व्हालरा, मेरी-एस्प्रित लेआँ : (१६ डिसेंबर १८३४–५ जानेवारी १९१०). प्रसिद्ध फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ. ह्याचा जन्म एव्हर (नॉर्मंडी) येथे झाला. त्याचे वडील हे अभ्यासू अर्थतज्ञ होते. लेआँ व्हालराने सुरुवातीस अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, पण नंतर वाङ्मय व शेवटी सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासावर त्याने लक्ष केंद्रित केले. काही काळ पत्रकार म्हणून त्याने काम केले. १८७१ मध्ये लॉसेन (स्वित्झर्लंड) विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. तेथे त्याने १८९२ पर्यंत अध्यापन केले. त्यानंतरही काही काळ एका प्रसिद्ध विमा कंपनीचा सल्लागार म्हणून काम केले.

व्हालरास अर्थशास्त्राच्या अध्ययनाची प्रेरणा कुर्नो (१८०१-७७) यांच्या एका पुस्तकापासून मिळाली. काही सनातनवादी तसेच कुर्नो, इसनार, प्वॉसो यांसारखे तत्कालीन अर्थशास्त्रज्ञ या सर्वांचा प्रभाव व्हालराच्या अर्थशास्त्रीय लेखनावर कमीअधिक प्रमाणात पडल्याचे जाणवते. त्याचे लेखन १८७० मध्ये सुरू झाले. इलिमेंट्स ऑफ प्युअर इकॉनॉमिक्स-खंड २ (१८७४ व १८७७), स्टडीज इन सोशल इकॉनॉमिक्स (१८९६०) व स्टडीज इन अप्लाइड पोलिटिकल इकॉनॉमी (१८९८) हे प्रमुख ग्रंथ होत.

अर्थव्यवस्थेतील सर्व विभागांच्या परस्परसंबंधातून एक सर्वसाधारण समतोल साधला जातो, हा सिद्धांत परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध स्वरूपात व्हालरने प्रथम मांडला. एकोणिसाव्या शतकात ही संकल्पना क्रांतिकारक होती. तिचा विस्तार प्रामुख्याने विसाव्या शतकात व तोही उत्तरार्धात वेगाने झालेला आढळतो. आपले प्रतिमान विशद करताना व्हालराने सर्व अर्थव्यवस्थेत स्पर्धात्मक परिस्थिती असते असे दाखवून दिले. यात सहभागी असणारे घटक, त्यांची उद्दिष्टे, त्यांचे कामकाज यांचेही त्याने विस्ताराने विवेचन केले आहे. जर या समतोलात काही बिघाड झाला, तर कोणत्या गतिमान पद्धतीने परिस्थितीची फेरजुळणी होते तेही स्पष्ट केले. या प्रक्रियेतील एक तर्कसंगत पायरी म्हणून त्याने वस्तूच्या समतोल किमती व त्यामार्फत होणारा विनिमय याबद्दलचा एक सिद्धांत निश्चित केला. सुरुवातीच्या विश्लेषणात त्याने वस्तुविनिमय-पद्धतीने होणारे देवाण-घेवाणीचे व्यवहार विशद केले. बाजारांमधील सर्व व्यवहार मागणी-पुरवठा तत्त्वानुसार होतात. मागणीचा दबाव कमीअधिक झाला, तर त्या प्रमाणात वस्तूचे विनिमय-मूल्यही कमीअधिक होत राहाते. हे जरी एका वस्तूबाबत खरे असले, तरी अशा वस्तूच्या विनिमयमूल्याच्या आणि मागणी-पुरवठ्याच्या नगसंख्येचा इतर सर्व वस्तूंच्या व्यवहारांवर परिणाम होतो. त्यामुळे वस्तूची मागणी जेव्हा निर्माण होते, तेव्हाच तिच्या मोबदल्यात इतर वस्तूंचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू होते, असे म्हणता येईल. अर्थव्यवस्थेतील अशा सर्व वस्तू व सेवांच्या मागणीची बेरीज सरतेशेवटी इतर वस्तू व सेवांच्या पुरवठ्याने संतुलित होते. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त मागणी अथवा न्यून मागणी अंतिम काळात राहू शकत नाही. हाच व्हालराचा नियम होय. जर बाजारात अथवा अर्थव्यवस्थेतील एखाद्या क्षेत्रात असंतुलन आढळून आले, तर किमतीतील किंवा विनिमयमूल्यातील बदलाने फेरजुळणी होते व सर्वसाधारण संतुलन एकाच वेळेस प्रस्थापित होते. सनातन अर्थशास्त्राची जी सैद्धांतिक बैठक होती, तिचाच विस्तार व्हालराने केला, असे म्हणता येईल.

