विकसेल, योहान गस्टाव्ह नट : (२० डिसेंबर १८५१−३ मे १९२६), विख्यात स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ. जन्म स्टॉकहोम येथे. त्याच्या वडिलांचे कामगारवस्तीत किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्याची कामगारवर्गाशी जवळीक निर्माण झाली. वयाच्या पंधराव्या वर्षी विकसेलचे आई-वडील वारले पण भावडांच्या मदतीने त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. १८६९ मध्ये तो अप्साला विद्यापीठात दाखल झाला. अपेक्षित अवधीपेक्षा निम्म्या कालावधीत त्याने गणितातील पदवी संपादन केली. त्याचे बालपण धार्मिक वातावरणात गेले असले, तरी विद्यापीठात शिक्षण घेत असताना डार्विन, रनां, श्ट्राउस, इब्सेन यांसारख्या लेखक-विचारवंतांच्या प्रभावामुळे तो विचारस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता बनला. तत्कालीन राजकीय-सामाजिक प्रश्नांकडे व वादविषयांकडे तो आकृष्ट झाला. १८८० मध्ये अप्साला येथील एका व्याखानात सर्व सामाजिक दुर्गुणांचे मूळ अतिलोकसंख्येत आहे, असे प्रतिपादन त्याने केले. अतिमद्यपानाच्या दुर्गुण समाजातील निम्नवर्गात दारिद्र्यामुळे व सुशिक्षितवर्गात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अविवाहित रहावे लागल्यामुळे निर्माण होतो आणि या दोन्ही वर्गांच्या आर्थिक परिस्थितीला वाढती लोकसंख्या हेच कारण असल्याने, संततिनियमनाद्वारे कुटुंब मर्यादित ठेवणे हाच उपाय ठरतो, असे विधान त्याने या व्याख्यानात केले. त्यामुळे समाजात प्रक्षोभ निर्माण झाला परंतु या व्याख्यानात केले. त्यामुळे समाजात प्रक्षोभ निर्माण झाला परंतु या व्याख्यानाच्या छापील प्रती हजारोंनी खपल्याने विकसेलची कीर्ती सर्वदूर पसरली. टीकाकारांबरोबर झालेल्या वादविवादांतून आपला सामाजिक-आर्थिक प्रश्नांचा अभ्यास कमी पडतो. असे त्याला जाणवले व हा अभ्यास वाढविण्याचे प्रयत्न त्याने सुरू केले.

विकसेलने १८८५ मध्ये भौतिकीची पदवी घेतली. गणिताची रुची कायम ठेवून एखाद्या सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणे, हे अर्थशास्त्राबाबतच शक्य आहे असे वाटल्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी तो १८८५ मध्ये लंडनला गेला. तेथे जेव्हन्झ, व्हालरा सिज्‌विक या अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा त्याने अभ्यास केला, तसेच सनातनवादी अर्थशास्त्राचे विश्लेषण अभ्यासले. इतिहासवादी विचारसरणीतून तो रमू शकला नाही. गणिती तंत्रानेच अर्थशास्त्राला भक्कम पाया मिळू शकेल, अशी त्याची धारणा बनली. पुढील पाच वर्षांत ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया या देशांत जाऊन तेथील अर्थव्यवस्थेचा, तसेच तेथील नामवंत अर्थशास्त्रज्ञांच्या ग्रंथांचा त्याने अभ्यास केला. १८८७ मध्ये लंडन येथील वास्तव्यात त्याने आपला बराच काळ ड्रायस्डेल, ब्रॅड्‌लॉ, बेझंट, काउट्‌स्की यांसारख्या सुधारणावादी विचारवंतांच्या सहवासात घालवला. कार्ल काउटस्कीच्या सान्निध्यांमुळे तो लंडनमध्ये भरणाऱ्या फेबिअन सभांना उपस्थित राहू लागला. ⇨बंथाव्हेर्कच्या पॉझिटिव्ह थिअरी ऑफ कॅपिटल या ग्रंथाने तो प्रभावित झाला.

