डेव्हिड रिकार्डोरिकार्डो, डेव्हिड : (१८ एप्रिल १७७२−११ सप्टेंबर १८२३). सनातनवादी परंपरेतील थोर अर्थशास्त्रज्ञ. हॉलंडमध्ये स्थायिक झालेल्या एका ज्यू कुटुंबात त्याचा जन्म झाला. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या रिकार्डोचे वडील हुंड्या आणि सरकारी रोखे यांची खरेदी-विक्री करणारे दलाल होते. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी तो वडिलांच्या व्यवसायात शिरला आणि थोड्याच काळात त्याने प्रचंड संपत्ती मिळविली. शिक्षणाकडे त्याचे दुर्लक्ष झाले. त्यानंतर तो ब्रिटिश संसदेचा सभासद झाला. धार्मिक अडचणींमुळे त्याला आपला पंथ सोडावा लागला. परिणामी त्याच्या वडिलांनी त्याला जातिबहिष्कृत केले. अर्थशास्त्रात त्याला स्वारस्य वाटू लागले, ते बँक व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे. अर्थार्जन सोडून हळूहळू त्याने गणित, रसायनशास्त्र आणि भूविज्ञान ह्या विषयांचा अभ्यास सुरू केला. १७९९ मध्ये ॲडम स्मिथ या थोर अर्थशास्त्रज्ञाचा ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉझिझ ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ त्याच्या वाचनात आला. त्या ग्रंथामुळे तो इतका प्रभावित झाला की, त्यानंतर अखेरपर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यात त्याने काळ घालविला. साक्षेपी विचार, आकडेमोड करण्यातील प्रावीण्य आणि दीर्घ परिश्रम करण्याची तयारी या त्याच्या गुणांमुळे त्याला व्यवसायात आणि आर्थिक समस्यांचा वेध घेण्यात मोठेच यश मिळाले. १८२१ मध्ये त्याने ‘पोलिटिकल इकॉनॉमी क्लब’ स्थापन केला. त्यानंतर दोन वर्षांनी ग्लाउसेस्टर परागणयातील गॅटकोम पार्क येथे त्याचे निधन झाले.

रिकार्डोचा प्रमुख ग्रंथ म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी  हा होय. त्याव्यतिरिक्त त्याने अनेक पुस्तिका निबंध लिहिले. त्याची पहिली पुस्तिका द हाय प्राइस ऑफ बुलियन, अ प्रूफ ऑफ द डिप्रीशिएशन ऑफ बैक नोट् १८१० साली प्रसिद्ध झाली तिला भरपूर प्रसिद्ध मिळाली. १८१५ साली एसे ऑन द इन्फ्लुअन्स ऑफ अलो प्राइस ऑफ कॉर्न ऑन द प्रॉफिटस ऑफ स्टॉक आणि १८१६ साली प्रपोजल्स फॉर ॲन इकॉनॉमिकल अँड सिक्युअर करन्सी या त्याच्या दोन महत्त्वाच्या पुस्तिका प्रसिद्ध झाल्या. त्याचा सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ द प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन १८१७ साली प्रकाशित झाला. रिकार्डोने केवळ आपल्या मित्राच्या आग्रहाखातर तो प्रसिद्ध करण्याचे ठरविले. १८२२ मध्ये त्याची प्रोटेक्शन टू अँग्रिकल्चर ही पुस्तिका प्रसिद्ध झाली. नामवंत स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन रॅम्झी माकलक (१७८९−१८६४) याच्या मते रिकार्डोने अन्य काही लेखन न करता केवळ ती एकच पुस्तिका लिहिली असती, तरी श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञांत त्याची निश्चितपणे गणना झाली असती. प्लॅन फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ नॅशनल बॅक हे त्याने लिहिलेले अखेरचे पुस्तक त्याच्या मृत्यूनंतर १८२३ मध्ये प्रसिद्ध झाले.  