व्हालरने उत्पादन-नफा यांच्या महत्तमीकरणाचे तत्त्व स्वीकारलेले होते. भांडवल, श्रम, नैसर्गिक घटक यांचा पुरवठा करणाऱ्यांना सर्वाधिक उत्पन्नाची अथवा मोबदल्याची अपेक्षा असते. व्हालराच्या विवेचनात उत्पादनघटकांची पूर्णगतिशीलता व बाजाराचे पूर्ण ज्ञान ही गृहीतेही समाविष्ट होती. पूर्ण स्पर्धा हा सनातन अर्थशास्त्राचा पाया त्यानेही स्वीकारला होता. स्पर्धात्मक जगात उद्योजकाला अतिरिक्त नफा अगर तोटा न होता शेवटी शून्य नफा परिस्थितीचा अनुभव येतो. वस्तूच्या मागणी व पुरवठ्याची नगसंख्या अशा वेळेस एकमेकास पूर्णपणे तोलणारी, म्हणजे एकमेकांबरोबर असते. ती वस्तू तयार करणाऱ्या उत्पादन घटकाचा पुरवठा व त्याची मागणी हेही एकमेकांबरोबर असतात. उत्पादकांची एकूण प्राप्ती व त्यांचा एकूण परिव्यय यांचीही येथे समानता असते. घटकबाजार व वस्तुबाजार हे एकमेकांशी जोडलेले असतात, हे व्हालराच्या उत्पादनासंबंधीच्या या विवेचनातून सूचित होते. अर्थव्यवस्थेतीलउत्पादनघटकांची खरेदी-विक्री, वस्तूची खरेदी-विक्री, बाजारातील व्यवहार हे सर्व सरतेशेवटी स्थिर समतोल परिस्थितीत येतात. व्हालराची ही विषयमांडणी सुरुवातीस स्थितीशील समतोल स्वरूपाची होती. तथापि उपयोगितांमध्ये बदल झाल्यामुळे जे सापेक्ष बदल ग्राहकाच्या समतोलाबाबत होतात, तसेच बदल त्यामुळे इतरही बाजारांमध्ये होतात. परिणामतः एखादी लाट पसरत जाते, त्याप्रमाणे इतर सर्व बाजार आपापल्या नव्या समतोलात स्थिरावतात. स्थितिशील विवेचनातून व्हालराने सापेक्ष स्थितिशील परिस्थिती विशद केल्याचे दिसून येते.

उत्पादनाच्या सिद्धांतातही व्हालराने उत्पादक सेवा व उत्पादित वस्तू यांच्या समतोल किमतींचे एक प्रतिमान मांडले. उत्पादन-घटकांची मागणी उद्योजक व्यक्त करताना ‘उत्पादनाच्या तांत्रिक सहगुणकाचा’ आधार घेतात. महत्तम उत्पन्नाची अपेक्षा उद्योजकांकडून करतात. त्या उत्पन्नातून तयार वस्तू व सेवांची मागणी केली जाते. हे सर्व घडवून आणणाऱ्या उद्योजकांना नफ्याद्वारे मोबदला मिळतो. उत्पादन घटकांचा बाजार आणि वस्तूचा बाजार एखाद्या कपडाच्या विणीसारखे एकमेकात गुंतलेले असतात. जर वस्तूची मागणी अचानक वाढली, तर पुरवठा तुलनेने अलवचीक असल्याने वस्तूची किंमत वाढते. उद्योजकांना त्या काळात जास्त नफा मिळतो. उत्पादनसंस्था आपले उत्पादन वाढवितात. नव्या उत्पादनसंस्था उद्योगधंद्यात प्रवेश करतात. उत्पादन घटकांची मागणी वाढते. त्यानुसार त्यांची किंमत वाढते व कालांतराने त्यांचा पुरवठा बाजारात वाढल्यानंतर परिणाम म्हणून वस्तूच्या किमतीही काही प्रमाणात उतरतात व अधिक नगसंख्येचा समतोल बाजारात नव्याने प्रस्थापित होतो. वस्तूची मागणी उतरल्यास याउलट प्रक्रियासाखळी घडून येते. अंतिम समतोलावेळी बाजारात वस्तूची किंमत आणि उत्पादनखर्च एकमेकांबरोबर असतात. उद्योजकाला अशा वेळी फक्त साधारण नफा मिळतो. यालाच व्हालराच्या लिखाणात ‘शून्य नफा’ असे नाव आहे. त्याच्या लिखाणात जागोजाग वस्तूची खरेदी-विक्री-उत्पादन-विनिमय यांच्या स्पष्टीकरणात असा सम्यक विचार आढळतो.

