जनसंपर्क : व्यवस्थापनाच्या कार्यांपैकी हे एक महत्वाचे कार्य मानले जाते. यामध्ये लोकांचा आपल्या संस्थेविषयीचा कल अजमावणे, तिच्या धोरणांचा व कार्यपद्धतीचा लोकहिताशी मेळ साधणे व लोकांच्या सदिच्छा मिळविणे यांचा समावेश होतो. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी व संस्थेचे महत्त्व आणि तिचा उपयोग लोकांना पटवून देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्नही जनसंपर्कातच मोडतात. मात्र जनसंपर्क म्हणजे प्रचार नव्हे [⟶ प्रचार].

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी १९१७ मध्ये जॉर्ज क्रील या पत्रकाराच्या अध्यक्षतेखाली एक लोकवार्ता समिती नेमली व तेथूनच जनसंपर्क हे नवीन शास्त्र उदयास आले, असे मानतात. असे असले, तरी जनसंपर्काचा अवलंब या ना त्या स्वरूपात फार पूर्वीपासून करण्यात येत असे.

भाटांची स्तुतिस्तोत्रे, पुढाऱ्यांची भाषणे, प्रवाशांची प्रवासवर्णने व धर्मनेत्यांची प्रवचने ही एका प्रकारे जनसंपर्कांचीच ऐतिहासिक उदाहरणे होत. ग्रीक आणि रोमन अंमलात सत्ताधीश जनसंपर्कांचे तंत्र हाताळण्यामध्ये तरबेज होते. ख्रिस्ती धर्माच्या प्रचारकांनीही जनसंपर्क साधून लोकमत आपल्या पंथास अनुकूल करण्यात यश मिळविले होते. छपाईच्या कलेचा शोध लागल्यानंतर पुस्तके व प्रचारसाधने छापता येऊ लागली त्यामुळे जनसंपर्काचे प्रयत्न करून अनेक क्षेत्रांत लोकमतावर प्रभाव पाडणे सुकर झाले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या व अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पुढाऱ्यांनीदेखील आपल्या चळवळीच्या यशासाठी जनसंपर्काचा वापर मुबलक प्रमाणावर केला. एकोणिसाव्या शतकांच्या उत्तरार्धात आपापल्या संस्थांना वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळावी, म्हणून अमेरिकेतील उद्योगपतींनी खास एजंटही नेमले होते. पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळीसुद्धा लोकमतावर छाप पाडण्यासाठी जनसंपर्काच्या तंत्राचा विशेष वापर करण्यात आला. या तंत्राच्या विकासाला अमेरिकेतील दोन जनसंपर्कतज्ञांनी विशेष हातभार लावला. रॉकफेलरसारख्या मोठमोठ्या उद्योगपतींचे कार्य व व्यवहार पत्रकारांपासून गुप्त ठेवण्याऐवजी त्यांना सविस्तर माहिती पुरवून आय्‌व्ही एल्. ली या तज्ञाने एक नवीनच पायंडा पाडला व अनेक उद्योगसंस्थांनी जनसंपर्कासाठी त्याचे मार्गदर्शन स्वीकारले. दुसरा तज्ञ एडवर्ड एल्. बर्नेज् याने लीच्या तंत्राचा अधिक सखोल वापर करून लोकमत म्हणजे लोकांच्या वेगवेगळ्या गटांचे मत असते, असे प्रतिपादून प्रत्येक गटास अनुकूल करून घेण्यासाठी विशिष्ट प्रकाराने जनसंपर्क साधावा लागतो, हे दाखवून दिले. शिवाय या दोघा तज्ञांनी जनसंपर्क हा एक व्यवसाय होऊ शकतो, हे अमेरिकेतील उद्योगसंस्थांना पटवून दिले.

पहिल्या जागतिक युद्धानंतरच्या वीस वर्षांत अमेरिकेत जनसंपर्क व्यवसायाचा खूपच विकास झाला आणि अनेक व्यवसायतज्ञ उद्योगसंस्थांना जनसंपर्क साधण्यासाठी सल्ला देऊ लागले. साहजिकच त्यांच्यापैकी काहींनी फसवेगिरी करून संस्थांना लुबाडलेदेखील. विद्यापीठांतील काही नामवंत प्राध्यापकही या व्यवसायात शिरले व त्यांनी व्यवसायाचा दर्जा उंचावण्यास मदत केली. विशेषतः त्यांनी लोकमत संशोधनाचे तंत्र शास्त्रीय पद्धतीने हाताळले. अशा व्यक्तींमध्ये जॉर्ज गॅलप, क्लॉड, रॉबिन्सन व रेक्स हार्लो यांची प्रामुख्याने गणना होते.

शासकीय संस्थांना जनसंपर्काची गरज भासू लागली, तेव्हा माहिती संचालक वा माहिती संशोधन अधीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका होऊ लागल्या. ब्रिटनमध्ये साम्राज्य विपणन मंडळाने १९२४ मध्ये व्यापाराचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क साधला. दुसऱ्या महायुद्धात तर ब्रिटन आणि अमेरिका या देशांत शासकीय विभागांनी जनसंपर्क संचालक नेमले. भारतात जनसंपर्काची थोडीफार जबाबदारी माहिती व नभोवाणी मंत्रालय व राज्य जनसंपर्क संचालक यांकडे असते. निरनिराळ्या राष्ट्रांतील सत्ताधारी पक्षाच्या संघटनादेखील ही जबाबदारी बऱ्याच अंशी पार पाडीत असतात.