ॲडम स्मिथने प्रस्थापित केलेल्या सनातनवादाची परंपरा रिकार्डेने हिरिरीने पुढे चालविली. शासनाने आर्थिक व्यवहारांत हस्तक्षेप करू नये, खाजगी मालमत्तेवरील व्यक्तीचा हक्क अबाधित राखावा, हे सनातनवादाचे पायाभूत विचार होते. रिकार्डोने आपले अर्थसास्त्रीय विवेचन या पायाभूत चौकटीच्या अनुषंगाने केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त व्यापाराचा त्याने पुरस्कार केला. ॲडम स्मिथनेही मुक्त व्यापाराचा पुरस्कार केला, पण या बाबतीत काही प्रमाणात व्यावहारिक तडजोड त्याला मान्य होती. इतर राष्ट्रांच्या आयातकरविषयक धोरणाला प्रत्युत्तर म्हणून एखाद्या राष्ट्राने आयातकराचे हत्यार काही काळ उपयोगात आणले, तर त्याला त्याची हरकत नव्हती. देशांतर्गत उद्योगधंद्यांच्या संरक्षणासाठी ती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ॲडम स्मिथचे मत होते. या बाबतीत रिकार्डो तडजोड करावयास तयार नव्हता. शासनाने अर्थव्यवहारात हस्तक्षेप करू नये, या धोरणाचा तो ॲडम स्मिक्षपेक्षाही अधिक जोरदार पुरस्कर्ता होता. 

वस्तूचे मूल्य कसे ठरते, हा अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय होय. ॲडम स्मिथचे मूल्यविवेचन श्रममापनावर आधारलेले होते. वस्तूची बाजारपेठेतील तात्कालिक किंमत, मागणी व पुरवठा यांवर अवलंबून असली, तरी दीर्घकाळात ठरणारी वस्तूची किंमत उत्पादन परिव्ययाशी निगडित असते. हा उत्पादन परिव्यय त्या वस्तूच्या उत्पादनासाठी किती श्रम खर्ची पडतात यांवर अवलंबून असतो, या मृल्यनिर्धारण सिद्धांताचा रिकार्डोने पाढपुरावा केला. मात्र रिकार्डोने मुख्यतः राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन कसे करावे, या विषयाची चर्चा करताना आपला स्वतःचा ठसा उमटविला. राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणाऱ्याउत्पादन घटकांचे मोबदले कोणत्या तत्त्वांवर ठरविले पाहिजेत, याविषयीचे त्याचे विवेचन मूलभूत स्वरूपाचे होते. आपली विभाजनाची योजना त्याने थोडक्यात पुढील शब्दांत मांडली आहेः नफा वेतनदरावर अवलंबून असतो वेतनदर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर अवलंबून असतो, तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रामुख्याने अन्नधान्याच्या किंमतीवर अवलंबून असतात. अन्नधान्याचे विनिमयमूल्य श्रममपनावर आधारित उत्पादन परिव्ययानुसार ठरत असते. दीर्घकाळात वेतनदर अन्नधान्याच्या विनिमय-मूल्यानुसार निश्चित होत असतात. खंड फक्त अधिक सुपीक व उत्पादक भूमीला मिळतो, सर्वांत कमी सुपीक जमिनीला खंड मिळत नाही.  

