औद्योगिक उत्पादकता: उत्पादकता ह्या संज्ञेचे अनेक अर्थ असून वेगवेगळ्या संदर्भांत ही संज्ञा वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते. शास्त्रीय शब्दात उत्पादकतेची व्याख्या खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल: कोणत्याही उत्पादन-क्रियेत दोन प्रमुख टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे जमीन, भांडवल, कामगार व प्रवर्तक ह्या उत्पादन घटकांचा उत्पादनाकरिता केला जाणारा व्यय व दुसरा टप्पा म्हणजे अशा घटकांच्या व्ययामुळे वस्तूंच्या स्वरूपात निर्माण होणारा माल. उत्पादन घटकाच्या झालेल्या व्ययाला अर्थशास्त्रात ‘निवेश’ म्हणतात, तर अशा घटकांच्या व्ययामुळे निर्माण होणाऱ्‍या वस्तूंना म्हणजेच उत्पादन क्रियेच्या अंतिम फळाला ‘उत्पाद’ असे म्हणतात. उत्पादकता म्हणजे अशा उत्पाद व निवेश यांचे गुणोत्तर होय. हे गुणोत्तर वाढले की त्याचा अर्थ उत्पादकता वाढली, असा होतो.

परंतु वरील सूत्राप्रमाणे ज्यावेळी आपण उत्पादकतेतील चढउतार मोजण्याचा प्रयत्‍न करतो, त्यावेळी अनेक अडचणी उपस्थित होतात. प्रमुख अडचण अशी की, निवेशात समावेश असलेल्या विविध घटकांना एकाच स्वरूपात दाखविणे कठीण असते, कारण हे घटक मोजण्याची साधने वेगवेगळी आहेत. उदा., कामगार संख्येत मोजले जातात, तर भांडवल पैशाच्या स्वरूपात दाखवितात. ह्या अडचणीतूनमार्ग काढण्याकरिता, उत्पादन हे जरी चार उत्पादन घटकांच्या सहकार्याचा परिपाक असले, तरी फक्त एकाच उत्पादन घटकाचा उत्पादकता काढताना विचार करतात. सर्वसाधारणपणे त्या काळात त्या उत्पादनाकरिता कामावर असलेल्या कामगारांच्या सरासरी संख्येचा किंवा अशा कामगारांच्या श्रमतासांचाच फक्त विचार करतात व उत्पादाला म्हणजेच एकूण उत्पादनाला कामगारांच्या संख्येने भागून येणारा आकडा उत्पादकता मानतात.

निवेशात फक्त कामगारांचा विचार करण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी प्रमुख कारण म्हणजे बहुतेक देशांत रोजगारीचे विश्वसनीय आकडे सहज उपलब्ध असतात. अशा तऱ्हेची माहिती इतर उत्पादन घटकांच्या बाबतीत मिळू शकत नाही. परंतु फक्त कामगारांच्याच संख्येचा विचार केला, तरी खालीलप्रमाणे अनेक प्रश्न निर्माण होतात : (१) कामगारांचा विचार करताना फक्त उत्पादक कामगारांचाच विचार करावयाचा की कार्यालयातील व व्यवस्थापनातील कामगारही विचारात घ्यावयाचे ह्याबाबत फक्त उत्पादन कामगार विचारात घेण्याची पद्धत आहे. (२) कामगारांचा विचार करताना फक्त कामावर असलेल्या कामगारांचाच विचार करावयाचा की ज्या कामगारांना वेतन दिले जात आहे, असे सर्व कामगार विचारात घ्यावयाचे कारण ह्या दोन संख्यांत फरक असू शकतो. प्रत्यक्ष कामावर असलेल्या कामगारांपेक्षा वेतन दिले जाणारे एकूण कामगार जास्त असू शकतात. कारण काही कामगार सवेतन सुट्टीवर वा रजेवर असण्याची शक्यता असते. उत्पादकता मोजताना ज्यांना वेतन दिले जात आहे, अशा सर्व कामगारांचा निवेशात समावेश करतात. (३) निवेशात कामगारांच्या संख्येचाच विचार करावयाचा की त्यांच्या श्रमतासांचा विचार करावयाचा, हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण असे की, सर्वच कामगार सारखेच तास काम करीत नाहीत. ह्याकरिता सर्वसाधारणपणे श्रमतासांचा विचार करण्याची पद्धत आहे. पण असे आकडे उपलब्ध नसतील, तर कामगारांच्या संख्येचाच विचार करतात.

