहा प्रकारांत विभागणी करता येते : (१) मॉस्कोहून परदेशांना, (२) प्रादेशिक केंद्रांतून परदेशांना, (३) देशातील सेवांचे परदेशांतील श्रोत्यांसाठी पुनःप्रेषण, (४) सांस्कृतिक संबंधविषयक समितीच्या अखत्यारीखाली परदेशातील रशियन लोकांसाठी, (५) व्यापारी जहाजावरील कर्मचाऱ्‍यांसाठी व कोळ्यांसाठी, (६) ‘शांतता व प्रगती’ केंद्र. मॉस्कोहून होणारे प्रेषण व त्याला पूरक असणाऱ्‍या प्रादेशिक विदेशी सेवा यांचे व्याप्तिक्षेत्र सर्वांत मोठे असून त्याकरिता सु. ७० भाषांचा उपयोग करण्यात येतो. यात आफ्रिका व आशिया खंडांतील भाषांमध्ये इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त प्रेषण रशियातील करण्यात येते.

प्रेषणाच्या प्रेक्षकवर्गाचे स्वरूप : येथे ‘प्रेक्षक’ हा शब्द रेडिओ व दूरचित्रवाणी या दोहोंच्या कार्यक्रमांचे ग्रहण करणाऱ्‍या व्यक्तिसमूहाकरिता वापरलेला आहे. प्रेक्षक हे मुख्यत्वे स्वतःच्या घरातील एकांतामधील व्यक्तिंच्या स्वरूपात असतात. यामुळे रेडिओ वा दूरचित्रवाणी प्रेक्षकांचे मानसशास्त्र व वर्तन हे नाट्यगृहातील बा सभागृहातील प्रेक्षकांपेक्षा पुष्कळसे भिन्न असते. तेथे एकत्रित जमावाचे वा गर्दीचे वातावरण नसते व आपण एका मोठ्या प्रेक्षकवर्गाचे प्रत्यक्ष भाग आहोत, याची फक्त वरवर जाणीव असते. यामुळे प्रेक्षकामध्ये वक्त्याशी वा कलाकाराशी समक्ष जवळीक असल्याची भावना उत्पन्न होते. याखेरीज कित्येक लोक रंगमंचावरील वा साहित्यातील अनेक प्रांजल शब्दप्रयोग चटकन क्षम्य मानीत असले वा त्यांना पुष्टी देत असले, तरी प्रत्यक्ष स्वतःच्या घरात अशा शब्दप्रयोगांचा ते स्वीकार करण्याची शक्यता जवळजवळ नसतेच.

रेडिओ वा दूरचित्रवाणी प्रेषण करण्यास राज्याचा परवाना लागत असल्याने किंवा ते राज्यानेच चालवावयाचे असल्याने वा प्रेक्षकांशी निकटचे संबंध असल्यामुळे प्रेषणाचे कार्य जणू काही सार्वजनिक जागेत चाललेले असते आणि सर्व अवस्थांमध्ये ते जनतेच्या निरीक्षणास खुले असते. यांमुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रेषणावर नैतिक व कायदेशीर जबाबदारी असते तसेच इतर स्वरूपातील सार्वजनिक अभिव्यक्तीपेक्षा जनतेच्या भावनांना व राजकीय मतांना ते अधिक संवेदनशील असले पाहिजे, अशीही अपेक्षा असते.

प्रेक्षकवर्गाची पाहणी : आर्थिक तसेच वर उल्लेखिलेल्या कारणांकरिता प्रेक्षकांच्या मतांचे व रेडिओ किंवा दूरचित्रवाणी कार्यक्रमांना मिळणाऱ्‍या त्यांच्या प्रतिसादाचे मूल्यमापन करणे प्रेषणकर्त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. प्रेक्षकांची निश्चित संख्या निर्धारित करण्यासाठी चित्रपटगृहाप्रमाणे वा नाट्यगृहाप्रमाणे गल्ल्याची मोजणी करण्यासारखे साधन नसल्याने रेडिओच्या वा दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकवर्गाची मोजणी करणे अवघड असते. पत्रे ही मुख्यत्वे ज्यांना वेळ आहे व ज्यांचा लिहिण्याचा कल आहे अशांकडूनच येत असल्याने ती पूर्णपणे प्रातिनिधिक समजता येत नाहीत. प्रेक्षकवर्गाच्या मूल्यमापनाची माहिती दूरध्वनीद्वारे प्रतिदर्श सर्वेक्षणाच्या (नमुना पाहणीच्या) पद्धतींनी [⟶ प्रतिदर्श सर्वेक्षण सिद्धांत], बाजारपेठ संशोधन करणाऱ्‍या संघटनांद्वारे घरीच मुलाखती घेऊन किंवा व्यक्तिगत ग्राही संचाला जोडलेल्या व नोंद करणाऱ्‍या खास प्रयुक्तींद्वारेही मिळविता येते. मालकाच्या संमतीने जोडलेली ही प्रयुक्ती ग्राही संच किती वेळा वापरला, तो सुरू वा बंद कधी केला आणि कोणकोणती केंद्रे लावली होती यांची नोंद करते. या प्रयुक्ती महाग असून त्या कोणीतरी कार्यक्रम प्रत्यक्ष पहात आहे वा ऐकत आहे हे दर्शवितातच असे नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग प्रेक्षकवर्गाच्या लहान प्रतिदर्शापुरताच होऊ शकतो. प्रेक्षकवर्गाच्या मूल्यमापनाची कोणतीही पद्धत वापरली, तरी एखाद्या कार्यक्रमाच्या बाबतीत प्रेक्षकांच्या आकर्षणाचा अभाव असल्याचे आढळून आल्यास व्यापारी प्रेषणकर्ते त्या कार्यक्रमात तत्परतेने बदल करतात वा तो बंद करतात. अशा प्रकारे प्रेक्षक हे त्यांना सादर केलेल्या कार्यक्रमांचे स्वरूप ठरविण्यावर प्रभाव पाडू शकतात. व्यापारी प्रेषणांतील प्रायोजित कार्यक्रमांच्या बाबतीतही जाहिरात केलेल्या मालाच्या विक्रीतील यशाचा वा अपशयाचा कार्यक्रमावर परिणाम होतो.


शैक्षणिक प्रेषण : ज्या देशांत प्रेषण हे मोठ्या प्रमाणावर वा पूर्णतः खाजगी व्यवस्थापनाद्वारे करण्यात येते आणि जेथे मोठी व अधिक महत्त्वाची केंद्रे व जाळी हे खाजगी व्यापारी उपक्रम आहेत तेथील शैक्षणिक प्रेषणाचा आढावा घेणे कठीण आहे. तथापि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये व लॅटिन अमेरिकेत विद्यापीठे, महाविद्यालये व काही वेळा नगरपालिकांच्या व राज्यांच्या मालकीच्या केंद्रांद्वारे बऱ्‍याच प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रेषण करण्यात येते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसने शैक्षणिक व सर्वसाधारणपणे अधिक विचार प्रवृत्त करणाऱ्‍या कार्यक्रमांचे प्रमाण वाढविले आहे. लॅटिन अमेरिकेतील काही देशांत शाळेतील शिक्षकांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठीच नव्हे तर निरक्षरतेच्या विरूद्ध लढा देण्यासाठी आणि विविक्त राहणाऱ्‍या ग्रामीण जनतेला सार्वजनिक आरोग्य, शेतीच्या पद्धती आणि इतर सामाजिक व व्यावहारिक विषयासंबंधी उचित सल्ला देण्यासाठी प्रेषण कार्यक्रमांचा उपयोग करण्यात येत आहे. रोमन कॅथलिक चर्च या सामाजिक व व्यावहारिक विषयांसंबंधीच्या कार्यक्रमांच्या प्रेषणाबाबत (उदा., ब्राझील व कोलंबिया या देशांत) अग्रेसर आहे. प्रेषणाचा अशाच प्रकारे उपयोग आफ्रिकेतील व आशियातील बहुतेक देशांत केला जात आहे.

जपानच्या एनएचकेचे शैक्षणिक प्रेषण कार्य जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी आहे. त्याच्या दोन दूरचित्रवाणी व दोन परमप्रसरविरूपण रेडिओ सेवा पूर्णपणे शैक्षणिक कार्यक्रम प्रेषित करतात तर सर्वसाधारण दूरचित्रवाणी सेवा व कंप्रता-विरूपण रेडिओ हेही या स्वरूपाचे कार्यक्रम प्रेषित करतात. जपानमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी कार्यक्रम तयार करण्यात येतात. मानसिक व शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्यांकरिता खास कार्यक्रम असतात. यांखेरीज ‘सामाजिक शिक्षण’ या व्यापक शीर्षकाखाली परदेशी भाषा, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण, शेती, वनविद्या, मत्स्योद्योग व व्यवसाय व्यवस्थापन यांविषयी सल्ला तसेच मुले, युवक व स्त्रिया यांच्याकरिता खास कार्यक्रम असतात. एनएचकेचे शैक्षणिक कार्यक्रम जपानमधील ९० टक्क्यांहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळांपर्यंत पोहोचतात.

फ्रान्समध्ये राज्य प्रेषण सेवा आपल्या रेडिओ कार्यक्रमांपैकी निम्मा वेळ कला, साहित्य व विज्ञाने यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रेषणाकरिता खर्च करते. तिच्या पहिल्या व दुसऱ्‍या दूरचित्रवाणी जाळ्यांच्या कार्यक्रमांपैकी १४% प्रौढ शिक्षणासाठी असतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबरोबरच शिक्षकांकरिता उजळणी पाठ्यक्रम व विद्यापीठीय स्तरांवरील पाठ्यक्रम यांविषयीचे कार्यक्रम सादर केले जातात. इटालियन रेडिओ १ टक्क्यापेक्षा कमी वेळ मुलांच्या शैक्षणिक कार्यक्रमांना देतो पण सांस्कृतिक आणि इतर संबंधित कार्यक्रमांना २०% देतो. १९८० नंतरच्या दशकाच्या प्रारंभी तेथील दूरचित्रवाणीच्या वेळेपैकी १७% वेळ शैक्षणिक व शालेय प्रेषणासाठी आणि ४% वेळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खर्च करण्यात येत होता. स्वीडिश रेडिओ व्यापक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतो. तेथील दूरचित्रवाणीवरील अशा कार्यक्रमांच्या प्रेषणाचे प्रमाण रेडिओपेक्षा जास्त आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि विद्यापीठीय स्तरांवरील प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रम तेथे भरीव प्रमाणावर प्रेषित केले जातात. स्वीडनमध्ये वर्षात एकूण १,४०० शालेय कार्यक्रम सादर केले जातात तसेच तेथे व्यावसायिक प्रशिक्षण व शिक्षकांकरिता उजळणी यांवर भर दिला जातो. याउलट जर्मनीत औपचारिक शिक्षणाकरिता प्रेषणाचा फारच थोडा उपयोग करण्यात येतो.

बीबीसीने शैक्षणिक प्रेषणात आद्य कार्य केलेले असून रेडिओ व दूरचित्रवाणी या दोहोंतील तिच्या कार्यांचा हळूहळू विस्तार झालेला आहे. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी बीबीसी शंभराहून अधिक रेडिओ कार्यक्रम मालिका व जवळजवळ ४० दूरचित्रवाणी मालिका सादर करते. खुल्या विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी खास तयार केलेले कार्यक्रम आठवड्यातून दोन वेळा सादर करण्यात येतात. १९७० नंतरच्या दशकाच्या मध्यास खुल्या विद्यापीठाकरिता बीबीसी आठवड्याला रेडिओवर सरासरीने १६ तास व दूरचित्रवाणीवर १४ तासांहून अधिक वेळ कार्यक्रम सादर करीत होती. याखेरीज ब्रिटनमधील इंडिपेंडंट ब्रॉडकास्टिंग ॲथॉरिटीने व्यापारी कार्यक्रम निर्मात्या कंपन्यांना शाळांकरिता व प्रौढांकरिता शक्षणिक कार्यक्रम तयार करणे आवश्यक ठरविलेले आहे. १९७० च्या सुमारापावेतो दर आठवड्याला १० तास (वर्षातून एकूण २८ आठवडे) इतका या कार्यक्रमांचा कालावधी झालेला होता.

ऑस्ट्रेलियात रेडिओ व दूरचित्रवाणी या दोहोंच्या व्यापारी केंद्रांवरून थोड्या प्रमाणात शैक्षणिक कार्यक्रम प्रेषित होतात परंतु ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कमिशन शैक्षणिक प्रेषणाचा मोठा वाटा उचलते. रेडिओच्या वेळेपैकी ४% व दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांपैकी १८% भाग शैक्षणिक कार्यक्रमांना दिला जातो. यातील बहुतेक प्रेषण शाळांकरिता व बालकमंदिरांसाठी असते. कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला इंग्रजी व फ्रेंच या दोन्ही भाषांत शैक्षणिक कार्यक्रम सादर करावे लागतात आणि ते कंप्रता-विरूपण व परमप्रसर-विरूपण रेडिओ जाळ्यांवर तसेच दूरचित्रवाणीवर सादर केले जातात.


विदेशी सेवेसाठी प्रेषण : स्वतःच्या सीमेपलीकडील प्रेक्षकांसाठी एखाद्या देशाने कार्यक्रमांचे प्रेषण करण्याची पद्धत रेडिओ प्रेषणाच्या अगदी प्रारंभीच्या काळापासून चालू झाली. रशियाने प्रचारासाठी परदेशी भाषांतून प्रेषण करण्यास १९२० नंतरच्या दशकात प्रारंक्ष केला. हुकूमशाही इटली व नाझी जर्मनी यांनी त्यानंतर अशा प्रेषणांचा अवलंब केला. फ्रान्स, ब्रिटन व नेदर्लंड्स यांनी प्रथमतः लघुतरंग प्रेषणाचा उपयोग परदेशांतील फ्रेंच, इंग्रजी व डच भाषिकांकरिता केला तरी त्यांनीही त्यानंतर प्रचारासाठी अशा प्रेषणांचा उपयोग केला. ब्रिटनने १९३८ मध्ये अरबी भाषेत आणि दक्षिण अमेरिकेसाठी स्पॅनिश व पोर्तुगीज या भाषांत कार्यक्रम प्रेषित करून परदेशी भाषा प्रेषणास प्रारंभ केला. ऑगस्ट १९३९ पावेतो परदेशी भाषांत प्रेषण करणाऱ्‍या देशांत अल्बेनिया, बल्गेरिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, हंगेरी, इटली, जपान, रूमानिया, स्पेन, रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व व्हॅटिकन सिटी यांचा समावेश होता.