रिकार्डोच्या नावाने विशेष प्रसिद्ध असलेला सिद्धांत म्हणजे भूमीचा ‘खंड सिद्धांत’ होय. ‘जमिनीच्या मूलभूत आणि अविनाशी शक्तीच्या उपयोगासाठी जमीन मालकाला जमिनीतील उत्पादनाचा जो हिस्सा द्यावा लागतो, तो खंड होय’, असे रिकार्डो म्हणतो. इमारती, कुंपण, पाणीपुरवठ्याच्या सोयी या रूपाने जमीन मालक जमिनीवर गुंतवणूक करीत असेल, तर त्यांसाठी त्याला मिळणारे जादा उत्पन्न खंडात समाविष्ट करता येणार नाही. जमिनीवर उगवलेल्या झाडांचे लाकूड खोदलेल्या खाणीतील खनिज यांपासून मिळणारे उत्पन्न म्हणजे खंड नव्हे. हे दोन्ही प्रकारचे अतिरिक्त उत्पन्न नफ्याच्या स्वरूपाचे असते. जमिनीच्या जन्मजात व अविनाशी गुणांसाठी मिळणारे उत्पन्न हेच खऱ्या अर्थाने खंड होय, असा रिकार्डोचा आग्रह होता. घटत्या उत्पादनफलाच्या गृहीतावर आधारलेला त्याचा सिद्धांत पुढीलप्रमाणे:सर्व जमीन सारखीच सुपीक नसते, म्हणूनच खंडाचा उद्‌भव होतो. एखाद्या निर्जन प्रदेशात माणसे प्रथमच वसती करावयास येतात, तेव्हा सर्वांत सुपीक जमीन ते प्रथम लागवडीखाली आणतात. कारण जमीन निसर्गतः जेवढी अधिक सुपीक, तितके अधिक उत्पादन मिळण्याचा संभव अधिक. या जमिनीवर केलेला उत्पादनखर्च भरून निघाला पाहिजे, एवढ्या प्रमाणात जमिनीवर निघालेल्या अन्नधान्याची किंमत ठरत असते. या जमिनीला खंड मिळत नाही, जमिनीतून निघालेल्या अन्नधान्याची किंमत उत्पादनखर्चाएवढीच असते. त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढू लागते बाहेरून आणखी काही लोक स्थलांतर करून कायमचे राहायला येतात. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा भागविण्यासाठी नवीन जमीन लागवडीखाली आणावी लागते. नव्याने लागवडीखाली आणण्यात आलेली जमीन दुय्यम दर्जाची, पहिल्या जमिनीच्या मानाने कमी सुपीक असते. उत्तम दर्जाच्या जमिनीवर उत्पादनासाठी जेवढा खर्च झाला असेल, तेवढ्याच उत्पादनखर्चात दुय्यम जमिनीतून कमी पीक निघते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे, दुय्यम प्रतीच्या जमिनीतून तेवढेच उत्पादन मिळविण्यासाठी अधिक उत्पादनखर्च करावा लागतो. बाजारात अन्नधान्याचे भाव वाढले, तरच दुय्यम दर्जाची जमीन लागवडीखाली आणणे परवडते. वाढत्या मागणीमुळे अन्नधान्याच्या किंमती वाढतात, वाढता उत्पादनखर्च भरून निघतो, प्रथम दर्जाच्या जमिनीचा उत्पादनखर्च भागून त्या जमीन मालकाला अतिरिक्त उत्पन्न मिळते. हे अतिरिक्त उत्पन्न म्हणजे ‘खंड’ होय. दुय्यम दर्जाच्या जमिनीला खंड मिळत नाही. जेव्हा लोकसंख्येत आणखी भर पडते, अन्न धान्याला असलेली मागणी वाढते, तेव्हा तिसऱ्यादर्जाची जमिनीला खंड मिळू लागतो आणि प्रथम दर्जाची जमीन ज्याच्या मालकीची आहे, त्याला मिळाणाऱ्याम खंडात आपोआप आणखी वाढ होते.                 

रिकार्डोचा हा खंडविषयक सिद्धांत अर्थशास्त्रात महत्त्वाचा सिद्धांत म्हणून गणला जातो. जमिनीच्या दर्जात फरक असल्यामुळे खंड निर्माण होतो. सर्व जमीन सारखीच सुपीक असती, तर खंड निर्माण झाला नसता, असे रिकार्डोचे म्हणणे होते. शेवटी लागवडीखाली आणलेल्या जमिनीचा (सीमांत जमिनीचा) केवळ उत्पादनखर्च भागत असतो. त्याहून अधिक सुपीक जमिनींना जो खंड मिळतो त्याचे कारण कमी प्रतीची जमीन लागवडीखाली आणण्याची गरज निर्माण झाली, हे होय. अधिक सुपीक जमीन धारण करणाऱ्यांना खंड मिळविण्यासाठी काहीही करावे लागत नाही. ती त्यांची अनर्जित मिळकत (अनर्जित उत्पन्न) होय. रिकार्डोच्या खंड सिद्धांतात अनेक दोष असल्याचे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी दाखवून दिले असले, तरी पाश्चात्त्य देशांत अनेक पुरोगामी, समाजवादी विचारवंतांच्या विवेचनाला त्या सिद्धांताने खतपाणी घातले. ‘खंड म्हणजे जमीनमालकाला विनासायास मिळणारे अनर्जित उत्पन्न होय’, हा त्याचा निष्कर्ष समाजवाद्यांना महत्त्वाचा वाटतो. अनेक देशांत जमीनदारी नष्ट करावी अशी मागणी पुढे आली जमिनीचे राष्ट्रीयकरण करावे असाही विचार मांडला गेला, याचे मूळ रिकार्डोच्या खंड सिद्धांतात शोधता येईल.


