गेऑर्ग फ्रीड्रिख लिस्टलिस्ट, गेऑर्ग फ्रीड्रिख : (६ ऑगस्ट १७८९-३० नोव्हेंबर १८८६). सुप्रसिद्ध जर्मन राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ. लिस्टचा जन्म वर्टेंबर्ग प्रांतातील रॉइटलिंगन शहरी एका चर्मकाराच्या कुटुंबात झाला. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने कारकुनी पेशा पत्करला, आपल्या गुणांच्या योगे तो मंत्र्याचा अवरसचिव बनला. त्यानंतर त्याची ट्युबिंगेन विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली, परंतु त्याच्या राजकीय मतांमुळे दोन वर्षांनी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

लिस्टने १८१९ मध्ये फ्रॅंकफुर्ट शहरी कारखानदार व व्यापारी यांची एक संस्था उभारली आणि देशांतर्गत जर्मन जकात अडथळे नष्ट करण्याच्या हेतूने चळवळ आरंभली, तेव्हा अनेक जर्मन भाषिक राज्ये व विशेषतः ऑस्ट्रियन चॅन्सेलर मॅटरनिक यांनी लिस्ट हा एक वावदूक पुढारी असल्याच्या प्रचारास सुरुवात  केली. १८२० मध्ये लिस्ट वेर्टेंबर्गच्या विधिमंडळावर निवडून आला. स्थानिक प्रशासन संस्थेचा कारभार अधिक काळ चालू ठेवावा आणि न्यायिक प्रक्रियेला प्रसिद्धी मिळावी, याकरिता लिस्टने अर्ज केला. त्यावेळी त्याला सार्वजनिक संस्थांचे स्थैर्य धोक्यात आणणारा म्हणून दहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. १८२२ मध्ये तो परदेशात पळून गेला व काही काळ भ्रमंती करीत राहीला. १८२४ मध्ये तो पुन्हा जर्मनीस परतला, तेव्हा त्याला अटक करण्यात आली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत जाण्याच्या अटीवरच त्याला मुक्त करण्यात आले. १८२५ मध्ये त्याने अमेरिकेस बोटीने प्रयाण केले.

अमेरिकेत लिस्टने अनेक उद्योग केले. प्रथम पेनसिल्व्हेनिया राज्यातील हॅरिसबर्ग गावाजवळ शेतकरी म्हणून आणि नंतर रेडिंग शहरात डेर ॲडलर या जर्मन वृत्तपत्राचा संपादक म्हणून तो काही काळ राहिला. तमाका शहराजवळील अँथ्रासाइट कोळसाखाणीचा शोध त्याने लावला व तो उद्योग चांगल्या प्रकारे वाढविला. या कोळसाखाणीतून माल नेण्याआणण्यासाठी त्याने जो लोहमार्ग बांधला-लिटल शूलकिल नॅव्हिगेशन रेलरोड अँड कनॅल कंपनी-त्याच्यावरून नोव्हेंबर १८३१ पासून वाहतूक सुरू झाली. त्या काळी माल व उतारू यांची वाहतूक करणारा तो एकमेव लोहमार्ग होता. उदयोन्मुख राष्ट्राला भेडसावणाऱ्या आर्थिक व राजकीय समस्यांकडे लिस्टचे लक्ष होते. त्यामुळेच औद्योगिक दृष्ट्या अर्धविकसित राष्ट्रांना संरक्षक जकाती ह्या निश्चितपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन लिस्टने आग्रहाने केले. चार्ल्स इंगरसोल ह्या एका उद्योजकाच्या सूचनेवरून लिस्टने आउटलाइन्स ऑफ अमेरिकन पोलिटिकल इकॉनॉमी हा आपला पहिला ग्रंथ पसिद्ध केला (१८२७). आपल्या मतांची सुव्यवस्थित मांडणी करून ती प्रकाशित करण्याचा तसेच भांडवलशाही राष्ट्राची अर्थव्यवस्था शब्दबद्ध करण्याचा तो पहिलाच प्रयत्न होता. या ग्रंथाच्या प्रती काँग्रेसच्या सदस्यांना वाटण्यात आल्या त्याचाच परिपाक १८२८ मध्ये जकात विधेयक (टॅरिफ बिल) संमत होण्यात झाला.

