हिक्स, सर जॉन रिचर्ड : (८ एप्रिल १९०४–२० मे १९८९). विसाव्या शतकातील एक प्रभावशाली ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. त्याचा जन्म सुशिक्षित कुटुंबात वारविकशर परगण्यातील (इंग्लंड) लिमिंग्टन स्पा या गावी झाला. त्याचे वडील स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार होते. हिक्सने विकसित केलेल्या आर्थिक समतोल व मूल्य सिद्धांता-बद्दल त्याला १९७२ मध्ये नोबेल पा रि तो षि क अमेरिकेच्या हार्व्हर्ड विद्यापीठातील केनेथ ॲरो याच्या-बरोबर विभागून देण्यात आले. हिक्सने आपले पारितोषिक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्सच्या ग्रंथालयास देणगी म्हणून दिले (१९७३). तत्पूर्वी १९६४ मध्ये त्याला सरदारकी (नाइट) देऊन गौरविण्यात आले. 

 

सर जॉन रिचर्ड हिक्स 
 

हिक्सचे शिक्षण सुरुवातीस क्लिफ्टन कॉलेज (१९१७–२२) व नंतर बॅलिओल कॉलेज, ऑक्सफर्ड (१९२२–२६) येथे झाले. त्याने पदवी संपादन केली आणि अध्यापन व्यवसाय अंगीकारला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स (१९२६–३५) यात अधिव्याख्याता म्हणून अध्यापन केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठ (१९३५–३८), मँचेस्टर विद्यापीठ (१९३८–४६), न्यूफिल्ड कॉलेज, ऑक्सफर्ड (१९४६–५२) आदींमधून त्याने अर्थशास्त्राचे अध्यापन केले. दरम्यान महाविद्यालयातील सहाध्यायी उर्सूला वेब हिच्याशी त्याने लग्न केले (१९३५). त्यानंतर पुढील जवळपास दोन दशके ऑल सोल्स कॉलेज, ऑक्सफर्ड (१९५२–७१) येथे सन्माननीय सदस्य व ड्रमंड गुणश्री प्राध्यापक म्हणून तो कार्यरत होता. अध्यापनाबरोबरच त्याने पुढील पदे भूषविली : फेलो ऑफ ब्रिटिश अकॅडेमी (१९५८), प्रेसिडेंट ऑफ रॉयल इकॉनॉमिक सोसायटी (१९६०–६२). त्याला ग्लासगो, मँचेस्टर, ईस्ट अंजिला व वारविक या विद्यापीठांनी अर्थशास्त्रातील संशोधनाबद्दल सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली. 

 

हिक्सचे सुरुवातीचे एक श्रमिक अर्थतज्ज्ञ म्हणून नावाजलेले काम मजुरीच्या सिद्धांतामध्ये प्रतिबिंबित झाले असून अद्यापही त्या क्षेत्रात प्रमाण मानले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रातील ग्राहक-मागणी सिद्धांतातील गृहीतक व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ केन्सच्या स्थूल अर्थशास्त्रातील दृष्टिकोनाबाबत सारांशरूपाने विकसित केलेली प्रतिकृती (१९३७) हे हिक्सचे सर्वांत मोठे योगदान मानले जाते. त्याचा आर्थिक समतोलाचा सिद्धांत हा पैसा, सेवन व गुंतवणूक या अर्थव्यवस्थेतील तीन महत्त्वाच्या घटकांमधील समतोलाचे विवेचन करतो. व्हॅल्यू अँड कॅपिटल (१९३९) या अभिजात ग्रंथात व्यापारचक्र सिद्धांत आणि संतुलन सिद्धांत यांमधील मूलभूत संघर्ष दूर करण्याचे तत्त्व त्याने मांडले. वस्तूंच्या उपयुक्ततेची मोजदाद करता येते, हे गृहीतक विचारात न घेताही वस्तूचे मूल्य निश्चित करण्याविषयीचा मूल्य सिद्धांत मांडणे शक्य आहे. शासकीय धोरणांमध्ये बदल केल्यास त्याचे समाजावर कसे परिणाम होतात, हे अभ्यासण्याचे तंत्रही त्याने विकसित केले. व्यवहारात ज्यांचा फायदा होतो, त्यांच्याकडून नुकसान होणाऱ्यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भरपाई होत असल्यास आर्थिक धोरणातील बदल परिणामकारक होत असतात. हिक्स आणि ॲरो यांनी प्रस्थापित केलेले सिद्धांत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व खासगी क्षेत्रांत परदेशी व्यापार, विनियोग धोरण आणि बाजारभाव या संदर्भांत वापरले जातात. 

 

हिक्सने सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, चलन सिद्धांत, शासकीय अर्थकारण, व्यापारचक्र इ. क्षेत्रांत विपुल लेखन केले असून त्याच्या ग्रंथांपैकी द थिअरी ऑफ वेजेस (१९३२ दु. आवृ. १९६३), ए सोशल फ्रेमवर्क : ॲन इंट्रॉडक्शन टू इकॉनॉमिक्स (१९४२), एसेज् इन वर्ल्ड इकॉनॉमिक्स (१९५९), इकॉनॉमिक परस्पेक्टिव्ह (१९७६), कलेक्टेड पेपर्स (दोन खंड, १९८१-८२), ए मार्केट थिअरी ऑफ मनी (१९८९) इ. महत्त्वाचे व मान्यवर होत. 

 

ब्लाकली (ग्लुसेस्टरशर) येथे त्याचे निधन झाले.

चौधरी, जयवंत