दुसऱ्‍या महायुद्धकाळात परदेशी भाषांतील प्रेषण चालू राहिले. विशेषतः बीबीसीच्या विश्वसनीय कार्यक्रमांमुळे जर्मनव्याप्त देशांतील लोकांचे नीतिधैर्य टिकून राहण्यास मदत झाली. महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय तणावामुळे विदेशी भाषा सेवांमध्ये लक्षणीय वाढ झाली. १९५० मध्ये पूर्व यूरोपातील सर्व कम्युनिस्ट देशांनी (पूर्व जर्मनी खेरीज) विदेशी सेवा सुरू केल्या होत्या परंतु त्या लहान प्रमाणात होत्या. त्या वेळी दर आठवड्याला रशिया ५०० तासांहून अधिक, ब्रिटन ६०० तासांहून थोडा अधिक, तर व्हॉइस ऑफ अमेरिका ५०० तासांहून कमी वेळ प्रेषण करीत होते. १९८० नंतरच्या दशकाच्या प्रारंभापावेतो मात्र ही परिस्थिती आमूलाग्र बदलली. केवळ रशिया दर आठवड्याला २,००० तासांपेक्षा जास्त व पूर्व यूरोपातील सर्व कम्युनिस्ट देशांचे (यूगोस्लाव्हिया सोडून) एकूण प्रेषण सु.१,५०० तास होते. १९८१ मध्ये दर आठवड्याला ब्रिटनने ७४४ तास, पश्चिम जर्मनीने ७८५ तास आणि अमेरिकेने व्हॉइस ऑफ अमेरिका, रेडिओ लिबर्टी व रेडिओ फ्री यूरोप यांच्या द्वारे १,९२५ तास प्रेषण केले. १९५० मध्ये चीन दर आठवड्याला ६६ तास प्रेषण करीत होता, तर १९८१ मध्ये ही वेळ १,३७५ तासांपर्यंत वाढली. चीनच्या प्रेषण काळांतील ही वाढ चीन व रशिया यांच्यातील वाढत्या तणावाचे द्योतक होती. १९८० नंतरच्या दशकाच्या प्रारंभी जपान २६२ तास प्रेषण करीत होता, तर ऑस्ट्रेलिया व कॅनडा हे देशही विदेशी प्रेषण करीत होते. १९८५ च्या सुमारास भारताच्या विदेशी सेवेद्वारे दर आठवड्याला २५ भाषांतून (यांतील आठ भारतीय) एकूण सु. ४०० तास प्रेषण केले जात होते.

विदेशी प्रेषणांतून विकसित झालेली आनुषंगिक गोष्ट म्हणजे विविध देशांनी केलेल्या विविध भाषांतील अशा प्रेषणांचे अनुश्रवण व त्यांचे माहितीकरता विश्लेषण करणे ही होय. बीबीसीची अनुश्रवण सेवा अतिशय विकसित असून तीतून बऱ्‍याचदा मौलिक माहिती मिळू शकते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची सेंट्रल इंटलिजन्स एजन्सी हीसुद्धा विदेशी प्रेषणांचे अनुश्रवण व विश्लेषण करते. एखाद्या देशात देशांतर्गत वा विदेशी सेवेसाठी तयार केलेल्या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण (प्रतिलेखन) करून त्यांचा अन्य देशांत प्रेषण करण्याकरिता स्वीकार करता येतो. शैक्षणिक स्वरूपाच्या रेडिओ कार्यक्रमांचा उपयोग तीच भाषा बोलणाऱ्‍या इतर देशांत करता येतो. अनेक रेडिओ ध्वनिमुद्रणे विनामूल्य पुरविण्यात येत असली, तरी दूरचित्रवाणीच्या बाबतीत परिस्थिती निराळी असून दूरचित्रवाणी चित्रपटांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो.

अवैध व अपतटीय केंद्रे : ज्या देशांत सर्वसाधारण प्रेषण किंवा फक्त रेडिओ प्रेषण ही मक्तेदारी आहे, त्या देशांच्या सागरी सीमेच्या पलीकडे उभ्या केलेल्या जहाजांवर उभारलेल्या स्वतंत्र व्यापारी केंद्रांशी त्यांना काही काळ स्पर्धा करावी लागलेली आहे. स्वीडन, डेन्मार्क, नेदर्लंड्स व ब्रिटन या देशांना अशा केंद्रांची झळ पोहोचलेली आहे. ही केंद्रे अनधिकृत तरंगलांब्यांचा उपयोग करीत असल्याने इतर रेडिओ संदेशवहन प्रणालींवर अनिष्ट परिणाम होतो. ही केंद्रे त्यांच्या प्रेषणासाठी वापरीत असलेल्या साहित्याच्या बाबतीत कृतिस्वाम्याचे कोणतेच नियम पाळीत नाहीत. सरकारी कारवाईमुळे अशा केंद्रांना हळूहळू पायबंद बसलेला आहे. स्वीडनमध्ये लोकप्रिय संगीताची स्पर्धात्मक सेवा परिणामकारक ठरली. ब्रिटनने हा प्रश्न सोडविण्यासाठी अशा जहाजांना कार्यक्रम वा जाहिराती पुरविणाऱ्‍यांना शिक्षा करणारा कायदा संमत करण्याबरोबरच रेडिओ १ ही बऱ्‍याच प्रमाणात लोकप्रिय संगीताचे कार्यक्रम प्रेषित करणारी सेवा स्थापन केली. फ्रान्सला सारमधील यूरोप नं. १ व पिरेनीजमधील रेडिओ अँडोरा या केंद्रांशी तसेच मोनाको, बेल्जियम, लक्सेंबर्ग व स्वित्झर्लंड या देशांतून होणाऱ्‍या फ्रेंच भाषेतील प्रेषणांशी स्पर्धा करावी लागते. यूरोप नं. १ हा सर्वांत तीव्र स्पर्धक असून त्यात फ्रेंच सरकारने शेवटी नियंत्रक हक्क विकत घेतले आहेत.

रेडिओचा कलामाध्यमाच्या दृष्टीने विचार : रेडिओ प्रेषण कार्यात गुंतलेल्या लोकांना ते ज्या माध्यमात काम करीत होते त्याचे स्वरूप व श्रोत्यांशी असलेला त्यांचा विशेष प्रकारचा संबंध यांची जाणीव झाली, तेव्हाच रेडिओच्या कलेचा शोध लागण्यास प्रारंभ झाला. रेडिओच्या कलात्मक सामर्थ्याचा उपयोग १९३० नंतरच्या दशकापावेतो करण्यात आला नाही. रेडिओ हे एकच असे माध्यम होते की, ज्यात श्रोत्यांना कलाकार अदृश्य होते. प्रारंभी प्रेषणकर्ते रंगमंचाच्या किंवा व्यासपीठाच्या शैलीचा वापर करण्यास प्रवृत्त झाले. मोठा श्रोतृवर्ग डोळ्यासमोर ठेवून अननुभवी प्रेषणकर्त्यांनी आपल्या आवाजाकरिता व शैलीकरिता अंगीकारलेला कृत्रिम दिमाख नवीन माध्यमाला पूर्णपणे अयोग्य होता. प्रत्यक्षात त्यांचा श्रोतृवर्ग हा घरातील वा अनौपचारिक परिस्थितीतील व बहुधा त्याच वेळी इतर काही गोष्टी करीत असलेला असा लहान गट किंवा व्यक्ती या स्वरूपाचा असतो. यामुळे या नवीन परिस्थितीला अनुरूप अशा शैलीची जुळवणी करण्यातच रेडिओची मूलभूत कला होती. काही थोडेसेच कार्यक्रम श्रोत्यांची उपस्थिती निर्विवादपणे मानू शकतात.

बातम्यांच्या प्रेषणाची अपवादांत गणना होते. बातम्या ठराविक, व्यक्तिनिरपेक्ष रीतीने देण्याची पद्धत बहुतेक देशांत रूढ झाली.बातम्या वाचणारा त्याचे स्वतःचे व्यक्तित्त्व शक्य तितके झाकून एक ‘सांघिक’ आवाज अंगीकारतो. इतर बहुतेक भाषित कार्यक्रमांत श्रोत्यांचे लक्ष वेधून घेईल असा प्रकारे आवाजाचा उपयोग करणे आवश्यक असते आणि याचाच अर्थ माध्यम म्हणून ध्वनिग्राहकाचे स्वरूप ओळखणे आवश्यक झाले. श्रोत्याचे लक्ष वेधलेले राहण्याचा कालावधी मर्यादित असल्याचे आढळून आले. संक्षिप्त बातमीपत्रांना ५ ते १० मिनिटे देण्यात आली, तर भाषणाला १५ मिनिटे व विशेष प्रसंगी ३० मिनिटांपर्यंत वेळ देण्यात आली. प्रेक्षकांच्या विविध प्रकारांनुसार योग्य अशा शैलीचा उपयोग करण्याबाबत पुष्कळ विचारमंथन करण्यात आले.


रेडिओच्या कलेचा उदय ब्रिटनमध्ये व ‘लोकसेवा’ हाच दृष्टिकोन बाळगणाऱ्‍या इतर विशिष्ट देशांत झाला. या कलेचे स्वरूप नाममात्र प्रत्येकाला उदेशिलेले माध्यम असे असले, तरी प्रत्यक्षात विशिष्ट विषयांबद्दल अगत्य व आवड असलेल्यांकरिता योजलेले खास विभाग (यांतील काही इतरांपेक्षा जास्त बुद्धिमत्तेची गरज असलेले) अंतर्भूत असलेल्या व व्यापक पायावर आधारलेल्या एक प्रकारच्या राष्ट्रीय नियतकालिकाशी साम्य असलेले असे होते. लोकप्रिय रेडिओ भाषणे ही गंभीर विषयावरील वा निव्वळ शैक्षणिक स्वरूपाच्या भाषणांपेक्षा कमी कालावधीची व शैलीच्या दृष्टीने अधिक अनौपचारिक असत. रेडिओ प्रेषणामुळे विविध विषयांवरील संकेंद्रीत विवरण व युक्तिवाद ऐकण्यास तयार असलेल्या तथाकथित अल्पसंख्य (पण प्रत्यक्षात ज्यांची संख्या बऱ्‍यारचदा लक्षावधी असे) श्रोत्यांपुढे त्यांच्या राहत्या घरात देशातील सर्वोच्च बुद्धिवंतांचे विचार सादर करण्याची अनन्य संधी उपलब्ध झाली. यातून (विशेषतः यूरोपात) अल्पसंख्य श्रोत्यांच्या विशेष आस्थेच्या विषयांकरिता दिवसाचा काही भाग अथवा दिवसभर प्रेषण करणारे खास परिवाह विकसित झाले. या सेवेच्या खर्चासाठी श्रोते वार्षिक परवाना शुल्क देत. याउलट अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत खाजगी मालकीच्या प्रेषण कंपन्या आपले उत्पन्न जाहिरातींद्वारे मिळवीत असल्याने शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे या जाहिरातदारांच्या इच्छेनुसार आपल्या कार्यक्रमांची आखणी करीत. जपानमध्ये सरकारी व व्यापारी अशा दोन्ही प्रेषण सेवा होत्या आणि त्यांपैकी सरकारी सेवेला यूरोपप्रमाणेच ग्राही संच धारकांकडून परवाना शुल्कातून उत्पन्न मिळे. रशियात रेडिओ प्रेषण हे सांस्कृतिक क्रांतीचे एक अतिशय शक्तिमान हत्यार म्हणून मान्यता पावले होते. स्टॅलिन यांच्या कारकीर्दीत बहुतेक सर्व रेडिओ ग्राही स्थानिक दूरध्वनी विनिमय केंद्रांना तारेने जोडलेले होते व त्यामुळे श्रोत्यांना फक्त मान्यताप्राप्त कार्यक्रमांमधूनच निवड करता येत असे. रशियात ८० प्रमुख भाषा बोलल्या जात असल्याने या सेवेचे प्रादेशीकरण करणे भाग पडले. बातम्या व भाष्य यांखेरीज असलेले कार्यक्रम सरळ प्रचारकी थाटापेक्षा सामान्यतः सांस्कृतिक स्वरूपाचे असत.

अशा प्रकारे कला-प्रकार या दृष्टीने रेडिओ प्रेषणाचा झालेला विकास त्याच्या व्यवस्थापनाच्या व वित्तव्यवस्थेच्या पद्धतीवर अवलंबून होता. रेडिओ या माध्यमाकरिता योजलेल्या नाटक, सुगम करमणूक व अनुबोधपर कार्यक्रम यांत नवीन समृद्ध क्षेत्रे खुली झाली. त्याच वेळी काही पारंपरिक कला-प्रकारांचे (विशेषतः रंगमंचावरील नाटक व संगीत यांचे) यशस्वीपणे प्रेषण करण्यात आले. कथावाड्मय व कविता यांचे वाचन हाही ध्वनिप्रेषणाचा एक प्रमुख घटक झाला.

दूरचित्रवाणीचा कलामाध्यमाच्या दृष्टीने विचार : १९५० नंतरच्या दोन दशकांत दूरचित्रवाणीने रेडिओला हळूहळू गाठले. प्रथमतः दूरचित्रवाणी हे माध्यम म्हणून चित्रपटापेक्षा थोडेसेच निराळे समजण्यात येत होते. दूरचित्रवाणीकरिता चित्रपटांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येत असला, तरी या चित्रपटांचे प्रकार चित्रपटगृहात दाखविण्यात येणाऱ्‍या चित्रपटांपेक्षा निराळे असणे आवश्यक असे.

चित्रपट व दूरचित्रवाणी यांच्यात कला-प्रकार या दृष्टीने असणारा फरक हा निर्मिती, वितरण व प्रदर्शन यांसंबंधीच्या भौतिक व आर्थिक परिस्थितींमधून उद्भवला. ही माध्यमे व त्यांचे प्रेक्षक यांच्यातील संबंधातील फार फरक होता. या माध्यमांतील प्राथमिक फरक निर्मिती-करिता वापरण्यात येणारे कॅमेरे व त्यांचे कार्य यांत आहे. चित्रपट कॅमेरा हा सेल्युलॉइडच्या फिल्मवर द्विमितीय प्रतिमेच्या रूपात नोंद करतो व तिचे यथायोग्य संकलन करून नंतर पडद्यावर क्षेपण करण्यात येते. दूरचित्रवाणी कॅमेरा द्विमितीय प्रतिमेचे ग्रहण करतो व तत्काळ ती प्रेषण करण्याकरिता उपलब्ध करून देतो. तथापि ही प्रतिमा नोंदविली जात नाही व घटना संपल्यावर नाहीशी होते. मात्र अधिक साधने वापरून प्रतिमा फिल्मवर अथवा दृक्फितीवर नोंदविता येते.चित्रपट कॅमेरा हा छायाचित्रण, दृश्याचे योग्य ठिकाणी छायाचित्रण थांबविणे, संकलन व पुनर्ध्ननिमुद्रण या निवडण्याच्या व जुळविण्याच्या सविस्तर प्रक्रियेशी संबंधित असून या एकूण प्रक्रियेला काही महिनेही लागू शकतात. दृक्फितीद्वारे दूरचित्रवाणी प्रतिमांची नोंद व संकलन करता येत असले, तरी मूलतः दूरचित्रवाणी या प्रकाराचे स्वरूप तत्क्षणी घडत असलेल्या घटनांचे (राजकीय व सामाजिक घटना, वार्ता सारांक्ष, भाष्य, चर्चा इ.) प्रेक्षकांना ताबडतोब प्रेषण करणे, असे आहे.