यूरोप खंडातील अभ्यासदौऱ्याच्या अखेरीस ॲना बॅगी या नार्वेजियन शिक्षिकेच्या सान्निध्यात विकसेल आला व तिच्याशी त्याने १८८९ मध्ये केले मात्र विवाहाचे कोणतेही धार्मिक विधी वा नागरी सोपस्कार त्यांनी केले नाहीत. या तत्कालीन लोकविलक्षण व प्रागतिक घटनेमुळे विकसेलला शैक्षणिक क्षेत्रात त्याच्या योग्यतेचे पद मिळण्यास विलंब लागला. निर्वाहासाठी वार्तहर, तसेच छोटेखानी पुस्तिकांचे लेखन इ. कामे त्याला करावी लागली. १८९३ मध्ये त्याचा व्हॅल्यू, कॅपिटल अँड रेंट हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. बंबाव्हेर्क, व्हालरा यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांनी त्याच्या या ग्रंथाची प्रशंसा केली. १८९५ मध्ये त्याने डॉक्टरेट पदवी मिळविली, तरीही त्याला विद्यापीठात नोकरी मिळू शकली नाही. त्या काळात अर्थशास्त्र हे कायदा विद्याशाखांतर्गत शिकविले जात असल्यामुळे, विद्यापीठात पद मिळण्यासाठी विकसेलला कायद्याची पदवी घेण्याची अट घालण्यात आली. विकसेलची कीर्ती सर्वदूर पसरलेली असली, तरी त्याला या शैक्षणिक अटीत सवलत मिळू शकली नाही. सरतेशेवटी १८९९ मध्ये त्याने कायद्याची पदवी घेतल्यानंतर १९०० मध्ये त्याची साहाय्यक प्राध्यापक म्हणून ‘लुंड विद्यापीठा’त नेमणूक करण्यात आली. १९०५ मध्ये त्याला प्राध्यापक म्हणून बढती मिळाली.

विकसेलच्या अर्थशास्त्रविषयक ग्रंथात व्हॅल्यू, कॅपिटल अँड रेंटप्रमाणेच स्टडीज इन फायनान्स थिअरी (१८९६), इंटरेस्ट अँड प्राइझेस (१८९८), लेक्चर्स ऑन पोलिटिल इकॉनॉमी (खंड पहिला : जनरल थिअरी, १९०१ व खंड दुसरा : मनी, १९०६), सिलेक्टेड पेपर्स ऑन इकॉनॉमिक थिअरी (संपा. व प्रस्तावना−एरिक लिंडाल यात १८९७ नंतर प्रसिद्ध झालेल्या प्रबंधाचा अंतर्भाव आहे) हे महत्त्वाचे आहेत.