व्हालराच्या विवेचनात भांडवल उभारणीचाही वास्तव दृष्टिकोनातून विचार दिसतो. भांडवलाची किंमत व त्याला दिला जाणारा मोबदला यांचा स्वतंत्र विचार त्याच्या विषयमांडणीत आहे. भांडवलाच्या किमतीवर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक त्याने स्पष्ट केले आहेत. भांडवलाचा पुरवठा, भांडवल बदलले जात असताना असणारी त्याची नवी अपेक्षित किंमत, भांडवलाची झीज-घसारा, भांडवली वस्तूचा विमा, भांडवली वस्तूच्या वापराच्या कालात त्यावर मिळू शकणारे वार्षिक उत्पन्न इ. घटक या सर्व प्रक्रियेत आघाडीवर असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याला त्याने नव्या भांडवली वस्तूंच्या महत्तम उपयोगितेचा सिद्धांत असे नाव दिले. त्याच्या या विवेचनात पतपैसारूप भांडवलाचाही विचार झालेला आढळतो. याही मुद्यावर त्याने सापेक्ष स्थितिशील पद्धती वापरून जर परिस्थितीत बदल झाला, तर भांडवली वस्तूंच्या किमतीत आणि उपलब्धतेत कसकसे बदल होतील, ते दाखवून दिले आहे.


वस्तूरूप भांडवलाच्या संकल्पनेप्रमाणे व्हालराने फिरते भांडवल या भूमिकेतून पैशाबाबतचे विवेचन केले. १८७६ ते १८९९ च्या काळात व्हालराचा भर पैशाच्या विवेचनावर होता. वस्तू वापरून जशी उपयोगिता प्राप्त होते, त्याप्रमाणे पैसाही अप्रत्यक्षपणे उपयोगिता प्राप्त करून देत असतो. वस्तू व सेवांचा वापर करून महत्तम उपयोगिता प्राप्त करून घेण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. बचत करणारे गट पैसा आणि इतर वित्तीय साधनांच्या द्वारे पैशाचा पुरवठा करतात. पैशाच्या उपयोगास व्याजाच्या रूपाने मोबदला दिला जातो. जेव्हा रोख पैशाची मागणी वाढते, तेव्हा व्यक्ती व उद्योजक पैशाची किंमत–म्हणजे व्याजदर–वाढवितात. त्यानुसार वाढीव व्याजदर पातळीला कमी पैशाचा मागणी-पुरवठा होऊन बाजार समतोलात येतो. हा पैसा बाजारातील समतोल होय. समतोलातील बदल विशद करताना त्याने मांडलेला सिद्धांत आधुनिक पैसा सिद्धांताच्या जवळ येतो. चलनातील पैसा वाढल्यास पैशाचे मूल्य उतरते व किमतीची पातळी मात्र त्याच दिशेने बदलते, हे त्याच्या विवेचनाचे सूत्र आधुनिक चलन सिद्धांताला जवळचे ठरते.

अर्थव्यवस्थेतील विविध घडामोडींमागील घटनाक्रम स्पष्ट करताना व्हालराच्या आर्थिक विकास किंवा अभिवृद्धीच्या संकल्पनेबद्दल काही कल्पना येऊ शकते. एक म्हणजे, त्याने विशद केलेल्या समतोलाच्या प्रतिमानातील चल घटकांमध्ये बदल घडून आल्यास काही प्रमाणात गतिमान परिस्थिती दिसून येते. येथे विकासाचा विचार प्रतीत होतो. पारंपरिक नैसर्गिक साधनांच्या ऐवजी भांडवलाचा पर्याय म्हणून वापर करणे व त्यानुसार उत्पादनपद्धतीत सुधारणा करीत नेणे, हे अर्थिक अभिवृद्धीचे गमक होय, असेही त्याने दुसरीकडे मांडलेले आढळते. या पर्यायता-प्रक्रियेसाठी त्याने सीमांत उत्पादकता सिद्धांताचा आधार घेतलेला आहे, असे दिसते.