 रिकार्डोचा वेतविषयक सिद्धांत म्हणजे ॲडम स्मिथतचा उपजीविका सिद्धांत आणि मॅल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत यांचे मिश्रण होय. श्रमिकाला किमान दर्जाचे राहणीमान ठेवण्यासाठी जितक्या पैशाची गरज आहे, तेवढ्याच प्रमाणात वेतनदर राहतील, असे रिकार्डोचे प्रतिपादन होते व ते स्मिथच्या विचारांशी मिळतेजुळते होते. वेतनदर उपजीविकेस आवश्यक असणाऱ्या रकमेहून वर गेले, तर श्रमिक लवकर लग्न करील, आपल्याला अधिक मुले होऊ देईल, श्रमिकांची संख्या वाढेल आणि वेतनदर उपजीविका-प्रमाणापर्यंत खाली येतील. उलटपक्षी वेतनदार उपजीविकेस आवश्यक असलेल्या पातळीच्याही खाली गेले, तर अनेक श्रमिक अविवाहित राहतील, श्रमिकांची संख्या घटेल आणि वेतनदर पुन्हा उपजीविका-पातळीपर्यंत वाढतील, ही सनातनवाद्यांनी विचारसरणी रिकार्डोला मान्य होती. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याच्या किंमती जसजशा वाढत जातील, तसतसे त्या प्रमाणात वेतन वाढवावे लागेल, अशी पुस्ती रिकार्डोने जोडली. रिकार्डोचा वेतनविषयक सिद्धांत हा पूर्ण स्पर्धा, श्रमिकांना असणारी मागणी व श्रमिकांचा पुरवठा या गृहीतांवर आधारलेला आहे. वेतनदरावर रूढी व दयाबुद्धी यांचा होणारा परिणाम त्याने विचारात घेतलेला नाही. सरकारने कायदे करून वेतनदर ठरविण्यास त्याचा विरोध होता. श्रमिकांच्या कार्यक्षमतेत फरक असतो, सर्व श्रमिक सारखेच कुशल वा अकुशल नसतात, अनेक कारणांमुळे वेतनदरांत भिन्नता निर्माण होते, या गोष्टींची रिकार्डोला जाणीव नव्हती. या सर्व वैगुण्यांमुळे त्याची वेतनदराविषयी मते अर्थशास्त्राच्या इतिहासात दुर्लक्षित राहिली. 

वेतन आणि नफा यांमधील प्रमाण व्यस्त असते, असे रिकार्डोचे म्हणणे होते. वेतनदर कमी झाला म्हणजे नफ्यात वाढ होते आणि वेतनदर वाढला की नफा घटतो. वेतनदर अन्नधान्याच्या किंमतीवर अवलंबून असतो. कृषिपद्धतीत सुधारणा झाली, म्हणजे जमिनीची उत्पादक शक्ती वाढते, अन्नधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने किंमती खाली येतात, परिणामी वेतनदर कमी होतो आणि नफ्यात वाढ होते. वाढता नफा भांडवल उभारणीस साहाय्यभूत ठरतो. भांडवल गुंतवणूक वाढल्याने साहजिकच श्रमिकाला असलेली मागणी वाढते आणि वेतनदर वर जातो. लोकसंख्या वाढू लागते, अन्नधान्याच्या किंमती वर जातात आणि त्या प्रमाणात वेतनदर वाढतो. वेतन वाढले की नफ्याचे प्रमाण कमी होते.  