दूरचित्रवाणीची मूलभूत कला ही या तत्क्षणिक प्रतिमांवर नियंत्रण ठेवण्यात आहे. कॅमेरे निवडक सोयीच्या जागी ठेवून या प्रतिमांची थोडीफार पूर्वनिवड करता येते पण नंतर मात्र या कॅमेऱ्‍यांनी दिलेल्या प्रतिमांमधून दिग्दर्शकाने योग्य ती निवड करणे आवश्यक असते. विविध कॅमेऱ्‍यांनी निरनिराळ्या कोनांतून उपलब्ध करून दिलेल्या प्रतिमांमधून तत्क्षणिक परिणामकारक असा प्रतिमा-प्रवाह मिळविण्या-करिता दिग्दर्शक-संकलकाला आपले कौशल्य वापरावे लागते. चित्रपटामध्ये हेच उद्दिष्ट गाठण्यासाठी निराळीच पद्धत अवलंबिली जाते. याकरिता त्यातील क्रियेचे चित्रण तुकड्यातुकड्यांनी करून क्रमवार प्रतिमा मिळविल्या जातात आणि नंतर संकलनाने व पुनर्ध्वनिमुद्रणाने त्यांची एकत्रित जुळणी केली जाते.

दूरचित्रवाणी व चित्रपट यांतील सर्वाधिक फरक त्यांच्या प्रेक्षकांशी असलेल्या संबंधांच्या बाबतीत आहे. चित्रपट ही खास तो पहाण्याच्या कार्यक्रमासाठी जमलेला प्रेक्षकवर्ग असलेल्या चित्रपटगृहाकरिता अभिकल्पित केलेली घटना असते. याउलट दूरचित्रवाणी ही घरातील खाजगी कार्यक्रमाशी सदृश्य असते. आपल्या घरातील नेहमीच्या वापराच्या खोलीतील अतिपरिचित परिस्थितीत दाखविल्या जाणाऱ्‍या व सापेक्षतः लहान असलेल्या चित्रापुढे कदाचित एकट्याने व बऱ्‍याच वेळा कित्येक तास बसणाऱ्‍या व्यक्तीची वृत्ती ही चित्रपटगृहात खास जमलेल्या प्रेक्षकवर्गाच्या अनुभवात सहभाग होण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या वृत्तीहून अगदी निराळी असते. दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकाच्या बाबतीत त्याच्या मनावरील ताण अधिक सैल झालेला असतो पण असंबद्ध व्यत्ययांनी लक्ष विचलित होण्याची सतत शक्यता असते. चित्रपटगृहात एखादा उत्तम चित्रपट पाहण्यात इतर सर्व गोष्टी विसरून प्रेक्षक मग्न होतो, तर दूरचित्रवाणीच्या बाबतीत पडद्यावर केवळ नजर ठेवली जाते. दूरचित्रवाणी प्रेक्षकाचे लक्ष कार्यक्रमाच्या एकाच भागामध्ये व्यग्र होत नसून ते भागामागून येणाऱ्‍या भागांनी बनलेल्या मुक्त प्रवाहाकडे असते. दूरचित्रवाणी ही एखाद्या बोलक्या चित्रांच्या नियतकालिकाप्रमाणे असून ती मनोरंजनाबरोबरच सहजपणे आत्मसात होणारी माहिती सादर करते आणि तीत औपचारिक बातमीपत्रापासून ते साध्यासुध्या चालू घडामोडींच्या अनौपचारिक गप्पागोष्टींसारख्या चर्चेचाही समावेश असतो.

दृक् परिणामाच्या तीव्रतेच्या बाबतीतही दूरचित्रवाणी ही चित्रपटापेक्षा निराळी आहे. चित्रपटगृहात दृष्टिक्षेत्राचा मध्यभाग अतिशय विवर्धित प्रतिमेने व्यापला जात असल्याने व याखेरीजचा दालनाचा भाग काळोखात असल्याने निर्माण होणारे कुतूहल व प्रतिसाद हे सापेक्षतः कमी काळोखात असलेल्या आणि बऱ्‍याच लहान खोलीतील प्रमाणित आकारमानाच्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावरील प्रतिमेने निर्माण होणारे कुतूहल व प्रतिसाद यांपेक्षा खूपच जास्त असतात. चित्रपटगृहातील कुशल प्रेक्षकांना असणारी तपशीलाची जाण व गुणग्राहकता आश्चर्यकारक असते. दूरचित्रवाणीशी चित्रपटाची तुलना करण्यासाठी व दूरचित्रवाणीच्या मर्यादा लक्षात येण्याकरिता मोठ्या पडद्याच्या चित्रपटगृहासाठी तयार केलेल्या चित्रपटांचे (उदा., शोले, जॉज् यांसारख्या चित्रपटांचे) निरीक्षण करणे उद्बोधक ठरते. दूरचित्रवाणीच्या पडद्यावरील बहुतांश दृष्टीक्षेत्र अभिनेते, वक्ते आणि भाष्वकार यांनीच व्यापणे इष्ट असते.


प्रेषणाची कलात्मक तंत्रे व इतर माध्यमांकडून घेवाण : ग्रीक नाटकाने प्राचीन मिथ्यकथा व आख्यायिका यांच्यावर आणि प्रबोधन काळातील नाटकाने अभिजात व समकालीन साहित्यावर आपली उभारणी केली. त्याचप्रमाणे विसाव्या शतकातील रेडिओ व दूरचित्रवाणी या नवीन माध्यमांनी निर्मात्यांना व पटकथाकारांना इतर माध्यमातील विद्यमान साहित्याचे (विशेषतः कादंबरी व नाटक) हक्क मिळविण्यास भाग पाडले. रेडिओ व दूरचित्रवाणी यांची क्षेत्रे वाढत्या प्रमाणावर वृत्तपत्रविद्येशी परस्परव्याप्त होत आहेत. अनेक पत्रकार हे प्रेषणकर्ते व भाष्यकार होत आहेत.

तथापि बरीचशी घेवाण ही कलात्मक स्वरूपापेक्षा यांत्रिक व तांत्रिक स्वरूपाची झालेली आहे. रेडिओ प्रेषणाने ध्वनी जतन करून ठेवण्यासाठी प्रारंभी ग्रामोफोन ध्वनिमुद्रिकेचा उपयोग करून घेतला, तर अशाच प्रकारे दूरचित्रवाणीने चित्रपटाचा वापर केला. पुढे ध्वनी व दृक् असे दोन्ही संकेत नोंदविणाऱ्‍या चुंबकीय फितीचा शोध लागल्याने ग्रामोफोन, दूरध्वनी, रेडिओ, ध्वनियुक्त चित्रपट (बोलपट) व दूरचित्रवाणी ही सर्व यांत्रिक माध्यमे परस्परांना जोडली गेली. यामुळे आधुनिक समाजातील दृश्ये, ध्वनी, कला व संस्कृती यांची वास्तविक पूर्ण नोंद उपलब्ध होत आहे.

नोंदवून जतन करणे ही क्रिया स्वतः सर्जनशील कला नाही, तर इतरत्र निर्माण झालेल्या कलेकरिता सेवा आहे. रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषणाचे एक प्रमुख कार्य म्हणजे इतर माध्यमांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचा प्रसार करणे, हे आहे. ही गोष्ट रेडिओच्या बाबतीत विशेषत्वाने खरी आहे. दूरचित्रवाणीत या कलाकृतींचे त्या माध्यमाच्या गरजेनुसार बहुधा रूपांतरण करण्यात येते व त्यामुळे त्या निराळ्या प्रकारच्या कलाकृती बनतात. दूरचित्रवाणी कलागृहात एखाद्या संगीतिका (ऑपेरा) इलेक्ट्रॉनीय कॅमेऱ्‍यांच्या क्षमतेला अनुरूप अशा प्रकारे सादर केली, तर ती दूरचित्रवाणी संगीतिका होईल व मग रंगमंचावरील संगीतिकेपेक्षा ती भिन्न प्रकारची असेल.

नाट्य तंत्रे : रेडिओने प्रारंभी गोष्टी सांगण्याच्या प्राचीन कलेची पुनःस्थापना केली. त्यानंतर स्थळ व काळ सूचित करण्यासाठी बोललेले शब्द आणि त्यांच्यासमवेत ध्वनी व संगीत यांचा प्रभावी उपयोग करण्यास रेडिओकरिता लेखन करणारे लेखक शिकले. यातूनच पुढे ⇨नभोनाट्याचा जन्म झाला. रेडिओ नाटककाराने, स्वतः काय अनुभवीत आहेत हे पाहू न शकणाऱ्‍या श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला उद्युक्त करणे आवश्यक असते. या मर्यादेत एक विशिष्ट प्रकारची मुक्तताही आहे. शेक्सपिअर यांच्या रंगमंचावरील देखाव्यांपासून असलेल्या मुक्ततेमुळे त्यांच्या नाटकांतील कृती ते स्थळकाळाच्या बाबतीत पुष्कळ विस्तृतपणे हलवू शकले. त्याचप्रमाणे रेडिओ हा कृती व स्थळकाळाचे संदर्भ यांच्या बाबतीत स्वतःचे आकार्य सातत्य निर्माण करण्यास मुक्त असतो. नाटक व अनुबोधपट आणि कल्पक सुगम मनोरंजनाचे अगदी नवीनच प्रकार यांच्या बाबतीत रेडिओने अतिशय सर्जनशील भूमिका बजावलेली आहे.

याउलट दूरचित्रवाणीने बोलपटांनी १९३०–५० या काळात अगोदरच प्रस्थापित केलेली तंत्रे आवश्यक तेथे बदल करून अनुसरली. चित्रपट व दूरचित्रवाणी यांच्यातील प्रारंभीच्या स्पर्धेत आर्थिक व तांत्रिक या दोन्ही बाबींचा वाटा होता. पहिली दूरचित्रवाणी नाटके ही अगदी साध्या प्रकारच्या चित्रपटाच्या संवादासारखी होती. पडदा फारसा मोठा नसल्याने व फार खर्च लागत असल्याने जास्त मेहनतीने तयार करावे लागणारे मंच व मोठी पात्रसंख्या टाळली जाई. ज्याप्रमाणे वर्तमानपत्रे एकदा वापरल्यावर टाकून दिली जातात, त्याचप्रमाणे दूरचित्रवाणी सामग्री ही सर्वांत जास्त व्यय होणारी असे. पुढे निवडक दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे आंतरराष्ट्रीय वितरण होऊ लागल्यावर दूरचित्रवाणी निर्मितीच्या खर्चाकरिता अधिक पैसे उपलब्ध होऊ लागले. जुन्या आदर्शांचा त्याग करणाऱ्‍या व स्वतःची नवी तंत्रे विकसित करणाऱ्‍या लेखकांचा व दिग्दर्शकांचा १९५० नंतरच्या दशकात उदय झाल्यावरच दूरचित्रवाणी नाटक मान्यता पावू लागले. दूरचित्रवाणीची शुद्ध कलात्मक दृष्ट्या असलेली सर्जंनशीलता ही तिच्या द्वारे निर्मात्याला उपलब्ध होत असलेल्या अनन्य संधीमध्ये आहे. या संधी चित्रपट निर्मात्याच्या आवाक्याच्या पलीकडील होत्या कारण अशा जोखमीकरिता त्याला पैसे उपलब्ध होणे शक्य नव्हते.

चित्रपट तंत्रे : दूरचित्रवाणी व चित्रपट यांतील प्रतिमांच्या मूलभूत तत्त्वांत असलेले साम्य म्हणजे प्रत्येक वेधाचा (शॉटचा) आवाका निवडण्याचे व त्यातील हालचालींचे स्वरूप ठरविण्याचे स्वातंत्र्य, हे होय. दोन्ही बाबतींत निवेदन हे गतिमान रचनेच्या म्हणजे हालचालींच्या निवडक वेधांच्या निवडक (वा संकलित) ओधाच्या त्याच तत्त्वांवर आधारलेले असते. त्यांच्या निर्मितीत तांत्रिक फरक असले, तरी सौंदर्यशास्त्रदृष्ट्या त्यांचे निकटचे संबंध आहेत. हे संबंध स्वाभाविकपणेच तांत्रिक क्षेत्रातही विस्तारलेले आहेत. दूरचित्रवाणीने इलेक्ट्रॉनीय प्रतिमेची उच्च गुणवत्तेची तत्काळ नोंद मिळविण्यासाठी दृक्फितीचा अवलंब केला. प्रारंभी दूरचित्रवाणीकरिता फिल्मचा उपयोग होण्यास हा द्दक्फीतचा अवलंब धोकादायक वाटला पण तसे काही घडले नाही. दूरचित्रवाणी निर्मितीच्या कित्येक शाखांत चित्रपट कॅमेऱ्‍याचा उपयोग आवश्यक ठरला आहे. याउलट चित्रपटनिर्मितीत दृक्फीत उपयुक्त आहे कारण फिल्मवर प्रक्रीया करण्यापूर्वीच वेध तपासण्याची क्षमता त्यामुळे उपलब्ध झालेली आहे.