व्हालराने स्वतःला एके ठिकाणी ‘शास्त्रीय समाजवादी’ म्हणून घेतले आहे. जमिनीचे आणि नैसर्गिक मक्तेदार्यांडचे राष्ट्रीयीकरण करावे असे त्याने सुचविले आहेच. त्याचे आर्थिक धोरण सरकारच्या मुबलक हस्तक्षेपावर आधारित होते, उदा. देशात प्रगत भांडवलबाजार असावा व सरकारने त्याचे नियमन करावे, असे त्याने म्हटले आहे. किमतींचे स्थिरीकरण करण्यासाठी शासनाने प्रयत्नशील असावे, असे त्याचे प्रतिपादन होते. करांचा बोजा जनतेवर टाकणे अन्यायकारक असल्याने कर रद्दच करावेत, असे त्याने १९०५ साली लिहिलेल्या पत्रात आग्रहाने मांडले.

व्हालराच्या विचारांवर काही बाजूंनी टीकाही झाली. त्याचा सर्वसाधारण समतोलाचा सिद्धांत तितकासा सर्वसाधारण राहात नाही, असे म्हटले गेले. तथापि व्हालरा याच्या कालाच्या संदर्भात विचार केला, तर या टीकेतील अनेक मुद्दे संदर्भहीन आहेत असे ध्यानात येते. सीमान्त उपयोगितेच्या संकल्पनेचा वापर व्हालराने विविध बाजारांमधील परस्परावलंबी समतोल विशद करण्यासाठी केला. तसे पाहता विविध स्पर्धात्मक बाजारांमधील विनिमयाचा त्याचा सिद्धांत काळाच्या कितीतरी पुढे होता. अर्थव्यवस्थेची सम्यक व समग्रलक्ष्यी संकल्पना आणि गणिती समीकरणांच्या मदतीने मांडलेले सर्वसाधारण समतोलाचे चित्र, हे त्याचे योगदान निःसंशय महत्त्वाचे आहे. व्हालराच्या नियमाची दखल प्रथम ⇨ ऑस्कर लांगे यांनी १९४२ मधील एका लेखात घेतलेली आढळते. व्हालरा याच्या नावावर १८५८ ते १९०५ च्या दरम्यान लिहिली गेलेली अर्थशास्त्रातील महत्त्वाची अशी १९ पुस्तके आहेत. मार्शल याच्या अर्थशास्त्राची मूलतत्त्वे या प्रसिद्ध पुस्तकात (१९८०) व्हालराचा पुसटसा उल्लेख फक्त तीन वेळा आला आहे. ब्रिटिश अर्थतज्ञांनी आपली उपेक्षा केली, अशी खंत त्याने समकालीन मित्रांशी केलेल्या पत्रव्यवहारात व्यक्त केली आहे. (संदर्भ : वॉकर यांचा जर्नल ऑफ पोलिटिकल इकॉनॉमिकधील लेख, जुलै-ऑगस्ट १९७०). तथापि नंतरच्या अनेक मान्यवर अर्थशास्त्रज्ञांनी व्हालराच्या योगदानाचा आवर्जून निर्वाळा दिल्याचे दिसते. १९८४ मध्ये ल्यॉन विद्यापीठात व्हालराच्या नावे अध्यासन निर्माण करण्यात आले.

समग्रलक्ष्यी अर्थसास्त्राची शाखा विसाव्या शतकात हेन्री शुल्झ, न्यूमन, सर जॉन हिक्स, ऑस्कर लांगे, पॉल सॅम्युअलसन, देब्रो, पॅटिंकिन, केनेथ ॲरो इत्यादींच्या लेखनाने गजबजून गेलेली आहे त्यांचा मूलाधार व्हालराच्या लेखनात आहे.

संदर्भ : 1. Blaug, Maarc, Economic Theory in Retrospect, 1987.

            2. Keynes, J. M. Essays in Biography, New York, 1933.

            3. Morishima,  M. Walra’s Economics, London, 1977.

            4. Schumpeter, J. A. A History of Economic Analysis, New York, 1954.

            5. Schumpeter, J. A. Ten Great Economist, New York 1951.

            6. Walker, D. A. Leon Walras : The New Palgrave Dictionary of Economics, 1987.

            7. Walras, Leon Trans. William, Jaffe, Elements of Pure Economics, London, 1954.

दास्ताने, संतोष