जमीन : एक मूलभूत उत्पादन-घटक, अर्थशास्त्रात व्यापक अर्थाने ‘जमीन’ या संज्ञेत शेतजमीन, कुरणे, जंगले, शहरांतील इमारतींच्या जागा, सर्व प्रकारची खनिज-द्रव्ये आणि खाणी, डोंगर, नद्या, समुद्रकिनारा, धबधबे वगैरे सर्व निसर्गदत्त उत्पादनाची साधने–ज्यांवर मानवी ताबा आणि मालकी हक्क चालू शकतो–अशा सर्वांचा समावेश होतो. जमिनीमध्ये समाविष्ट असलेल्या नैसर्गिक उत्पादन साधनांवर मानवी श्रम खर्ची पडलेले नसतात. सर्वसाधारणपणे जमीन ही संज्ञा शेतजमिनीच्या संदर्भात वापरली जाते. जमिनीची प्रत तिच्या सुपीकतेवरून ठरते. जमिनीची सुपीकता तिच्या अंगभूत गुणांमुळे असते परंतु जमिनीची बांधबंदिस्ती करून, खतपाणी घालून, उत्तम बी-बियाणे वापरून मानवी श्रमाने काळजीपूर्वक व कुशलतेने जमिनीची मशागत केल्यास तिची सुपीकता वाढते. कित्येक वेळा शेतजमिनीच्या उत्पन्नात जमिनीची मूळची सुपीकता आणि मानवी श्रमाने सुपीकतेत झालेली वाढ, असा फरक करावा लागतो. कारण जमिनीची सुपीकता मानवी श्रम, भांडवल, संयोजन या उत्पादन घटकांचा वापर करून वाढविता येते.

वैशिष्ट्ये : (१) जमिनीचा एकंदर पुरवठा कायम आणि मर्यादित आहे. जमीन निसर्गाची देणगी असल्यामुळे तिचा उत्पादनखर्च शून्य आहे. कितीही मानवी श्रमाने लहानसाही जमिनीचा तुकडा निर्माण करणे शक्य नाही. जमिनीचे एकंदर क्षेत्र न बदलणारे आणि मर्यादित असते. (२) दुसरे वैशिष्ट्य जमिनीच्या उत्पादन क्षमतेची (सुपीकतेची) भिन्नता, हे होय. काही जमिनी अधिक सुपीक, तर काही जमिनी कमी सुपीक असतात. निरनिराळ्या जमिनी स्थानाच्या दृष्टीनेही भिन्न असतात. काही बाजारपेठेजवळ, तर काही बाजारपेठेपासून दूर असतात. बाजारपेठेपासून असणाऱ्या अंतरामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्यामुळे भिन्नता निर्माण होते. (३) सामाजिक दृष्टिकोनातून तिचा पुरवठा संपूर्णपणे अलवचिक असतो अन्य उत्पादन घटकांप्रमाणे जमीन गतिक्षम नसते. कारण जमिनीचे स्थलांतर होणे शक्य नसते. मात्र जेव्हा जमिनीला दोन किंवा अधिक पर्यायी उपयोग असतात, तेव्हा कोणत्याही एका उपयोगाच्या संदर्भात जमीन सापेक्षतः गतिक्षम बनते. जमिनीचा उपयोग जेव्हा एखाद्या पिकाखाली अधिक फायदेशीर ठरण्याचा संभव असतो, तेव्हा दुसऱ्या पर्यायी उपयोगातून काढून जमिनीचा वापर त्या उपयोगासाठी करता येतो. उदा., जेव्हा एखाद्या जमिनीत कापूस, तेलबिया यांसारखी नगदी पिके काढणे जास्त फायदेशीर ठरते, तेव्हा शेतकरी ज्वारी आणि इतर अन्नधान्ये न पिकविता, जमिनीचा वापर कापूस व तेलबिया पिकविण्यासाठी करतील. अशा रीतीने कापूस आणि तेलबियांच्या पिकांखालील जमिनीचे क्षेत्र वाढेल. (४) जमिनीच्या पर्यायी उपयोगाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता, जमिनीला बदली किंमत असल्यामुळे ती उत्पादनपरिव्ययाचा भाग होऊ शकते. म्हणून वैकल्पिक परिव्यय तत्त्वानुसार जमिनीला उत्पादनपरिव्यय मुळीच नाही, असे म्हणता येत नाही.

जमिनीची ही वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यास जमीन इतर उत्पादनघटकांहून, विषेशतः भांडवलापासून, कशी निराळी आहे हे ध्यानात येते. यंत्रसामग्रीसारख्या वास्तविक भांडवलाप्रमाणेच जमीन हे एक प्रकारचे धन म्हणजे उत्पादनाचे साधन आहे. परंतु जमीन ही निसर्गाची देणगी आहे, तर यंत्रसामग्रीच्या स्वरूपात असलेले भांडवल हे मानवनिर्मित उत्पादनाचे साधन आहे. त्यामुळे दीर्घ काळात तरी वास्तविक भांडवलाचा पुरवठा वाढविता येतो. तसेच काही जमिनींना पर्यायी उपयोग असले, तरी सर्वसाधारणपणे जमिनीला विशिष्ट उपयोग असतो. शिवाय यंत्रसामग्रीचे स्थलांतर करता येते. जमिनीचे मात्र स्थलांतर करता येत नाही. सारांश, भांडवल जमिनीपेक्षा अधिक गतिक्षम असते आणि त्याचा पुरवठा अधिक लवचिक असतो.

पहा : खंड.

संदर्भ : Marshall, Alfred, Principles of Economics, London, 1959.

सुर्वे, गो. चिं.