खालील उदाहरणावरून उत्पादकता कशी काढतात हे स्पष्ट होईल. समजा, ‘क्ष’ दिवशी २०० कामगार एकाच प्रकारचे १,००० वार कापड निर्माण करतात, तर त्या दिवसातील कामगारांची उत्पादकता पुढीलप्रमाणे काढता येईल:

उत्पादकता = 

उत्पाद 

१,००० वार कापड 

=५ वार,  

निवेश 

२०० कामगार 

ह्याचा अर्थ कामगाराची सरासरी उत्पादकता अर्धा वार आहे, असा होतो. अर्थ कामगाराची सरासरी उत्पादकता अर्धा वार आहे, असा होतो. वरील उदाहरणात जी उत्पादकता आपणास मिळाली, ती निरपेक्ष उत्पादकता होय.

वास्तविक आपणास उत्पादकतेतील बदल मोजावयाचा असतो, म्हणजे एका काळातील उत्पादकतेची दुसऱ्‍या काळातील उत्पादकतेशी तुलना करावयाची असते. ही तुलना निर्देशांकांच्या साहाय्याने करतात. ह्याकरिता प्रथम कोणत्या काळातील उत्पादकतेच्या संदर्भात हे बदल मोजावयाचे आहेत, हे निश्चित करावे लागते. साधारणतः एखाद्या प्रमाण वर्षातील उत्पादकता संदर्भासाठी घेऊन त्या वर्षातील उत्पादकतेचा १०० हा निर्देशांक मानतात व इतर वर्षांतील उत्पादकतेशी तिचे शेकडा प्रमाण दाखवितात. असे आकडे ज्या वेळी १०० पेक्षा जास्त असतील, त्यावेळी उत्पादकता वाढली असा निष्कर्ष निघतो व १०० पेक्षा कमी असल्यास उत्पादकतेत घट झाली, अशा निर्णायाप्रत आपण येतो. वरील कल्पना खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल.

तक्ता क्र. १. वस्तूचे प्रत्यक्ष उत्पादन घेऊन उत्पादकता काढण्याची पद्धत 

वर्ष 

कामगारांची त्या वर्षातील एकूण संख्या 

कामगारांच्या संख्येचा निर्देशांक 

कापड उत्पादन (वार) 

कापड उत्पादनाचा निर्देशांक 

उत्पादकता (वारांत) 

उत्पादकतेचा निर्देशांक 

क्ष 

२,५०० 

१०० 

१,००,००० 

१०० 

१ 

१०० (संदर्भ वर्ष १००) 

य 

५,००० 

२०० 

३,००,००० 

३०० 

३/२ 

१५० 

वरील उदाहरणावरून हे स्पष्ट होते की, ‘य’ या वर्षी ‘क्ष’ वर्षाच्या तुलनेने उत्पादकता ५० टक्क्यांनी वाढली आहे. वरील उदाहरणात कामगाराऐवजी आपण जर भांडवल घेतले, तर आपणास भांडवलाची उत्पादकता मिळू शकेल.

उत्पादकता जशी एक कामगार किती वार कापड निर्माण करतो ह्या प्रमाणात काढता येते, त्याचप्रमाणे एक वार कापड उत्पादनाला किती कामगार लागतात, अशा पद्धतीनेसुद्धा काढता येते. वरील उदाहरणात एका कामगाराची उत्पादकता पाच वार आहे असे उत्तर मिळाले, तेच दुसऱ्‍या शब्दांत भांडवयाचे म्हणजे एक वार कापड उत्पादनाकरिता एक-पंचमांश कामगारांचे श्रम खर्ची पडले. ह्यालाच आवश्यक श्रम परिव्ययाच्या स्वरूपातील उत्पादकता म्हणतात. एखाद्या वर्षातील अशी उत्पादकता संदर्भासाठी घेऊन ज्या काळातील उत्पादकतेचे बदल मोजावयाचे आहेत, त्या काळातील वर्षांचे अशा उत्पादकतेचे वेगवेगळे निर्देशांक काढून उत्पादकतेतील बदलाचे प्रमाण सूचित करता येते.