दूरचित्रवाणी हा कला-प्रकार म्हणून विकसित होताना इतर माध्यमांत तयार झालेल्या कलाकृतींना वाव देण्याचा एक मार्ग म्हणूनही तिचा उपयोग करण्यात आलेला आहे. इतर माध्यमांत होणाऱ्‍या निर्मितीचा खर्च नंतर दूरचित्रवाणीवर प्रेषण करून मिळणाऱ्‍या उत्पन्नातून वाढत्या प्रमाणात करण्यात येत आहे. अगदी प्रारंभीच्या काळापासून पूर्वीच्या चित्रपटांच्या प्रचंड साठ्यातील चित्रपट नियमितपणे दाखविण्यावर दूरचित्रवाणी अवलंबून होती. जुन्या चित्रपटांसाठी फार मोठे भाडे द्यावे लागत असल्याने दूरचित्रवाणीचे हितसंबंधीय प्रथम चित्रपटगृहात व नंतर स्वतः चालवीत असलेल्या दूरचित्रवाणी परिवाहांवर दाखविण्यासाठी स्वतःच नव्या चित्रपटांची निर्मिती करण्यास प्रवृत्त झाले. अशा प्रकारे तयार करण्यात येणाऱ्‍या कथा चित्रपटांत बहुधा पात्रसंख्या कमी असून जवळून केलेल्या चित्रणाचे प्रमाण जास्त असल्याने ते दूरचित्रवाणीच्या लहान पडद्यावर दाखविण्यास सोयीचे होतात.

कार्यक्रमांचे प्रकार व कलागृहांचा विकास : प्रेषित करण्यात येणाऱ्‍या कार्यक्रमांचे भेद करता येण्याजोगे अनेक प्रकार आहेत पण बऱ्‍याचदा त्याचे तंत्र, विषय व शैली परस्परव्याप्त असू शकतात. उदा., रेडिओवरून भाषण (शब्द) व संगीत प्रेषित करण्यात येतात पण त्यांचे अनेकविध प्रकारे संयोग होऊ शकतात. दूरचित्रवाणी दृक् घटकाची भर घालते व त्यामुळे शक्य असलेल्या कार्यक्रमांच्या प्रकारांची संख्या खूपच वाढते. बहुतेक मोठ्या प्रेषण संघटनांनी प्रशासकीय सोयीसाठी कार्यक्रमांचे निरनिराळे वर्ग केलेले आहेत तथापि त्यांच्या व्याख्या फार अचूक असणे शक्य नाही व त्यांच्या विभाजक रेषा अपरिहार्यतेने संदिग्ध आहेत.


मनोरंजन : यात पुढील प्रकारांचा समावेश असू शकतो : सुखात्मिका (पण नाटकापासून हिचे निराळेपण ओळखणे पूर्णपणे अशक्य आहे) कूटप्रश्नांचे कार्यक्रम (माहितीपर व शैक्षणिक स्वरूपाच्या सापेक्षतः गंभीर कार्यक्रमांपासून सहजपणे वेगळे करता न येणारे) लोकप्रिय संगीत (याच्या जॅझ व शास्त्रीय संगीताशी असणाऱ्‍या सीमा दृढ नाहीत) विविधरंजन किंवा परस्परसंबंध नसलेल्या प्रसंगांची मालिका (बहुधा एखाद्या लोकप्रिय सादरकर्त्याने वा प्रस्थापित कलाकाराने हिची गुंफण केलेली असते).

रेडिओच्या प्रारंभीच्या काळात जुन्या संगीतगृहांच्या परंपरेचा विस्तार असलेल्या विविधरंजन प्रकाराचा उपयोग करण्याची प्रवृत्ती होती. यातून पुढे ‘गँग शो’ या नावाने ओळखण्यात येणारा प्रकार उदयास आला. दर आठवड्याला तीच पात्रे व कलाकार विनोदी प्रसंगांच्या वा सूचक शब्दप्रयोगांच्या मालिकेचा यात उपयोग करीत आणि यातून हळूहळू बनणाऱ्‍या परिचित पार्श्वभूमीवर पटकथेतील विसंगतींचा विनोदनिर्मितीसाठी पुरेपूर उपयोग करण्यात येई. यापुढील विकास म्हणजे ‘परिस्थितिनिष्ठ सुखात्मिका’ (सिटकॉम) व तीत अनेक पात्रे (उदा., एखाद्या कुटुंबातील व्यक्ती) आठवड्यामागून आठवडे एकाच परिस्थितीत राहतात पण विनोदी साहसे अनुभवतात. दूरचित्रवाणी लोकप्रिय झाल्यावर रेडिओवरील या विनोदी कार्यक्रमांची लोकप्रियता संपुष्टात आली पण दूरचित्रवाणीवर असे कार्यक्रम (उदा., दूरदर्शनवरील ये जो है जिंदगी हा कार्यक्रम) आधारस्तंभ बनलेले आहेत. राजकीय व सामाजिक उपरोधाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करणारे विनोदी कार्यक्रम हा प्रचलित लोकप्रिय आविष्कार आहे. परिस्थितिनिष्ठ सुखात्मिकेवरही या प्रवृत्तीचा प्रभाव पडलेला आहे.

जगभर तयार करण्यात येणाऱ्‍या सुखात्मिका वा विनोदी मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांच्या बाबतीत एक गोष्ट समान असल्याचे दिसून येते आणि ती म्हणजे ज्याप्रमाणे कलाकारांना उत्तेजन मिळण्यासाठी कलागृहातील प्रेक्षकांची गरज असते, त्याचप्रमाणे श्रोते व प्रेक्षक हेही कलागृहातील प्रेक्षकांच्या हशा व टाळ्यांमुळे उत्तेजित होतात. यामुळे कलाकारांबरोबरच प्रेक्षकांचीही सोय असलेली मोठी कलागृहे आवश्यक होतात (या परिस्थितीचे काही दुरूपयोगही करण्यात आलेले आहेत उदा., अगोदर ध्वनिमुद्रित केलेल्या कार्यक्रमावर हशा व टाळ्यांचे अध्यारोपण करणे). दूरचित्रवाणी कलागृहांच्या बाबतीत अधिकाधिक भपकेदार होत चाललेल्या मंचांसाठी तसेच नर्तक व समूहगायक यांकरिता अधिक जागेची सोय करावी लागते. प्रेषण संघटनांना सामान्यतः योग्य आकारमानाची कलागृहे बांधणे शक्य झालेले आहे तथापि रेडिओ प्रेषणकर्ते प्रारंभी छोटी रंगमंदिरे विकत वा भाड्याने घेणेच पसंत करीत.

प्रकार व रचना या बाबतीत मुलांच्या मनोरंजन कार्यक्रमांचे प्रौढांच्या कार्यक्रमांशी साम्य असते. सचेतनीकृत व्यंगचित्रपट हे मात्र या नियमाला अपवाद असून हंगेरियन, पोलिश व फ्रेंच कलाकारांनी या क्षेत्रात खरे प्राविण्य मिळविलेले आहे.

नाटक : रेडिओ व दूरचित्रवाणी नाटकाची निर्मिती रंगमंदिरात चांगल्या प्रकारे करता येत नाही. यामुळे कलागृहाचे स्वरूप भिन्न असते. प्रारंभीची नभोनाट्ये सापेक्षतः लहान व एकच ध्वनिग्राहक असलेल्या कलागृहात तयार करीत, तर प्रारंभीची दूरचित्रवाणी नाटके एकाच कॅमेऱ्‍याने कलागृहात तयार करण्यात येत. लवकरच रेडिओ अभियंते एकाहून अधिक कलागृहांना जोडलेल्या नियंत्रण फलकाचा व मोठ्या कल्पकतेने प्राप्त केलेल्या ध्वनि-परिणामांचा उपयोग करू लागले. दूरचित्रवाणी अभियंत्यांनी कॅमेरे व मंच यांच्या उपयोगाचे क्षेत्र अधिक विस्तारित केले. रेडिओच्या बाबतीत एका कलागृहापासून दुसऱ्‍यात व दूरचित्रवाणीच्या बाबतीत एका मंचापासून दुसऱ्‍यात मिश्रण करणे, तसेच सुविकसित ध्वनि-परिणाम व पार्श्वसंगीत ही सर्व नाटकनिर्मितीतील स्वीकृत तंत्रे बनलेली आहेत. अपरिहार्यपणे दूरचित्रवाणी नाटकाने चित्रपटनिर्मितीची तंत्रे मोठ्या प्रमाणावर अनुसरली आहेत.

कथाचित्रपट (बहुधा मूळात चित्रपटगृहासाठी तयार केलेला) हा जगभर दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकातील स्वीकृत व महत्त्वाचा घटक बनलेला आहे. अधूनमधून रेडिओ व दूरचित्रवाणी या दोहोंवर नाट्यगृहातील रंगमंचावर सादर होणारी नाटके सरळ प्रेषित करण्यात येतात पण यात कोणत्याच माध्यमाचे फायदे पुरेशा प्रमाणात उपयोगात आणले जात नाहीत, असे सर्वसाधारण मत आहे. रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्या प्रारंभीच्या काळापासून कलागृह-निर्मित नाटक हा त्यांच्या कार्यक्रम वेळापत्रकातील महत्त्वाचा घटक आहे. चित्रपटाप्रमाणे दूरचित्रवाणीच्या बाबतीतही लवकरच प्रत्यक्ष स्थानावर चित्रण करण्याची पद्धत स्वीकारली गेली.

दूरचित्रवाणी व रेडिओ यांवर सादर करण्यात येणाऱ्‍या मालिकांत प्रसिद्ध साहित्यकृतींची (उदा., चार्ल्स डिकिन्झ, लीओ टॉलस्टॉय, शरत्चंद्र चतर्जी, रवींद्रनाथ टागोर इत्यादींच्या कादंबऱ्‍या व लघुकथा तसेच महाभारत, रामायण यांसारखी महाकाव्ये) रूपांतरे आठवे हेन्री, थोरले माधवराव पेशवे, बहादूरशाह जफर यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावरील नाटके आणि अदभूतरम्य क्षोभप्रधान नाटके (सोप ऑपेराज) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. मुलांकरिता काल्पनिक व साहसपूर्ण मालिका रेडिओ व दूरचित्रवाणी यांकरिता तयार केल्या जातात. तीन इतर वेगळ्या प्रकारच्या नाटकांना जवळजवळ सार्वत्रिक लोकप्रियता लाभली आहे : (१) पश्चिमी (वेस्टर्न) साहसे (सामान्यतः पश्चिम अमेरिकेतील एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जीवनाविषयीची नाटके) (२) गुंड, गुन्हे व पोलिस यांचा अंतर्भाव असलेली नाटके (३) रूग्णालये व इतर वैद्यकीय परिस्थितीच्या पार्श्चभूमीवरील नाटके. गुन्हे व पश्चिमी साहसे यांविषयीच्या काही कार्यक्रमांतील हिंसक घटनांचा मुलांवर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव आहे, अशी कडक टीका करण्यात आलेली आहे. तिला प्रतिसाद म्हणून कित्येक प्रेषण संघटनांनी अशी दृश्ये कमीत कमी ठेवण्यासाठी आचारसंहिता अंमलात आणलेली आहे.

भाषित कार्यक्रम : या कार्यक्रमांत मनोरंजक प्रकारचे व कित्येक संवादात्मक स्वरूपाचे कार्यक्रम यांचा समावेश होतो. दुसऱ्‍या प्रकारच्या कार्यक्रमांत नामवंत व्यक्तींना मुलाखतकार प्रश्न विचारतो आणि काही वेळा त्यात अधूनमधून संगीत वा विनोद किंवा गंभीर चर्चा, अनुबोधपट वा भाषणे यांचा अंतर्भाव असतो. वादविवाद निर्माण होण्याची भीती, एकूण निःपक्षपातीपणा राखण्याची समस्या आणि काही वेळा जाणीवपूर्वक प्रयत्न व लक्ष केंद्रित करावयास लावणाऱ्‍या कार्यक्रमांमुळे मोठा प्रेक्षकवर्ग दुरावेल ही समजूत यांमुळे रेडिओच्या प्रारंभीच्या काळात गंभीर भाषिक कार्यक्रमांना देण्यात येणारा वेळ मर्यादित होता परंतु लवकरच अनेक प्रेषणकर्त्यांत स्वतःच्या कार्यासंबंधीचा अभिमान व जबाबदारी यांची जाणीव निर्माण झाली आणि माहिती व मत किंवा अभिप्राय पुरविणे हे कर्तव्य मानण्यात आले. ज्या देशांत प्रेषणाला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य प्राप्त झाले, तेथे हळूहळू काही प्रेषणकर्त्यांत सत्य व वादविवाद उघडकीस आणण्यासंबंधी आस्था वाटण्याबरोबरच समाजातील दुराचार व अनिष्ट रूढी प्रकाशात आणण्याच्या जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.


भाषित रेडिओ कार्यक्रमांत बातम्या हाच सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणून सातत्याने गणला जात आहे. प्रेषित केलेल्या बातम्यांमुळे वृत्त-पत्रव्यवसायावर होणारा परिणाम टाळणे शक्य नसल्याने रेडिओच्या प्रारंभीच्या काळात वृत्तपत्र मालकांनी बातम्यांचे उद्गम व त्या प्रेषित करण्याची शक्यता असलेली वेळ यांवर मर्यादा ठेवण्याचे किंवा स्वतःच या क्षेत्रात उतरण्याचे प्रयत्न केले. जेथे प्रेषणाचे व्यापारीकरण झाले तेथे जाहिरातींच्या उत्पन्नासाठी रेडिओ वृत्तपत्रांशी स्पर्धा करू लागल्याने व एखादा वृत्तान्त वृत्तपत्रांपेक्षा रेडिओ बहुधा अगोदरच लोकांपर्यंत पोहोचवू शकत असल्याने वृत्तपत्रांना अधिकच चिंता वाटू लागली. तथापि रेडिओवरील बातम्यांमुळे वृत्तपत्रांचा खप कमी झाल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र दूरचित्रवाणीचा दैनिक वृत्तपत्रांवर आणि अधिकांशाने साप्ताहिकांवर व मासिकांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसते. दूरचित्रवाणीने रेडिओला मागे टाकण्यापूर्वी बऱ्‍याच अगोदर, प्रेषण संघटना वृत्तसंस्थाकडून मिळणाऱ्‍या सेवेला पूरक म्हणून स्वतःचे वार्ताहर आणि खास व परदेशी बातमीदार यांचा उपयोग करू लागलेल्या होत्या. दूरचित्रवाणी बातम्यांच्या निर्मितीत आणखी काही समस्या उद्भवल्या. नुसत्या लिखित मजकुरावरून वा टेलिप्रॉम्पटरवरून ध्वनिग्राहकासमोरील वृत्तनिवेदकाने बातम्या वाचणे समाधानकारक नव्हते आणि लवकरच दूरचित्रवाणी बातम्यांच्या अधिकांश भागाबरोबर योग्य अशी संबंधित चित्रे दाखविण्यात येऊ लागली. दृश्यचित्रांची गरज आणि ती मिळविण्यासाठी येणाऱ्‍या अडचणी व लागणारा खर्च या त्या वेळी व अद्यापही काही प्रमाणात असलेल्या गंभीर समस्या आहेत. अशा दृश्यचित्रांवर भरीव खर्च करण्यात येत असला, तरी त्याची उपलब्धता अथवा अनुपलब्धता यांमुळे बातम्यांचे मूल्य व वस्तुनिष्ठता यांना बाधा येते, अशी टीका होऊ शकते.