विकसेलने व्हॅल्यू, कॅपिटल अँड रेंट या ग्रंथाद्वारे मूल्य आणि वितरण सिद्धांतात मोलाची भर घातली. इंटरेस्ट अँड प्राइझेस या पुस्तकामुळे विकसेलला चलनविषयक सिद्धांताचा आद्य प्रवर्तक म्हणून ख्याती लाभली. सर्वसाधारण किंमतीची पातळी कशी बदलते, हे त्यानेच प्रथम दाखवून दिले. पैशाचा पुरवठा वाढल्यास किंमती का वाढतात, हे त्याने स्पष्ट केले. ⇨उत्पादन परिव्यम सिद्धांत आणि द्रव्यराशि सिद्धांत यांतील त्रुटी त्याने दाखवून दिल्या. त्याने व्याजाचे दोन प्रकार मानले : नैसर्गिक वा वास्तव व्याजदर आणि बाजारातील मौद्रिक (चलनाचा) दर. विकसेलच्या मते, ‘भांडवल म्हणजे बचत केलेले भूमी व श्रम हे घटक’. व्याज हे उपभोग पुढे ढकलण्यसाठी द्यावा लागणारा मोबदला असतो. व्याजाचा नैसर्गिक दर हा कर्जाऊ भांडवलाच्या मागणी व पुरवठ्यातील समतोलाने ठरतो, तर मौद्रिक दर हा बाजारपेठेतील (विपणी) व्याजदर असून, तो बँकांच्या धोरणानुसार ठरतो. बाजारपेठेतील मौद्रिक व्याजदर हा नैसर्गिक व्याजदराच्या−म्हणजेच समतोल व्याजदराच्या−पातळीच्या वर किंवा खाली, कमी वा अधिक होऊ शकतो. मौद्रिक दर हा नैसर्गिक व्याजदरापेक्षा कमी असल्यास बचतीत वाढ होत नाही. जेव्हा उपभोग वाढून उत्पादकांना नफा मिळविण्याची शक्यता असते, तेव्हा भांडवलगुंतवणूक वाढते आणि किंमतही वाढतात. तसेच जेव्हा बाजारातील मौद्रिक दर नैसर्गिक व्याजदरापेक्षा अधिक असतो, तेव्हा उत्पादन घटून किंमती उतरतात. विकसेलच्या मौद्रिक आणि नैसर्गिक दरांतील संबंधाच्या सिद्धांताने नंतरच्या काळात विकसित झालेल्या आर्थिक प्रक्रिया-विश्लेषणाची सुरुवात झाली व गतिमान विश्लेषणाची एक नवी पद्धत अभ्यासकांना उपलब्ध झाली. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात बदल करून अर्थव्यवस्थेचे नियंत्रण करावे, अशी त्याची सूचना नंतरच्या काळात सर्वत्र अमलात आली. अस्थिर असमतोलाच्या एकंदर गतीच्या परिणामातून व्यापारचक्र निर्माण होते. मौद्रिक व्याजदरापेक्षा नैसर्गिक व्याजदर अधिक झाल्यास, गुंतवणूक वेगाने वाढून जास्त व्यापारवाढीच्या अपेक्षेने किंमतीत व उत्पादनात अस्थिरता निर्माण होते, असा वेगळा दृष्टिकोन त्याने मांडला. पैशाच्या मूल्याबाबतही नैसर्गिक व मौद्रिक व्याजदराचा संबंध प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न केला. किंमती-पातळी स्थिर राखणारे चलनविषयक धोरण असावे, असे मत त्याने मांडले.


विकसेलचा सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत ही त्याची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. बंबाव्हेर्कच्या त्याबाबतच्या मूळ सिद्धांतात विकसेलने सुधारणा केली. भूमी व बदलत्या प्रमाणाचे घटक विचारात घेऊन विविध वस्तूंच्या उत्पादनास तो त्याने लागू केला. सीमांत उत्पादकतेची संकल्पना भांडवल व मूल्य सिद्धांताशी जोडल्यामुळे, नंतरच्या पिढीतील अर्थशास्त्रज्ञांस ती मार्गदर्शक ठरली. ऑस्ट्रियन भांडवल−सिद्धांताचे आणि व्हालराच्या सर्वसाधारण समतोल सिद्धांताचे एकत्रीकरण करून त्याने नवसनातनवादी सिद्धांताची पुनर्मांडणी केली.

पूर्ण रोजगाराची परिस्थिती असताना जर बचतीचा दर श्रमशक्तीपेक्षा (वर्क फोर्स) वेगाने वाढत असेल, तर तात्त्विक दृष्ट्या भांडवलसंचय होऊ शकतो. संसाधनामधील स्पर्धेमुळे मजुरी आणि इतर घटकांचे मोबदले वाढत जातात. त्यामुळे बचतीचा काही भाग वाढत्या मजुरीने शोषला जातो. याला ‘विकसेल−इफेक्ट’ (विकसेल परिणाम) असे संबोधण्यात येते. वास्तव भांडवलातील वाढ ही एकूण समाजाच्या भांडवलाच्या सीमांत उत्पादकतेबरोबर असते. तिला बचतीने भागल्यास वास्तव भांडवलाचा उत्पादकता दर मिळतो. विकसेलच्या या नव्या दृष्टीकोनामुळे उत्पादन, उत्पन्नाचे वितरण, बचत आणि उपभोग यांवर भांडवल उभारणीतील बदलाचे परिणाम स्पष्ट करता येऊ लागले.