रिकार्डोच्या मते कृषिक्षेत्रातील नफा अन्य उद्योगधंद्यांमधील नफा नियंत्रित करतो. शेतीव्यवसायातील नफ्याचे घटू लागतो. याचे कारण उघड आहे. अन्नधान्याच्या किंमती वाढल्या की अन्य उद्योगधंद्यांना कामगारांचे वेतन वाढविणे भाग पडते. परिणामी उद्योगधंद्यांना कामगारांचे वेतन वाढविणे भाग पडते. परिणामी उद्योगधंद्यांना मिळणारा नफा घटतो. व्याज नफ्यात समाविष्ट असते, असे रिकार्डोचे मत असल्याने व्याजदराविषयीचे विवेचन त्याच्या लेखनात आढळत नाही.                 

रिकार्डोने आर्थिक विकासासंबंधी शास्त्रशुद्ध सिद्धांत मांडलेला नाही, परंतु त्याच्या लेखनातून आणि तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांनी त्याने केलेल्या पत्रव्यवहारातून त्या विषयावरील त्याचे विचार समजून येतात. आर्थिक विकास भांडवल उभारणीवर प्रामुख्याने अवलंबून असतो, यावर त्याने भर दिला आहे. भांडवल उभारणीसाठी बचतीचे आणि नफ्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. उत्पादन वाढविले आणि अनुत्पादक उपभोग कमी केला, तर भांडवल उभारणीस मदत होते. करमारामुळे गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होतो. करामुळे मिळकत, नफा आणि भांडवल उभारणी घटते. म्हणून रिकार्डोचा कर लादण्यावर विरोध आहे. तांत्रिक प्रगती आणि वाढते यांत्रिकीकरण रिकार्डोला मान्य नाही. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते आणि घटत्या उत्पादनफल प्रवृत्तीस आळा बसतो, हे त्याला मान्य असले, तरी हळूहळू कामगार बेकार होतील आणि एकूण अर्थकारणावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतील, अशी भीतीही रिकार्डोने व्यक्त केली वाढती लोकसंख्या आणि घटते उत्पादनफल, या दुहेरी प्रवृत्ती अटळ असल्याने अखेरीस नफा शून्यावर येतो आणि स्थिर अर्थव्यवस्था अस्तित्वात येते. या अवस्थेत भांडवल उभारणीला वाव नसतो, वेतनदर उदरनिर्वाहाच्या पातळीवर स्थिर होतो आणि तांत्रिक प्रगतीला खीळ बसते. अशा प्रकारे आर्थिक विकासाची गतिशील प्रक्रिया स्पष्ट करताना रिकार्डोने अचल प्रतिमानाचा उपयोग केला आहे. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना ते प्रतिमान सर्वथा मान्य नसले, तरी त्यांनी रिकार्डोच्या अनेक संकल्पना स्वीकारल्याचे दिसून येते. 