तथापि सर्वसाधारणपणे दूरचित्रवाणी बातम्यांना येणाऱ्‍या अधिक मोठ्या खर्चाशी प्रेषण संघटनांनी जुळवून घेतलेले आहे. दृश्यचित्र बातम्यांचे सांघिक व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय स्तरावर सरळ जोडलेल्या जाळ्यांचा (उदा., यूरोव्हिजन) विकास व उपग्रह संदेशवहन यांमुळे दूरचित्रवाणीवरील बातम्या देण्याच्या बहुतेक समस्यांचे निराकरण झालेले आहे. याउलट युद्ध व नागरी विक्षोभ तसेच अपघात व भीषण अनर्थ यांच्या दृश्यचित्रांचा मानसशास्त्रीय परिणाम रेडिओ वृत्तान्तापेक्षा फार मोठा होतो, हे स्पष्ट आहे. उदा., व्हिएटनाम युद्धाच्या दूरचित्रवाणी वृत्तान्तांमुळे जनमतावर पडलेला प्रभाव रेडिओ बातमीपत्रांपेक्षा अतिशय दूरगामी होता. तथापि रेडिओवरील बातम्यांच्या बाबतीत दूरचित्रवाणीच्या इतक्या प्रमाणात सातत्याने लक्ष देण्याची गरज भासत नाही व अल्पकालीन वार्तापत्रे वारंवार प्रेषित करण्याचा कल अधिक आहे. अमेरिकेत पूर्णपणे बातम्यांसाठीच आपले प्रेषण मर्यादित ठेवणारी काही रेडिओ केंद्रे आहेत. या बातम्या अखंड नियतकालिकाच्या स्वरूपाच्या व मधूनमधून जाहिराती अशा असतात. रेडिओवर वार्ता नियतकालिक किंवा वार्तापट (न्यूज रील) प्रेषित करण्यास बीबीसीने बऱ्‍याच अगोदर सुरूवात केली. या बाबतीत संक्षिप्त वार्ता, मुलाखती व भाषणांतील उतारे याची मालिका, अनेक आवाजांचा वापर आणि उद्दीपनाचे वारंवार नवीकरण करण्याच्या तंत्राचा उपयोग हे सूत्र यशस्वी ठरले. या सूत्राचा उपयोग बातमीपत्रांकरिता आणि रेडिओ व दूरचित्रवाणी यांमध्ये चालू घडामोडींच्या वृत्तव्याप्तीसाठीही वाढत्या प्रमाणात करण्यात येत आहे. या सर्व बातम्या व भाष्य यांसंबंधीच्या कार्यक्रमांबाबत एक समस्या म्हणजे सादरकर्ते व त्यांना स्वतःचे व्यक्तित्व प्रक्षेपित करण्यास अगर दृष्टिकोन मांडण्यास किती प्रमाणात स्वातंत्र्य द्यावे, ही आहे. जेथे प्रेषण ही मक्तेदारी आहे वा होती आणि जेथे निःपक्षपातीपणाची गरज व परंपरा प्रबळ आहे अशा देशांच्या मानाने अमेरिकेत या क्षेत्रामध्ये फारच थोडे प्रतिबंध आहेत. बीबीसीच्या बाबतीत रेडिओ वृत्तनिवेदक दीर्घकाळ अनामिक होते परंतु दूरचित्रवाणीवरील वृत्तनिवेदकाची किंवा वृत्त वा भाष्य नियतकालिकाच्या सादरकर्त्याची ओळख लपवून ठेवणे शक्य नसते आणि यामुळे हे प्रतिबंध मोडून पडले आहेत. तरीसुद्धा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपेक्षा किंवा लॅटिन अमेरिकेपेक्षा पश्चिम यूरोपातील व राष्ट्रकुलातील देशांमध्ये प्रेषण सेवांच्या निःपक्षपातीपणाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा राहिलेला आहे. सर्व विकसित देशांत निवडणुकीच्या निकालांच्या बातम्या देण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्यात येतात. अमेरिका व ब्रिटन या देशांत हे कार्यक्रम सर्वांत भपकेदार असतात.

काही देशांत रेडिओवरील थेट भाषणाचे कार्यक्रम टिकून आहेत मात्र या माध्यमाच्या बहराच्या काळाच्या मानाने त्यांचे प्रमाण कमी झाले आहे, तरीसुद्धा काही यशस्वी व्याख्यात्यांचे बरेच दीर्घ कार्यक्रम काही वेळा दूरचित्रवाणीवर व काही देशांत रेडिओवरही ठेवण्यात येतात. १० मिनिटे वा अधिक कालावधीचे थेट भाषण उत्तेजक दूरचित्रवाणी निर्मितीच्या दृष्टीने सोयीचे होत नाही. मात्र अनुबोधपट होण्याइतपत चित्रित उदाहरणासह असे भाषण असेल, तर ते सोयीचे होते.

अनेक देशांत लोकप्रिय असलेल्या आणखी एका स्वरूपाच्या कार्यक्रमात एका अध्यक्षाच्या खालील विख्यात व्यक्तींचे मंडळ कलागृहातील प्रेक्षकांच्या प्रासंगिक स्वरूपाच्या प्रश्रांना उत्तरे देते. काही वेळा कार्यक्रम योजलेल्या कलागृहातील वा दालनातील कोणत्याही भागात असलेल्या प्रेक्षकाला प्रश्न विचारता यावा म्हणून विशेष प्रकारचा ध्वनिग्राहक वापरण्यात येतो.

रेडिओ अनुबोधपटाचा विकास नाटकातून झाला. यामुळे प्रारंभीचे अनुबोधपट नाट्यरूपी होते आणि त्यांचा बहुतांश सुपरिचित ऐतिहासिक घटनांवर आधारलेला होता. हे कार्यक्रम परिणामतः या घटनांच्या नाट्यरूपी पुनर्रचनेच्या रूपात सादर केले जात असत. चुंबकीय ध्वनिमुद्रण फितीच्या शोधामुळे रेडिओ अनुबोधपटांची निर्मिती सुलभ झाली. त्यापूर्वी वापरात असलेले मेणविलेपित तबकडी व तार ध्वनिमुद्रक यांच्यापेक्षा चुंबकीय फीत संकलनास व प्रत्यक्ष स्थळी वापरण्यास खूपच सोयीची होती. जेव्हा या तांत्रिक प्रगतीमुळे उत्तम स्वरूपाचे रेडिओ अनुबोधपट तयार करणे शक्य झाले. नेमकी त्याच वेळी प्रचलित विषयांवरील दूरचित्रवाणी अनुबोधपटांनी त्यांची जागा घेण्यास सुरूवात केली. अनुबोधपट हे आंतरराष्ट्रीय संबंध, देशांतर्गत राजकारण व सामाजिक प्रश्न यांसंबंधीच्या चालू घडामोडी अधिकाधिक चांगल्या प्रकारे उजेडात आणू लागलेले आहेत.

धार्मिक : प्रामुख्याने दोन प्रकारचे धार्मिक कार्यक्रम प्रेषित केले जातात : (१) भक्तिप्रवण व (२) माहितीपर–चर्चात्मक. पहिल्या प्रकारात कलागृहामध्ये अथवा चर्च, प्रार्थनामंदिर वा एखादे मोठे दालन येथे आयोजित केलेल्या प्रार्थना, धार्मिक उपासना वा स्तोत्र गायन अशा कार्यक्रमांचा समावेश होतो. धार्मिक कार्यक्रमांना देण्यात येणाऱ्‍या वेळेपैकी बराचसा वेळ अनुबोधपट, चर्चा व मुलाखती यांसाठी खर्च करण्याकडे कल आहे. धार्मिक विषयाचे नाट्यरूपांतरण हा तिसरा प्रकारही प्रचारात आलेला आहे. बहुशः अनेक आंतरराष्ट्रीय वा प्रादेशिक धार्मिक प्रेषण संघटनांच्या नियंत्रणाखालील धर्मप्रसारक संस्था व्यापारी प्रेषण केंद्रावरील वेळ विकत घेतात अथवा लॅटिन अमेरिका, आफ्रिका व आशिया यांसह जगातील अनेक भागांत प्रेषण केंद्रे चालवितात. भारतात विविध धार्मिक प्रसंगविशेषांनुसार (उदा., सण, उत्सव वगैरे) रेडिओ व दूरचित्रवाणीवरून माहितीपर कार्यक्रम प्रेषित केले जातात.


बाह्य प्रेषण कार्यक्रम : असे कार्यक्रम हा भिन्न व व्याख्या देता येण्यासारखा प्रकार नसला, तरी रेडिओच्या जन्मापासून दोन्ही माध्यमांद्वारे प्रेषित झालेल्या सर्व कार्यक्रमांत ते सर्वाधिक लोकप्रिय व लक्षवेधक ठरलेले आहेत. विविध प्रकारचे खेळ, समारंभ व राजकीय घटना ही खात्रीची आकर्षणे ठरलेली असून त्यांकडे सामान्यतः सर्वाधिक प्रेक्षकवर्ग आकर्षिला जातो. अशा कार्यक्रमांच्या प्रेषणामुळे प्रेक्षकाला आपण स्वतः प्रत्यक्ष प्रेक्षकवर्गात बसल्याची भावना होत असल्याने त्यात त्याला खास रस असतो. बाह्य प्रेषणामुळे दूरचित्रवाणी प्रेषण अभियंत्यांच्या कल्पकतेला मिळणारे उत्तेजन व योजकतेवर पडलेला भार इतका आहे की, रेडिओच्या आद्य प्रवर्तकांना कल्पनाही करता येणार नाही अशा युक्त्याप्रयुक्त्यांचा त्यांनी प्रेक्षकांना परिचय करून दिलेला आहे. तारेद्वारे होणाऱ्‍या संदेशवहनातील सुधारणा, चल (फिरत्या) प्रेषकांचा विकास व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उपग्रह संदेशवहन यांमुळे बाह्य प्रेषणांना लवचिकता आलेली असून जवळजवळ अमर्याद क्षेत्र उपलब्ध झालेले आहे.

संगीत : जगातील संगीताच्या क्षेत्रावर रेडिओमुळे दोन महत्त्वाचे परिणाम झाले. एक म्हणजे सर्व प्रकारच्या संगीतांचा श्रोतृवर्ग पुष्कळच विस्तारला आहे आणि दुसरा म्हणजे नवीन प्रकारांचा (उदा., इलेक्ट्रॉनीय संगीत) विकास अधिक सुलभतेने होण्यास मदत झालेली आहे. संगीताला रेडिओ प्रेषणाचा एक मुख्य घटक म्हणून न्याय्य स्थान मिळालेले आहे याउलट दूरचित्रवाणीवर जरी संगीताचे कार्यक्रम होत असले, तरी बऱ्‍याचदा तो दुसऱ्‍या कशाचा तरी (उदा., नृत्य) आनुषंगिक भाग अथवा मिश्र कार्यक्रमाचा एक लहान घटक असतो. लोकप्रिय संगीताच्या क्षेत्रातील प्रघात जलद बदलले जाण्यास रेडिओने फार मोठी कामगिरी केलेली आहे आणि हे बदल ध्वनिमुद्रिका व ध्वनिफिती तयार करण्यातील तांत्रिक प्रगती व त्यांची लोकप्रियता व विक्री यांच्याशी जुळते असलेले आढळतात. एखादे गाणे वा एखादा कलाकार लोकप्रिय होण्यातील रेडिओचे सामर्थ्य ध्वनिमुद्रिका निर्मात्यांनी ओळखल्याने याचा काही प्रमाणात दुरूपयोगही झालेला आहे.

मूर्तस्वरित ध्वनी तंत्राच्या [⟶ ध्वनिमुद्रण व पुनरूत्पादन] विकासामुळे ध्वनिमुद्रिका व्यवसायात मोठी क्रांती झाली व रेडिओच्या बाबतीत या तंत्राचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे. शास्त्रीय संगीताचे व नंतर इतर प्रकारच्या संगीताचे कंप्रता-विरूपित रेडिओ प्रेषण काही क्षेत्रांत लोकप्रिय झालेले आहे.

संगीतिका या प्रकाराचाही प्रेषणामुळे फायदा झालेला आहे. संगीतिकागृहांतून केलेल्या बाह्य प्रेषणामुळे तसेच रेडिओ व दूरचित्रवाणी कलागृहांतून केलेल्या प्रेषणामुळे यूरोपातील व इतर देशांतील मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत हा संगीत प्रकार पोहोचण्यास मोठी मदत झालेली आहे. इतर बहुतेक कार्यक्रमांपेक्षा संगीताच्या कार्यक्रमांच्या बाबतीत कलागृहांसंबंधीच्या समस्या अधिक प्रमाणात अडचणीच्या असतात. या अडचणी अंशतः संपूर्ण सिंफनी वाद्यवृंदाकरिता लागणारे कलागृहाचे मोठे आकारमान व अंशतः अशा कार्यक्रमांचे योग्य ध्वनिपुनरूत्पादन करण्याकरिता ध्वनिकीय समतोल अतिशय सूक्ष्मग्राही असण्याची आवश्यकता, यांमुळे उद्भवतात.

कलाकार, व्याख्याते, लेखक व त्यांच्या संघटना यांच्याशी असणारे संबंध : रेडिओच्या प्रारंभीच्या काळात शुल्क, स्वामित्वशुल्क, प्रयोगाचे हक्क व कृतिस्वामित्व यांविषयीच्या समस्या आणि संघटनांशी असणारे संबंध यांकडे क्वचितच लक्ष दिले जात असे. करमणूक कलाकार बहुतांशी प्रसिद्धीसाठी कार्यक्रम करीत. हळूहळू रेडिओचा परिणाम कलाकारांना समजून येऊ लागला. प्रथमतः रंगमंदिरातील त्यांच्या उत्पन्नाला धोका म्हणून व पुढे रंगमंदिराच्या जागी अतिशय लाभदायक असा पर्याय म्हणून निरनिराळ्या देशांत निरनिराळे कायदे व संघटनांच्या विविध रचना असल्याने वरील प्रश्रांबाबत कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली याचे चित्र फारच गुंतागुंतीचे आहे. सर्वसाधारणपणे पहाता कृतिस्वामित्वाचे प्रश्न हे ध्वनिमुद्रिकांच्या निर्मात्यांचे हक्क आणि संगीत रचनाकारांचे शुल्क यांभोवतीच फिरत होते. बऱ्‍याचदा ध्वनिमुद्रणांच्या पुनरूत्पादनाचे दर व शुल्क हे संघटनांशी निर्माण झालेल्या वादांचे विषय होते. ध्वनिमुद्रिका विकत घेणे वा प्रत्यक्ष संगीत सभांतून स्वतःची ध्वनीमुद्रणे तयार करणे यामुळे बऱ्‍याच प्रमाणात आर्थिक बचत होते, असे प्रेषणकर्त्यांना दिसून आले तथापि हा फायदा संगीतकाराचे मोल देऊन घेतला जाई. परिणामी संगीतकारांच्या संघटनांनी काही वेळा ध्वनिमुद्रिकांचा उपयोग करण्यास वा प्रत्यक्ष संगीत सभेत ध्वनिमुद्रण करण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. काही देशांत (उदा., नेदर्लंड्स) पुनरावृत्तीचा प्रश्न दर पुनरावृत्तीच्या वेळी कलाकाराला शुल्क देऊन सोडविण्यात आला. प्रेषणकर्त्याला एखादे ध्वनिमुद्रण फायदेशीर होईनासे होईपर्यंत त्याच्या प्रत्येक क्रमागत उपयोगाच्या वेळी शुल्क वाढविण्यात येते.

