एंगेल्स, फ्रीड्रिख : (२८ नोव्हेंबर १८२०–५ ऑगस्ट १८९५). जर्मन समाजवादी, कार्ल मार्क्सचा सर्वांत निकटचा सहकारी व शास्त्रीय समाजवादाचा एक प्रस्थापक. त्याचा जन्म र्‍हाईनलँडमधील बार्मेन या औद्योगिक शहरी झाला. र्‍हाईनलँडच्या धनाढ्य कारखानदाराच्या आठ मुलांपैकी फ्रीड्रिख हा सर्वांत मोठा मुलगा. वयाच्या सतराव्या वर्षी तो आपल्या वडिलांच्या उद्योगात शिरला. प्रथम व्यावसायिक उमेदवारी, नंतर प्रशियाच्या सैन्यदलात सैनिकी पेशा आणि पुढे १८४८–६९ या काळात वडिलांच्या मँचेस्टर येथील कापडगिरणीत अनुक्रमे कर्मचारी, भागीदार व एक संचालक म्हणून त्याने काम केले. फुरसतीचा वेळ तो वाचन व लेखन ह्यांसाठी खर्च करी. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी तो आपल्या उद्योगव्यवसायातून निवृत्त झाला आणि उर्वरित आयुष्य त्याने राजकारण व लेखन ह्यांस वाहून घेतले.

फ्रीड्रिख एंगेल्स

एंगेल्स वयाच्या एकविसाव्या वर्षी मोझेस हेसच्या (१८१२–१८७५) विचारांनी प्रभावित झाला. समाजवादी चळवळीचा बारकाईने अभ्यास करून तीसंबंधी लेखन करीत असताना, मार्क्स संपादन करीत असलेल्या नियतकालिकात एंगेल्सने’खाजगी मालमत्ता रद्द करावी’ असे मत व्यक्त करणारा लेख लिहिला. त्या निमित्ताने त्याचा मार्क्सशी पत्रव्यवहार सुरू झाला आणि १८४४ मध्ये दोघांची जेव्हा पॅरिस येथे भेट झाली, तेव्हा बहुतेक विचारांसंबंधी आपले एकमत असल्याचे त्यांना आढळून आले. यानंतर अखेरपर्यंत त्याने मार्क्सला सर्वतोपरी सहकार्य दिले. दारिद्र्यात पिचणाऱ्या मार्क्सला त्याने आर्थिक साहाय्य केले आणि मृत्युपत्राद्वारे आपली सर्व मालमत्ता मार्क्सच्या मुलांच्या नावे करून ठेवली. मार्क्सने एंगेल्सच्या साहाय्याने अनेक ग्रंथांची निर्मिती केली. द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो (१८४८) हा त्यांचा जगप्रसिद्ध निबंध होय. मार्क्सच्या निधनानंतर मार्क्सने लिहून ठेवलेली अपूर्ण व अप्रकाशित ग्रंथांची हस्तलिखिते एंगेल्सने संपादित केली आणि त्यांच्या अनेक आवृत्त्या स्वत: प्रस्तावना जोडून प्रसिद्ध केल्या. द कॅपिटलचा दुसरा खंड त्याने संपादित केला व मार्क्सने मागे ठेवलेल्या आराखड्याच्या अनुरोधाने तिसऱ्या खंडाची मुद्रित प्रतही त्याने तयार केली. या प्रसिद्ध ग्रंथाच्या लेखनात त्याचा वाटा किती, हे निश्चित करणे कठीण आहे.

मार्क्सच्या व्यक्तिमत्त्वापुढे एंगेल्सचे व्यक्तिमत्त्व झाकोळून गेल्यासारखे दिसत असले, तरी त्याच्या स्वतंत्र प्रज्ञेची साक्ष त्याने केलेल्या ग्रंथनिर्मितीत सापडते. कामगारांची परिस्थिती जवळून पाहून त्याने वयाच्या चोविसाव्या वर्षी लिहिलेल्या, द कंडिशन ऑफ द वर्किंग क्‍लास इन इंग्‍लंड (१८४५) या पुस्तकाची सर्वत्र वाहवा झाली. द पेझंट वॉर इन जर्मनी (१८५०); जर्मनी :रेव्होलूशन अँड काउंटर रेव्होलूशन (१८५१); तसेच कार्ल ड्यूरिंग (१८३३–१९२१) या जर्मन समाजवाद्याचे खंडन करणाराहेर् ऑइगेन ड्यूरिंग्ज रेव्होलूशन इन सायन्स हा ग्रंथ (इं. शी.अँटि-ड्यूरिंग) (१८७८), शास्त्रीय समाजवादावरीलसोशॅलिझम :यूटो पियन अँड सायंटिफिकहा ग्रंथ (१८८०) आणिद ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट (१८८४) या त्याच्या ग्रंथांना साम्यवादी वाङ्‌मयात महत्त्वपूर्ण स्थान आहे. मार्क्सवाद व विरोधविकासाधिष्ठित भौतिकवाद या दोन सिद्धांतांवर एंगेल्सच्या बुद्धिमत्तेचा खोल ठसा उमटलेला आढळतो. वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी तो लंडन येथे कर्करोगाने मरण पावला. त्याच्या अंतिम इच्छेमुसार त्याचे शव दहन करण्यात येऊन ईस्टबोर्न–त्याचे प्रिय आरोग्यस्थान–येथील समुद्रात त्याची रक्षा विखरण्यात आली.

संदर्भ : 1. Coates, Zelda (Kahan), The Life and Teachings of Friedrich Engels, London, 1945.

2. Kautsky, Karl. Friedrich Engels : His Life, His Work and His Writings, Chicago, 1899.

3. Mayer, Gustav, Friedrich Engels : A Biography, London, 1936.

गद्रे, वि. रा.