रिकार्डो मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता होता. अनिर्बंध आंतरराष्ट्रीय व्यापार सर्व देशांना कसा फायदेशीर ठरतो, हे स्पष्ट करताना त्याने मांडलेला ‘तौलनिक उत्पादन-परिव्य सिद्धांत’ अर्थशास्त्रात मान्यता पावला आहे. ॲडम स्मिथने आपल्या वेल्थ ऑफ नेशन्स या जगप्रसिद्घ ग्रंथात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत श्रमविभागणीच्या तत्त्वावर विशद केला. प्रत्येक देशला काही वस्तूंचे उत्पादन करणे निसर्गतः सोयीचे असते. जर परकीय राष्ट्र एखाद्या वस्तूचा स्वस्त दरात पुरवठा करीत असेल, तर ती वस्तू, आपण जी वस्तू स्वस्त दरात पुरवू शकतो त्या वस्तूच्या बदलत्या खरेदी करणे, हे दोन्ही राष्ट्रांना फायद्याचे ठरेल, असे ॲडम स्मिथने म्हटले आहे. स्मिथच्या या विधानात तथ्य असले, तरी त्या विधानाला काही मर्यादा आहेत एका विविक्षित प्रमाणात मजूर वापरून एखाद्या देशाला अन्य देशांपेक्षा एखादी वस्तू अधिक प्रमाणात उत्पादन करता येते हे खरे, परंतु ज्या देशाला कोणतीही वस्तू अन्य देशांपेक्षा कमी खर्चात उत्पादन करता येत नसेल, तर त्या देशाला अन्य देशांशी व्यापार करताच येणार नाही, असा स्मिथच्या विधानाचा अर्थ होतो. रिकार्डोने आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताला अधिक निश्चित व अधिक स्वीकारार्ह रूप दिले. ग्रेट ब्रिटनसारखा एखादा देश गहू व मद्य या दोन्ही वस्तू तेवढ्याच खर्चात पोर्तुगालच्या मानाने अधिक प्रमाणात निर्माण करू शकेल. प्रश्न असा की, अशा परिस्थितीत दोन्ही देशांदरम्यान व्यापाराची शक्यता आहे का ? स्मिथने याचे उत्तर दिले नाही. रिकार्डोने ‘तौलनिक परिव्यय सिद्धांत’ मांडून परस्पर-व्यापार दोन्ही देशांना फायदेशीर आहे, असे सिद्ध केले. अनुकूल परिस्थितीमुळे ग्रेट ब्रिटन गहू व मद्य पोर्तुगालपेक्षा जादा प्रमाणात उत्पादन करतो दोन्ही वस्तू उत्पादित करणे पोर्तुगालला तोट्याचे आहे आणि गव्हाचे उत्पादन करणे अधिक तोट्याचे आहे. रिकार्डोच्या सिद्धांताप्रमाणे पोर्तुगालने मद्याच्या उत्पादनावर आपले उत्पादन घटक केंद्रित करणे दोन्ही देशांच्या दृष्टीने फलदायी ठरेल. जॉन स्ट्यूअर्ट मिल व अन्य सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी रिकार्डोच्या विवेचनाचा आधार घेऊन खुल्या व्यापाराचे समर्थन केले. 

तात्त्विक चिंतन आणि तर्कशास्त्राचा साक्षेपी उपयोग, हे रिकार्डोच्या अनेक सिद्धांतांमागील प्रमुख आधार असल्याचे दिसून येते. आपल्या निष्कर्षांच्या पुष्ट्यर्थ ऐतिहासिक वा सांख्यिकीय पुरावे देण्याची काळजी त्याने घेतली नाही. आपल्या सिद्धांतांचा वस्तुस्थितीशी किती संबंध आहे, हे त्याने कधी पाहिले नाही. विचारवंतास आवश्यक असणारी सुसंगत विचारसरणी आणि सुस्पष्ट अभिव्यक्ती त्याच्या लेखनात अभावानेच आढळते. तो निराशावादी होता. ‘अर्थशास्त्र हे उदास वृत्तीचे शास्त्र असल्याचे’ तत्कालीन तत्त्ववेत्त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले, त्यास रिकार्डो काही अंश जबाबदार होता. असे असले, तरी अर्थशास्त्राचा एक जनक आणि एकोणिसाव्या शतकातील एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्याचे स्थान अबाधित राहील, त्याच्या अनेक संकल्पना आजही वादविषय झाल्या आहेत आणि प्येरो स्त्राफासारखे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ त्याच्या सिद्धांतांची वेळोवेळी दखल घेतात, यांवरून रिकार्डोचे महत्त्व लक्षात येते.

संदर्भ : 1. Blaug, Mark, Ricardian Economics: A Historical Study, New Haven, 1958.

            2. Hollander, Jacob II. The Economics of David Ricardo, Toronto, 1979.

            3. Sraffa, Piero, Ed. The Works and Correspondence of David Ricardo, Cambridge, 1973.

            4. St. Clair, Oswald, A Key to Ricardo, New York, 1975.

भेण्डे, सुभाष