प्रेषण संघटनांचे त्यांच्या कर्मचाऱ्‍यांशी असणारे संबंधही गुंतागुंतीचे आहेत. कॅनडात निर्बंधक नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांची परिणती बंडावा व राजिनामे यांत झाली, तर फ्रान्समध्ये सरकारी धोरणाशी जुळवून घेण्यास तयार नसलेल्या संपादकांना व निर्मात्यांना (अर्थात बहुधा दुसऱ्‍या एखाद्या बहाण्याखाली) कामावरून दूर करण्यात आले. ज्या देशात प्रेषण ही सरकारी मक्तेदारी आहे, तेथे कर्मचारीवर्गाची स्थिती विशेषत्वाने दुबळी असल्याचे आढळते.

तांत्रिक बाबी : साधन संच व कार्यमान : प्रेषण प्रणालीमध्ये पुढील भौतिक घटक आवश्यक असतात : (१) कलागृह, ध्वनिग्राहक वा दूरचित्रवाणी कॅमेरा, प्रेषक आणि आकाशक हे घटक संयुक्तपणे विद्युत् चुंबकीय तरंगांची निर्मिती, विरूपण व सामान्यतः सर्व दिशांना समान तीव्रतेने प्रारण करू शकतात आणि (२) प्रारित तरंगांचा शोध घेऊ शकणारे आणि मूळ कार्यक्रमाचे पुनरूत्पादन करू शकणारे विविध ठिकाणी असलेले ग्राही.

प्रेषणाचे तांत्रिक उद्दिष्ट विकृती व व्यत्यय किमान ठेवून शक्य तितक्या वास्तव स्वरूपात कार्यक्रम प्रेषित व पुनरूत्पादित करणे हे असते. प्रेषण केंद्रे प्रेषणाचा उच्च दर्जा राखतात पण अनेक ग्राही (विशेषतः लहान आकारमानाचे व कमी किंमतीचे) प्रेषित केलेले सर्व काही पुनरूत्पादित करू शकत नाहीत. तथापि कान माफक प्रमाणातील विकृती सहन करू शकतो आणि भाषण व संगीत यांच्या अर्थबोधातील कल्पनेचीही मदत होते व यामुळे श्रोत्याला वास्तवतेचा आभास होतो. डोळा हा विकृती व व्यत्यय यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात कमी सहनशील असल्याने दूरचित्रवाणी प्रेषणाच्या बाबतीत मात्र प्रेषण आणि ग्रहण करणाऱ्‍या साधनांवर अधिक तीव्र मर्यादा पडतात.

व्यत्यय अनिष्ट तरंगांमुळे उदभवतो. हे तरंग काही वेळा नैसर्गिक तर काही वेळा मानवनिर्मित असतात. रेडिओ संकेतांबरोबर हे तरंग अविभाज्यपणे मिसळले जातात व ध्वनिक्षेपकाद्वारे गोंगाटात किंवा दूरचित्रवाणी ग्राहीत पडद्यावरील प्रतिमेतील दोषांत रूपांतरीत होतात. प्रमाणभूत व आंतरराष्ट्रीय लघुतरंग प्रेषण केंद्रे (परमप्रसर-विरूपण वापरणारी) अशा व्यत्ययांवर मात करण्यासाठी उच्च शक्ती प्रेषक वापरतात. सामान्य ग्रहण परिस्थितीत अशा प्रकारे समाधानकारक प्रेषण सेवा मिळू शकते पण औद्योगिक वा मोठ्या शहरातील दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात काही वेळा व्यत्ययकारी विद्युत् स्पंद इतके तीव्र असतात की, गोंगाटरहित ग्रहण अशक्य होते. कंप्रता-विरूपण प्रेषण हे या प्रकारच्या व्यत्ययाच्या बाबतींत परमप्रसर-विरूपणापेक्षा कमी संवेदनशील असते आणि कित्येक वेळा ज्या ठिकाणी परमप्रसर-विरूपित संकेतांपेक्षा गोंगाट पूर्णपणे वरचढ असेल तेथे कंप्रता-विरूपणाद्वारे स्पष्टपणे ग्रहण होणे शक्य असते. दूरचित्रवाणी संकेत नैसर्गिक वा स्थिर व्यत्ययापासून बऱ्‍याचशा प्रमाणात मुक्त असलेल्या अति-उच्च कंप्रता व अत्यधिक-उच्च कंप्रता पट्ट्यांचा उपयोग करतात पण काही वेळा त्यांवर मोटारगाड्याच्या इंधन-प्रज्वलन प्रणाली वा विद्युत् यंत्रसामग्रीपासून उद्भवणारे प्रारण यांसारख्या मानवनिर्मित व्यत्ययांचा परिणाम होतो.


प्रेषण कंप्रता वाटप : रेडिओ कंप्रता वर्णपट कोष्टक क्र. १ मध्ये दिल्याप्रमाणे यदृच्छया सात गटांत विभागलेला आहे. यांपैकी दोन ते सहा या गटांतील प्रत्येकात काही कंप्रता पट्टे रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषणासाठी राखून ठेवलेले आहेत. हे कंप्रता पट्टे अंशतः प्रमाणीकरणासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय करारांद्वारे व अंशतः विविध कंप्रतांच्या रेडिओ तरंगांच्या प्रसारण गुणधर्मातील तांत्रिक फरकांमुळे राखून ठेवण्यात आलेले आहेत. कोष्टकात कंप्रता गट, कंप्रता मर्यादा, तरंगलांबी मर्यादा व सामान्यतः (पण केवळ त्याच नाही) वापर करणाऱ्‍या प्रेषण सेवांचे प्रकार दिलेले आहेत.

कोष्टक क्र. १. रेडिओ कंप्रता वर्णपटातील गट

कंप्रता गट

कंप्रता मर्यादा

तरंगलांबी मर्यादा

प्रेषण सेवा प्रकार

अतिनीच कंप्रता (VLF)

३-३० किलोहर्ट्‌झ

१,००,००० १०,००० मी.

नीच कंप्रता(LF)

३०–३०० किलोहर्ट्‌झ

१०,००० – १,००० मी.

परमप्रसर-विरूपण (युरोप)

मध्यम कंप्रता (MF)

३०० – ३,००० किलोहर्ट्‌झ

१,००० – १०० मी.

परमप्रसर-विरूपण

उच्च कंप्रता (HF)*

३ – ३० मेगॅहर्ट्‌झ

१०० – १० मी.

आंतरराष्ट्रीय

अति-उच्च कंप्रता (VHF)

३० – ३०० मेगॅहर्ट्‌झ

१० – १ मी.

कंप्रता-विरूपण व दूरचित्रवाणी

अत्यधिक-उच्च कंप्रता (UHF)

३०० – ३,००० मेगॅहर्ट्‌झ

१ मी. – १० सेंमी.

दूरचित्रवाणी

परमोच्च कंप्रता (SHF)

३ – ३० गिगॅहर्ट्‌झ

१० – १ सेंमी

* यांना ‘लघुतरंग’ असेही म्हणतात. १–१०० गिगॅहर्ट्झ कंप्रता मर्यादेतील तरंगांना ‘सूक्ष्मतरंग’ म्हणतात.

रेडिओ वर्णपटातील कोणत्याही कंप्रता गटाचा मुक्तपणे वापर करण्याचा अधिकार सर्व देशांना असतो. देशामधील रेडिओ प्रेषण केंद्रांमध्ये कंप्रतांचे वाटप करण्याकरिता प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती यंत्रणा स्थापन केलेली असते. उदाहरणादाखल कोष्टक क्र. २ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील प्रेषण केंद्रांना केलेले कंप्रता वाटप दिलेले आहे. अंतर्गत प्रेषणाकरिता राखून ठेवलेल्या कंप्रतांचे वाटप करताना देशातील प्रेषण केंद्रांच्या हितसंबंधांचाच विचार केला जातो.

बहुतेक सर्व विकसित देशांत सध्याच प्रेषण केंद्रांची गर्दी झालेली आहे. उदा., दोन जवळच्या केंद्रांच्या कंप्रतांमध्ये कमीत कमी १० किलोहर्ट्झ एवढा फरक असला पाहिजे असे गृहीत धरले, तर ५३५ ते १,६०५ किलोहर्ट्झ या कंप्रता पट्ट्याकरिता फक्त १०७ कंप्रता परिवाह उपलब्ध होतात. अमेरिकेत या परिवाहांचा उपयोग करणारी ४,४०० रेडिओ केंद्रे प्रत्यक्षात काम करताना आढळतात. यावरून तेथे एकापेक्षा जास्त केंद्रे एकावेळी एकच परिवाह वापरीत असतात, हे उघड होते. ही केंद्रे भौगोलिक दृष्ट्या एकमेकांपासून पुरेशी दूर असतात. यांपैकी काही केंद्रे फक्त दिवसा तर काही फक्त रात्री प्रेषणकार्य करतात. एकाच कंप्रता परिवाहावर प्रेषण करणाऱ्‍या अशा केंद्रांमध्ये परस्पर व्यत्यय टाळण्यासाठी त्यांच्या शक्तीवर मर्यादा घातली जाते किंवा त्यांना विशिष्ट दिशिक आकाशक वापरण्यास सांगितले जाते. एक वेळापत्रक करून या केंद्रांच्या कार्य करण्याच्या वेळेची योग्य प्रकारे वाटणी केली जाते. या सर्व मर्यादा लक्षात घेऊन कंप्रता वाटपाचे काम करणे अत्यंत अवघड असते. अलीकडे कंप्रतांच्या वाटपाचे काम कार्यक्षमतेने करण्याकरिता संगणकाचा किंवा विश्लेषण पद्धतीचा उपयोग केला जाऊ लागला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या रेडिओ प्रेषणाचा प्रश्न वरील प्रश्नाइतकाच जटिल होऊन बसलेला आहे. हे प्रेषण मुख्यतः लघुतरंग पट्ट्यात केले जाते आणि यापैकी बहुसंख्य कंप्रता विभाग विकसित देशांनी आधीच व्यापून टाकलेले आहेत. जगातील एकूण लोकसंख्येपैकी १०% ज्यांची लोकसंख्या आहे अशा विकसित देशांनी रेडिओ कंप्रता पट्ट्यांपैकी ९०% भाग अशा प्रकारे आपल्या ताब्यात ठेवलेला आहे, असे म्हटले जाते, रेडिओ कंप्रता पट्ट्यांच्या वाटपाचा फेरविचार व्हावा व प्रत्येक देशाकरिता काही कंप्रता कायम रीतीने आरक्षित केल्या जातात, असा दावा विकसनशील देश करीत आहेत. या कंप्रतांचा प्रत्यक्ष वापर हे देश करीत आहेत की नाहीत हा मुद्दा या वाटपाच्या संदर्भात विचारात घेऊ नये, असेही या देशांचे म्हणणे आहे. विकसित देश काही रेडिओ कंप्रता त्यांच्या लष्करी कामासाठी आज आधीच वापरीत असताना आढळतात. संपूर्ण कंप्रता पट्ट्यांचे फेरवाटप केले, तर साहजिकच या व्यवस्थेत बिघाड निर्माण होईल या शंकेने आहे ही परिस्थिती कायम ठेवण्याचा आग्रह विकसित देश धरीत असतात. उपग्रह संदेशवहन योजना प्रस्थापित करण्यासाठी विकसनशील देशांच्या समकालिक उपग्रहांना योग्य स्थान मिळण्याबाबतही रेडिओ कंप्रता वाटपाप्रमाणे परिस्थिती निर्माण झालेली आढळते.

परमप्रसर-विरूपण विरूद्ध कंप्रता-विरूपण : ध्वनी प्रेषणामध्ये परमप्रसर-विरूपण रेडिओ कंप्रता वर्णपटातील नामपात्र १० किलोहर्ट्झ रूंदीचा परिवाह व्यापते, तर कंप्रता-विरूपण केंद्राला २०० किलोहर्ट्झ रूंदीचा परिवाह लागतो. यामुळे ५३५ ते १,६०५ किलोहर्ट्झ या संपूर्ण प्रमाणभूत परमप्रसर-विरूपण पट्ट्यात अमेरिकेमध्ये १०७ परमप्रसर-विरूपण केंद्रांना दुबार न होता पुरेसे १० किलोहर्ट्झ रूंदीचे परिवाह उपलब्ध होऊ शकतात पण या पट्ट्यात २०० किलोहर्ट्झ रूदीचे फक्त पाच परिवाह बसू शकतात. या कारणास्तव कंप्रता-विरूपण प्रेषण अति-उच्च कंप्रता व अत्यधिक-उच्च कंप्रता या क्षेत्रातच मर्यादित ठेवणे आवश्यक ठरते. या क्षेत्रांत त्याचे रूंद परिवाह वर्णपटातील सापेक्षतः कमी टक्के जागा व्यापतात.

