केन्स, जॉन मेनार्ड : (५ जून १८८३–२१ एप्रिल १९४६). जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. इंग्लंडमधील केंब्रिज येथे त्याचा जन्म झाला. नामवंत तर्कशास्त्राज्ञ व द स्कोप अँड मेथड ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८९१) या ग्रंथाचे लेखक जॉन नेव्हिल केन्स हे त्याचे वडील. जॉन मेनार्ड केन्सने केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजमध्ये गणित विषयाची पदवी संपादन केली असली, तरी त्याचा ओढा अर्थशास्त्राकडे होता. केंब्रिज अर्थशास्त्रज्ञ मार्शल व पिगू यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अर्थशास्त्राचे धडे घेतले. १९०६ मध्ये तो भारतीय सनदी नोकरीत शिरला व त्याची ‘इंडिया ऑफिस’मध्ये नेमणूक झाली. पण दोन वर्षांतच त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्याने केंब्रिज येथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नोकरी पतकरली. १९११ मध्ये इकॉनॉमिक जर्नलच्या  संपादकपदी त्याची नेमणूक झाली. ही जबाबदारी त्याने १९४५ पर्यंत सांभाळली. १९१३ मध्ये त्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा इंडियन करन्सी अँड फायनान्स  हा ग्रंथ लिहिला. भारताला मध्यवर्ती बँकेची आवश्यकता असल्याचे त्याने या प्रबंधात प्रतिपादन केले.

जॉन मेचार्ड केन्स

पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर १९१५ मध्ये केन्सची नेमणूक ट्रेझरीमध्ये करण्यात आली युद्ध संपल्यानंतर पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेत त्याच्याकडे ट्रेझरीचे प्रमुख प्रतिनिधित्व होते परंतु परिषदेतील वाटाघाटी व व्हर्सायच्या तहाच्या अटी त्यास पसंत नव्हत्या म्हणून १९१९ मध्ये त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच प्रसिद्ध केलेल्या आपल्या इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सिस् ऑफ द पीस (१९१९) या ग्रंथात त्याने आपल्या दृष्टिकोनाचे विवरण करून तहाच्या अटींवर कडक टीका केली. या ग्रंथाने त्यास आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. १९२१ मध्ये त्याने लिहिलेल्या अ ट्रीटिज ऑन प्रॉबॅबिलिटी  या ग्रंथामुळे संख्याशास्त्रविषयक साहित्यात मोलाची भर पडली आहे. १९२० पासून चलनविषयक सिद्धांतासंबंधीच्या नव्या संकल्पना त्याच्या मनात घोळत होत्या. त्या विषयावर अ ट्रॅक्ट ऑन मॉनेटरी रिफॉर्म (१९२३) व ट्रीटिज ऑन मनी (१९३०) हे दोन प्रबंध प्रसिद्ध करून त्यांत पैशाच्या क्रयशक्तीचे बचत व गुंतवणूक यांवर होणारे परिणाम ह्यांसंबंधीची काही मूलभूत समीकरणे त्याने मांडली. अर्थशास्त्र – विचारात क्रांती करणारा त्याचा जगप्रसिद्ध ग्रंथ द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी  १९३६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्याने सनातन अर्थशास्त्रावर प्रखर हल्ला चढविला आणि व्यापारचक्राचा एक अपरिहार्य भाग ह्या दृष्टीने वारंवार येणाऱ्या मंदीवर उतारा म्हणून सरकारी क्षेत्रातील गुंतवणुकीचा जोरदार पुरस्कार केला. या ग्रंथात त्याने पूर्ण रोजगारी, बचत आणि गुंतवणूक, व्याज दर यांविषयी मांडलेले विचार अर्थशास्त्राच्या विकासाला नवे वळण लावणारे ठरले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धकालीन अर्थकारणाचे त्याने हाउ टू पे फॉर द वॉर (१९४२) या पुस्तिकेत पृथक्करण केले आणि युद्धखर्चासाठी करयोजनेबरोबर सक्तीच्या बचतयोजनेची आवश्यकता प्रतिपादन केली. १९४१ मध्ये केन्सला अर्थखात्याचा सल्लागार म्हणून पाचारण करण्यात आले. १९४२ मध्ये ‘सर’ पदवी घेऊन त्याचा गौरव करण्यात आला. १९४४ मध्ये ब्रेटन वुड्स येथे परिषद घडवून आणण्यात आणि ‘आंतरराष्ट्रीय चलन निधी’ आणि ‘जागतिक बँक’ स्थापन करण्याच्या कामी त्याने पुढाकार घेतला.

प्रतिभावंत लेखक, पट्टीचा वक्ता, कुशाग्र बुद्धीचा विचारवंत, विविध कलांचा जाणता रसिक असे केन्स याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. रशियन नर्तकी लिडिया लोपोकोव्हा हिच्याशी १९२५ मध्ये झालेला त्याचा विवाह फार सुखाचा ठरला. आपल्या अर्थशास्त्रविषयक ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करून केन्सने अपार संपत्ती मिळविली.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आर्थिक विचार सरणीवर केन्स याच्या विचारांचा खोल ठसा उमटलेला आहे. त्याच्या आर्थिक सिद्धांतांच्या इष्टानिष्टतेबद्दल मतभेद संभवतात. मात्र त्याने अर्थशास्त्राच्या विकासाला मोठाच हातभार लावल्याचे टीकाकारही मान्य करतात. त्याने केलेल्या विविध आर्थिक प्रश्नांच्या पारदर्शी विश्लेषणामुळे भारावून जाऊन अनेक नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी त्या विश्लेषणात ‘केन्सप्रणीत क्रांती’ असे संबोधिले आहे. केन्स ससेक्स येथील आपल्या राहत्या घरी हृदयविकाराने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन पावला.

संदर्भ: 1. Hansen, A. H. A Guide to Keynes, New York, 1953.

           2. Harris, S. E. John Maynard Keynes : Economist and Policy Marker, New York, 1955.

3. Harris, S. E. Ed. The New Economics : Keynes’s Influence on Theory and Public Policy, New York, 1965.

4. Harrod, R. F. The Life of John Maynard Keynes, London, 1963.

5. Klein, L. R. The Keyensian Revolution, New York, 1966.

भेण्डे, सुभाष