विभागीय भांडारातील वस्तूंची पसंती करणारे ग्राहक.

विभागीय भांडारे : मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्री करणारी व अनेक विभाग असणारी विक्रीकेंद्रे. किरकोळ विक्रीव्यवसायात विभागीय भांडांरांचे वर्चस्व असते. विविध प्रकारच्या वस्तू मोठ्या संख्येने विक्रीस असल्याने विभागीय भांडार एकाच प्रशस्त इमारतीत असते. हे एकाच इमारतीत- म्हणजे एकाच छत्राखाली-असल्याने त्यास ‘एकछत्री भांडार’ असेही संबोधले जाते. पूर्वी या भांडारांच्या इमारती अनेक मजली असत व त्यांतून निरनिराळ्या प्रकारच्या अनेक वस्तू विक्रिस ठेवल्या जात. परंतु अलीकडे सर्वसाधारणपणे दोन मजली इमरतींमधून काही ठरावीक प्रकारच्याच वस्तू विक्रीस ठेवण्याची प्रवृत्ती दिसून येते. तयार कपडे व उपसाधने, कापड, गृहसजावटीच्या वस्तू, फर्निचर, विजेची उपकरणे, कॅमेरे, क्रीडासाहित्य, भेटवस्तू इत्यादींची विक्री या दुकांनांतून केली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विभागीय भांडारांतून घरपोच माल देणे, पसंतीस न उतरलेला माल परत घेणे, भाडेखरेदीसारख्या विविध सवलती देणे, ग्राहकांच्या सोसीसाठी पाळणाघरे, उपहारगृहे, आरामकक्ष इत्यादींची व्यवस्था भांडाराच्या वतीने करणे, अशा सोयीसुविधांकडे विशेष लक्ष पुरविले जाते. विभागीय भांडाराचे कार्य मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने त्याचे संघटन संयुक्त भांडवल कंपनीसारखे असते. भागधारक हे मालक असून ते आपले प्रतिनिधिसंचालक निवडतात. भांडाराच्या दैनंदिन कारभारासाठी व्यवस्थापक नेमले जातात. कामकाजाच्या सोयीसाठी खरेदी विभाग, विक्री विभाग, हिशेब विभाग, मालमत्ता विभाग, कर्मचारी विभाग, प्रशासन विभाग असे निरनिराळे विभाग असतात.

ग्राहकांच्या दृष्टिकोनांतून पाहिल्यास विभागीय भांडांरांचे अनेक फायदे आहेत. उदा., ग्राहकाला सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने त्याच्या वेळेची व श्रमाची बचत होते. विभागीय भांडारात सामान्यतः विशिष्ट वस्तुगट वा प्रकार यांनुसार वर्गीकरण केलेले विविध विभाग (उदा., धान्य विभाग, कापड विभाग, फर्निचर विभाग, इलेक्ट्रॉनिकी वस्तू विभाग इ.) असतात आणि या निरनिराळ्या विभागांतून मुक्त संचार करण्याची ग्राहकाला मुभा असल्याने वस्तू प्रत्यक्ष हाताळता येतात, तसेच निरनिराळ्या कंपन्यांच्या उत्पादनांचया किंमती व दर्जा यांची तुलनात्मक पडताळणी करून वस्तू निवडता येतात. साधारणपणे विभागीय भांडार हे शहराच्या मध्यवस्तीत असल्याने वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता चांगली असते. काही विभागीय भांडारे ग्राहकाला विक्रयोत्तर सेवादेखील पुरवितात.

ग्राहकांप्रमाणे विभागीय भांडारांनादेखील त्यांच्या विशाल आकारामुळे काही फायदे होत असतात. जसे, श्रमविभागणी व विशेषीकरण करता येते, व्यवहारांचे व्यवस्थापन एकच असल्याने सर्व विभागांमध्ये सुसंवाद व सुसूत्रता ठेवता येते. प्रसारमाध्यमांचा वापर करून मालाची जाहिरात करणे त्यांना शक्य होते. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावरील व्यवहाराचे सर्व फायदे विभागीय भांडारांना मिळतात.

फायद्यांप्रमाणे काही तोटेदेखील ग्राहकांच्या दृष्टीने संभवतात. सर्वसाधारणपणे ह्या भांडारांचे ग्राहक श्रीमंत वर्गातील असल्याने त्यांच्या मालाच्या किंमती अधिक असतात, त्या मध्यम व गरीब वर्गातील ग्राहकांना परवडणाऱ्या नसतात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विभागीय भांडार असल्यास दूरवर राहणाऱ्या ग्राहकांना त्याचा लाभ घेता येत नाही. अशा भांडारांत ग्राहक व व्यवस्थापक ह्यांच्यात व्यक्तिगत संबंध निर्माण होत नसल्याने ग्राहकांच्या अडीअडचणी भांडाराला कळू शकत नाहीत. विभागीय भांडारे घरपोच माल देत असली, तरी दूर अंतरावर राहणाऱ्या ग्राहकांना माल वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी येतात.