कोष्टक क्र. २. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील प्रेषण केंद्रांना केलेले कंप्रता वाटप

केंद्राचा प्रकार

कंप्रता पट्टा

परिवाह रूंदी

परिवाह संख्या

प्रमाणभूत

परमप्रसर-विरूपण

५३५ – १,६०५ किलोहर्ट्‌झ

१० किलोहर्ट्‌झ

१०७

आंतरराष्ट्रीय

६,००० – २१,७०० किलोहर्ट्‌झ

कंप्रता-विरूपण :

बिनव्यापारी शैक्षणिक

८८ – ९२ मेगॅहर्ट्‌झ

२०० किलोहर्ट्‌झ

२०

व्यापारी

९२ – १०८ मेगॅहर्ट्‌झ

२०० किलोहर्ट्‌झ

८०

दूरचित्रवाणी

अति-उच्च कंप्रता नीच पट्टा परिवाह २ ते ६

५४ – ८८ मेगॅहर्ट्‌झ

६ मेगॅहर्ट्‌झ

अति-उच्च कंप्रता उच्च पट्टा परिवाह ७ ते १३

१७४ – २१६ मेगॅहर्ट्‌झ

६ मेगॅहर्ट्‌झ

अत्यधिक-उच्च कंप्रता परिवाह १४ ते ८३

४७० – ८९० मेगॅहर्ट्‌झ

६ मेगॅहर्ट्‌झ

७०

प्रमाणभूत परमप्रसर-विरूपण पट्ट्यांपेक्षा अति-उच्च कंप्रता व अत्यधिक-उच्च कंप्रता पट्ट्यात बहुतेक कारणांनी निर्माण होणारे व्यत्यय कमी प्रमाणात असतात. याउलट अति-उच्च कंप्रता व अत्यधिक-उच्च कंप्रता केंद्रांचा उपयुक्त पल्ला स्थानिक क्षेत्रांपुरताच मर्यादित असतो तर परमप्रसर-विरूपण केंद्रांचा नेहमीचा पल्ला कित्येक शेकडो किलोमीटर व रात्री त्यापेक्षाही जास्त असतो.


प्रेषणाचे तंत्र : रेडिओ व दूरचित्रवाणी प्रेषण तंत्रात प्रेषण व ग्रहण प्रणालीच्या मूलभूत घटकांची पुष्कळच सविस्तर मांडणी करावी लागते.

आ. १. रेडीओ प्रेषण जाळ्याचे मूलभूत घटक

कार्यक्रम सादर करण्याकरिता त्याचप्रमाणे प्रत्यक्ष प्रेषणापूर्वी त्याच्या तालमींकरिता कलागृहाची सुविधा पुरविणे आवश्यक असते. एक कार्यक्रम प्रेषित होत असताना इतर कार्यक्रम तयार करण्याची प्रक्रीया चालू ठेवण्यासाठी अनेक कलागृहे उपलब्ध असावी लागतात. कलाकारांच्या निरनिराळ्या आकारमानांच्या गटांची सोय करण्याच्या दृष्टीने कलागृहेही निरनिराळ्या आकारमानांची असावी लागतात. प्रेषणासाठी तयार असलेले कलागृह निवडण्यासाठी व ते प्रेषकाला जोडण्यासाठी योग्य सोय करावी लागते. कार्यक्रम करणारा व प्रेक्षक यांच्यातील या अनेक दुव्यांचे एकूण प्रणालीतील त्यांच्या कार्याच्या अनुक्रमानुसार पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येते : (१) कलागृह वा कार्यक्रमाचे उद्गम स्थान (२) ध्वनिग्राहक अथवा दूरचित्रवाणी कॅमेरा व आनुषंगिक पूर्वविवर्धक (३) मिश्रक व ध्वनी तीव्रता नियंत्रक प्रणाली (४) मध्यवर्ती वा मुख्य नियंत्रण कक्ष (५) मुख्य नियंत्रण कक्षापासून प्रेषण केंद्रापर्यंत (किंवा एकाच वेळी जाळ्यातील अनेक केंद्रांपर्यंत) कार्यक्रम पाठविण्यासाठी विद्युत् केबल किंवा सूक्ष्मतरंग पुनःप्रेषक (सुक्ष्मतरंग जाण्यावर अतिदिशिक सूक्ष्मतरंग शलाकेद्वारे पाठविलेले संकेत ग्रहण करणे, विवर्धित करणे आणि कोणत्याही एका दिशेने पुढे पाठविण्यासाठी ग्राही व प्रेषक बसविलेला मनोरा) (६) प्रेषण केंद्र (७) कार्यक्रमाचे ग्रहण करणारा ग्राही. नमुनेदार रेडिओ प्रेषण प्रणालीचे मूलभूत घटक आ. १ मध्ये दाखविले आहेत.

कलागृहे, ध्वनिग्राहक व दूरचित्रवाणी कॅमेरे यांखेरीज कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी व ते प्रेषित करणारी साधने चालविण्यासाठी सुसंघटित कर्मचारीवर्ग आवश्यक असतो. दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या निर्मितीत अंतर्भूत असणाऱ्‍या कलागृहातील व नियंत्रण कक्षातील कर्मचारीवर्गाची रूपरेषा आ. २ मध्ये दिली आहे.

कलागृहे किंवा कार्यक्रमाचे उगमस्थान : कलागृह ही प्रेषणासाठी कलाकार जेथे कार्यक्रम सादर करतात अशी विशेष रचना केलेली खोली असते. ही खोली बाह्य गोंगाटापासून बंदिस्त राहावी म्हणून ध्वनि-निरोधित केलेली असते व निनादन [⟶ ध्वनिकी] नियंत्रित करण्यासाठी तिच्या भिंतीवर ध्वनिशोषक द्रव्याची प्रक्रिया करण्यात येते. निनादन म्हणजे कलागृहाच्या भिंतीवरून ध्वनितरंगाचे होणारे गुणित परावर्तन होय. प्रत्येक परावर्तनाच्या वेळी भिंती ऊर्जेचे अंशतः शोषण करतात. यामुळे कलागृहात ध्वनीची तीव्रता घातीय प्रमाणात क्षय पावते.

आ.२. कलागृहात निर्मिती करण्यात येणाऱ्‍या नमुनेदार दूरचित्रवाणी कार्यक्रमाकरीता लागणारा तांत्रिक व कार्यक्रम कर्मचारीवर्ग.

ध्वनीची तीव्रता ऐकू न येण्याइतपत कमी होण्यासाठी लागणाऱ्‍या कालावधीला कलागृहाचा निनादन काल म्हणतात. जास्तीत जास्त आल्हादकारक परिणाम साधण्यासाठी हा कालावधी किती मोठा असावा ही बाब शास्त्रीय विचारापेक्षा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनातून ठरविणे इष्ट असते. तथापि अत्यधिक निनादनामुळे त्रासदायक असा रिकाम्या खोलीसारखा परिणाम उद्भवतो व त्यामुळे कार्यक्रमाचा आनंद उपभोगण्यातील श्रोत्याचे लक्ष विचलित होते. दूरचित्रवाणी कलागृहांत प्रकाशयोजनेची साधने तसेच रंगमंच देखावे व कॅमेरे यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागते. (दूरचित्रवाणी कलागृहाचे अधिक वर्णन ‘दूरचित्रवाणी’ या नोंदीत दिलेले आहे).


वृत्त घटना, खेळांच्या स्पर्धा, सार्वजनिक भाषणे यांसारखे काही विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम कलागृहात घडवून आणणे शक्य नसल्याने त्यांच्या मूळ उद्गम स्थानापासूनच त्यांचे प्रेषण करावे लागते आणि त्यांच्या बाबतीत उदभवणारे विशेष ध्वनिकीय प्रश्न परिस्थितीनुसार सोडवावे लागतात. अशा प्रेषणाकरिता सुवाह्य ध्वनिग्राहक, दूरचित्रवाणी कॅमेरे व विवर्धक खास मोटारगाडीतून कार्यक्रमाच्या स्थानी न्यावे लागतात. या साधनांपासून मिळणारे ध्वनी संकेत दूरध्वनी तारांद्वारे वा लघुतरंग दुव्यामार्फत आणि दृक् संकेत ⇨समाक्ष केंबलीद्वारे वा सूक्ष्मतरंग प्रेषकामार्फत मुख्य कलागृहाला पाठविले जातात. जेव्हा एखादा कार्यक्रम चालू असताना त्याच वेळी प्रेषित करावयाचा नसतो, तेव्हा त्याचे नंतर प्रेषण करण्यासाठी चुंबकीय फितीवर किंवा चित्रपटाच्या फिल्मवर मुद्रण (अभिलेखन) करण्यात येते. फीत मुद्रण, तबकडी मुद्रण व चित्रपट या तंत्रांचा कलागृहात खास तयार केलेल्या संपूर्ण कार्यक्रमाकरिताही मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या मुद्रणांच्या प्रती अनेक प्रेषण केंद्रांना पुरविता येतात. कार्यक्रम चालू असतानाच दूरचित्रवाणी चित्रनलिकेवरील प्रतिमांचे सरळ चित्रपटाच्या फिल्मवर चित्रण केल्यास त्याला किनेस्कोप मुद्रण म्हणतात व ते इतर केंद्रांना पुनःप्रेषणासाठी वापरता येते. १९५० नंतरच्या दशकाच्या अखेरीस दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे दृक्फीत मुद्रणाचे प्रेषणातील महत्त्व वाढू लागले. या मुद्रणाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे या फितीवर चित्रपटाच्या फिल्मप्रमाणे विकाशन, स्थिरीकरण वगैरे कोणतीही प्रक्रिया करावी न लागता ते ताबडतोब पुन्हा पाहता येते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया यांसारख्या पूर्व-पश्चिम विस्तार मोठा असलेल्या देशांत देशव्यापी प्रेषण जाळ्यांना कालपट्ट [⟶ कालमापन] फरकांमुळे कार्यक्रमांच्या वेळापत्रकाची जुळवणी करणे अवघड असते, तेथे हा गुणधर्म बहुमोलाचा ठरतो. (फीत मुद्रण, तबकडी मुद्रण व किनेस्कोप मुद्रण या तंत्रांची सविस्तर माहिती ‘दूरचित्रवाणी’ या नोंदीत दिलेली आहे).

ध्वनिग्राहक, दूरचित्रवाणी कॅमेरा व पूर्वविवर्धक : रेडिओ प्रेषणासाठी वापरण्यात येणारे ध्वनिग्राहक सामान्यतः जमिनीवरील तिपाईवर अथवा वरून लोंबकळणाऱ्‍या केबलींवर बसविलेले असतात. दूरचित्रवाणीच्या बाबतीत ध्वनिग्राहक कॅमेऱ्‍याच्या दृष्टिटप्प्याच्या बाहेर ठेवणे आवश्यक असल्याने ते मोठी दांडी असलेल्या बैठकींवर बसविलेले असतात किंवा अनौपचारिक कार्यक्रमांच्या बाबतीत व्यक्तिगत कलाकार गळ्यातील पट्ट्यांवर बसविलेले छोटे ध्वनिग्राहक वापरतात. मृर्तस्वरित प्रेषणासाठी दोन ध्वनिग्राहक लागतात. एक डावीकडील ध्वनी व दुसरा उजवीकडील ध्वनी एकत्रित करतो. ग्राहीमध्ये हे दोन ध्वनी संच अलग करता येणे आवश्यक असते आणि ते श्रवणस्थानाच्या डाव्या व उजव्या बाजूंच्या ध्वनिक्षेपकांना पुरवावे लागतात. उच्च तद्रूप पुनरूत्पादनासाठी १५ किलोहर्ट्झपर्यंतचा पूर्ण श्राव्य कंप्रता पट्टा प्रेषित केला जातो. हे अति-उच्च कंप्रतांना व कंप्रता-विरूपणाद्वारेच साध्य करता येते.

दूरचित्रवाणी कॅमेऱ्‍याचे कार्य ध्वनी प्रेषणातील ध्वनिग्राहकाशी सदृश असते. इष्टतम कार्याची खात्री करण्यासाठी कॅमेरे व इतर दूरचित्रवाणी साधनांचे वारंवार परीक्षण करणे व जुळवणी करणे आवश्यक असते आणि बहुधा प्रत्येक कार्यक्रमांच्या अगोदर त्यांची विशिष्ट आकृतिबंधाबरोबर तपासणी करण्यात येते. कॅमेरे धातुच्या मोठ्या बैठकींवर (डॉलींवर) बसविलेले असतात. या बैठकीला जोडलेल्या फलाटावर कॅमेरा चालविणारा उभा राहतो. हालचालीसाठी या बैठकीला रबरी टायर बसविलेले असतात.

ध्वनिग्राहक व प्रकाशाचे रूपांतरण करणाऱ्‍या प्रयुक्ती यांच्या द्वारे निर्माण होणारे विद्युत् प्रवाह बहुधा इतके क्षीण असतात की, विवर्धित करण्यापूर्वी काही मीटरांपेक्षा जास्त अंतरावर ते प्रेषित करणे शक्य होत नाही. हे विद्युत् प्रवाह विवर्धित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या विवर्धकांना पूर्वविवर्धक म्हणतात. ध्वनी प्रेषणासाठी प्रत्येक ध्वनिग्राहकासाठी एक पूर्वविवर्धक वापरतात आणि हे पूर्वविवर्धक सामान्यतः कलागृहाशी संलग्न असलेल्या नियंत्रण कक्षात बसविलेले असतात. काही प्रणालींत एखाद्या ध्वनिग्राहकांच्या गटाचे मिश्र प्रदान एकाच पूर्वविवर्धकाला जोडलेले असते. दूरचित्रवाणीच्या बाबतीत कॅमेऱ्‍यापासून मिळणारे विद्युत् प्रवाह हा अल्प अंतरावर सुद्धा प्रेषित करता येत नाहीत व त्यामुळे पूर्वविवर्धक कॅमेऱ्‍यातच चित्रनलिकेजवळ बसविलेला असतो.

मिश्रक व ध्वनी तीव्रता नियंत्रण प्रणाली : प्रत्येक ध्वनिग्राहकापासून मिळणारे विवर्धित प्रवाह नियंत्रण कक्षातील क्षीणकाला (एका ध्वनिग्राहकापासून दुसऱ्‍याकडे क्रमाक्रमाने बदल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या नियंत्रक प्रयुक्तीला) व स्विचिंग प्रणालीला जोडलेले असतात. तेथील तंत्रज्ञ ध्वनिग्राहक प्रदानांचे मिश्रण करतो वा एका ध्वनिग्राहकाकडून दुसऱ्‍याकडे बदल करतो. या तंत्रज्ञाला प्रधान तीव्रता नियंत्रकाची बहिर्गत कार्यक्रमातील ध्वनीची पातळी स्थिर राखण्यासाठी मदत होते आणि ही स्थिरता तीव्रता दर्शकमापकाने व ध्वनिक्षेपकाने सूचित होते.