श्रमाची मजुरी सीमांत उत्पादकतेवरून ठरते. सर्वच उत्पादनघटकांचे मोबदले सीमांत उत्पादकतेवरून ठरविता येत असल्यामुळे खंड (रेंट) विषयक स्वतंत्र सिद्धांताची आवश्यकता नाही, असे मत विकसेलने मांडले.

बचत आणि गुंतवणूक समान असल्यासच अर्थव्यवस्थेचा समतोल घडून येतो, असे त्याचे मत होते. किंमती उतरल्यामुळे क्रयशक्ती वाढून प्रभावी मागणी वाढत जाते, या व्हालराच्या मताशी तो सहमत नव्हता. एकाने केलेला खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असल्यामुळे एकंदर क्रयशक्ती तितकीच राहते, असे विकसेलने स्पष्ट केले.

विकसेलच्या लेक्चर्स ऑन पोलिटिकल इकॉनॉमी (इं. भा) या द्विखंडात्मक ग्रंथाला ‘प्राध्यापकांसाठीचे पाठ्यपुस्तक’ असे म्हटले जाते. हे दोन्ही खंड मूळ स्वीडिश भाषेत प्रकाशित झाले असून लायोनेल रॉबिन्स यांनी १९३४-३५ मध्ये त्याचे संपादन केले.

लुंड विद्यापीठात प्राध्यापक झाल्यानंतरही, विकसेलने सामाजिक व वादग्रस्त विषयांवर व्याख्याने देण्याचे आपले अंगीकृत कार्य चालूच ठेवले. धर्मविडंबनाबद्दल शिक्षा भोगणाऱ्या एका मुक्त विचाराच्या बंडखोर व्यक्तीच्या बचावार्थ विकसेलने प्रयत्न केल्याबद्दल सबंध देशभर त्याचा निषेध करण्यात आला व १९०८ मध्ये त्याला दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही भोगावी लागली. त्या काळात विकसेलने आपली पूर्वी प्रसिद्ध झालेली व्याख्याने पुन्हा सुधारली. लोकसंख्य सिद्धांतावर त्याने एक पुस्तिका लिहून पर्याप्त लोकसंख्येबाबत मत मांडले. तसेच ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथाचा अनुवाद त्याने केला. पहिल्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात विकसेलने स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेचा सल्लागार म्हणूनही काम केले.

विकसेल लुंड विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यावर (१९१७) स्टॉक होमला परतला. तेथे १९१७ मध्ये स्थापण्यात आलेल्या ‘द इकॉमॉमिस्ट क्लब’ या संस्थेचा तो पहिला अध्यक्ष बनला. वयाच्या ७० व्या वर्षी ऑस्लो विद्यापीठाने त्याला सन्माननीय सदस्यत्व दिले.

विकसेलची अर्थशास्त्रविषयक विचारप्रणाली ‘स्वीडन’ अथवा ‘स्टॉकहोम’ संप्रदाय या नावाने ओळखली जाते. स्कँडिनेव्हियन अर्थप्रणालीवर विकसलेचा प्रभाव होता, तद्वतच लिंडाल, ⇨कार्ल गन्नार मीर्दाल हे अर्थशास्त्रज्ञही विकसलेल्या विचारांनी प्रभावित झाले होते. विकसेलचे स्टॉकहोम येथे निधन झाले.

संदर्भ : 1. Gardlund, Torsten, The Life of Knut Wicksell, Stockholm, 1958.

           2. Uhr, Carl G. Economic Doctrines of knut Wicksell, Los Angles, 1960.

फरांदे, विजयकुमार