आजच्या गुंतागुंतीच्या युगात मोठ्या प्रमाणावर उत्पादन, व्यापार व आर्थिक उलाढाली करणाऱ्या संस्थांविषयी नागरिकांना कुतूहल असते. शासकीय संस्थांच्या कारभाराविषयीही त्यांना औत्सुक्य असते. अशा संस्थांच्या धोरणाचे त्यांच्यावर महत्त्वाचे परिणाम होत असतात. साहजिकच त्या संस्थांची माहिती मिळविण्यास ते उत्सुक असतात. पूर्वीच्या काळी अशी माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे, असे संस्थांचे व्यवस्थापक मानीत परंतु जनमताचे महत्त्व जस जसे त्यांना पटू लागले, तसतशी संस्थेची माहिती योग्य तऱ्हेने लोकांना पुरविल्यास तीपासून संस्थेला काहीही धोका संभवणार नाही, अशी त्यांची खात्री होत गेली. ही माहिती पुरविण्याचे कार्य जनसंपर्क विभागाकडे सोपविण्यात येऊ लागले. उद्योगसंस्थांना व शासन यंत्रणेला जनसंपर्क विभाग आवश्यक वाटू लागला. या विभागातील तज्ञ जनमताचा सतत अभ्यास करतात. त्याचा संस्थेवर काय परिणाम होतो व संस्थेची प्रतिमा लोकमानसात कशी आढळते, याचे संशोधन करून व्यवस्थापकांना लोकमताची जवळून ओळख पटते व त्यांना आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव होऊन संस्थेची प्रतिमा उजळ राखण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे सोपे जाते.

जनसंपर्काचे कार्य परिणामकारक रीतीने हाताळण्यासाठी जनसंपर्क विभागास अनेक प्रकारची जबाबदारी स्वीकारावी लागते. विशिष्ट प्रश्न किंवा संस्था यांसंबंधी लोकांचे मत काय आहे हे अजमाविणे, ते प्रतिकूल असल्यास अनुकूल व्हावे म्हणून काय केले पाहिजे हे सुचविणे, लोकांना हवी असलेली व द्यावयाची माहिती योग्य स्वरूपात तयार करणे, ती पुरविण्याची योग्य संधी निवडणे, माहिती पुरविण्यासाठी परिणामकारक बहुजन माध्यमांचा वापर करणे, संस्थेचे कार्य व धोरण यांविषयी लोकांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या मनात गैरसमज पसरू न देण्याची दक्षता बाळगणे इ. कार्ये जनसंपर्क विभागास पार पाडावी लागतात. जनसंपर्क विभागाला छापील व भाषित अशा सर्व उपलब्ध प्रचारमाध्यमांचा उपयोग करावा लागतो या माध्यमांद्वारा हा विभाग खालीलप्रमाणे कार्य करतो : वृत्तपत्रे, नभोवाणीकेंद्रे, व्यापारविषयक मासिके व अन्य मासिके ह्यांच्याकडे आपल्या संस्थेच्या कार्याची माहिती देणे पत्रकारपरिषदा भरविणे  वृत्तसंस्था व जनता यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे जनसंपर्काच्या जाहिराती, पत्रिका, कर्मचाऱ्यांची मासिके किंवा संस्थापत्रिका (हाऊस मॅग्‌झिन्स), नव्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणार्थ नियमपुस्तिका, भागधारकांकरिता संस्था-अहवाल व विविध पत्रनमुने या सर्वांसाठी मजकूर (लिखित माहिती) व शक्य तेथे द्यावयाची चित्रे तयार करणे अनुबोधपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नकाशे, फीतमुद्रित भाषणे वगैरेंची आखणी करणे, प्रदर्शनांची उभारणी व प्रसिद्धी करणे आणि कर्मचारी, ग्राहक किंवा सामान्य जनता यांची मते वा अभिप्राय अजमाविण्यासाठी संशोधन सर्वेक्षणे आयोजित करणे. लोक व व्यवस्थापक यांमध्ये सामाजिक जबाबदाराची जाणीव उत्पन्न करून जनसंपर्क विभागाचे तज्ञ एक प्रकारे समाजाची सेवाच करीत असतात.

बहुतेक पाश्चात्त्य देशांत जनसंपर्काचा वापर हा एक प्रतिष्ठित व्यवसाय झाला आहे. त्याची प्रतिष्ठा टिकावी म्हणून जनसंपर्कतज्ञांनी संघटित होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था स्थापल्या आहेत, विद्यापीठांशी संपर्क साधून व परीक्षायंत्रणा उभारून आपल्या विषयाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे व जनसंपर्क व्यवसायींसाठी आचारसंहिताही तयार केली आहे. बँकिंग, कृषी, शिक्षण, लोकोपकार यांसारख्या क्षेत्रांमध्ये जनसंपर्काचे विशेषीकरण झालेले आढळून येते.

भारतातही ‘जनसंपर्क संस्था ’ (पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया) स्थापन झाली असून जनसंपर्काचा वापर दिवसेंदिवस सरकारी व खाजगी क्षेत्रांतील उद्योगधंदे, लोकोपयोगी सेवाउद्योग, हॉटेल व पर्यटन उद्योग यांमधून वाढत्या प्रमाणात केला जात आहे. मद्रास विद्यापीठाने १९७५ मध्ये ‘जनसंपर्क व व्यवस्थापन संस्थे ’च्या सहकार्याने मद्रास येथील ‘स्टेला मॉरिस ’ या स्त्रियांच्या महाविद्यालयात जनसंपर्क विषयातील तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला असून, अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच उपक्रम आहे.

पदा : जाहिरात.

संदर्भ : Black, Sam, Practical Public Relations, London, 1966.

धोंगडे, ए, रा.