सीन्यर, नॅसा विल्यम : (२६ सप्टेंबर १७९० – ४ जून १८६४). सुप्रसिद्घ सनातनवादी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. ग्रेट ब्रिटनमधील बर्कशर परगण्यातील कॉम्टन बोचॅम्प येथे त्याचा जन्म झाला. ईटन येथे त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्याने १८१२ मध्ये पदवी संपादन केली. १८१९ मध्ये वकिलीची परीक्षा देऊन त्याने व्यवसायास प्रारंभ केला. एकोणिसाव्या शतकाचा पहिला अर्धकाळ सीन्यरने एक अग्रेसर सैद्घांतिक अर्थवेत्ता म्हणून गाजविला. ऑक्सफर्ड विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्र विषयाचा पहिला ड्रमांड प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली होती (१८२५ – ३० १८४७ – ५२).

आर्थिक सिद्धांताची मांडणी करणारा त्याचा लेख सुरुवातीला मेट्रपॉलिटन एन्साय्‌क्लोपीडिआत प्रसिद्ध झाला. त्यानंतर हा लेख ॲन आउटलाइन ऑफ दि सायन्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी ह्या नावाने (१८३६) प्रकाशित झाला. या ग्रंथातून त्याने व्याजाच्या उत्पत्तीबद्दल ‘उपभोगस्थगन सिद्घांत’(ॲबस्टिनन्स थिअरी ऑफ इंटरेस्ट) मांडला. या सिद्घांतानुसार भांडवल हा एक उत्पादक घटक असून व्याज व नफा या दोन्ही गोष्टी त्याने भांडवलदाराकडे केलेल्या उपभोगस्थगनांच्या (बचतींच्या) योगे जमा होतात. सोने-चांदी यांसारख्या बहुमूल्य धातूंच्या वितरण सिद्घांताविषयीही त्याने आपले मत मांडले. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याने दिलेली व्याख्याने प्रकाशित झाली, त्याचबरोबर त्याच्या बहुतेक व्याख्यानांचे फ्रेंचमध्ये भाषांतर (१८३५) केले गेले. प्रशासकीय व सामाजिक प्रश्नांसंबंधी विविध नियतकालिकांमधून त्याचे विपुल लेखन प्रसिध्द झाले. १८३० मध्ये मजुरीच्या दरासंबंधी त्याने दिलेली तीन व्याख्याने प्रकाशित होऊन त्यांत त्याने कामगारांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी उत्पादकता वाढली पाहिजे अन्यथा शासकीय वेतननिधीवर अवलंबून असणाऱ्या गरीब कामगारांची संख्या कमी केली पाहिजे असे प्रतिपादन केले. उत्पादकता वाढविण्यासाठी त्याने दोन उपाय सुचविले : एक, खुला व्यापार व भांडवलसंचय यांवरील सर्व बंधने काढून टाकली पाहिजेत आणि दुसरे म्हणजे, पुअर लॉ या कायद्याचे उच्चटन झाले पाहिजे कारण या कायद्यानुसार कामगारांना दिली जाणारी वेतनाची रक्कम मालक आणि कामगार यांच्यातील करारानुसार नव्हे, तर कामगारांचा हक्क व मालकवर्गाला जाचक कर या स्वरुपात दिली जाते. या सीन्यरच्या सिद्घांतावर मार्क्सवाद्यांनी मोठी टीका केली.

त्याच्या व व्हिग पक्षाच्या जवळीकीमुळे आपली या संदर्भातील मते त्याला व्यवहारात आणणे शक्य झाले. १८३२ मध्ये त्याची दारिद्र्यनिर्मूलनासंबंधी असलेले कायदे व कार्यपद्घती यांचा अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी पुअर लॉ कमिशनवर नियुक्ती केली गेली. सदर आयोगाचा अहवाल (१८३४) हे सीन्यरचे मोठे योगदान मानले जाते. आयोगाने संबंधित कायद्यात तीन महत्त्वाच्या शिफारशी सुचविल्या, त्या अशा : कामगारांनी कामाची परिस्थिती वा पगाराचा विचार न करता त्यांना देऊ केलेले काम स्वीकारले पाहिजे ज्याला प्रयत्न करूनही काम मिळण्यास अडचण येते, अशा व्यक्तीला भूक भागेल एवढेच किमान वेतन द्यावे या स्वरुपाचा उदरनिर्वाहभत्ता नोकरी करणाऱ्याच्या वेतनाच्या तुलनेत खूपच कमी असावा, जेणेकरून बेकार व्यक्ती कामाची परिस्थिती व वेतन जरी बेताचे असले, तरी नोकरी शोधण्याला प्रवृत्त होईल.

सीन्यरने ॲडम स्मिथ यांच्या कार्यविभागणी संदर्भातील विचारात नवीन भर घातली. मजुरीचे दर व श्रमाचे मूल्य यांमधील भेद अधिक स्पष्ट केला. सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांत रस असणारा तो नामवंत वकील होता. व्हिग पक्षाचे सदस्य त्याचे चांगले मित्र असल्याने तो त्या पक्षाचा प्रभावी सल्लागार म्हणून कार्यरत होता. १८३४ सालचा गरीब लोकांचे हित वा कल्याण साधण्यासाठी केला गेलेला ‘पुअर लॉ अमेंटमेंट ॲक्ट’ हा संशोधन कायदा हे त्याच्या अहवालाचे फलित मानले जाते. हातमाग विणकरांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियुक्त केलेल्या ‘हँडलूम विव्हर्स कमिशन’ (१८३७) या आयोगाचा शासननियुक्त सदस्य म्हणूनही त्याने काम पाहिले. विल्यम मेलबर्न पंतप्रधान असताना सीन्यरने सरकारला कामगार संघटनांचा प्रतिकार करण्याबाबतचा सल्ल दिला होता. मॅल्थसचा नैराश्यवादी अतिरिक्त लोकसंख्या सिद्घांत त्याने केवळ नाकारलाच नाही, तर त्या सिद्घांताच्या विरोधात सांप्रदायिक अर्थतज्ज्ञांमध्ये बंडाचे निशाण उभारले. कर्मचाऱ्यांचे नैतिक चारित्र्य जसे उंचावेल, त्या प्रमाणात त्यांच्या उत्पादकतेत सुधारणा होऊन आर्थिक अरिष्टे दूर होतील, असा त्याचा ठाम विश्वास होता. नैतिक शिक्षण हेच दारिर्मूलनाचे एकमेव साधन असून ते बळकट करण्यासाठी त्याने वेळोवेळी पुढाकार घेतला.

लंडन शहरात त्याचे निधन झाले.

चौधरी, जयवंत