बेव्हरिज, विल्यम हेन्री : (५ मार्च १८७९–१६ मार्च १९६३). सुविख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, रंगपूर (बांगला देश) येथे जन्म. त्याचे शिक्षण वॅल्यल माहाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे झाले. १९०४ मध्ये त्याने कायद्याची पदवी संपादिली १९०३–०५ या काळात तो ‘टॉयन्बी हॉल’चा उप-अधीक्षक होता. याच सुमारास ⇨सिडनी व बिआड्रिस वेब  या सुप्रसिद्ध अर्थशास्त्रीय व समाजवादी विचारवंत दांपत्याशी त्याचा परिचय झाला. १९०५ मध्ये  विल्यम हेन्री बेव्हरिजब्रिटिश सरकारने बीॲट्रिस वेबच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘द रॉयल कमिशन ऑन द पूअर लॉज’ या आयोगाच्या कामात बेव्हरिजचे साहाय्य घेण्यात ले. १९०९ मध्ये ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ हा अहवाल तयार झाला. या अहवालात सामाजिक सुरक्षा योजनेची विस्तृत माहिती होती [⟶सामाजिक सुरक्षा].

वेव्हरिजने मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रातून सामाजिक समस्यांवर अनेक महत्त्वाचे लेख प्रकाशित केले, त्याचप्रमाणे अनेक व्याख्यानेही दिली. परिणामी विन्स्टन चर्चिल यांनी १९०९ मध्ये रोजगार कार्यालये स्थापन केली व बेव्हरिजची रोजगार कार्यालयांचा संचालक तसेच व्यापार मंडळामधील (बोर्ड ऑफ ट्रेड) रोजगार विभागाचा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. बेव्हरिजने या पदांवर असताना रोजगार कार्यालयांचे सुसूत्रीकरण व बेकारी विमानपद्धतीचे संयोजन केले. अनएम्प्लॉयमेंट : ए प्रॉब्लेम ऑफ इंडस्ट्री (१९०९) हे त्याचे पहिले पुस्तक. पहिल्या महायुद्धकाळात बेव्हरिजने मनुष्यबळ व शिधा-वाटप कार्यक्रम ( रेशनिंग) विभागांत जबाबदारी पदे सांभाळली. १९१९ मध्ये बेव्हरिजला ‘सर’ हा किताब लाभला. त्याच वर्षी तो ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ या संस्थेचा संचालक झाला. पुढे १९३७ मध्ये त्याची युनव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. यांशिवाय बेव्हरिजने ‘कोळसा उद्योगविषयक शाही आयोगा’चा सदस्य (१९२५), ‘कमिटी ऑफ इंपीरिअल डिफेन्स ऑन फूड रेशनिंग’ (१९३६) या समितीच्या उपसमितीचा अध्यक्ष, ‘बेकारी विमा सांविधिक समिती’ (१९३४–४४) चा अध्यक्ष, ध्वनिक्षेपण समितीचा अध्यक्ष (१९४९-५०) अशा विविध समित्यांवर महत्त्वाची पदे भूषविली.

बेव्हरिजची १९४२ मध्ये ‘इंटर-डिपार्टमेंटल कमिटी ऑन सोशल इन्शुअरन्स अँड ॲलाइड सर्व्हिसेस’ या शआसकीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९४२ मध्ये या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला. तोच बेव्हरिज रिपोर्ट होय. हा अहवाल लोकप्रिय झाला. १९४५ च्या निवडणुकांतील मजूर पक्षाच्या विजयाचे श्रेय या अहवालालाही दिले जाते. मजूर पक्षाने १९४६ मध्ये या अहवालाच्या आधारे सामाजिक सुरक्षा अधिनियम सुरक्षा अधिनियम समंत केला. त्यानुसार ब्रिटिश नागरिकांकरिता जन्मापासून मृत्यूपर्यंतची सामाजिक सुरक्षेची तरतूद करण्यात ली (१९४८).

फुल एम्प्लॉयमेंट इन ए फ्री सोसायटी (१९४४) या ग्रंथातून बेव्हरिजने सरकारी खर्चाचे नियोजन, खाजगी गुंतवणुकीवर नियंत्रण यांसारख्या उपायांचा अवलंब केल्यास पूर्ण रोजगाराची उद्दिष्ट गाठता येईल, असे प्रतिपादिले आहे. व्हॉलंटरी ॲक्शन (१९४८), डिफेन्स ऑफ फ्री लर्निंग (१९५९)यांसारख्या ग्रंथांतून त्याने शासकीय व्यवस्थापन हे वैयक्तिक उपक्रमाला मारक नसून, पूरक असल्याचे प्रतिपादन केले आहे. बेव्हरिज १९४४ मध्ये बर्विक मतदारसंघातून संसदेवर निवडून गेला, तथापि का वर्षाच्या तच सार्वत्रिक निवडणुकांत तो पराभूत झाला. १९४६ मध्ये ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’ मध्ये त्याची उमराव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी’ आणि ‘इन्स्टिट्ट ऑफ स्टॅटिस्टिशियन्स’या संस्थांचे अनुक्रमे १९४१–४३ व १९४८–६३ या काळात त्याने अध्यक्षपद भूषविले. बेव्हरिजचे ऑक्सफर्ड येथे निधन झाले.

पहा : कल्याणकारी राज्य.

संदर्भ : 1. Beveridge, Janet P. Beveridge and his Plan, London, 1954.

             2. Williams, Gertrude, The Coming of the Welfare state, London, 1967.

गद्रे, वि. रा.