उत्पादननिर्मित मूल्याचा उपयोग करूनही उत्पादकता काढता येते. उत्पादननिर्मित मूल्य हे पैशाच्या स्वरूपात असते. उत्पादननिर्मित मूल्य काढण्याकरिता एकूण विक्रीच्या उत्पन्नातून कच्चा माल, घसारा, जळण इत्यादींवरील खर्च वजा करावा लागतो व राहिलेल्या बाकीला उत्पादननिर्मित मूल्य असे म्हणतात. ह्याची कामगार व कामगारविरहित इतर नोकरवर्ग ह्यांचे वेतन, व्याज, कर व नफा ह्यांत वाटणी होते. उत्पादननिर्मित मूल्याला त्या काळात कामावर असलेल्या कामगारांच्या संख्येने भागिले असता एक कामगार सरासरी किती मूल्य निर्माण करतो, ह्याचा आकडा मिळतो. वेगवेगळ्या वर्षांकरिता असे मूल्य काढून संदर्भ वर्षाच्या अनुषंगाने त्याचे निर्देशांक तयार करतात व अशा निर्देशांकापासून उत्पादकतेत वाढ वा घट होत आहे की काय, हे कळते. मात्र उत्पादननिर्मित मूल्याचे असे निर्देशांक तयार करताना एक काळजी घ्यावी लागते. उत्पादननिर्मित मूल्यात किंमतीच्या फरकामुळे होणाऱ्‍या बदलाचा परिणाम काढून टाकण्याकरिता इतर वर्षांच्या उत्पादननिर्मित मूल्यांचे संदर्भ वर्षाच्या किंमतीतच, म्हणजे एका स्थिर किंमतीत रूपांतर करावे लागते.


उत्पादननिर्मित मूल्याच्या व कामगारांच्या संख्येच्या गुणोत्तराने ज्याप्रमाणे कामगारांची म्हणजे औद्योगिक उत्पादकता निघते, त्याचप्रमाणे कामगारांऐवजी छेदस्थानी गुंतविलेल्या उत्पादक भांडवलाचा आकडा घेऊन भांडवलाची औद्योगिक उत्पादकता काढता येते ह्याला भांडवल-उत्पादन गुणोत्तर किंवा भांडवल-गुणक असे म्हणतात. समजा, गुंतविलेलेउत्पादक भांडवल ४०० रुपये आहे व उत्पादननिर्मित मूल्य १०० रुपये आहे, तर भांडवल-उत्पादन गुणोत्तर (४/१ = ४) ४:१ असे येते. ह्याचाच अर्थ एक रूपयाच्या मूल्य निर्मितीकरिता चार रुपये लागतात, असा होतो. भांडवल-उत्पादन गुणोत्तराच्या साहाय्याने विशिष्ट टक्के राष्ट्रीय उत्पन्न वाढवावयाचे असेल, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के भांडवल गुंतवणूक करणे आवश्यक आहे, हे काढता येते.

उत्पादकता ह्या संज्ञेचे वेगवेगळ्या संदर्भांत वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. ह्या दृष्टीने औद्योगिक उत्पादकतेचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल: (१) सरासरी उत्पादकता. सरासरी उत्पादकता उत्पाद व निवेशाच्या गुणोत्तराने मिळते. (२) सीमांत उत्पादकता म्हणजे सीमांत उत्पादन-नगाकडून उत्पादनात पडणारी भर. (३) प्रत्यक्ष उत्पादकता म्हणजे त्या विशिष्ट काळातील उत्पादकतेचा प्रवाह व (४) संभाव्य उत्पादकता म्हणजे त्या काळात अपेक्षित असलेली पर्याप्त उत्पादकता.

कोणत्याही देशातील औद्योगिक उत्पादकता ही त्या देशाची तांत्रिक ज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती. मनुष्यबळ व त्याचे कर्तृत्व, भांडवलसंचय, नैसर्गिक परिस्थिती, आर्थिक व सामाजिक संस्था, साधनसंपत्तीची उपलब्धता, कामगार प्रशिक्षणाचा व कामगारांना दिल्या जाणाऱ्या यंत्रावजारांचा दर्जा, कामगारांची कार्यक्षमता, बौद्धिक पातळी, काम करण्याची इच्छा, उद्योगप्रवर्तकाचे संघटनकौशल्य, शासनाचे सम्यक व पुरोगामी औद्योगिक धोरण, कामगार व मालक ह्यांचे सौहार्दाचे संबंध इ. अनेक घटकांवर अवलंबून असते. सबंध समाजाची मनोवृत्तीदेखील उत्पादकतेच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