दूरचित्रवाणी नियंत्रण कक्षात वरीलप्रमाणे ध्वनिग्राहक नियंत्रक संच असण्याबरोबरच कॅमेऱ्‍याच्या दृक् संकेतासाठी मिश्रक-स्विचिंग प्रणाली असते. एकाच दृश्याची अनेक कॅमेऱ्‍यांनी निरनिराळ्या बाजूंनी घेतलेली चित्रे तसेच त्यांतून निवड करून प्रेक्षकाला प्रेषित केलेले संयुक्त चित्र नियंत्रण कक्षातील तज्ञाला त्याच्या समोरील ग्राही पडद्यांवर पहाता येतात. दृक् पातळ्यांचे ⇨ऋण किरण नलिकेच्या साहाय्याने निरीक्षण केले जाते.

मुख्य नियंत्रण कक्ष : हा कलागृह प्रणालीचा केंद्रबिंदू असून निरनिराळी कलागृहे, दूरवरची कार्यक्रम उद्‌गमस्थाने व प्रेषण जाळी यांच्याकडून येणाऱ्‍या, कार्यक्रममालिकेची व्यवस्था लावण्याचे काम येथे होते. या विविध उद्गमांपासून क्रमाक्रमाने येणारे कार्यक्रम तारेद्वारे प्रेषित करण्यासाठी प्रमाणभूत तीव्रता पातळीपर्यंत विवर्धित केल्यावर ठराविक वेळापत्रकानुसार तारेद्वारे वा लघुतरंग मंडलामार्फत प्रेषकाला पोहोचविण्यात येतात. प्रेषक हा कलागृह आणि नियंत्रण कक्ष यांपासून काही अंतरावर (३० ते ५० किमी.) असतो. मुख्य नियंत्रण कक्षाच्या इतर कार्यात सर्व कार्यक्रमांवर देखरेख ठेवणे, कार्यक्रमांच्या ने-आणीसंबंधी संदेशवहन आणि जाळ्यांकडून व त्यांकडे कार्यक्रमांचे वितरण करण्यासाठी परिवाहात बदल करणे, यांचा समावेश असतो.

विद्युत् केबल व सुक्ष्मतरंग पुनःप्रेषक : मुख्य नियंत्रण कक्षापासून केंद्राच्या प्रेषकाला किंवा जाळ्याच्या बाबतीत इतर शहरांतील केंद्रांना कार्यक्रम संकेत पोहोचविण्यासाठी सोयीस्कर साधन आवश्यक असते. ध्वनी प्रेषणासाठी सामान्यतः दूरध्वनी कंपन्यांकडून वा खात्याकडून भाडेपट्ट्याने घेतलेल्या खास विद्युत् मंडलांचा उपयोग करण्यात येतो. ही मंडले संगीत स्वरांचा पूर्ण पल्ला प्रेषित करू शकतील अशा प्रकारे अभिकल्पित केलेली असतात. अंतिम अग्रांशी असलेल्या समानीकारकांमुळे (दोषसुधारक विद्युत् मंडलांमुळे) विविध कंप्रतांना एकविध (एकसारखा) प्रतिसाद खात्रीपूर्वक मिळू शकतो. अशाच प्रकारची मंडले सभागृहे, रंगमंदिरे इत्यादींपासून स्थानिक दूरवर्ती कार्यक्रम मुख्य नियंत्रण कक्षापर्यंत आणण्यासाठी वापरण्यात येतात.


दूरचित्रवाणी संकेतांचा कंप्रता पट्टा (सु. ३० हर्ट्झ ते ४·२ मेगॅहर्ट्झ) अधिक रूंद असल्याने त्यांच्यासाठी समाक्ष केबलींचा वा सूक्ष्मतरंग पुनःप्रेषकांचा उपयोग करावा लागतो. समाक्ष केबलीच्या एका प्रकारच्या प्रणालीत मार्गावरील ऊर्जाक्षयाची भरपाई करण्यासाठी दर ६·५ किमी. अंतरावर विवर्धक बसवावे लागतात आणि केबलीतील प्रत्येक संवाहक तार एक दूरचित्रवाणी कार्यक्रम व ६०० दूरध्वनी संदेश एका दिशेने वाहून नेऊ शकते.

अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीने बसविलेल्या सूक्ष्मतरंग प्रणालींमध्ये देशव्यापी दूरचित्रवाणी प्रेषण करण्यासाठी ४,००० मेगॅहर्ट्झच्या जवळपासच्या कंप्रता वापरल्या जातात. यांत निम्न-शक्तीचा वाहक तरंग दृक् संकेतांनी कंप्रता-विरूपित केला जातो आणि एकमेकांपासून ४० ते ५० किमी. अंतरावर असलेल्या मनोऱ्‍यांच्या मालिकेवर बसविलेल्या आकाशकांद्वारे प्रेषित केला जातो. प्रत्येक मनोऱ्‍यावर येणाऱ्‍या संकेतांचे ग्रहण करणे, कंप्रता बदलणे, विवर्धन करणे व शेवटी पुढच्या मनोऱ्‍याकडे पुनःप्रेषण करणे यांसाठी योग्य अशी साधने बसविलेली असतात. सूक्ष्मतरंग संकेतांकरिता वापरण्यात येणाऱ्‍या कंप्रता व अरूंद शलाक्रेतून जाण्याची त्यांची क्षमता यांमुळे त्यांचे स्वरूप खाजगी असते आणि दूरध्वनी कंपनीच्या अग्रांपाशीच त्यांचे ग्रहण होऊ शकते व तेथून दूरचित्रवाणी केंद्रांना त्यांचे वितरण करण्यात येते. यामुळे सूक्ष्मतरंग शलाकांपासून दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे थेट ग्रहण लोकांना करता येत नाही, तर स्थानिक दूरचित्रवाणी केंद्राला ते पोहोचल्यानंतर व त्याने त्यांचे प्रेषण केल्यावरच ग्रहण करणे शक्य होते. कित्येक केंद्रे अशाच स्वतःच्या सूक्ष्मतरंग साधनसामग्रीचा व इतर कंप्रता पट्ट्यांचा उपयोग करून कलागृहाबाहेरील स्थळांपासून त्यांच्या नियंत्रण कक्षाला स्थानिक दूरचित्रवाणी संकेत प्रेषित करतात किंवा त्यांचे नियंत्रण कक्ष व त्यांचे प्रेषक परस्पर संबंध साधतात. जाळ्याद्वारे प्रेषण करताना संपूर्ण प्रणालीमध्ये वेळेची अचूक योजना व समन्वय साधणे आवश्यक असते.

प्रेषक : प्रेषण प्रणालीतील या अंतिम दूव्याद्वारे तीन हेतू साध्य करण्यात येतात : (१) रेडिओ तरंगांचे प्रारण मिळविण्यासाठी उच्च कंप्रता असलेल्या वाहक विद्युत् प्रवाहाची निर्मिती, (२) कार्यक्रमानुसार वाहक प्रवाहाचे विरूपण, (३) विरूपित वाहक प्रवाहाचे विद्युत् चुंबकीय तरंगात रूपांतर करणे. [⟶ रेडिओ प्रेषक दूरचित्रवाणी].

शहरातील उच्च-शक्ती रेडिओ प्रेषण केंद्राच्या जवळपास राहणाऱ्‍या श्रोत्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या बाबतीत अनिष्ट व्यत्यय टाळण्यासाठी बहुतेक प्रमाणभूत प्रेषक कलागृहांपासून काही किमी. अंतरावर ग्रामीण भागात बसविलेले असतात. शहरातील मोठ्या इमारती या कंप्रतांचे तरंग शोषित असल्याने निर्माण होणारे परिणामही टाळता येतात. दूरचित्रवाणी व कंप्रता-विरूपण प्रेषक उच्चतर कंप्रतांवर प्रेषण करीत असल्याने आणि भोवतालचे कमाल क्षेत्र समाविष्ट होण्यासाठी ते प्रेषण करावयाच्या क्षेत्राच्या सामान्यतः मध्याजवळ असलेल्या सर्वांत उंच इमारतीवर वा इतर वस्तूवर (उदा., टेकडीवर) बसविलेले असतात. यामुळे त्यांच्या बाबतीत वरील व्यत्ययाची समस्या उद्भवत नाही.

ग्राही : ग्राहीचे कार्य म्हणजे त्याच्या पल्ल्यातील कोणत्याही इष्ट प्रेषण केंद्राकडून येणारे संकेत अडवणे, त्यांची निवड करणे व विवर्धन करणे आणि मूळ कलागृहातील कार्यक्रमानुसार ध्वनीद्वारे अथवा ध्वनी व प्रकाश यांद्वारे प्रतिमेचे पुनरूत्पादन करणे, हे असते. सर्व प्रकारचे ग्राही (परमप्रसर-विरूपण, कंप्रता-विरूपण किंवा दूरचित्रवाणी) निवड व विवर्धन यांसाठी तीच मूलभूत तत्त्वे वापरतात. [⟶ रेडिओ ग्राही दूरचित्रवाणी].

रंगीत दूरचित्रवाणी तंत्रे : रंगामुळे प्रेक्षकांना चित्रात अधिक रस निर्माण होण्याबरोबरच जाहिरातदारांना उत्पादने जास्त वेधक तऱ्‍हेने प्रदर्शित करता येत असल्याने त्यांनाही रंगाचे आकर्षण असते.

रंगीत दूरचित्रवाणीसाठी कलागृहातील प्रकाशाची पातळी सु. ४,३०० लक्स लागते, तर एकवर्णी दूरचित्रवाणीसाठी ती सु. १,३५० लक्स पुरेशी असते. याचे मुख्य कारण म्हणजे रंगीत दूरचित्रवाणीच्या कॅमेऱ्‍यात रंग विलग करणाऱ्‍या गाळण्यात शोषण झाल्याने प्रकाशाचा व्यय होतो. याखेरीज आल्हाददायक रंग दाखविण्यासाठी सपाट, छायारहित प्रकाशयोजना अत्यावश्यक असते. या दोन्ही गरजांमुळे प्रकाशयोजनेकरिता लागणाऱ्‍या साधनांची संख्या वाढते आणि परिणामी निर्माण होणारी उष्णता कलागृहातील वातानुकूलन यंत्रणेने घेणे आवश्यक ठरते.

देखावे व रंगमंचावरील वस्तू यांचे रंग नैसर्गिक असले पाहिजेत. एकवर्णी दूरचित्रवाणीसाठी वापरण्यात येणाऱ्‍या काही क्लृप्त्या (उदा., सर्व करड्या रंगाच्या छटांमध्ये रंगविलेले देखावे व रंगभूषेत वापरण्यात येणारी तपकिरी ओष्ठशलाका) रंगीत दूरचित्रवाणीसाठी अर्थांतच वापरता येत नाहीत. उजळ रंगांच्या पोषाखाचा रंगीत दूरचित्रवाणीवर परिणामकारक उपयोग होतो पण रस्त्यावरील पोषाख बहुतेक वेळा हलक्या रंगाचे असणे जरूरीचे असते उदा., साध्या पांढऱ्‍या शर्टापेक्षा फिकट निळ्या रंगाचा शर्ट अधिक इष्ट असतो.

कलाकारांच्या चेहेऱ्‍याच्या त्वचेच्या रंगछटांचे जशाच्या तशा रंगांत पुनरूत्पादन करणे सर्वांत कठीण असल्याने रंगीत ग्राहीच्या पडद्यावरील त्यांच्या दर्शनावरून पुनरूत्पादनाची अचूकता बहुधा ठरविली जाते. कार्यक्रमाच्या ओघात निरनिराळ्या दिशांनी चित्रण करण्यासाठी सामान्यतः अनेक कॅमेरे आलटून पालटून वापरावे लागतात आणि एका कॅमेऱ्‍यापासून दुसऱ्‍या कॅमेऱ्‍याकडे देखावा बदलत असताना रंगछटांत लक्षात येण्याजोगा बदल होऊ नये म्हणून कॅमेऱ्‍यांचे काळजीपूर्वक रंग-संतुलन करणे आवश्यक असते. याकरिता रंग चाचणी तक्त्यावर कॅमेऱ्‍यांचे केंद्रीकरण करून त्यांचे प्राथमिक संरेखन केले जाते. विवर्धक व इतर साधने यांतून रंग संकेत जातात आणि त्यांची जुळणी इलेक्ट्रॉनीय रीत्या निर्माण केलेल्या रंग-दंड चाचणी संकेताच्या मदतीने केली जाते. हा संकेत पिवळा, सियान, हिरवा, मॅजन्टा, तांबडा व निळा या रंगाचे पट्टे, तसेच काळे व पांढरे पट्टे यांचा बनलेला असून दिवसाच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेक्षकांना आपले रंगीत ग्राही जुळविता यावेत यासाठी चाचणी आकृतिबंध म्हणून तो काही वेळा प्रेषित केला जातो.

रंगीत व एकवर्णी दूरचित्रवाणी प्रेषक मूलतः भिन्न नसतात परंतु रंगीत चित्राच्या योग्य प्रेषणासाठी विविध प्रतिसाद अभिलक्षणांवर सामान्यतः कडक नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने त्यांच्या सूक्ष्म नियंत्रणासाठी साहाय्यकारी साधने लागतात.

पहा : आकाशक आकाशवाणी उपग्रह संदेशवहन दूरचित्रवाणी दूरदर्शन ध्वनिग्राहक ध्वनिक्षेपक प्रेषण मार्ग रेडिओ ग्राही रेडिओ तरंग प्रसारण रेडिओ प्रेषक रेडिओ संदेशवहन प्रणाली समाक्ष केबल सूक्ष्मतरंग.

संदर्भ : 1. Abbot, W. Rider, R. L. Handbook of Broadcasting, New York, 1957.

2. Barnouw. E. A History of Broadcasting in the United States. 3 Vols., New York, 1966-70.

3. Bretz, R. Techniques of Television Production, New York, 1962.

4. Chappel, G. A. Radio Stations. New York, 1939.

5. Dizzard, W. Television : A World View, Syracuse, New York, 1966.

6. Emery, W. B. National and International Broadcasting Systems : Their History, Operation and Control, East Larsing , Mich., 1969.

7. Hillard, R., Ed., Radio Broadcasting : An Introduction to the Sound Medium, New York, 1967.

8. Houghum, R. J. World Systems of Broadcasting and Telecasting, St. Eugene, Orc., 1977.

9. Katz, E. Wedell, E. G. Broadcasting in the Third World : Promise and Performance, Cambridge, Mass., 1977.

10. Lawton, S. P. The Modern Broadcaster : The Station Book, New York, 1961.

11. Luthra, H. R. Indian Broadcasting, New Delhi, 1986.

12. McCavitt, W. E., Ed., Broadcasting, Around the World, 1981.

13. World Radio-Television Handbook Company Ltd., World Radio TV Handbook, Hellerup, Denmark, 1971.

फाटक, अ. श्री. चिपळोणकर, व. त्रिं.

होनप, स. न. भदे, व. ग.