विभागीय भांडारांचा व्यवस्थापनखर्चदेखील खूप असतो. शिवाय उधळपट्टी होण्याची शक्यता अधिक असते, कारण व्यवहाराचा व्याप मोठा असल्याने प्रत्यक्ष देखरेख नीट ठेवता येत नाही. निरनिराळ्या प्रकारचा माल मोठ्या प्रमाणावर विक्रीस ठेवलेला असतो व त्यापैकी काही विकला गेला नाही, तर तो अंगावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच इमारतीत सर्व व्यवहार असल्याने आग लागणे, भूकंप, पूर इत्यादींमुळे नुकसान झाल्यास ते फार मोठे असते.


विभागीय भांडारातील विविध वस्तू व विक्रीव्यवहार

आरीस्तीदे ब्यूसीको या फ्रेंच व्यापाऱ्याने विभागीय भांडारांना सुरूवात केली, से सामान्यतः मानले जाते. पॅरिसमध्ये त्याचे ‘बाँ मार्शे’ (चांगला सौदा) या नावाने कापडाचे दुकान होते. १८५० नंतरच्या दशकात त्याने अनेक प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या विभागांतून विकण्यास सुरूवात केली. या घटनेतच विभागीय भांडारांच्या संकल्पनेचा उगम आढळतो. एकोणिसाव्या शतकात मोठ्या शहरांतून दाट लोकवस्ती झाली. लोकांचा राहणीमानाचा स्तर उंचावू लागला. शहरातील वाहतूकव्यवस्था अपुरी पडू लागली. त्यामुळे शक्यतो एकाच ठिकाणी सर्व गरजेच्या वस्तू विकत घेण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये वाढू लागली. प्रामुख्याने या घटनाच विभागीय भांडारांच्या विस्तारवाढीस कारणीभूत ठरल्या. किरकोळ विक्री व्यवसायांचे हे अभिनव तंत्र पुढे अनेक व्यापाऱ्यांनी अनुसरले. त्यातून यूरोप-अमेरिकेत विभागीय भांडारांचा प्रसार होऊ लागला. अमेरिकेत मार्शल फिल्ड, ईबन जॉर्डन, अलेक्झांडर स्टिबर्न व जॉन वानामेकर यांनी अशी भांडारे सुरू करण्यात पुढाकार घेतला. इंग्लंडमधील ‘हेरॉड्स’, ‘सेल्फीजस’ व ‘गॅमेजस’ ही विभागीय भांडारे जगप्रसिद्ध आहेत. सुरुवातीला विभागीय भांडारे ही इतर किरकोळ व्यापाऱ्यांशी स्पर्धा करून त्यांना नामशेष करतील, अशी भीती व्यक्त केली जाई परंतु प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. सुरुवातीची विभागीय भांडारे ही सध्याच्या प्रचलित भांडारांपेक्षा थोडी वेगळी होती. उदा., प्रारंभीची विभागीय भांडारे शहराच्या मध्यवस्तीत असायची परंतु अलीकडे ती उपनगरांमध्येदेखील निघू लागली आहेत. पूर्वीची विभागीय भांडारे ही बहुतकरून एकेकटी असत परंतु आता एकाच मालकीची अनेक विभागीय भांडारे साखळीच्या स्वरूपात असू शकतात. पूर्वीच्या विभागीय भांडारातील प्रत्येक विभागात ग्राहकाला व्यक्तिगत सेवा पुरविली जाई परंतु सध्या काही ठरावीक विभागांतच अशी सेवा पुरविली जाते व इतर विभागांतून स्वयंसेवेचया तत्त्वावर ग्राहकाला माल घ्यावा लागतो.

भारतात १९७० नंतरच्या काळात विभागीय भांडारांचा प्रसार होऊ लागला. सध्या काही शहरांतून अशी भांडारे आढळतात. परंतु पाश्चिमात्य देशांतील भांडारांच्या तुलनेने आपल्याकडील विभागीय भांडारांचा आकार लहान असतो. काही विभागीय भांडारे सहकारी तत्त्वावरदेखील चालविली जाऊ लागली आहेत. उदा., मुंबईतील ‘अपना बाजार’, अन्य शहरांतील सहकारी भांडारे इत्यादी. 

पहा : दुकाने व विक्रीकेंद्रे साखळी दुकाने सुपर बाजार. 

धोंगडे, ए. रा.