उत्पादकतेच्या निर्देशांकाचा अनेक दृष्टींनी उपयोग आहे. अशा निर्देशांकामुळे उत्पादकतेची गती कळून तिचा आर्थिक धोरण आखण्याकरिता उपयोग होतो वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रांतील कार्यक्षमतेचा अंदाज येतो व उत्पादकतेच्या दृष्टीने कच्च्या असलेल्या दुव्यांकडे जास्त लक्ष केंद्रीभूत करता येते. वेगवेगळ्या उत्पादनतंत्रांमुळे उत्पादकतेत होणाऱ्‍या फरकाच्या अनुषंगाने योग्य उत्पादनतंत्राची निवड करणे सुलभ होते. उत्पादन साधनांची किती मागणी करावी व उत्पादन घटकांचे जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याकरिता कोणत्या प्रमाणात एकत्रीकरण करावे, ह्याविषयीही उत्पादकतेमुळे मार्गदर्शन मिळते.

सामुदायिक वाटाघाटीमध्ये कामगाराची वेतनवाढीची मागणी पुष्कळ वेळा उत्पादकतेच्या वाढीवरच आधारलेली असते. अलीकडच्या काळात उत्पादनाला व उत्पादकतेला वेगळ्या कारणांनीच महत्त्व आले आहे. कारण मूल्यवाढ व तिच्यापासून उद्‍भवणार्‍या अनिष्ट परिणामाला आळा घालण्याकरिता उत्पादन व उत्पादकता ह्यांच्या वाढीची उत्पन्न-वाढीशी सांगड घालून आज विकसित देशांत नियोजनात्मक उत्पन्न-वाढीचे धोरण स्वीकारले जात आहे. उत्पादकतेच्या निर्देशांकावरून विभागीय व आंतरराष्ट्रीय उत्पादकतेचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. अर्थात हे निर्देशांक निर्दोष असतातच असे नव्हे त्यांच्याही काही मर्यादा असून ते सर्वसाधारणपणे उत्पादकतेच्या गतीची दिशा दाखविण्याचा प्रयत्‍न करतात.

आर्थिक जीवनातील उत्पादकतेच्या महत्त्वा मुळे उत्पादक तेच्या अभ्यासाला अलिकडे सुरुवात झाली आहे. ह्या क्षेत्रात अमेरिकेने आघाडी मारली आहे. त्याचप्रमाणे काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी ही उत्पादकतेविषयी अत्यंत उपयुक्त असे संशोघनात्मक लिखाण प्रसिद्ध केले आहे. ह्या दृष्टीने ‘आंतरराष्ट्रीय मजूर संघटना’ व ‘आर्थिक सहकार्य व विकास संघटना’ ह्यांनी केलेले कार्य वाखाणण्यासारखे आहे. उत्पादकता वाढीच्या चळवळीला प्रोत्साहन देण्याकरिता विविध राष्ट्रांत उत्पादकता मंडळे स्थापन झालेली असून आशिया खंडाकरिताही ‘आशियाई उत्पादकता संघटना’ स्थापन झाली आहे. आर्थिक विकासात उत्पादकतेचे महत्त्व ओळखून, भारत सरकारने उत्पादकतेविषयी जनमत जागृत करण्याकरिता १९५८ साली राष्ट्रीय उत्पादकता परिषद स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक उत्पादकता मंडळे ही स्थापन झाली आहेत. ह्या चळवळीचा एक भाग म्हणून १९६६ हे वर्ष भारतात ‘उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरे केले गेले.

पहा: उत्पादकता निर्देशांक राष्ट्रीय उत्पादकता परिषद.

संदर्भ: 1. Beri, G. C. Measurement of Production and Productivity in Indian Industries, Bombay, 1962.

   2. International Labour Organization,Methods of Labour Productivity Statistics – I. L. O. 

               Studies  and Report No. 18. Geneva, 1951.

  3. Journal of Productivity, Productivity : Its Concept and Measurement, New Delhi, June – July, 

               1960.

  4. Mehta, M. M. Measurement of Industrial Productivity, Calcutta, 1955. 

रायरीकर, बा. रं.