ऑस्कर लांगेलांगे, ऑस्कर रिचर्ड : ( २७ जुलै १९०४-२ ऑक्टोबर १९६५ ). सुविख्यात पोलिश शिक्षणवेत्ता, राजकारणपटू व मार्क्सवादी अर्थशास्त्र, टॉमाशूफ येथे जन्म. पॉझनान विद्यापीठ, लंडन अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था आणि क्रेको विद्यापीठ यांमधून त्याने शिक्षण संपादन केले. १९३१ मध्ये क्रेको विद्यापीठ यांमधून त्याने शिक्षण संपादन केले. १९३१ मध्ये क्रेको विद्यापीठात तो अर्थशास्त्र व सांख्यिकी यांचे अध्यापन करू लागला. १९३४ मध्ये लांगेला रॉकफेलर प्रतिष्ठानाची अधिछात्रवृत्ती मिळाली आणि तो अमेरिकेतील हार्व्हर्ड व मिनेसोटा विद्यापीठांत अध्ययनार्थ गेला. १९३६ मध्ये मिशिगन विद्यापीठात, तर १९३७ मध्ये कॅलिफोर्निया व स्टॅनफर्ड विद्यापीठांत तो अर्थशास्त्राचा अधिव्याख्याता झाला. पुढच्याच वर्षी तो शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन करू लागला, त्याच विद्यापीठात १९४३ मध्ये तो प्राध्यापक झाला.

 

लांगे याने हद्दपारीतील पोलिश सरकारातील रशियाविरोधी सदस्यांवर केलेल्या टीकेमुळे तसेच युद्धोत्तर पोलंडच्या पुनर्रचनेच्या कार्यक्रमात पोलिश प्रतिनिधींनी रशियाला पूर्ण सहकार्य द्यावे, अशा प्रकारची विधायक सूचना केल्यामुळे जोसेफ स्टालिनने लांगे यास रशिया-भेटीचे निमंत्रण दिले आणि त्यानुसार १९४४ मध्ये त्याने रशियाला भेट दिली. १९४३ मध्ये लांगेला मिळालेले अमेरिकन नागरिकत्व त्याने सोडून दिले आणि तो पोलंडचा अमेरिकेतील राजदूत म्हणून अमेरिकेत रूजू झाला ( डिसेंबर १९४५-डिसेंबर १९४६ ). संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पोलिश प्रतिनिधी म्हणूनही त्याने काम केले (१९४६-४८). त्यानंतर  लांगेने वॉर्सा विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाच्या अध्यासनाचा संचालक, पोलिश अर्थशास्त्रीय संस्थेचा उपाध्यक्ष, पोलिश अकॅडेमी ऑफ सायन्सिसच्या अर्थशास्त्र विषय समितीचा अध्यक्ष आणि सामाजिक विज्ञान विभागाचा अध्यक्ष तसेच गणित संस्थेचा सदस्य, पोलिश मंत्रिमंडळाच्या आर्थिक परिषदेचा अध्यक्ष, पोलिश युनायटेड वर्कर्स पार्टीच्या मध्यवर्ती परिषदेचा सदस्य अशी विविध पदे सांभाळली. २० जानेवारी १९५७ च्या पोलंडमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निवडणुकांत लांगे पोलिश संसदेवर (सेज्म) प्रतिनिधी म्हणून निवडून गेला आणि २० फेब्रुवारी रोजी त्याची राज्यसभेचा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निमंत्रणावरून अर्थसल्लागार म्हणून लांगेने भारतास १९५५ मध्ये भेट दिली होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्याच्या कामी भारतीय नियोजनकारांना साहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लांगेचे भारतात सहा महिने वास्तव्य होते. लांगे हा ‘ पोलिश-भारतीय मैत्री संघा ’ चा अध्यक्ष तर होताच, त्याशिवाय तो पंडित नेहरूंचा स्नेहीही होता. १९५९ मध्ये श्रीलंकेच्या (पूर्वीचा सीलोन) तत्कालीन पंतप्रधान श्रीमती भंडारनायके यांनी त्या देशाच्या आर्थिक योजना तयार करण्याकरिता लांगे यास आमंत्रित केले होते. लांगेने ईजिप्त व इंडोनेशिया या देशांच्या नियोजन आयोगांचे सल्लागार म्हणूनही काही काळ काम पाहिले.

अष्टपैलू प्रतिभावंत म्हणून समजल्या गेलेल्या लांगेने नियोजन, समाजवाद, उपयोगिता सिद्धांत, कल्याणकारी अर्थशास्त्र, मार्क्सवादी अर्थशास्त्र, व्हालरा या अर्थशास्त्रज्ञाचा ‘ सामान्य समतोल सिद्धांत ’ यांसारख्या अगणित विषयांवर लेखन केले आहे.

लूटव्हिख फोन मीझेस या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञाने १९२० मध्ये आर्थिक नियोजनाचा तत्त्व व व्यवहार अशा दोन्ही दृष्टींनी अंगीकार करणे हे अशक्य असल्याचे मत व्यक्त करून अशा तऱ्हेचा वाद प्रथमच आर्थिक जगतात सुरू केला हायेक व रॉबिन्स ह्या दोन अर्थशास्त्रज्ञांनी नियोजित अर्थव्यवस्था ही संयुक्तिक दृष्ट्या कार्य करू शकत नसल्याचा युक्तिवाद पुढे मांडून मीझेसला पाठिंबा दिला. लांगेने १९३६ मध्ये मीझेसच्या प्रतिपादनाला प्रत्युत्तर देऊन आर्थिक नियोजनाविषयी प्रथमच प्रागतिक दृष्टीकोनातून चर्चा घडवून आणण्यास प्रारंभ केला. विभाजनाच्या सीमांत उत्पादनक्षमता सिद्धांताचे विश्लेषण करताना लांगेने नवप्रवर्तनाचा (नवीन वस्तूंचा व नवीन प्रक्रियांचा शोध आणि विकास) प्रारंभकाळ व प्रवर्तनकाळ यांमधील भेद स्पष्ट केला आहे.

लांगे याची प्रचंड ग्रंथसंपदा व शोधनिबंध आहेत. त्याचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : (१) नोट्स ऑन इनपुट-आउटपुट ॲनॅलिसिस. या ग्रंथाचा फ्रेंच, जपानी व स्पॅनिश भाषांत अनुवाद करण्यात आला आहे. (२) इंट्रोडक्शन टू इकॉनॉमेट्रिक्स (३) पोलिटिकल इकॉनॉमी (तीन खंड). पोलिटिकल इकॉनॉमी ही लांगेची महत्त्वाची कृती मानली जाते. तीत अर्थशास्त्र विषयातील प्रमुख समस्यांचा उदा., पुनरुत्पादन सिद्धांत, संचयन, वस्तुउत्पादन, मूल्यसिद्धांत इ. ऊहापोह करण्यात आला आहे.

लांगेला गणितीय अर्थशास्त्र व सांख्यिकी यांमध्ये विशेष गती होती. या विषयांवर त्याने अनेक देशांत व्याख्याने दिली. हिक्स, सॅम्युएलसन, ॲरो, होटेलिंग, कॅल्डॉर इ. अर्थशास्त्रज्ञांप्रामाणेच लांगे हा नवकल्याणकारी अर्थशास्त्राचा एक प्रवर्तक मानण्यात येतो.

गद्रे, वि. रा.