अँड्रू जॅक्सन या सातव्या अमेरिकन अध्यक्षाच्या निवडणूक प्रचारकार्यात (१८३२) लिस्टने हिरिरीने भाग घेऊन त्यास भरघोस साहाय्य केले. या निवडणुकीत जॅक्सन विजयी झाला. त्याबद्दल अमेरिकेचा जर्मनीतील कौन्सल म्हणून प्रथम हँबुर्ग येथे व नंतर लाइपसिक येथे लिस्टची नियुक्ती करण्यात आली. अमेरिकन कौन्सल म्हणून काम करीत असतानाही, लिस्टने जर्मन रेल्वेयंत्रणा उभारण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना आखली. तीनुसार त्याने १८३७ मध्ये लाइपसिक-ड्रेझ्डेन असा लोहमार्ग विकसित केला. यूरोप खंडामधील पहिल्या काही लोहमार्गांमध्ये याची गणना होते. हा उपक्रम वैयक्तिक व आर्थिक अशा दोन्ही दृष्टिकोनांतून निराशाजनकच ठरून परिणामी त्याला जर्मनी सोडून फ्रान्सला जावे लागले.

पॅरिस येथील वास्तव्यात लिस्टने आपला द नॅशनल सिस्टम ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी हा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ प्रथम जर्मन भाषेत (१८३७) लिहून पॅरिसच्या ‘ॲकडेमी ऑफ सायन्सेस, मोराल्स अँड पालिटिक्स’ या संस्थेस सादर केला. हा ग्रंथ १९२५ पर्यंत अप्रकाशितच राहिला. दोन वर्षांनी तो फ्रेंच व जर्मन अशा दोन्ही भाषांतून प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये लिस्टने आउटलाइन्स…… (१८२७) या आपल्या पहिल्या ग्रंथात मांडलेल्या सैद्धांतिक प्रणालीला ऐतिहासिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. परंतु त्याचे सखोल विवेचन आणि त्याला दिलेली आंतरराष्ट्रीय अनुभवांची जोड आपणाला त्याच्या द नॅशनल सिस्टम ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८४१) या ग्रंथातूनच पहावयास मिळते. १८४३ पासून लिस्टने Das Zollvereinsblatt या नावाचे आपल्या मताचा व विचारांचा प्रसार करणारे मासिक छापण्यास प्रारंभ केला. त्या काळी औद्योगिकीकरणाची जी लाट उसळली होती, तिचा तो परिणाम होता. जर्मनीतील लोकमतावर त्याच्या विचारांचा प्रभाव निश्चितच पडू लागल्याचे दिसून येते. तथापि आर्थिक विवंचना तसेच जर्मनी व ग्रेट ब्रिटन या दोन राष्ट्रांतील आर्थिक सहकार्याबाबत त्याने संकल्पिलेल्या योजनेचे अपयश यांच्या योगे त्याच्या मनात वैफल्य निर्माण झाले आणि ऑस्ट्रियातील कूफस्टिन या गावी त्याने आत्महत्या केली.

आर्थिक सिद्धांत आणि धोरण यांची आर्थिक परिस्थितीशी सांगड कशी घालावी, यावर लिस्टने नेहमीच भर दिला. त्याकाळी औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या ग्रेट ब्रिटनला मुक्त व्यापार परवडत असला, तरी जर्मनी आणि अमेरिका यांसारख्या अविकसित देशांना अनिर्बंध व्यापाराचे तत्त्व आत्मघाती ठरेल, असे मत त्याने आग्रहाने मांडले. अर्धविकसित देशांतील उद्योगधंदे बाल्यावस्थेत असतात, पुढारलेल्या देशांतून आयात केलेल्या स्वस्त व दर्जेदार वस्तूंशी स्पर्धा करणे प्रारंभीच्या काळात त्यांना शक्य होत नाही, अशा आयातीवर निर्बंध घातले नाहीत, तर अविकसित देशांतील उद्योग कोलमडतील, असे त्याचे म्हणणे होते. आयातीवर मोठ्या प्रमाणावर संरक्षक जकात बसविण्याचा परिणामकारक उपाय त्याने सुचविला. अविकसित देशांतील उद्योग भरभराटीस आले की, विकसित देशांतील उद्योगांशी स्पर्धा करण्याची क्षमता त्यांच्यात आपोआप निर्माण होईल आणि त्यांनतर संरक्षक जकातीची तटबंदी काढून टाकणे सहज साध्य होईल, असे त्याचे प्रतिपादन होते. त्याची ही विचारसरणी भारतासारख्या विकसनशील देशांत आजही ग्राह्य मानली जाते.

संदर्भ : 1. Brinkmann, Carl, Friedrich List, Berlin. 1949.

           2. Hirst, Margaret E. Life of Friedrich List and Selections From His Writings, London, 1909.

           3. Samuelson, Paul A. Postwar Economic Trends in the United States, New York, 1960.

           4. Streecton, Paul, Unbalanced Growth-Oxford Economic Papers New Series, Oxford 1959.

गद्रे, वि. रा.